M’Cheyne Bible Reading Plan
दावीदाचा मंदिर बांधायचा बेत
7 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूपासून विसावा दिला. 2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशा साठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”
4 पण त्यादिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग: ‘परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस. 6 इस्राएल लोकांना मिसरमधून मी बाहेर काढले,त्यावेळी मी कुठल्या ही घरात राहात नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर. 7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही. माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.’
8 “शिवाय दावीदाला हे ही सांग: ‘सर्वशक्तीमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले. 9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन. 10-11 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली. त्यांना रुजवले. त्यांना जागोजाग भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. पूर्वी मी त्यांच्यावर शास्ते नेमले पण दुर्जनांनी त्यांना त्रास दिला. आता तसे घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
12 “तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन. 13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ घर (मंदिर) बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. 14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक 15 पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही. 16 राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे सिंहासन टिकून राहील.”
17 नाथानने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
दावीदाची प्रार्थना
18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला,
“हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस? 19 मी केवळ तुझा सेवक आहे. (तुझ्या माझ्यावर किती लोभ आहे!) पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का? 20 मी आणखी काय बोलणार? प्रभु परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. 21 तू करणार म्हणालास आणि तुला तसे करायची इच्छा आहे. तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. 22 माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो.
23 “पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. (ती गुलाम होती) तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुकत केलेस. तिला आपली प्रजा मानलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भुत चमत्कार केलेस. 24 तू निरंतर त्यांना स्वतःच्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास.
25 “आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे. 26 मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, ‘सर्वशक्तीमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.’
27 “सर्वशक्तीमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, ‘मी तुझ्यासाठी घर बांधीन’ म्हणून मी, तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. 28 प्रभो, परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. 29 आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रषित झालेला पौल याजकडून, तसेच आपला बंधु तीमथ्य याजकडून, देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना 2 देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त याजकडून कृपा व शांति असो.
पौल देवाचे उपकार मानतो
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देवपिता. तो सांत्वन करणारा देव आहे. 4 तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो. 5 आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दु:खामध्ये सहभागी होतो, त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हांला पुष्कळ सांत्वन मिळते 6 जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत, जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे. यामुळे आम्हाला जे दु:ख आहे तशाच प्रकारचे दु:ख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते. 7 आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. 9 खरोखर आम्हांला वाटत होते की, आम्ही मरु, पण आम्ही आपल्या स्वतःवर भरंवसा ठेवू नये, यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की, जो मनुष्यांना मरणातून उठवितो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. 10 देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले. आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील. आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे. यासाठी की, तो यापुढे ही आम्हांस सोडवील. 11 तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हांला मदत करावी. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे.
पौलाच्या योजनेत बदल
12 कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो. 13 कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हांस लिहित नाही. आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो. 14 आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हांस काही अंशी जाणता की प्रभु येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता.
15 मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हांला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हांला फायदा व्हावा. 16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हांला भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरविले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाला जाण्यासाठी मदत करावी. 17 जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?
18 पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हांजवळ आम्ही तुम्हांला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही, असे नाही. 19 कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो आम्हांकडून, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य यांजकडून तुम्हांमध्ये गाजविला गेला, तो होय किंवा नाही असा झाला नाही, तर तो फक्त होकारार्थीच आहे. 20 कारण देवाची वचने कितीही असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत, यामुळे त्याच्याद्वारे आम्हांकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे (आमेन). 21 आता जो तुम्हांसहित आम्हांस ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हांस अभिषेक केला तो देव आहे. 22 मालकीपणाचा शिक्का आमच्यावर मारला व जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आपला आत्मा आमच्या अंतरंगात ठेव म्हणून ठेवला.
23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारुन आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करु नये म्हणून मी करिंथला आलो नाही. 24 आम्ही तुमच्या विश्वासावर स्वामित्व करतो असे नाही, पण तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्याबरोबर काम करतो. कारण विश्वासाने तुम्ही स्थिर राहता.
15 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, रानातील झाडांच्या लहान लहान फांद्यांपेक्षा द्राक्षवेलींचे तुकडे चांगले का? नाही. 3 द्राक्षवेलीच्या लाकडाचा कशासाठी उपयोग होतो का? नाही. ताटल्या अडकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून खुंट्या बनविता येतात का? नाही. 4 लोक त्या लाकडाला फक्त आगीत टाकतात, काही काटक्या टोकाकडून जळू लागतात, मध्यावर काळ्या पडतात, पण त्या काही पूर्णपणे जळत नाहीत. त्या जळक्या काटक्यांचा काही उपयोग आहे का? 5 ते लाकूड जळण्यापूर्वी जर तुम्ही त्या लाकडाचा उपयोग करु शकत नसाल, तर ते लाकूड जळल्यावर नक्कीच त्याचा काही उपयोग होणार नाही. 6 म्हणजेच द्राक्षवेलींच्या काटक्या ह्या रानातल्या झाडांच्या फांद्याप्राणेच आहेत. लोक त्या विस्तवात टाकतात आणि त्या जळून जातात. त्याचप्रमाणे, यरुशलेमच्या लोकांना मी आगीत टाकीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, 7 “मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे. 8 त्या लोकांनी खोट्या देवांसाठी माझा त्याग केला, म्हणून मी त्या देशाचा नाश करीन.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या
प्रमुख गायकासाठी “दूर ओकच्या झाडावर असलेला पारवा” या चालीवर आधारलेले दावीदाचे मास्कील. पलिष्ट्यांनी त्याला गाथमध्येपकडले त्या वेळचे स्तोत्र
56 देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर.
ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
2 माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला.
मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत.
3 मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
4 माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही.
लोक मला त्रास देऊ शकत नाहीत.
देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन.
5 माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात.
ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात.
6 ते एकत्र लपतात आणि
मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात.
7 देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे.
परक्या राष्ट्रांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
8 मी खूप चिंताक्रांत झालो आहे.
मी किती रडलो ते तुला माहीत आहे.
तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.
9 म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर.
तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
10 मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो.
परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो.
11 माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही.
लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत.
12 देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे.
मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
13 का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस,
तू मला पराभवापासून वाचवलेस
म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच
जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” याचालीवर बसवलेले दावीदाचे मास्कील तो शौलापासून गुहेत पळून गेला तेव्हाचे
57 देवा, माझ्यावर दया कर.
दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.
2 मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे
आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे.
3 तो स्वर्गातून मला मदत करतो
आणि मला वाचवतो.
मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो.
देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.
4 माझे जीवन संकटात आहे,
माझ्याभोवती माझे शत्रू आहेत.
ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत
आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
5 देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस
आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर पसरली आहे.
6 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला.
ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात.
मी त्यात पडेन परंतु शेवटी
तेच त्या खड्यात पडतील.
7 परंतु देव मला सुरक्षित ठेवील.
तो मला साहसी करील.
मी त्याचे गुणगान गाईन.
8 माझ्या आत्म्या, जागा हो.
सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा.
आपण पहाटेला जागवू या.
9 माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो.
मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
10 तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे.
11 देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे.
त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.
2006 by World Bible Translation Center