M’Cheyne Bible Reading Plan
दावीदाच्या दूतांचा हानून कडून अपमान
10 पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला. 2 दावीदाने विचार केला, “नाहाशचा माझ्यावर लोभ होता तेव्हा त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन.” दावीदाने मग हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनासाठी आपल्या सेवकांना पाठवले.
तेव्हा ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले. 3 पण अम्मोनी अधिकारी हानूनला, आपल्या धन्याला म्हणाले. “तुमच्या सांत्वनासाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय, असे तुम्हाला वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांना पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरुद्ध उठाव करायचा बेत आहे.”
4 तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करुन त्यांना त्याने परत पाठवले.
5 लोकांकडून हे दावीदाला कळले तेव्हा त्याने आपल्या या सेवकांची गाठ घेण्यास माणसे पाठवली. हे सेवक खूप शरमिंदे झाले होते. दावीदाने त्यांना सांगितले, “तुमच्या दाढ्या वाढून पूर्ववत होईपर्यंत यरीहो येथेच राहा. मग यरुशलेम येथे या.”
अम्मोन्यांवर चढाई
6 आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने धेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.
7 दावीदाने हे ऐकले तेव्हा आपल्या लढाऊ सैन्यासह यवाबाला पाठवले. 8 अम्मोनी बाहेर पडून युध्दाला सज्ज झाले. नगराच्या वेशीपाशी त्यांनी व्यूह रचला. सोबा आणि रहोब येथील अरामी, तसेच माकाचे व तोबचे सैनिक हे सर्व मिळून स्वतंत्रपणे युद्धासाठी उभे राहिले.
9 अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्द्यांची निवड केली. त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले. 10 मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही माणसांना करुन अम्मोन्यांचा सामना करायला सांगितले. 11 यवाब अबीशयला म्हणाला, “अरीमी मला भारी पडत आहेत असे दिसले तर तू माझ्या मदतीला ये. जर अम्मोनी प्रबल आहेत असे लक्षात आले तर मी तुझ्या मदतीला येईन. 12 हिंमत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करु. परमेश्वर त्याला योग्य वाटेल तसे करील.”
13 यानंतर यवाबाने आपल्या लोकांसह अराम्यांवर चढाई केली. अरामी लोकांनी त्यांच्या समोरुन पळ काढला. 14 अराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अबीशय समोरुन पळून गेले आणि आपल्या नगरात परतले.
अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमला परतला.
पुन्हा युध्द करण्याचा अराम्यांचा निर्णय
15 इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले) 16 हदरेजरने (फरात) नदीच्या पलीकडे राहाणाऱ्या अराम्यांना एकत्र आणण्यासाठी माणसे पाठवली. हे अरामी हेलाम येते आले. हदरेजरचा सेनापती शोबख याने त्यांचे नेतृत्व केले.
17 हे दावीदाच्या कानावर आले. तेव्हा त्याने सर्व इस्राएलींना एकत्र आणले. यार्देन नदी पार करुन ते हेलाम येथे गेले.
तेथे अराम्यांनी सर्व तयारीनिशी हल्ला केला. 18 पण दावीदाने अराम्यांचा पराभव केला. अराम्यांनी इस्राएल लोकां समोरुन पळ काढला. दावीदाने सातशे रथांवरील माणसे आणि चाळीस हजार घोडेस्वार यांना ठार केले. अरामी सैन्याचा प्रमुख शोबख यालाही दावीदाने ठार केले.
19 हदरेजरच्या मांडलीक राजांनीही इस्राएलांनी केलेला हा पराभव पाहिला. तेव्हा त्यांनी इस्राएलांशी तह केला व इस्राएलांचे ते चाकर झाले. पुन्हा अम्मोन्यांना मदत करायची अम्मोन्यांनी धास्ती घेतली.
देवाच्या नव्या कराराचे सेवक
3 पुन्हा, आम्ही आमची प्रशंसा करायला लागलो काय? किंवा आम्हांला काही लोकांसारखी तुमच्याकडे येण्यास किंवा तुमच्याकडून येण्यास शिफारसपत्रांची आवश्यकता आहे काय? 2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात. आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले. 3 तुम्ही दाखवून देता की, तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात.
4 देवासमोर ख्रिस्ताद्धारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. 5 असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्वकाही करण्यास समर्य आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. 6 त्याने आम्हांला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे- पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारुन टाकते, पण आत्मा जीवन देतो.
