M’Cheyne Bible Reading Plan
दावीद बथशेबाला भेटतो
11 वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला.
दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला. 2 संध्याकाळी तो आपल्या पलंगावरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती. 3 तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.”
4 तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली. 5 पण बथशेबा गर्भवती राहिली. दावीदाला तिने निरोप पाठवला. तिने सांगितले, “मी गरोदर आहे.”
दावीद पाप लपवायचा प्रयत्न करतो
6 दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा.
तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदकडे पाठवले. 7 उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले. 8 मग म्हणाला, “घरी जा आणि आराम कर.”
उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली 9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवकवर्गा प्रमाणेच तो तिथे झोपला. 10 उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले.
तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, “तू लांबून प्रवास करुन आला आहेस तू घरी का गेला नाहीस?”
11 उरीया दावीदाला म्हणाला, “पवित्र करारकोश, इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे, बायकोच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.”
12 दावीद उरीयाला म्हाणाला, “आजच्या दिवस इथे राहा. उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो.”
उरीयाने त्या दिवशी यरुशलेममध्येच मुक्काम केला. 13 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने जेवणखाण केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले. पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
दावीदाचा उरीयाला मारण्याचा कट
14 दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले. 15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”
16 यवाबाने नगराची टेहेळणी करुन सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले आणि उरीयाला तेथे नेमले. 17 राब्बा नगरातील लोक यवाब विरुद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली. उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
18 नंतर यवाबाने युध्दातील हकिकतींचे साद्यंतवृत्त दावीदाला पाठवले. 19 युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले. 20 यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, ‘यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे. 21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथचा मुलगा अबीमलेख याला एका बाईने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरुन जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला?’ राजा दावीद असे काही म्हणाला तर त्याला हे ही म्हणावे, ‘उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यात मारला गेला.’”
22 निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगयला सांगितले ते सर्व कथन केले. 23 तो म्हणाला, “अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला. आम्ही त्यांचा सामना करुन त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले. 24 मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला. त्यात काही जण ठार झाले. उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.”
25 दावीद त्या निरोप्याला म्हणाला, “यवाबाला सांग, ‘निराश होऊ नको, हिंमत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा. तुम्ही जिंकाल.’ यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.”
दावीदाचा बथशेबाशी विवाह
26 उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला. 27 काही काळाने तिचे दु:ख ओसरल्यावर दावीदाने सेवकांकरवी तिला आपल्याकडे आणवले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या मुलाला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वराला पसंत पडले नाही.
मातीच्या भांड्यातील आध्यत्मिक ठेवा
4 म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे, आम्ही धीर सोडत नाही. 2 तर आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी सोडून दिल्या आहेत, आम्ही कपटाने वागत नाही. आणि कपटदृष्टीने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही, तर देवासमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुध्दिला पटवितो. 3 आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे, जे नाश पावत आहेत अशांसाठी ते आच्छादित आहे. 4 या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत. यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊन नये. जो देवाच्या प्रतिमेचा आहे. 5 कारण आम्ही आमचीच सुवार्ता सांगत नाही तर ख्रिस्त येशू हाच प्रभु आहे अशी घोषणा करतो आणि आम्ही येशू ख्रिस्तासाठी तुमचे सेवक आहोत असे स्वतःविषयी सांगतो. 6 कारण देव, जो म्हणाला, “अंधारातून प्रकाश होवो.” त्याने तो प्रकाश, आमच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या चेहेऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा. 7 पण आमचा हा ठेवा मातीच्या भांड्यामध्ये आहे. यासाठी की, सामर्थ्याची पराकोटी देवापासून येते, आम्हांकडून नाही. 8 आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही. 9 छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही. 10 आम्ही नेहमी येशूचे मरण आमच्या शरीरात घेऊन जात असतो. यासाठी की ख्रिस्ताचे जीवनही आमच्या शरीराद्वारे प्रकट व्हावे. 11 कारण आम्ही जे जिवंत आहोत ते आम्ही नेहमीच ख्रिस्ताकरिता मरणाला सोपविलेले आहोत. यासाठी त्याचे जीवन आमच्या मर्त्य शरीराद्वारे प्रकट व्हावे. 12 म्हणून मग, आमच्यामध्ये मृत्यू काम करीत आहे, पण तुमच्यामध्ये जीवन काम करीत आहे.
