Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 13

अम्नोन आणि तामार

13 दावीदाचा मुलगा अबशालोम याला तामार नावाची बहीण होती. ती दिसायला फार सुरेख होती. दावीदाला अम्नोन नावाचा आणखी एक मुलगा होता. त्याचे तामारवर प्रेम होते. तामार कुमारिका होती. तिच्याशी वावगे वागण्याची त्याची छाती नव्हती. पण तिच्याविषयी त्याच्या मनात अभिलाषा होती. तिच्याविषयी विचार करून करून तो आजारी पडला.

अम्नोनला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता. तो अम्नोनला म्हणाला, “दिवसेंदिवस तू क्षीण होत चालला आहेस. तू तर राजपुत्र! खायची प्यायची रेलचेल असताना तू असा अशक्त का होत आहेस? माझ्यापाशी मनमोकळे कर.”

तेव्हा अम्नोन योनादाबला म्हणाला, “माझे तामार वर प्रेम आहे, पण ती माझा सावत्र भाऊ अबशालोमची बहीण आहे.”

योनादाब यावर अम्नोनला म्हणाला, “आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, ‘तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करु द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन’”

तेव्हा अम्नोन आजारी असल्याचे भासवून बिछान्यावर झोपून राहिला. राजा दावीद त्याच्या समाचाराला आला. त्याला तो म्हणाला, “तामारला माझ्याकडे पाठवा. तिला इथे माझ्यादेखत दोन पोव्व्या करु द्या आणि मला भरवू द्या. मग मी त्या खाईन.”

दावीदाने तामारच्या दालनात तसा निरोप पाठवायची व्यवस्था केली. तामारला नोकराने निरोप दिला, “आपला भाऊ अम्नोन याच्या घरी जाऊन त्याच्यासाठी खायला कर.”

तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन कडे गेली. तो पलंगावरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या अम्नोन हे सर्व पाहात होता. पोळ्या तयार झाल्यावर तव्यावरून काढून तिने त्या अम्नोनसाठी ताटात मांडल्या पण अम्नोन ते काही केल्या खाईना. मग आपल्या नोकरांना त्याने बाहेर निघून जाण्याची आज्ञा देऊन तिथून घालवले. सर्व नोकर बाहेर पडले.

अम्नोनचा तामारवर बलात्कार

10 यानंतर अम्नोन तामारला म्हणाला, “ताट घेऊन शयनगृहात ये आणि तेथे मला तू भरव.”

तेव्हा ती ताट घेऊन भावाच्या शयनगृहात गेली. 11 त्याला ती भरवू लागली तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, “हे बहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.”

12 तामार त्याला म्हणाली, “भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करु नकोस. ही मोठी शरमेची गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत. 13 मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलमधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करुन राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.”

14 पण अम्नोनने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शक्तीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला. 15 मग तिच्याबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. पूर्वी त्याचे तिच्यावर जेवढे प्रेम होते त्यापेक्षा अधिक तो आता तिचा द्वेष करु लागला. त्याने तिला तात्काळ तिथून निघून जायला सांगितले.

16 तामार त्याला म्हणाली, “नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आत्ताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल.”

पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले. 17 नोकरांना बोलावून तो म्हणाला, “हिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा आणि दार बंद करून टाका.”

18 तेव्हा अम्नोनच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला.

तामरने रंगीबेरंगी, पट्ट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत. 19 तामारने उद्विग्न मनःस्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करु लागली.

20 तेव्हा अबशालोम या तिच्या भावाने तिला विचारले, “तू अम्नोनकडे गेली होतीस का? त्याने तुला त्रास दिला का? आता तू शांत हो. तो तुझा भाऊ आहे. तेव्हा त्याचे काय करायचे ते आम्ही पाहू. तू याचा त्रास करुन घेऊ नकोस.” यावर तामार काही बोलली नाही. ती शांतपणे अबशालोमच्या घरी राहायला गेली.

