M’Cheyne Bible Reading Plan
शौलाच्या निधनाचे वृत्त दावीदाला समजते
1 अमालेक्यांचा पाडाव करुन दावीद सिकलाग येथे परतला. शौलाच्या मृत्यूनंतर लगेचची ही घटना आहे. दावीदाला सिकलाग येथे येऊन दोन दिवस झाले होते. 2 तिसऱ्या दिवशी तिथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतला होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. सरळ दावीदापाशी येऊन त्याने लोटांगण घातले.
3 दावीदाने त्याला “तू कोठून आलास?”
म्हणून विचारले. त्याने आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे सांगितले.
4 तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे!”
तो म्हणाला, “लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात कामी आले. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”
5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “हे दोघे मेले हे तुला कसे कळले?”
6 यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते. 7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला मी दिसलो. त्याने मला बोलावले आणि मी ओ दिली. 8 त्याने माझी चौकशी केली. मी अमालेकी असल्याचे त्याला सांगितले. 9 तेव्हा शौल म्हणाला, ‘मला जबर दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारुन टाक. एवीतेवी मी मरणाच्या दारातच उभा आहे.’ 10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
11 हे ऐकून दावीदाला इतके दु:ख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतीच्या लोकांनीही त्याचे अनुसरण केले. 12 दु:खाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळ पर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक मृत्यु मुखी पडले या बद्दल त्यांनी शोक केला.
दावीद त्या अमालेक्याच्या वधाचा हुकूम सोडतो
13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाशी दावीद बोलला. त्याला दावीदाने विचारले, “तू कुठला?”
त्याने सांगितले. “मी अमालेकी असून एका परदेशी माणसाचा मुलगा आहे.”
14 दावीदाने त्याला विचारले, “देवाने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
15-16 पुढे दावीद त्याला म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस. तू अपराधी आहेस याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” दावीदाने मग आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
शौल आणि योनाथानला उद्देशून दावीदाचे शोकगीत
17 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक शोकपूर्ण गीत म्हटले. 18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले पाहा,
हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20 ही बातमी गथ मध्ये सांगू नका
अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करु नका.
नाहीतर पलिष्ट्यांच्या त्या मुली (शहरे) आनंदित होतील.
नाहीतर (सुंता न केलेल्या) त्या परकीयांच्या मुलींना (शहरांना) आनंद होईल.
21 “गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस
किंवा दव न पडो!
तिथल्या शेतातून यज्ञात अर्पण
करण्यापुरतेही काही न उगवो!
कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला
शौलाची ढाल तेलपाण्यावाचून तशीच पडली
22 योनाथानच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले
शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले.
रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांना वधिले,
बलदंडांची हत्या केली.
23 “शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले.
एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही
त्यांची ताटातूट केली नाही.
गरुडांहून ते वेगवान्
आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा.
किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली
वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
25 “युध्दात शूर पुरुष कामी आले गिलबोवाच्या
डोंगरावर योनाथानला मरण आले.
26 बंधो. योनाथान, मी अतिशय दु:खी
असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे.
तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला.
स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते
27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले
त्यांची शस्त्रे नष्ट झाली.”
पवित्र आत्म्याची दाने
12 आता, बंधूनो, आध्यात्मिक दानांसबंधी तुम्ही अज्ञान असावे असे मला वाटत नाही. 2 तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुम्ही यहूदीतर होता तेव्हा मूर्तिपूजेकडे तुमचा कल होता. 3 म्हणून मी तुम्हांला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभु आहे,” असे म्हणू शकत नाही.
4 आध्यात्मिक दाने विभागलेली आहेत पण तोच आत्मा ही विभागणी करतो. 5 सेवेचे प्रकार आहेत, पंरतु ज्याची आम्ही सेवा करतो तो एकच आहे. 6 कार्य करण्याचे वेगवेगळे विभाग आहेत पण ह्या सेवा एकाच देवाकडून येतात.
7 कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले आहे. 8 एका व्यक्तीला आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाचे वचन सांगण्याचे शहाणपण दिले जाते. आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाने बोलण्याचे, 9 कोणाला त्याच आत्म्याने विश्वास व दुसऱ्याला फक्त त्याच एका आत्म्याद्वारे बरे करण्याचे दान दिले आहे. 10 दुसऱ्या कोणाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ति, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, दुसऱ्या कोणाला वेगवेगळ्या भाषा बोलण्याची, दुसऱ्याला भाषांतर करुन अर्थ सांगण्याची शक्ति दिली आहे. 11 परंतु तो एकच आत्मा जो त्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देऊन ही सर्व कार्ये पूर्णत्वास नेतो.