नवा करार महान गौरव आणतो
7 आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की, इस्राएल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते. 8 तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? 9 कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते! 10 त्यात गौरव होते, पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते, तेव्हा ते कमी होते. 11 आणि जर ते निस्तेज होत जाणारे गौरवाने आले तर जे टिकते त्याचे गौरव किती महान असेल!
12 म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत. 13 आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. 14 पण त्यांची मने मंद करण्यात आली होती. कारण आजपर्यंत तोच पडदा (आवरण) राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही. कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल. 15 तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते. 16 पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते. 17 प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. 18 तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभुचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभु जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरुपात रुपांतरीत होत जातो.
17 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला. 2 “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना पुढील कहाणी सांग व त्यांना त्याचा अर्थ विचार. 3 त्यांना सांग:
“‘मोठे पंख असलेला एक प्रचंड गरुड (नबुखद्नेस्सर) लबानोनला आला.
त्याला खूप पिसे होती व त्यावर ठिपके होते.
4 त्याने मोठ्या गंधसरुचा शेडा (लबानोन)
तोडून कनानला आणला.
व्यापाऱ्यांच्या गावात त्याने एक फांदी लावली.
5 मग त्या गरुडाने कनानमधील काही बीज (लोक)
सुपीक जमिनीत नदीकाठी पेरले.
6 बीज अंकुरले आणि द्राक्षवेल तरारली.
ती वेल उत्तम होती.
ती उंच नव्हती,
पण तिचा विस्तार मोठा होता.
तिला फांद्या फुटल्या
व लहान वेलीचा वाढून मोठा वेल झाला.
7 मग मोठे पंख असलेल्या, दुसऱ्या मोठ्या गरुडाने हा वेल पाहिला.
त्या गरुडला खूप पिसे होती.
ह्या नव्या गरुडाने आपली काळजी घ्यावी,
असे द्राक्षवेलीला वाटत होते.
म्हणून तिने आपली मुळे गरुडाकडे वळविली.
तिच्या फांद्या त्याच्या दिशेने पसरल्या.
ज्या मळ्यात ती वेल लावली होती, त्या मळ्यापासून फांद्या वाढून दूर गेल्या.
नव्या गरुडाने आपल्याला पाणी द्यावे असे द्राक्षवेलीला वाटले.
8 ती द्राक्षवेल सुपीक मळ्यात लावली होती.
तिच्या जवळपास पुष्कळ पाणी होते.
तिला खूप फांद्या फुटून चांगली फळे धरु शकली असती.
ती एक उत्तम वेल झाली असती.’”
9 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला:
“ती वेल यशस्वी होईल असे तुम्हाला वाटते का?
नाही! नवा गरुड तो उपटून टाकील.
पक्षी तिची मुळे तोडेल
व तो सर्व द्राक्षे खाऊन टाकील.
मग कोवळी पाने सुकून गळून पडतील.
ती वेल सुकत जाईल.
तिला मुळापासून उपटण्यास बळकट हातांची
व सामर्थ्यवान राष्ट्रांची गरज लागणार नाही.
10 जेथे लावली आहे तेथेच ती वेल चांगली वाढेल का?
नाही! पूर्वेच्या गरम वाऱ्याने ती सुकेल व मरेल.
जेथे लावली तेथेच ती मरेल.”
11 परमेश्वराचा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला, 12 “इस्राएलच्या लोकांना ह्या गोष्टीचा अर्थ समजावून सांग. ते नेहमीच माझ्याविरुद्ध जातात. त्यांना पुढील गोष्टी सांग. पहिला गरुड म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय. तो यरुशलेमला आला आणि त्याने राजाला व इतर नेत्यांना आपल्याबरोबर बाबेलला नेले. 13 मग नबुखद्नेस्सरने राजघराण्यातील एका माणसाबरोबर करार केला. त्याने त्याच्याकडून सक्तीने वचन घेतले. त्या माणसाने नबुखद्नेस्सराशी निष्ठेन राहण्याचे वचन दिले. नबुखद्नेस्सरने मग त्याला यहूदाचा नवा राजा केला. मग त्याने यहूदातील सर्व सामर्थ्यवान पुरुषांना यहूदापासून दूर नेले. 14 त्यामुळे यहूदा हे दुर्बल झाले आणि ते नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करु शकले नाही. यहूदाच्या नव्या राजाबरोबर नबुखद्नेस्सरने केलेला करार लोकांना सक्तीने पाळावा लागला. 15 पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”