21 हे सर्व राजा दावीदाच्या कानावर गेले. तो संतापला. 22 अबशालोमला अम्नोनचा तिरस्कार वाटू लागला. तो अम्नोनशी एक चकार शब्द बोलेना. अम्नोनने आपल्या बहिणीशी जो अतिप्रसंग केला त्याने अबशालोम द्वेषाने पेटून उठला होता.

अबशालोमचा सूड

23 दोन वर्षानंतर, मेंढरांची लोकर कातरणारे अबशालोमचे काही लोक एफ्राइम जवळील बालहासोरमध्ये आलेले होते. अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ते पाहायला बोलावले. 24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, “मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत. आपल्या नोकरासहित येऊन हे दृश्य पाहा.”

25 तेव्हा राजा दावीद त्याला म्हणाला, “मुला आम्ही सर्व जण येणं काही शक्य नाही. तुझ्यावरही त्याचा भार पडेल.”

अबशालोमने दावीदाची खूप आर्जवे केली. दावीद गेला नाही पण त्याने आपले आशीर्वाद दिले.

26 अबशालोम म्हणाला, “तुम्ही नाही तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी पाठवा.”

राजा दावीद म्हणाला, “तो तरी तुला कशासाठी बरोबर यायला हवा आहे?”

27 पण अबशालोमने आपला हटृ सोडला नाही. शेवटी, अम्नोन आणि इतर सर्व मुले यांना अबशालोम बरोबर जायला राजा दावीदाने संमती दिली.

अम्नोनची हत्या

28 अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “अम्नोनवर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत घेत त्याला जेव्हा त्याची नशा चढेल तेव्हा मी तुम्हाला संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करुन तुम्ही त्याला ठार करा. शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.”

29 तेव्हा अबशालोमच्या नोकरांनी त्याचा शब्द पाळला. अम्नोनला त्यांनी ठार केले. पण दावीदाची बाकीची सर्व मुले निसटली. आपापल्या खेचरावर बसून ती पळाली.

अम्नोनच्या वधाची बातमी दावीदाला समजते

30 राजाचे मुलगे नगराच्या वाटेवर असतानाच राजा दावीदाला या घडामोडीची खबर मिळाली, ती अशी, “अबशालोमने राजाच्या सर्व मुलांना ठार केले. कोणालाही त्यातून वगळले नाही.”

31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.

32 पण, दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, “सर्व मुले गेली असे समजू नकोस. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती. 33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करुन समजू नका. फक्त अम्नोन गेला.”

34 अबशालोमने पळ काढला नगराच्या वेशीवर एक पहारेकरी उभा होता.

त्याने डोंगरापलीकडून बऱ्याच लोकांना येताना पाहिले. 35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “बघा, मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.”

36 योनादाबचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे अधिकारीही शोक करु लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला. 37 दावीद अम्नोनसाठी रोज अश्रू ढाळे.

अबशालोम गशूरला येतो

अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता. अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला. 38 गशूर येथे तो तीन वर्षे राहिला. 39 राजा दावीद अम्नोनच्या दु:खातून सावरला. पण अबशालोमच्या आठवणीने तो व्याकुळ होत असे.

2 करिंथकरांस 6

देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हांला विनंति करतो की, जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. कारण तो म्हणतो,

“माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले
    आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.” (A)

मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे.

आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही. उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना, शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत, आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्व्याज प्रीतीमुळे, सत्य बोलण्यात, आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रांसह, गौरव व अपमानाद्वारे, आमच्याबद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने शहाणपणाने, तरीही फसविणारे ठरले गेलेलो. जरी आम्ही प्रसिद्ध असलो, तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले, 10 दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत.

11 आम्ही मोकळे पणाने तुमच्याशी बोललो, करिंथकरांनो, आणि आमची अंतःकरणे तुमच्यासमोर अगदी पूर्णपणे रीतीने उघडी केली. 12 आम्ही तुमच्याबद्दल प्रेमभावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेमभावना मात्र थबकली आहे. 13 आपल्यातली देवाणघेवाण चांगली असावी म्हणून मी तुमच्याशी माइया मुलांप्रमाणे बोलतो. तुम्हीही तुमची अंतःकरणे विशाल करा.