ख्रिस्ताचे शरीर
12 कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्तसुद्धा आहे. 13 जर आपण यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र असून आपणांला एकच आत्मा देह म्हणून दिला आहे. कारण एका आत्म्याने आपणाला एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा दिलेला आहे.
14 आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही, तर पुष्कळ असतात 15 जर पाय म्हणतो, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का? 16 आणि जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही. होते का? 17 संबंध शरीरच जर डोळा असते तर आपल्याला ऐकता कसे आले असते? 18 परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे. 19 आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? 20 पण असे आहे की, अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे.
21 डोळा हाताला म्हणू शकत नाही की, “मला तुझी गरज नाही.” किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” 22 याच्या उलट जे अवयव आपण कमी महत्त्वाचे समजतो, त्यांची आपण अधिक काळजी घेतो. 23 आणि जे न दाखवण्याजोगे अवयव त्यांना मोठ्या सभ्यतेने वागवतो. 24 पण आपल्या दाखविता येण्याजोग्या अवयवांना तशी गरज नसते. त्याऐवजी जे अवयव उणे आहेत त्यांना मोठा मान देण्यासाठी देवाने असे शरीर जुळविले आहे, 25 यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत तर उलट अवयवांनी एकमेकांची काळजी घ्यावी. 26 जर शरीराचा एक अवयव दुखत असेल तर सर्व अवयव त्याच्याबरोबर दु:ख सोसतात, एका अवयवाचा सन्मान झाला तर सर्व अवयव त्याच्याबरोबर आनंदीत होतात.
27 म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात 28 शिवाय देवाने मंडळीत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, जे चमत्कार करतात ते, ज्यांना आरोग्य देण्याचे दान आहे ते, 29 जे लोक मदत करतात, जे पुढारीपण करतात व ज्या लोकांना भिन्न भिन्न भाषा बोलण्याचे दान आहे, असे लोक ठेवले आहेत. म्हणजे सर्वच प्रेषित नाहीत, सर्वच संदेष्टे नाहीत, सर्वच शिक्षक नाहीत, सर्वांनाच चमत्कार करण्याची शक्ति नाही. 30 सर्वांनाच आरोग्य देण्याची दाने नाहीत, सर्वच अन्य भाषेत बोलत नाहीत, सर्वांनाच भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ति नाही. 31 तथापि आत्म्याच्या अधिक मोठ्या दानांसाठी प्रयत्न करा. आणि आता मी तुम्हांस ह्याहूनही उत्तम मार्ग दाखवितो.
10 मग मी करुब दूतांवर असलेल्या वाडग्याकडे पाहिले. तो इंद्रनीलाप्रमाणे नितळ निळा दिसत होता. आणि त्यावर सिंहासनासारखे काहीतरी होते. 2 नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेत [a] पाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.”
तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला. 3 तो करुबाकडे गेला तेव्हा करुब मंदिराच्या दक्षिणेकडील भागात उभे होते. ढगाने आतले अंगण व्यापले. 4 मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले. 5 मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता.
6 करुबांच्या मध्ये असलेल्या चाकातल्या दरम्यान जाऊन निखारे आणण्याची आज्ञा देवाने तागाचे कपडे घातलेल्या माणसाला दिली. मग तो त्या ढगात शिरला व एका चाकाजवळ उभा राहिला. 7 मग एका करुबाने हात लांब करुन, त्यांच्यामधील काही धगधगते निखारे उचलले आणि त्या माणसाच्या हाती दिले. मग तो माणूस निघून गेला. 8 (करुबांच्या पंखाखाली माणसाच्या हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.)
9 मग तेथे चार चाके असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रत्येक करुबाजवळ एक चाक होते. ती चाके नितळ तृणमण्याप्रमाणे दिसत होती. 10 ती चारही चाके सारखीच होती. चाकात चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती. 11 ती चालताना कोठत्याही दिशेने जात. पण करुब चालताना कोणत्याही बाजूला वळत नसत. ज्या बाजूस त्यांचे डोके होते, त्या बाजूसच ते जात. ते इकडे तिकडे वळत नसत. 12 त्यांच्या सर्वांगावर म्हणजेच पाठींवर, हातांवर, पंखांवर डोळे होतेच पण त्याशिवाय चाकांवरही डोळे होते. 13 “चाकांच्या मधली जागा” असे त्या चाकांना म्हटलेले मी ऐकले.