13 असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला; म्हणून मी बोललो आहे.” विश्वासच्या त्याच आत्म्याने आम्हीसुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो. 14 कारण आम्हांला माहीत आहे ज्याने प्रभु येशूला उठविले, तो त्याच्याबरोबर आम्हांला उठवील व आम्हांला तुमच्याबरोबरच त्याच्यासमोर सादर करील. 15 कारण या सर्व गोष्टी तुम्हाकरिता आहेत. यासाठी की, पुष्कळांच्या द्धारे विपुल झालेली कृपा अनेकांच्या उपकारस्तुतीमुळे देवाचे भरघोस गौरव होण्याला कारण व्हावी.
विश्वासाचे जगणे
16 म्हणून आम्ही धीर सोडीत नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17 कारण आमची हलकी व क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे. 18 म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे.
18 परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, 2 “आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली. त्याची आंबट चव मात्र मुलांनी घेतली. ही म्हण तुम्ही नेहमी म्हणता. ते का?
‘तुम्ही पाप करु शकता, भविष्यकाळात कोणालातरी
त्याची शिक्षा मिळेल, असे तुम्हांला वाटते.’”
3 पण परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “माझ्या प्राणांची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की इस्राएलच्या लोकांना ह्यापुढे ही म्हण खरी वाटणार नाही. 4 मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आईवडील असोत वा मूल. जो पाप करील, तो मरेल.
5 “जर माणूस सज्जन तर तो जगेल. तो सर्वांशी चांगलेच वागतो. 6 तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांना दाखवलेले नैवेद्य खात नाही, इस्राएलमधील अमंगल मूर्तीची तो प्रार्थना करीत नाही. तो शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करीत नाही, आपल्या स्वतःच्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी तिच्याजवळ जात नाही. 7 तो सज्जन लोकांचा फायदा घेत नाही, कर्ज देताना गहाण ठेवलेल्या वस्तू, तो कर्जाची परतफेड होताच कर्जदाराला परत करतो. तो सज्जन भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो. 8 एखाद्याला पैसे उसने दिल्यावर, तो त्यावर व्याज घेत नाही. तो कपट करीत नाही. तो सर्वांशीच चांगला वागतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात. 9 तो सज्जन माझे नियम पाळतो, माझ्या निर्णयांवर विचार करतो, तो न्यायी आणि विश्वासनीय होण्याचे शिकतो. तोच चांगला माणूस होय, म्हणूनच तो जगेल.
10 “पण त्या सज्जनाचा मुलगा कदाचित् ह्या सर्व चांगल्या गोष्टी करणार नाही. तो मुलगा कदाचित् चोरी करीत असेल व लोकांना ठार मारीत असेल. 11 तो मुलगा पुढील वाईट गोष्टी करत असेल. तो डोंगरावर जाऊन खोट्या देवांना दाखविलेला नैवेद्य खात असेल, तो दुष्ट मुलगा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर, व्यभिचाराचे पाप करीत असेल. 12 तो गरीब असहाय्य लोकांना वाईट वागणूक देत असेल, लोकांचा गैर फायदा घेत असेल, गहाण ठेवलेल्या वस्तू कर्जफेडीनंतर कर्जदाराला परत करीत नसेल, तो त्या अमंगल मूर्तीची प्रार्थना करीत असले आणि आणखी काही भयंकर गोष्टी करीत असेल. अशा कितीतरी वाईट गोष्टी तो करीत असेल. 13 एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत: जबाबदार असेल.
14 “आता, या दुष्टालाही कदाचित् मुलगा असेल व त्याने वडिलांच्या सर्व वाईट गोष्टी पाहिल्या असल्याने तो वडिलांप्रमाणे वागण्याचे कदाचित् टाळेल. असा चांगला मुलगा लोकांशी चांगलेच वागतो. 15 तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांचा प्रसाद खात नाही. तो इस्राएलमधील घाणेरड्या मूर्तीची कधी प्रार्थना करीत नाही. शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर व्यभिचाराचे पाप करीत नाही. 16 तो लोकांचा फायदा घेत नाही. तो कर्जफेडीनंतर गहण ठेवलेल्या वस्तू कर्जदाराला परत करतो, भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो. 17 तो गरिबांना मदत करतो गरजूला पैसे उसने दिल्यास, त्यावर व्याज घेत नाही. तो माझे नियम पाळतो त्याचप्रमाणे वागतो. त्याच्या वडिलांच्या पापांसाठी, चांगल्या मुलाला मृत्युदंड मिळणार नाही. तो मुलगा जिवंत राहील. 18 वडील कदाचित लोकांना दुखवीत असतील आणि चोरी करीत असतील. ते त्यांच्या माणसांकरिता काहीच भल्या गोष्टी करीत नसतील ते त्यांच्या पापांनी मरतील. पण वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही.