ख्रिस्ती नसलेल्यांबरोबर राहण्याविषयी सूचना

14 जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? 15 ख्रिस्त आणि बलियाल [a] यांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? 16 देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे:

“मी त्यांच्याबरोबर राहीन,
    आणि त्यांच्याबरोबर चालेन,
मी त्यांचा देव होईन
    आणि ते माझे लोक होतील.” (B)

17 “म्हणून त्यांच्यामधून बाहेर या
    आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा.
प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका,
    आणि मी तुम्हांला स्वीकारीन.” (C)

18 “मी तुम्हांला पिता असा होईन,
    तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल,
    असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.” (D)

यहेज्केल 20

20 एक दिवस, इस्राएलमधील काही वडीलधारी नेते परमेश्वराचा सल्ला विचाण्यासाठी माझ्याकडे आले. परागंदा अवस्थेतील काळाच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या (आँगस्ट) दहाव्या दिवशी ते लोक आले आणि माझ्यापुढे बसले.

मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या वडीलधाऱ्यांशी (नेत्यांशी) बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही माझा सल्ला घेण्यासाठी आला आहात का? जर तसे असेल. तर मी तुम्हाला सल्ला देणार नाही.’ परमेश्वर माझा प्रभू, असे म्हणाला, मानवपुत्रा, तू त्यांची परीक्षा करशील का? तू त्यांची पारख करशील का? त्यांच्या वडिलांनी केलेल्या भयंकर गोष्टींबद्दल तू त्यांना सांगितले पाहिजेस. ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्यांना सागितले पाहिजेस; ज्या दिवशी मी इस्राएलची निवड केली, याकोबाच्या वंशाला अभिवचन दिले आणि अभय देऊन मी त्यांना माझी ओळख दिली. “मीच तुमचा परमेश्वर आहे. असे वचन मी त्यांना निसरमध्ये दिले.” त्याच दिवशी, त्यांना मिसरमधून बाहेर काढून, मी त्यांना देत असलेल्या भूमीकडे घेऊन जाण्याचेही कबूल केले. ती भूमी अनेक चांगल्या गोष्टीनी भरलेली होती. [a] सर्व देशांपेक्षा हा देश सुंदर होता.

“‘इस्राएलच्या लोकांना त्यांच्या भयंकर मूर्ती दूर फेकून देण्यास मी सांगितले. मिसरच्या त्या अमंगळ पुतळ्यांबरोबर तुम्ही स्वतःही अमंगळ होऊ नका, असेही मी त्यांना सांगितले. “मी परमेश्वर तुमचा देव आहे.” पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली व माझे ऐकण्याचे नाकारले, त्यांनी त्यांच्या त्या भयंकर मूर्ती ऐकल्या नाहीत ते मिसरचे घाणेरडे पुतळे त्यांनी मिसरमध्येच टाकून दिले नाहीत. मग माझ्या रागाचा पारा किती चढतो हे त्यांना कळावे म्हणून मी (देवाने) मिसरमध्येच त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला. पण मी त्यांचा नाश केला नाही. माझे लोक जेथे राहात होते तेथे, त्यांना, मिसरमधून बाहेर काढण्याचे मी अगोदरच कबूल केले होते. तेव्हा त्या सर्वांच्या देखत इस्राएलचा नाश मी केला नाही कारण, मला माझ्या नावाला बट्टा लावायचा नव्हता. 10 मी इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणले. व त्यांना वाळवंटात नेले. 11 मग मी त्यांना माझे कायदे शिकविले, माझे नियम घालून दिले. एखाद्याने ते नियम पाळल्यास, तो जगेल. 12 मी त्यांना विश्रांतीच्या खास दिवसाबद्दलही सांगितले. त्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्या व माझ्यामधील विशेष संकेत होते, खूण होती. मीच परमेश्वर आहे व ह्या माणसाना, मी, माझी विशेष (पवित्र) माणसे करीत आहे हेच त्या खुणेवरुन दिसे.