14-15 प्रत्येक करुब दूताला चार तोंडे होती. पहिले करुबाचे तोंड, दुसरे माणसाचे तोंड, तिसरे सिंहाचे तोंड व चवथे गरुडाचे तोंड खबार कालव्याजवळच्या दृष्टान्तात मी पाहिलेले प्राणी म्हणजे करुब दूतच होते. [b]
मग करुब हवेत उडाले. 16 आणि चाकेही त्यांच्याबरोबर वर गेली. जेव्हा करुब पंख पसरुन हवेत उडत, तेव्हा चाके दिशा बदलत नसत. 17 करुब हवेत उडाले, तर चाकेही उडत. ते स्थिर उभे राहिले, तर चाकेही स्थिर राहात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) त्यांच्यात होता.
18 मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली. 19 मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.
20 मग मी खबार कालव्याजवळ इस्राएलच्या देवाच्या प्रभेखाली पाहिलेल्या प्राण्याला ओळखले आणि माझ्या लक्षात आले की ते प्राणी म्हणजे करुब दूतच होते. 21 प्रत्येक प्राण्याला चार तोंड व चार पंख होते. पंखाखाली मानवी हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता. 22 खबार कालव्याजवळ पाहिलेल्या चार तोंडाप्रमाणेच करुब दूतांची तोंडे होती. ते जात असलेल्या दिशेकडेच सरळ पाहात होते.
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे गाणे
49 सर्व राष्ट्रांनो, हे ऐका.
पृथ्वीवरील सर्व जनहो! हे ऐका.
2 प्रत्येकाने, गरीब असो वा श्रीमंत, हे ऐकले पाहिजे.
3 मी तुम्हाला काही शहाणपणाच्या
आणि हुशारीच्या गोष्टी सांगणार आहे.
4 मी त्या गोष्टी ऐकल्या आणि आता
माझ्या वीणेच्या साथीवर मी त्या तुम्हाला गाऊन दाखवतो.
5 संकटे आली तर मला भीती का वाटावी?
दुष्टांनी मला घेरले आणि सापळ्यात अडकवले तर मी का घाबरु?
6 काही लोकांना वाटते की त्यांची सत्ता
आणि संपत्ती त्यांचे रक्षण करील परंतु ते लोक मूर्ख आहेत.
7 कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही
आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही.
8 स्वःतचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो.
सदैव जिवंत राहाण्याचा हक्क विकत घेण्याइतका.
9 पैसा कुणाकडेच नसतो व शरीर थडग्यात कुजू नये
म्हणून ते वाचविण्यासाठी ही कुणाकडे पैसे नसतात.
10 शहाणी माणसेही मूर्ख लोकांसारखीच मरतात.
आणि इतर लोक त्यांची सर्व संपत्ती घेतात.
11 थडगे हेच सर्वांचे सर्वकाळचे नवीन घर असते.
आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे यामुळे त्यात काहीही फरक पडत नाही.
12 श्रीमंत लोक सर्वकाळ जगू शकत नाहीत.
ते प्राण्यासारखेच मरतात.
13 आपल्या संपत्तीवर भरंवसा ठेवणाऱ्या
अशामूर्ख लोकांचे असेच होते.
14 ते लोक मेंढ्यांप्रमाणे आहेत.
थडगे त्यांची लेखणी आहे.
मरण त्यांचा मेंढपाळ आहे.
एका सकाळी त्यांच्या शरीराचा थडग्यात नाश होईल आणि ते कुजेल तेव्हा चांगले लोक आनंद करतील.
15 परंतु देव किंमत चुकवून माझा जीव वाचवेल.
तो मला थडग्याच्या सामर्थ्यापासून वाचवेल.
16 लोक केवळ श्रीमंत आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस.
लोकांकडे मोठी, वैभवशाली घरे आहेत म्हणून त्यांची भीती बाळगू नकोस.
17 ते लोक मरतील तेव्हा एकही गोष्ट बरोबर घेऊन जाणार नाहीत.
या सुंदर वस्तूपैकी एकही वस्तू ते बरोबर नेणार नाहीत.
18 आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत
ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ति स्वत:चेच अभिनंदन करील व लोकही त्याची स्तुति करतील.
19 परंतु त्याला त्याच्या पूर्वजांकडे जाण्याची वेळ येईलच
आणि नंतर तो दिवसाचा प्रकाश पुन्हा बघू शकणार नाही.
20 लोक श्रीमंत असूनही समजू शकणार नाहीत.
ते प्राण्यांप्रमाणेच मरण पावतील.
2006 by World Bible Translation Center