Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 14

यवाब दावीदाकडे एका चतुर बाईला पाठवतो

14 अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले. तेव्हा तकोवा येथे निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर बाईला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, “तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्याला शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या बाईसारखी तू दिसली पाहिजेस. राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल.” यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले.

मग तकोवा येथील बाई राजाशी बोलली. तिने स्वतःला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, “कृपाकरून मला मदत करा.”

राजाने तिची विचारपूस करुन तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, “मी एक विधवा बाई मला दोन मुलगे होते. एकदा शेतात त्यांचे भांडण जुंपले, त्यांना थोपवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला. आता सगळे घर माझ्याविरुद्ध आहे. सगळे मला म्हणतात, ‘आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्याला आम्ही मारून टाकतो. कारण त्याने आपल्या भावाला मारले.’ माझा मुलगा हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या मुलाचा जीव घेतला तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही.”

हे ऐकून राजा तिला म्हणाला, “मी यात लक्ष घालतो. तू घरी जा.”

तेव्हा ती बाई राजाला म्हणाली, “माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी दोषी आहे, तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत.”

10 राजा दावीद म्हणाला, “तुझ्याविरुद्ध कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे आण तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही.”

11 ती तकोवा येथील बाई पुन्हा राजाला म्हणाली, “परमेश्वरा देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्याला धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या.”

दावीद म्हणाला, “परमेश्वर असे पर्यंत कोणीही तुझ्या मुलाला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.”

12 मग ती म्हणाली, “माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे परवानगी असावी.”

राजा म्हणाला, “बोल”

13 त्यावर ती म्हणाली, “तुम्ही देवाच्या लोकांच्या विरुद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वतः दोषी ठरता. कारण तुम्ही आपल्या घराबाहेर घालवलेल्या मुलाला पुन्हा परत आणलेले नाही. 14 आपण सर्वच कधीना कधी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्याला आपल्यापासून पळायला लावत नाही. 15 स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, ‘राजाशी मी बोलेन. कदाचित् तोच मला मदत करील. 16 तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या माणसापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जे दिले त्यापासून हा माणूस आम्हाला वंचित करू पाहात आहे.’ 17 स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरेवाईट तुम्ही जाणता. आणि देव परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”

18 राजा दावीद त्या बाईला म्हणाला, “आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस.”

ती म्हणाली, “माझेस्वामी, विचारा.”

19 राजा म्हणाला, “तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले का?”

ती म्हणाली, “होय महाराज तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले. 20 अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच, स्वरुप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. तुम्ही देवदूता सारखेच चाणाक्ष आहात. तुम्हाला या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.”

अबशालोम यरुशलेमला परततो

21 राजा यवाबाला म्हणाला, “माझे वचन मी खरे करीन, आता अबशालोमला परत आणा.”

22 यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले. राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरून मी ताडले.”

23 मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरुशलेमला घेऊन आला. 24 पण राजा दावीद म्हणाला, “अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे. त्याला मला भेटता मात्र येणार नाही.” तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.

25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरुन प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याचा देह नखशिखान्त निर्दोष, नितळ होता. 26 दरवर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत असे. ते पाच पौंड भरत. 27 त्याला तीन मुलगे आणि एक मुलगी होती. या मुलीचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.

अबशालोम यवाबाला भेटायला बोलावण्याची सक्ती करतो

28 यरुशलेम मध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत राजा दावीदाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही. 29 तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्याला पुन्हा बोलावणे पाठवले तरीही तो येईना.

30 तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, “माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यात जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या”

अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली. 31 तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला आणि त्याला म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?”

32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्याला विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे येण्यात काय मतलब? तेव्हा मला त्याला भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला खुशाल मारून टाकावे.”

अबशालोमची राजा दावीदाशी भेट

33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले. राजाने अबशालोमला बोलावले. अबशालोम आला. त्याने राजाला वाकून अभिवादन केले. राजाने त्याचे चुंबन घेतले.