13 “‘पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला. 14 पण मी त्यांचा नाश केला नाही. मी इस्राएलला मिसर मधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्यांच्यासमोर इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला काळिमा फासायचा नव्हता. 15 वाळवंटात त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले. ते असे जी भूमी मी त्यांना देत होतो, तेथे मी त्यांना नेणार नाही. ती समृध्द भूमी होती. तो प्रदेश सर्व देशांपेक्षा सुंदर होता.

16 “‘इस्राएलच्या लोकांनी माझे नियम पाळण्यास नकार दिला. ते माझ्या नियमनुसार वागले नाहीत. त्यांनी माझ्या सुट्ट्यांच्या दिवसाला महत्व दिले नाही. त्यांची मने त्या गलिच्छ मूर्तीमध्ये गुंतली असल्याने ते असे वागले. 17 पण मला त्यांची दया आल्याने मी त्यांचा वाळवंटात संपूर्ण नाश केला नाही. 18 मी त्यांच्या मुलांशी वाळवंटात बोललो. मी त्यांना सांगितले, “तुमच्या आई-वडिलासारखे होऊ नका. त्यांच्या गलिच्छ मूर्तीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. नियम पाळू नका. त्यांच्या आज्ञा पाळू नका. त्यांच्या त्या गलिच्छ गोष्टीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. 19 मी परमेश्वर आहे, मीच तुमचा देव आहे. माझे नियम पाळा. माझ्या आज्ञांचे पालन करा. मी सांगतो तसे वागा. 20 माझ्या सुट्ट्यांच्या दिवसांचे महत्व तुम्हाला वाटते हे दाखवा ते दिवस हे तुमच्या माझ्यामधील विशेष खूण आहे, ह्याची आठवण ठेवा. मी परमेश्वर आहे आणि ते सुट्ट्यांचे दिवस मी तुमचा देव आहे हेच दाखवितात.”

21 “‘पण ती मुले माझ्याविरुध्द गेली. त्यांनी माझे नियम मानले नाहीत. माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. खरे म्हणजे, माझे नियम चांगले आहेत. माणसाने ते पाळल्यास, तो अवश्य जगेल. त्यांनी माझ्या सुट्टयांच्या विशेष दिवसांकडे दुर्लक्ष केले. मग माझा राग किती आहे, हे त्यांना कळावे म्हणून मी वाळवंटात त्यांचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले. 22 पण मी मलाच आवरले. मी इस्राएलला मिसरमधून बाहेर आणताना इतर राष्ट्रांनी पाहिले होते. त्या सर्वांसमक्ष इस्राएलचा नाश करुन मला माझ्या नावाला कलंक लावायचा नव्हता. 23 म्हणून त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले की मी त्यांना इतर राष्ट्रांत पसरवीन, पुष्कळ वेगवेगळ्या देशांत पाठवीन.

24 “‘इस्राएल लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी माझ्या नियमाप्रमाणे वागायचे नाकारले. माझ्या सुटृ्यांच्या विशेष दिवसांना त्यांनी महत्व दिले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अमंगळ मूर्तीचीच पूजा केली. 25 म्हणून मी त्यांना वाईट नियम शिकविले त्यांना शुद्धीवर न आणणाऱ्या आज्ञा मी त्यांना दिल्या. 26 त्यांच्या दानांबरोबर मी त्यांना अमंगळ होऊ दिले. त्यांनी स्वतःच्याच पहिल्यां अपत्यांचेसुध्दा बळी देण्यास सुरवात केली. अशा रीतीने, मी त्यांचा नाश केल्यावर त्यांना मीच परमेश्वर आहे. हे समजेल!’ 27 तेव्हा मानवपुत्रा, आता इस्राएलाच्या लोकांशी बोल ‘परमेश्वर, माझा देव पुढील गोष्टी सांगतो, असे साग: इस्राएलच्या लोकांनी माझी निंदा केली आणि माझ्याविरुद्ध कट रचले. 28 पण तरीसुद्धा, त्यांना कबूल केलेल्या प्रदेशात मी त्यांना आणले. त्यांनी टेकड्या व हिरवीगार झाडे पाहिली आणि ते त्या सर्व ठिकाणी पूजा करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर बळी आणि संतापदायक नैवेद्य नेले सुंदर गंध निर्माण करणारे यज्ञ त्यांनी केले, त्यांनी तेथे पेये अर्पण करण्यासाठी नेली. 29 मी इस्राएली लोकांना विचारले की तुम्ही ह्या उच्चस्थानी कशा करिता जात आहात? आज देखिल ते उच्चस्थान आहे.’”