16 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन सांगतो की नवा राजा बाबेलमध्येच मरेल. नबुखद्नेस्सरने ह्या माणसाला यहूदाचा नवा राजा केले. पण त्या माणसाने नबुखद्नेस्सरला दिलेले वचन मोडले. त्याने कराराकडे दुर्लक्ष केले. 17 आणि मिसरचा राजा यहूदाच्या नव्या राजाचे रक्षण करु शकणार नाही. तो कदाचित् मोठे सैन्य पाठवील, पण मिसरची प्रचंड शक्ती यहूदाला वाचवू शकणार नाही. नबुखद्नेस्सरचे सैन्य नगरी हस्तगत करण्यासाठी मातीचे रस्ते व भिंती बांधील खूप लोक मरतील. 18 पण यहूदाच्या राजाला पळून जाता येणार नाही. का? कारण त्याने कराराकडे दुर्लक्ष केले. नबुखद्नेस्सरला दिलेले वचन त्याने मोडले.” 19 परमेश्वर, माझा प्रभू, अशी प्रतिज्ञा करतो, “माझ्या प्राणाशपथ मी यहूदाच्या राजाला शिक्षा करीन. का? कारण त्याने माझ्या ताकिदींकडे लक्ष दिले नाही. त्याने आमचा करार मोडला. 20 मी सापळा रचीन व त्यात तो पकडला जाईल. मग मी त्याला बाबेलला आणून शिक्षा करीन. तो माझ्याविरुद्ध गेला म्हणून मी त्याला शिक्षा करीन. 21 मी त्याच्या सैन्याचा नाश करीन. त्याचे चांगले सैनिक मी नष्ट करीन. वाचलेल्या लोकांना मी वाऱ्यावर सोडून देईन. मग तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आणि मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या.”
22 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
“उंच गंधसरुची एक फांदी मी तोडून घेईन.
शेड्याची डहाळी मी घेईन
आणि मी स्वतः उंच पर्वतावर ती लावीन.
23 मी स्वतः, ती फांदी, इस्राएलच्या उंच पर्वतावर लावीन.
मग त्या फांदीचा वृक्ष होईल.
त्याला फांद्या फुटून फळे येतील.
तो एक सुंदर गंधसरुचा वृक्ष असेल.
त्याच्या फांद्यांवर खूप पक्षी बसतील.
त्याच्या सावलीला खूप पक्षी राहतील.
24 “मग दुसऱ्या झांडाना समजेल की
मी उंच वृक्ष जमीनदोस्त करतो
आणि लहान झांडांचे उंच वक्ष करतो.
मीच हिरवीगार झाडे सुकवून टाकतो,
व सुकलेल्या झाडांना पालवी फुटवितो.
मी परमेश्वर आहे.
मी बोलतो, तेच करतो.”
प्रमुख गायकासाठी “कराराची लिली” या चालीवर बसवलेले शिकवण्यासाठी लिहीलेले दावीदाचे मिक्ताम, अराम नहराईम आणि अराम सोबा याच्याशी तो लढला आणि क्षाराच्या खोऱ्यात परत गेल्यावर 12,000 अदोमातील सैनिकांचा त्याने पराभव केला तेव्हाचे स्तोत्र
60 देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास
आणि आमचा नाश केलास.
कृपाकरुन आमच्याकडे परत ये.
2 तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुभंगवलेस,
सारे जग कोलमडून पडले.
आता ते पुन्हा एकत्र आण.
3 तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास.
आम्ही दारु पिऊन झोकांड्या खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे आहोत.
4 जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास,
त्यामुळे आता ते शत्रूंपासून सुटका करुन घेऊ शकतील.
5 तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव.
माझ्या प्रार्थनेला उत्तर दे आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्या लोकांना वाचव.
6 देव त्याच्या मंदिरात म्हणाला
“मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन.
मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
7 गिलाद आणि मनश्शे माझे असेल,
एफ्राईम, माझे शिरस्त्राण असेल
आणि यहुदा माझा राजदंड असेल.
8 मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल,
अदोम माझा जोडा नेणारा गुलाम असेल.
मी पलिष्टी लोकांचा पराभव करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन.”
9-10 मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण नेईल?
अदोमाशी लढायला मला कोण नेईल?
देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास.
तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
11 देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर.
कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
12 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो
देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे एक स्तोत्र
61 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक.
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 मी कुठेही असलो कितीही अशक्त
असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन.
तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
3 तूच माझी सुरक्षित जागा आहेस.
माझ्या शत्रूंपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
4 तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे,
जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
5 देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस
परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
6 राजाला भरपूर आयुष्य दे
त्याला कायमचे राहू दे.
7 त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे.
तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
8 आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन.
ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
2006 by World Bible Translation Center