2 करिंथकरांस 7

प्रिय मित्रांनो, देवाची अभिवचने आमच्याकडे असल्याने जे शरीर व आत्म्याला दुषित करते त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला शुद्ध ठेऊ या. देवाविषयी असलेल्या आदराने पवित्रतेत परिपूर्ण होऊ या.

पौलाचा आनंद

तुमच्या अंतःकरणात आमच्यासाठी जागा करा: आम्ही कोणाचेही वाईट केले नाही. आम्ही कोणाला भ्रष्ट केले नाही. आम्ही कोणाचा गैर फायदा घेतला नाही. मी तुम्हांला तुमचा निषेध करावा म्हणून असे म्हणत नाही. मी तुम्हांला अगोदरही सांगितले आहे की, आमच्या अंतःकरणात तुमच्याविषयी असे स्थान आहे की, आम्ही तुमच्याबरोबर जगू किंवा मरु. मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे.

कारण जेव्हा आम्ही मासेदिनियाला आलो, तेव्हा आमच्या या शरीराला विसावा नव्हता. पण आम्हांला प्रत्येक ठिकाणी त्रास देण्यात आला, बाहेरुन भांडणे, आतून भीति होती. पण जे हताश झाले आहेत त्याचे सांत्वन देव करतो, त्याने तीताच्या येण्याने आमचे सांत्वन केले. त्याच्यामुळेच नव्हे तर तुम्ही त्याला दिलेल्या सांत्वनामुळेसुद्धा. तुमच्या आमच्याबद्दल असलेल्या ओढीबद्दल त्याने आम्हांला सांगितले आहे. तुमचे खोलवरचे दु:ख, माझ्याबद्दलची तुमची असलेली तीव्र सदिच्छा याविषयी सांगितले, त्यामुळे माझा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे.

जरी मी माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:खावले असले तरी त्याबद्दल मला खेद होत नाही, जरी मला खेद होत असला तरी मला आता जाणवले आहे की, माझ्या पत्रामुळे तुम्हांला दु:ख झाले, पण फक्त थोड्या वेळापुरते असावे. तरी आता मी आनंदी आहे. यासाठी नाही की, तुम्हांला दु:खी केले, तर यासाठी की तुमच्या दु:खामुळे तुम्ही पशचात्ताप केला. कारण देवाने इच्छिल्याप्रमाणे तुम्ही दु:खी झाला आणि म्हणून आमच्याकडून कुणाची कोणत्याही प्रकारे हानि झाली नाही. 10 दैवी दु:ख तारणाप्रत नेणारा पश्र्चात्ताप आणते आणि कोणताही खेद बाळ्गीत नाही, पण जगिक दु:ख मरण आणते. 11 पहा दैवी दु:खामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे: किती तरी गंभीरपणा आणि आत्मियता, स्वतःला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता, या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःला निर्दोष असे सिद्ध केले. 12 म्हणून जरी मी तुम्हांला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दूसऱ्याला दु:ख दिले म्हणून नाही तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मियता दाखवली हे तुम्हांला पाहता यावे. 13 यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.

आमच्या स्वतःच्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषतः तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे. 14 मी त्याला तुमच्याविषयी अभिमानाने सांगितले आणि तुम्ही मला लज्जित केले नाही. पण जे सर्व काही आम्ही तुम्हांला सांगितले ते खरे खरे होते. तसा आमचा तुमच्याविषयीचा अभिमान जो तीताला सांगितला ह्याच रीतीने स्वतःचा खरेपणा सिद्ध केला. 15 आणि जेव्हा त्याला तुमचा आज्ञाधारकपणा आठवतो तेव्हा त्याचे तुमच्या विषयीचे प्रेम अधिकच वाढते. त्याचा स्वीकार तुम्ही भीत व कांपत केला. 16 मला आनंद वाटतो की मला तुमच्याविषयी पूर्ण विश्वास वाटू शकतो.