30 देव म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनी अशा सर्व वाईट गोष्टी केल्या म्हणून त्यांच्याशी बोल. त्यांना सांग ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो, तुमच्या पूर्वजांनी केलेली कृत्ये करुन तुम्ही स्वतःला अमंगळ करुन घेतले आहे, गलिच्छ करुन घेतले आहे, तुम्ही वेश्येप्रमाणे वागला आहात. तुमच्या वाडवडिलांनी पूजलेल्या भयंकर दैवतांसाठी तुम्ही माझा त्याग केला. 31 तुम्ही तुमच्या पूर्वजांनी अर्पण केलेल्या गोष्टीच आजही दैवताला अर्पण करीत आहात. तुमच्या खोट्या देवांना बळी म्हणून तुम्ही स्वतःचीच मुले आगीत टाकीत आहात. आजसुद्धा तुम्ही त्या घाणेरड्या, अमंगळ देवांबरोबर स्वतःला घाणेरडे करुन घेत आहात. मी तुम्हाला माझ्याजवळ येऊ देईन आणि तुम्हाला सल्ला देईन. उपदेश करीन असे खरंच तुम्हाला वाटते का? मी परमेश्वर व प्रभू आहे. मी स्वतःची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की मी तुमच्या प्रश्र्नांना उत्तर देणार नाही वा तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. 32 तुम्हाला इतर राष्ट्रांसारखे व्हायचे आहे असे सारखे तुम्ही म्हणत राहता. पण तुमचा उद्देश आणि इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांतील लोकांसारखे वागता. तुम्ही लाकडाच्या तुकड्यांची व दगडांची (मूर्तीची) पूजा करता.’”

33 परमेश्वर, माझा देव, म्हणतो, “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी राजा म्हणून तुमच्यावर राज्य करीन. पण मी सामर्थ्यशाली हात तुमच्यावर उगारीन. तुम्हाला शिक्षा करीन. माझा तुमच्यावरचा क्रोध मी प्रकाट करीन. 34 मी ह्या इतर राष्ट्रांतून तुम्हाला बाहेर काढीन. इतर राष्ट्रांत तुम्हाला पसरविले पण मी तुम्हाला ह्या सर्व देशांतून परत आणून एकत्र करीन. मग मी माझा हात तुमच्यावर उचलून तुम्हाला शिक्षा करीन. मी तुमच्यावर माझा राग किती आहे हे दाखवून देईल. 35 मी तुम्हाला पूर्वीप्रमाणेच वाळवंटात नेईन. पण तेथे इतर राष्ट्रे वसत असतील. आपण समोरासमोर उभे राहू व मग मी तुमचा न्यायनिवाडा करीन. 36 मिसरजवळच्या वाळवंटात मी जसा तुमच्या पूर्वजांचा न्यायनिवाडा केला तसाच मी तुमचाही करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,

37 “मी तुम्हाला अपराधी समजून, कराराप्रमाणे तुम्हाला शिक्षा करीन. 38 माझ्याविरुध्द गेलेल्या पापी लोकांना तुमच्या मातृभूमीतून मी हालवीन. ते इस्राएलमध्ये कधीच परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे पटेल.”

39 इस्राएल लोकांनो, परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या, कोणाला “त्या अमंगळ मूर्तीची पूजा करावीशी वाटत असेल, तर खुशाल करु दे. पण नंतर माझ्या सल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्या गलिच्छ मूर्तीना बलिदान देऊन ह्यापुढे अजिबात माझ्या नावाला बट्टा लावू शकणार नाही.”