19 “तुम्ही कदाचित् विचाराल ‘वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा का होणार नाही?’ कारण मुलगा प्रामाणिक होता व त्याने सत्कृत्ये केली. त्याने माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या. म्हणून तो जगेल. 20 पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वतःचाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.
21 “पण, वाईट माणूस, सुधारला, तर तो मरणार नाही. तो जगेल. त्याने पूर्वी केलेल्या वाईट गोष्टी तो करण्याचे सोडून देईल व माझे नियम काळजीपूर्वक पाळील तो सज्जन व प्रामाणिक होईल. 22 तर मग देव त्याच्या दुष्कृत्यांचे स्मरण ठेवणार नाही. तो फक्त त्याचा चांगुलपणाच स्मरेल. मग तो माणूस जगेल.”
23 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वाईट लोकांनी मरावे अशी माझी इच्छा नाही. त्यांनी आपले मार्ग बदलावे. मग ते जगू शकतील.
24 “कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”
25 देव म्हणाला, “तुम्ही कदाचित् म्हणाला, ‘देव, आमचा प्रभू न्यायी नाही’ पण इस्राएलच्या लोकांनो, ऐका. तुम्हीच न्यायी नाही आहात. 26 जर सज्जन बिघडला व दुष्ट झाला, तर त्याने त्याच्या दुष्कृत्याबद्दल मेलेच पाहिजे. 27 पण वाईट माणूस सुधारला व सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील. 28 तो किती वाईट होता. हे त्याचे त्यालाच कळेल व तो माझ्याकडे परत येईल. पूर्वीप्रमाणे वाईट गोष्टी तो करणार नाही. मग तो जगेल. तो मरणार नाही.”
29 इस्राएलचे लोक म्हणाले, “हे न्याय्य नाही. परमेश्वर, आमचा प्रभू, असा असूच शकत नाही!”
देव म्हणाला, “मी न्यायी आहे तुम्ही लोकच न्यायी नाही आहात. 30 का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका. 31 तुम्ही तयार केलेल्या भयानक गोष्टी (मूर्ती) फेकून द्या. त्यांच्यामुळेच तुम्ही पाप करण्यास धजावता. तुमचे ह्दयपरिवर्तन व आत्मपरिवर्तन होऊ द्या. इस्राएलच्या लोकांनो, स्वतःच स्वतःचा मृत्यू का ओढवून घेता? 32 मला तुम्हाला ठार मारण्याची इच्छी नाही. कृपा करुन परत या व जगा” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
प्रमुख गायकासाठी यदूथूनाच्या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.
62 देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे.
माझे तारण त्याच्याकडूनच येते.
2 देव माझा किल्ला आहे.
तो मला तारतो.
देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे.
खूप मोठे सैन्यदेखील माझा पराभव करु शकणार नाही.
3 किती काळ तू माझ्यावर चाल करुन येणार आहेस?
मी एका बाजूला कललेल्या भिंतीसारखा आहे,
केव्हाही पडणाऱ्या कुंपणासारखा आहे.
4 ते लोक माझा नाश करण्याच्या योजना आखत आहेत.
ते माझ्याबद्दल खोटंनाटं सांगतात.
ते लोकांमध्ये माझ्याबद्दल चांगल बोलतात
पण गुप्तपणे ते मला शाप देतात.
5 मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे.
देव माझी एकुलती एक आशा आहे.
6 देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो,
देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे.
7 माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो
तो माझा भक्कम किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.
8 लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा.
तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा.
देव आपली सुरक्षित जागा आहे.
9 लोक खरोखरच मदत करु शकत नाहीत.
तुम्ही मदतीसाठी लोकांवर खरोखरच विश्वास टाकू शकत नाही.
देवाशी तुलना करता ते हवेतल्या
फुंकरीसारखे न गण्य आहेत.
10 बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका.
चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे
असे समजू नका ,आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता
तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका.
11 फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे
असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.”
12 प्रभु, तुझे प्रेम खरे आहे.
माणूस ज्या गोष्टी करतो त्या नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
9 काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु त्यांचा नाश होईल.
ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
10 त्यांना तलवारीने मारले जाईल.
रानटी कुत्री त्यांची प्रेते खातील.
11 परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल
आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का?
कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
2006 by World Bible Translation Center