यहेज्केल 21

21 मग परमेश्वराचे शब्द मला पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमकडे पाहा आणि त्यांच्या पवित्र स्थानांच्या विरुद्ध बोल. माझ्यावतीने इस्राएलच्या भूमीविरुद्ध बोल. इस्राएल देशाला सांग ‘परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो मी तुमच्याविरुध्द आहे. मी माझी तलवार म्यानातून उपसेन. मी सज्जनांना व पाप्यांना तुझ्यापासून दूर करीन. मी सज्जन माणसांना व पापी माणसांना तुझ्यापासून तोडीन. मी माझी तलवार म्योनेतून उपसेन दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व लोकांविरुद्ध चालवीन. मग सगळ्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे. मी माझी तलवार म्यानातून उपसली आहे आणि तिचे काम संपल्याशिवाय ती परत म्यानात जाणार नाही. हेही त्यांना कळेल.’”

देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, अतिशय दु:खाने आक्रंदणाऱ्या ह्दय विदीर्ण झालेल्या माणसासारखा आवाज तू सर्व लोकांसमोर काढ. मग ते तुला विचारतील ‘तू दु:ख का करीत आहेस?’ मग तू सांगितले पाहिजेस ‘वाईट बातमीसाठी हा शोक आहे. त्या बातमीने सर्वांची मने खचतील, हात लुळे पडतील, मने दुर्बल होतील, त्यांचे गुढघे पाण्याप्रमाणे गळून जातील. पाहा! ती वाईट बातमी येत आहे.’ त्यामुळे ह्या गोष्टी घडतीलच.” परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला,

तलवार परजली आहे

परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने लोकांशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.

“‘पाहा! तलवार, धारदार तलवार!
    तलवारीला पाणी दिले आहे.
10 मारण्यासाठी तिला धार लावली आहे.
    ती विजेप्रमाणे तळपावी म्हणून तिला पाणी दिले आहे.
माझ्या मुला, मी तुला ज्या काठीने शिक्षा करीत असे तिच्यापासून तू दूर पळालास.
    त्या लाकडी काठीने शिक्षा करुन घेण्याचे नाकारलेस.
11 म्हणून तलवारीला पाणी दिले आहे.
    आता तिचा उपयोग करता येऊ शकेल.
तलवारीला धार दिली आहे, तिला पाणी दिले आहे.
    आता ती मारेकऱ्याच्या हातात देता येईल.

12 “‘मानवपुत्रा, मोठ्याने ओरड व किंचाळ का? कारण तलवार माझ्या लोकांवर व इस्राएलच्या राज्यकर्त्यांवर चालविली जाणार आहे. त्या राजकर्त्यांना युद्ध हवे होते. म्हणून तलवार येईल तेव्हा ते माझ्या लोकांबरोबर असतील. तेव्हा मांडीवर थापट्या मार आणि दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मोठ्याने आक्रोश कर. 13 कारण का? ही फक्त कसोटी नाही. तुम्ही शिक्षेसाठी लाकडाची काठी नाकारलीत. मग तुम्हाला शिक्षा करण्यासाठी मी दुसरे काय बरे वापरावे? हो फक्त तलवारच!’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

14 देव म्हणाला, “मानवपुत्रा, टाळी वाजव व माझ्यावतीने लोकांशी बोल.

“तलवार, दोनदा खाली येऊ देत.
    तीनदा खाली येऊ देत.
ही तलवार लोकांना ठार मारण्याकरिता आहे.
    ती प्रचंड संहार करण्याकरिता आहे.
    ती त्यांच्यात शिरेल.
15 ह्दयाचे भीतीने पाणी होईल.
    खूप लोक पडतील.
नगरीच्या वेशींजवळ, तलवार खूप
    लोकांना ठार करील.
हो! ती विजेप्रमाणे तळपेल.
    लोकाना मारण्यासाठीच तिला पाणी दिले होते.
16 तलवारी, धारदार राहा.
    उजवीकडे, समोर
    व डावीकडे वार कर.
तुझे पाते नेईल त्या सर्व ठिकाणी जा.

17 “मग मीसुध्दा टाळी वाजवीन.
    मग माझा राग निवळेल.
मी, परमेश्वर, हे बोललो आहे.”

