M’Cheyne Bible Reading Plan
दावीद आणि त्याचे लोक हेब्रोनला जातात
2 दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?”
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा.”
दावीदाने विचारले, “कुठे जाऊ?”
देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”
2 तेव्हा दावीद आपल्या दोन्ही बायकांसह हेब्रोनला गेला. (इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन बायका) 3 आपल्या बरोबरच्या लोकांनाही दावीदाने त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या गावांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.
4 यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करुन यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. मग त्याला ते म्हणाले, “याबेश गिलादच्या लोकांनी शौलचा दफनविधी केला.”
5 तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो. 6 देव तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे. 7 आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी मला राज्याभिषेक केला आहे.”
ईश-बोशेथ राजा बनतो
8 नेरचा मुला अबनेर हा शौलचा सेनापती होता. इकडे तो शौलचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला. 9 आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल [a] यांच्यावर राजा म्हणून नेमले.
10 हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता. 11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदांच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.
भयंकर झुंज
12 नेरचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले. 13 सरुवेचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.
14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे.”
यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”
15 तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने झुंज द्यायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.
16 प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरुन त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव हेलकथहसूरीम म्हणजेच “धारदार सुऱ्यांचे क्षेत्र” असे पडले हे स्थळ गिबोनमध्ये आहे. 17 त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.
अबनेरकडून असाएलचा वध
18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरूवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता. 19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने डावीकडे अथवा उजवीकडे वळून सुद्धा पाहिले नाही. 20 अबनेर ने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?”
असाएलने होकार भरला.
21 (असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते.) म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव. एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.
22 पुन्हा अबनेर त्याला म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.”
23 तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घुसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला.
यवाब आणि अबीशय अबनेरच्या मागावर
असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले. 24 पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. (ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.) 25 बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.
26 तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्याला विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे पर्यवसान दु:खात होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांना सांग.”
27 तेव्हा यवाब म्हणाला, “तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते.” 28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलांशी युध्दही केले नाही.
29 अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी मग रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करुन महनाइमला पोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.
30 यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांना त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरुन दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्याला आढळून आले. 31 पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती. 32 दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले.
यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करुन उजाडता उजाडता हेब्रोन येथे पोचली.
प्रीति
13 मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माझ्या ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. 2 जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ति असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्र्वास असला, परंतु माझ्या ठायी प्रीति नसली, 3 तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माझ्या ठायी प्रीति नसली.
4 तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही. प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही. 5 ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, 6 वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. 7 सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते
8 ती नेहमी विश्वास ठेवते. आशा धरते. नेहमी सहन करते. प्रीति कधी संपत नाही. पण भविष्य सांगण्याची दाने ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल. ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल. 9 कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही देवासाठी बोलतो (भविष्य सांगतो). आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. 10 पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.
11 जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा उहापोह करीत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. 12 आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो, तसा मी पूर्णपणे ओळखीन, 13 सारांश, या तीन गोष्टी राहतात: विश्वास, आशा आणि प्रीति पण यातील सर्वांत महान प्रीति आहे.
11 मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते.
2 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या नगरीत दुष्ट बेत करणारे लोक हेच होत. हे लोक इतर लोकांना वाईट गोष्टी करायला सांगतात. 3 ते म्हणतात, ‘आपण आपली घरे पुन्हा लवकरच बांधू. भांड्यातील मांसाप्रमाणे आपण येथे सुरक्षित आहोत.’ 4 ते खोटे बोलत आहेत. म्हणून तू माझ्यावतीने लोकांशी बोल. ̶मानवपुत्रा, लोकांना संदेश सांग.”
5 मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो. 6 ह्या नगरीत तुम्ही पुष्कळांना ठार केले, रस्ते प्रेतांनी झाकून टाकले. 7 आता परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘ती प्रेते म्हणजे मांस व नगरी म्हणजे भांडे आहे. तो (नबुखद्नेस्सर) येईल आणि ह्या सुरक्षित भांड्यातून तुम्हाला बाहेर काढील. 8 तुम्ही तलवारीला घाबरता. पण मी तलवारीलाच तुमच्यावर आणीत आहे.’” परमेश्वराने, आमच्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. मग त्या घडतीलच.
