M’Cheyne Bible Reading Plan
शौलाचा मृत्यू
31 पलिष्ट्यांची इस्राएलांशी लढाई झाली तेव्हा इस्राएलांनी शत्रूंपासून पळ काढला. बरेच इस्राएल लोक गिलबोवा डोंगरात मारले गेले. 2 शौल आणि त्याची मुले यांच्याशी पलिष्टी निकराने लढले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलाच्या मुलांचा पलिष्ट्यांनी वध केला.
3 युद्ध शौलाच्या हाताबाहेर जाऊ लागले. तिरंदाजांनी शौलावर बाणांचा वर्षाव केला आणि शौल चांगलाच घायाळ झाला. 4 तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझ्यावर चालव. नाहीतर हे परकीय मला भोसकून माझी टिंगल टवाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरुन या गोष्टीला नकार दिला. तेव्हा शौलाने आपली तलवार उपसली व स्वतःला भोसकले.
5 शस्त्रवाहकाने शौल मेला हे पाहून आपली तलवार काढली आणि आत्महत्या केली. शौला बरोबरच त्याने देह ठेवला. 6 अशा प्रकारे त्या दिवशी शौल, त्याची तीन मुले आणि त्याचा शस्त्रवाहक असे सर्व एकदम मृत्युमुखी पडले.
शौलच्या मरणाचा पलिष्ट्यांना आनंद
7 खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या इस्राएली लोकांनी, इस्राएली सैन्याला पळ काढताना पाहिले. शौल आणि त्याची मुले मरण पावल्याचे त्यांना आढळले. तेव्हा त्यांनी ही आपापली गावे सोडून पलायन केले. त्या ठिकाणी मग पलिष्ट्यांनी वस्ती केली.
8 दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील चीजवस्तू लुबाडायला आले. त्यांना शौल आणि त्याची तीन मुले गिलबोवा डोंगरात मरुन पडलेली आढळली. 9 पलिष्ट्यांनी शौलचे मुंडके कापले आणि चिलखत, शस्त्रे पळवली सर्व देशभरच्या लोकांना आणि देवळांमधून त्यांनी हे वर्तमान कळवले. 10 शौलची शस्त्रे त्यांना अष्टारोथच्या देवळात ठेवली आणि त्याचा मृतदेह बेथ-शानच्या गावकुसावर टांगला.
11 पलिष्ट्यांनी शौलची काय गत केली ते याबेश-गिलाद येथील रहिवाश्यांनी ऐकले. 12 तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघून बेथ-शान येथे पोचले. तेथे गावकुसावर टांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली. याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सर्वांनी त्यांचे दहन केले. 13 मग त्यांच्या अस्थी काढून याबेश मधील झाडाखाली पुरल्या. सर्व लोकांनी सात दिवस उपास करुन शोक प्रगट केला.
11 मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
अधिकाराखाली असणे
2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता. 3 परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.
4 प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो. 5 परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे. 6 जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.
7 ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. 8 पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे. 9 आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली. 10 यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
11 तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. 12 कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
13 हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का? 14 पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय? 15 परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गतः आच्छादनासाठी दिले आहेत. 16 जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
प्रभु भोजन
17 पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमची हानि होते. 18 प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये गट असतात, आणि काही प्रमाणात ते खरे मानतो. 19 (तरीही तुम्हांमध्ये पक्ष असावेत) यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावेत.
20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही. 21 कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो. 22 खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हांला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करु काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
23 कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली. 24 आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 25 त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “हा द्राक्षारसाचा प्याला माझ्या रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही द्राक्षारस प्याल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 26 कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता व हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
27 म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खातो किंवा द्राक्षारसाचा प्याला पितो. तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. 28 पंरतु मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी. आणि नंतर भाकर खावी किंवा द्राक्षारसाचा प्याला प्यावा. 29 कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व द्राक्षारसाचा प्याला पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर न्याय ओढवून घेतो. 30 याच कारणामुळे तुम्हांतील अनेक जण आजारी आहेत. आणि पुष्कळजण झोपलेले आहेत. 31 परंतु जर आम्ही आमची परीक्षा करु तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. 32 प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हांला शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हांलाही शिक्षा होऊ नये.
33 म्हणून माझ्या बंधूनो, जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा. 34 जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही न्यायनिवाड्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करुन देईन.
9 मग देव नगरीला शिक्षा करणाऱ्या लोकांच्या नेत्यांशी मोठ्याने बोलला. प्रत्येक नेत्याच्या हातात स्वतःची विध्वंसक शस्त्रे होती. [a] 2 नंतर मी वरच्या प्रवेशद्वाराकडून सहा माणसांना येताना पाहिले. हे प्रवेशद्वार उत्तरेला होते. प्रत्येकाच्या हातात प्राणघातक शस्त्रे होती. एकाने तागाचे कपडे घातले होते. त्याच्या कमरेला लेखणी आणि दौत होती. ते लोक मंदिरातील काशाच्या वेदीपाशी जाऊन उभे राहिले. 3 करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या व लेखणी व दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.
4 मग परमेश्वर (म्हणजेच प्रभा) त्याला म्हणाला, “यरुशलेम नगरीत फीर आणि लोक करीत असलेल्या दुष्कृत्यांबद्दल दु:खी आणि अस्वस्थ असलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर खूण कर.”
5-6 मग देव इतरांशी बोलताना मी ऐकले, “तुम्ही त्या माणसाच्या मागे जावे. ज्यांच्या कपाळावर खूण नाही त्यांना तुम्ही ठार केलेच पाहिजे. मग ते वडीलधारी (नेते) असोत वा तरुण तरुणी असोत किंवा मुले व त्यांच्या आया असोत. कपाळावर खूण नसलेल्या प्रत्येकाला तुम्ही मारलेच पाहिजे. अजिबात दया दाखवू नका. कोणाचीही कीव करु नका. माझ्या मंदिरापासूनच सुरवात करा.” मग त्यांनी मंदिरा समोर असलेल्या वडील धाऱ्यांपासूनच (नेत्यांपासूनच) सुरवात केली.
7 देव त्यांना म्हणाला, “ही जागा अस्वच्छ करा. हे अंगण प्रेतांनी भरा! आता जा.” म्हणून मग ते नगरीत गेले आणि त्यांनी लोकांना ठार केले.
8 ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”
9 देव म्हणाला, “इस्राएल आणि यहुदाच्या लोकांनी अनंत पापे केली आहेत, ह्या देशात सगळीकडे खून होत आहेत. ही नगरी अपरांधानी भरुन गेली आहे. का? कारण लोक मनाशीच म्हणतात, ‘देवाने ह्या देशाचा त्याग केला. आम्ही काय करीत आहोत, हे त्याला दिसू शकत नाही.’ 10 मी अजिबात दया दाखविणार नाही. त्या लोकांबद्दल मला वाईट वाटणार नाही. त्यांनी स्वतःवरच संकट ओढवून घेतले आहे. मी फक्त त्यांना योग्य अशी शिक्षा देत आहे.”
11 मग तागाचे कपडे घातलेला व लेखणी आणि दौत जवळ असणारा माणूस म्हणाला, “तुझ्या आज्ञेचे मी पालन केले.”
एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
हे त्या महान राजाचे शहर आहे.
3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
देवाला किल्ला म्हणतात.
4 एकदा काही राजे भेटले.
त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते घाबरले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना घेरले,
भीतीने त्यांचा थरकाप झाला.
7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
2006 by World Bible Translation Center