यरुशलेमकडे जाणाऱ्या मार्गाची निवड

18 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, 19 “मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार इस्राएलला येऊ शकेल, असे दोन रस्ते रेखाटून काढ दोन्ही रस्ते एकाच देशातून (बाबेलमधून) येतील. मग नगरीला येणाऱ्या रस्ताच्या सुरवातीला खूण कर. 20 तलवार कोठल्या रस्त्याचा उपयोग करील हे दाखविण्यासाठी खुणेचा वापर कर. एक रस्ता अम्मोनच्या राब्बा शहराकडे जातो. दुसरा रस्ता यहूदाकडे, यरुशलेम ह्या सुरक्षित केलेल्या (तटबंदीने) नगरीकडे जातो. 21 बाबेलचा राजा ह्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी आपल्या इच्छेनुसार योजना आखत आहे, हेच ह्यावरुन दिसून येते. दोन रस्ते जेथून फुटतात, त्या नाक्यावर बाबेलचा राजा आला आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी त्याने काही मंत्र-तंत्र केले आहेत. त्याने काही बाण हलविले, आपल्या कुलदैवताला प्रश्र्न विचारले, त्याने बळी दिलेल्या प्राण्याचे यकृत निरखिले. [a]

22 “ह्या खुणांनी यरुशलेमकडे जाणारा रस्ता निवडण्यास त्यास सांगितले. त्याने मोठे ओंडके आणण्याचे ठरविले आहे. राजाने हुकूम देताच त्याचे सैनिक संहार करायला सुरवात करतील. ते रणगर्जना करतील. मग ते नगरीभोवती मातीची भिंत बांधतील व तेथून तटबंदी चढण्यासाठी रस्ता तयार करतील, ते लाकडाचे बुरुजही बांधतील. 23 त्या मंत्र-तंत्रांच्या खुणा इस्राएल लोकांना निरर्थक वाटतील त्यांना दिलेली वचने त्यांना पुरेशी आहेत. पण परमेश्वराला त्यांच्या पापाचे स्मरण होईल. मग इस्राएल लोक पकडले जातील.”

24 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तुम्ही खूप वाईट गोष्टी केल्यात. तुमची पापे उघड उघड दिसतात. तुमच्या अपराधाचे स्मरण ठेवायला तुम्ही मला भाग पाडलेत. म्हणून तुम्ही शत्रूच्या हाती सापडाल. 25 आणि, इस्राएलच्या दुष्ट नेत्या, तुम्हाला ठार केले जाईल. तुझ्या शिक्षेची वेळ आली आहे, अंत जवळ आला आहे.”

26 परमेश्वर, माझा देव, असे म्हणतो, “पागोटे काढा मुकुट उतरवा, बदल होण्याची वेळ आली आहे. महत्वाचे नेते सत्ताभ्रष्ट होतील, त्यांना खाली उतरविले जाईल, व आता जे सामान्य आहेत, ते महत्वाचे नेते बनतील. 27 मी त्या नगरीचा संपूर्ण नाश करीन. पण योग्य माणूस नवा राजा होईपर्यंत हे घडून येणार नाही. मग मी त्याला (बाबेलच्या राजाला) नगरी हस्तगत करु देईल.”

अम्मोनच्याविरुद्ध भविष्यकथन

28 देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने लोकांशी बोल. ‘परमेश्वर, माझा प्रभू, अम्मोनच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या लज्जास्पद देवाबद्दल पुढील गोष्टी सांगतो, असे त्यांना सांग.

“‘पाहा! तलवार!
    तलवार म्यानातून बाहेर आली आहे.
    तिला पाणी चढविले आहे.
ती मारायला तयार आहे.
    ती विजेप्रमाणे तळपावी म्हणून तिला पाणी चढविले आहे.

29 “‘तुमचे दृष्टान्त निरुपयोगी आहेत.
तुमचे मंत्र-तंत्र तुम्हाला मदत करणार नाहीत.
    ते म्हणजे असत्याचे गाठोडे आहे.
तलवार दुष्टांच्या चाळ्याला भिडली आहे.
    लवकरच त्यांची फक्त कलेवरे उरतील
त्यांची वेळ आली आहे.
    त्यांची पापे भरली आहेत.