9 देव असेही म्हणाला, “मी तुम्हा लोकांना या नगरीतून बाहेर काढीन, व परक्यांच्या हाती देईन. मी तुम्हाला शिक्षा करीन. 10 तुम्ही तलवारीने मराल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. म्हणजे तुम्हाला कळेल की शिक्षा करणारा मीच एक आहे. मीच परमेश्वर आहे. 11 हो! ही जागा म्हणजे अन्न शिजविण्याचे भांडे होईल. त्यातील मांस तुम्ही असाल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. 12 मगच तुम्हाला ‘मी परमेश्वर आहे’ हे कळेल. तुम्ही मोडलात तो माझा कायदा होता. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राप्रमाणे जगण्याचे ठरविले.”
13 मी भविष्यावाणी संपवताच बनायाचा मुलगा पलट्या मेला. मी जमिनीवर पडलो. डोके टेकवून मी मोठ्याने ओरडलो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, तू इस्राएलच्या अवशेषाचा पूर्ण विध्वंस करणार आहेस!”
14 पण मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 15 “मानवपुत्रा, हा देश ज्यांना सक्तीने सोडावा लागला त्या इस्राएलच्या कुटुंबीयांचे, तुझ्या भाऊबंदाचे स्मरण कर. ते येथून दूर असलेल्या देशात राहतात. पण मी त्यांना परत आणीन. पण यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणतात, ‘परमेश्वरापासून दूर राहा ही भूमी आम्हाला दिलेली आहे ती आमची आहे.’
16 “म्हणून त्या लोकांना पुढील गोष्टी सांग; परमेश्वर, आमचा प्रभू, म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना दूरच्या देशांत सक्तीने घालविले, हे खरे आहे. मी त्यांना पुष्कळ देशांत विखुरले, त्या देशांतील मुक्कामाच्या अल्पकाळात मीच त्यांचे मंदिर होईन. 17 म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन. 18 आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील. 19 ते सर्वजण एकच व्यक्ती असल्याप्रमाणे, मी त्यांच्यात ऐक्य निर्माण करीन. मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. त्यांचे दगडाचे ह्दय काढून घेऊन तिथे मी खरे ह्दय बसवीन. 20 मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो, त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन.’”
21 मग देव पुढे म्हणाला, “पण सध्या, त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, 22 ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती. 23 परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवर [a] थांबली. 24 मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले व ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले. 25 मी परागंदा झालेल्या लोकांशी बोललो. परमेश्वराने मला दाखाविलेल्या सर्व गोष्टी मी त्यांना संगितल्या.
असाफचे स्तोत्र
50 0परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे.
तो पृथ्वीवरील पूर्व व पश्चिमेकडील सर्व लोकांना बोलावतो.
2 सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
3 आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही.
त्याच्यासमोर आग लागली आहे.
त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला
त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”
6 देव न्यायाधीश आहे
आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
7 देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका!
इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन.
मी देव आहे.
तुमचा देव आहे.
8 मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही.
इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा.
तुम्ही मला ती रोज द्या.
9 मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही.
मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही.
10 मला त्या प्राण्यांची गरज नाही.
जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वातावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहीत आहे
डोंगरावर हलणारी प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
12 मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागितले नसते.
मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
13 मी बैलाचे मांस खात नाही.
मी बकऱ्यांचे रक्त पीत नाही.”
14 म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली.
तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.
15 देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा.
मी तुम्हाला मदत करीन.
आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
16 देव दुष्ट लोकांना म्हणतो,
“तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता.
तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
17 मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता?
मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
19 तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
20 तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता.
स्वत:च्या भावाविषय़ी सुध्दा!
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे
तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही.
आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते.
पण मी मुळीच गप्प बसणार नाही.
मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन
आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच
तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले
तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23 म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो.
जर एखाद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
2006 by World Bible Translation Center