40 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “लोकांनी माझ्या पवित्र डोंगरावर इस्राएलच्या उंच पर्वतावर माझी सेवा करण्यासाठी आलेच पाहिजे. सर्व इस्राएलचे लोक त्यांच्या भूमीवर असतील. ते त्यांच्या स्वतःच्या देशात असतील. माझा सल्ला विचारायला येण्याची तीच जागा आहे. तेथेच तुम्ही मला नैवेद्य दाखविला पाहिजे. त्या जागीच तुम्ही मला अर्पण करण्यासाठी तुमच्या पिकाचा पहिला भाग आणलाच पाहिजे. तुमची पवित्र दाने तेथेच तुम्ही मला दिली पाहिजेत. 41 मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन. 42 तुमच्या पूर्वजांना जी भूमी देण्याचे मी वचन दिले होते, त्या इस्राएलच्या भूमीत मी तुम्हाला परत आणीन, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजेल. 43 तेथेच तुम्हाला अमंगळ करणाऱ्या तुमच्या वाईट कृत्यांची आठवण होऊन, तुम्ही शरमिंदे व्हाल. 44 इस्राएल लोकांनो, तुम्ही खूप वाईट कृत्ये केलीत. त्यासाठी तुमचा सर्वनाश व्हायला पाहिजे होता. पण माझे नाव राखण्यासाठी तुम्हाला योग्य अशी शिक्षा मी केली नाही. ह्यावरुन तुम्हाला मीच देव आहे हे समजून येईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

45 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला, 46 “मानवपुत्रा, यहूदाच्या दक्षिणेकडच्या भागाकडे, म्हणजे नेगेवकडे पाहा. नेगेवच्या रानाविरुद्ध बोल. 47 नेगेवच्या रानाला सांग, ‘परमेश्वराचे शब्द ऐका. प्रभू, माझा देव, असे म्हणाला की तुझ्या रानात आग लावण्याची मी तयारी केली आहे. ती आग प्रत्येक झाड-हिरवे व वाळलेले जाळेल. ज्वाळा विझणार नाहीत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश आगीत जळेल. 48 मी, परमेश्वराने, आग लावली हे सर्व लोकांना समजेल. ती विझणार नाही.’”

49 मग मी (यहेज्केल) म्हणालो, “बाप रे! परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे सांगितले, तर मी गोष्ट सांगत आहे. असे लोक म्हणतील हे खरेच घडून येईल. ह्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही.”

स्तोत्रसंहिता 66-67

प्रमुख गायकासाठी स्तुतिगीत

66 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा.
    स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा.
    देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे
    प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.

देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी
    आम्हाला आश्चर्यचकित करतात.
देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले
    त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो
    देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो,
    त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.

लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
    त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
देवाने आम्हाला जीवन दिले.
    देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
    तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
    तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
    परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
13-14 म्हणून मी तुझ्या मंदिरात तुला होमबली अर्पण करण्यासाठी बळी घेऊन येईन.
मी संकटात होतो तेव्हा तुझ्याकडे मदत मागितली.
    मी तुला अनेक वचने दिली,
आता मी वचन दिल्याप्रमाणे तुला त्या गोष्टी देत आहे.
15     मी तुला पापार्पण करीत आहे.
मी तुला धुपासहित मेंढ्या अर्पण करीत आहे.
    मी तुला बैल आणि बोकड अर्पण करीत आहे.

16 देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो, इकडे या.
    देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो.
17-18 मी त्याची प्रार्थना केली,
    मी त्याची स्तुती केली.
माझे मन शुध्द होते म्हणून
    माझ्या प्रभुने माझे ऐकले.
19 देवाने माझे ऐकले.
    त्याने माझी प्रार्थना ऐकली.
20 देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही.
    त्याने माझी प्रार्थना ऐकली.
    देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.

प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तुतिगीत

67 देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे.
    कृपाकरुन आमचा स्वीकार कर!

देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो.
    तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
देवा, लोक तुझी स्तुती करु देत,
    सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे.
    का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस
    आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
देवा, लोक तुझी स्तुती करोत,
    सर्व लोक तुझी स्तुती करोत.
देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे.
    आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
देव आम्हाला आशीर्वाद देवो
    आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center