बाबेलविरुद्ध भविष्यकथन

30 “‘तलवार (बाबेल) पुन्हा म्यानेत ठेवा. बाबेल, तुझ्या जन्मभूमीतच मी तुला न्याय देईन. 31 मी माझ्या राग तुझ्यावर ओतीन. माझा राग गरम वाऱ्याप्रमाणे तुला भाजून काढील. मी तुला क्रूर माणसांच्या [b] ताब्यात देईन. माणसांना ठार मारण्यात ते तरबेज आहेत. 32 तुझी स्थिती सरपणासारखी होईल. तुझे रक्त जमिनीत मुरेल. लोकांना तुझे पूर्णणे विस्मरण होईल. मी, देव, हे बोललो आहे!’”

स्तोत्रसंहिता 68

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत

68 देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव.
    त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
तुझे वैरी वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत.
    आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होवो.
परंतु चांगले लोक आनंदात आहेत.
    चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो.
    चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा,
    देवासाठी रस्ता तयार करा.
तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव याह आहे.
    त्याच्या नावाची स्तुती करा.
देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो.
    तो विधवांची काळजी घेतो.
देव एकाकी लोकांना घर देतो,
    देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत.
    परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील.

देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस.
    तू वाळवंटातून चालत गेलास.
आणि भूमी थरथरली.
    देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.
देवा, थकलेल्या जीर्ण झालेल्या भूमीला पुन्हा
    शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास.
10 तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले.
    देवा, तू तिथल्या गरीब लोकांना बऱ्याच चांगल्या वस्तू दिल्यास.
11 देवाने आज्ञा केली
    आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.
12 शक्तिमान राजांची सैन्ये पळून गेली.
    सैनिकांनी युध्दातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील.
    जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्तीत वाटा घेतील.
13 त्यांना कबुतराचे चांदीने मढवलेले पंख मिळतील.
    त्यांना सोन्याने मढवलेले आणि चकाकणारे पंख मिळतील.

14 देवाने साल्मोन डोंगरावर शत्रूंच्या राजाची दाणादाण उडवली
    त्यांची अवस्था पडणाऱ्या हिमासारखी झाली.
15 बाशानचा पर्वत उंच सुळके असलेला मोठा पर्वत आहे.
16 बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस?
    देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो.
    परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले.
17 परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो.
    त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.
18 तो उंच पर्वतावर गेला,
    त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली.
त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते,
    त्यांच्याकडूनही नजराणे घेतले.
परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
19 परमेश्वराची स्तुती करा.
    तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो
    देव आपल्याला तारतो.

20 तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे.
    परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.
21 देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल. [a]
    जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील.
22 माझा धनी म्हणाला, “मी शत्रूला बाशान पर्वतावरुन परत आणीन.
    मी शत्रूला पश्चिमेकडून परत आणीन.
23 म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातून चालत जाता येईल.
    तुमच्या कुत्र्यांना त्यांचे रक्त चाटता येईल.”

24 विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात.
    माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
25 गायक वाजत गाजत पुढे येतील.
    नंतर तरुण मुली खंजिऱ्या वाजवतील.
    त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.
26 मोठ्या मंडळात देवाचा जय जयकार करा.
    इस्राएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
27 छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे
    आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते
    आणि नफतालीचे नेते आहेत.

28 देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव.
    तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.
29 राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील,
    तुझ्या यरुशलेममधील प्रासादात ती आणतील.
30 त्या “प्राण्यांनी” तुला हवे ते करावे
    म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना”
आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव.
    तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस
    आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
31 त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा,
    इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.
32 पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा,
    त्याच्यासाठी स्तुतिगीते गा.

33 देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो,
    त्याचा जोरदार आवाज ऐका.
34 तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे.
    इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना
    अधिक शक्तिमान बनवतो.
35 देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो.
    इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो.

देवाचे गुणगान करा.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center