Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 28

पलिष्टी युध्दाला सज्ज

28 तेव्हा पुढे पलिष्ट्यांनी इस्राएलवर स्वारी करायला सैन्याची जमवाजमव केली. आखीश दावीदला म्हणाला, “इस्राएलशी युद्ध करायला तू आणि तुझे लोक यांना माझ्या बाजूला असले पाहिजे हे लक्षात ठेव.”

दावीद म्हणाला, “निश्चितच माझी कामगिरी पाहालच तुम्ही.”

आखीश म्हणाला, “उत्तम. मी तुला माझा अंगरक्षक म्हणून नेमतो. तू माझ्या संरक्षणाची काळजी घेशील.”

शौल आणि एन-दोर येथील एक बाई

शमुवेल मरण पावला होता. सर्व इस्राएलांनी निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्याच्या गावी रामा येथे शमुवेलचे दफन केले होते.

शौलने मांत्रिक आणि दैवज्ञ यांना इस्राएल मधून घालवून दिले होते.

पलिष्ट्यांनी युद्धाच्या तयारीने शूनेम येथे तळ दिला. शौलने सर्व इस्राएलांना एकत्र आणून गिलबोवा येथे तळ दिला. पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याची छाती धडधडू लागली. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली पण परमेश्वराने त्याला उत्तर दिले नाही. स्वप्न, संदेष्टे किंवा उरीम यापैकी कोणत्याही माध्यामातून देव त्याच्याशी बोलला नाही. शेवटी शौल आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच या युध्दाविषयी प्रश्न विचारतो.

ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.”

आपणच शौल आहोत हे ओळखू देऊ नये म्हणून वेष पालटून शौल दोन सेवकांना सोबतीला घेऊन रात्रीच त्या बाईकडे गेला. तिला म्हणाला, “पुढे काय होणार हे मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा आपल्या भूतविद्येचा प्रयोग करुन, मी ज्याचे नाव घेईन त्याला इथे हजर कर.”

तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”

10 शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.

11 तेव्हा कोणाला समोर आणू असे तिने त्याला विचारले.

शौल म्हणाला, शमुवेलला आण.

12 आणि तसे झाले. शमुवेलला पाहताच ती मोठ्याने किंचाळली. शौलला ती म्हणाली, “तू मला फसवलेस तू शौल आहेस.”

13 तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.”

ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”

14 शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?”

ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले. 15 शमुवेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”

शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्टी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वप्न किंवा संदेष्टे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करु ते तू सांग.”

16 शमुवेल म्हणाला, “परमेश्वराने तुझा त्याग केला आहे. तो आता दावीद या तुझ्या शेजाऱ्याच्या बाजूचा आहे. तेव्हा मला का त्रास देतोस? 17 परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद. 18 तू परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागला नाहीस. परमेश्वराचा क्रोध किती आहे ते दाखवायला तू अमालेक्यांचा नाश करायाला हवा होतास, तसा तू केला नाहीस. म्हणून परमेश्वर आज तुझ्याशी असे वागत आहे. 19 पलिष्ट्यांच्या हातून प्रभु तुझा आणि इस्राएल सैन्याचा पराभव करील आणि उद्या तू आणि तुझी मुले इथे माझ्याबरोबर असाल.”

20 हे ऐकून शौलने जमिनीवर लोळण घेतली. शमुवेलच्या भाकिताने त्याला कापरे भरले. त्याआधी दिवसभर आणि रात्र भर त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते.

21 तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे. 22 आता कृपा करुन माझे ऐक. मी खायला देते ते खा तरच तुला वाटचाल करायला तरतरी येईल.”

23 पण शौलने खायचा आग्रह निग्रहाने धुडकावून लावला.

शेवटी शौल बरोबरच्या सेवकांनीही तिच्याच सारखी त्याला खायची विनंती केली. तेव्हा अखेर शौलने त्यांचे म्हणणे मानले. जमिनीवरुन उठून तो पलंगावर बसला. 24 एक चांगले धष्टपुष्ट वासरु त्या बाईकडे होते ते तिने पटकन् मारले. मग पीठ मळून त्याची खमीर विरहित भाकर भाजली. 25 शौल आणि त्याचे सेवक यांना खायला दिले. त्या सर्वांनी ते खाऊन त्याच रात्री तिचा निरोप घेतला.

1 करिंथकरांस 9

Rights That Paul Has Not Used

मी मुक्त नाही का? मी प्रेषित नाही का? आमचा प्रभु येशू याला मी पाहिले नाही का? तुम्ही माझे प्रभूमधील काम नाही का? जरी मी इतरांच्यासाठी प्रषित नसलो तरीही तुमच्यासाठी मी एक आहे. कारण तुम्ही प्रभूमध्ये असलेल्या माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात.

जे माझी परीक्षा घेऊ पाहतात, त्यांच्याविरुद्ध माझा बचाव असा आहे. मला खाण्याचा आणि पिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ आणि पेत्र यांच्यासारखे एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला पत्नी करुन घेण्याचा मला हक्क नाही काय? का फक्त बर्णबा व मलाच आमच्या उपजीविकेकरिता काम न करण्याचा हक्क आहे? स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? द्राक्षमळा लावून द्राक्षे खात नाही असा कोण आहे? किंवा मेढ्यांचे कळप पाळून कळपाचे काही दूध पित नाही असा कोण आहे?

फक्त मानवी दैनंदिन व्यवहारानुसार मी हे सांगत नाही. तर नियमशास्त्रसुद्धा हेच सांगत नाही का? मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “मळणी करीत असताना बैलाला मुसके घालू नकोस.” [a] देव बैलांची काळजी करीत नाही, 10 तो खात्रीने आमच्याविषयीच सांगत नाही काय? होय, ते आमच्यासाठीच लिहिले होते, कारण जो नांगरतो त्याने अपेक्षेने नांगरावे. आणि जो मळणी करतो त्याने पिकात वाटा असावा या हेतूने मळणी करावी. 11 जर आम्ही तुमच्या फायद्यासाठी आध्यात्मिक बी पेरले, तर तुमच्यापासून ऐहिक गरजांची कापणी केली तर ती मोठी गोष्ट आहे काय? 12 जर इतरही तुमच्यापासून ऐहिक गोष्टींची कापणी करण्याच्या या अधिकारात सहभागी होत असतील तर तसे करण्याचे आम्हालाही यापेक्षा अधिक मोठे कारण नाही काय? परंतु आम्ही हा अधिकार बजावला नाही. त्याऐवजी ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मार्गात अडथळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व गोष्टी सहन करतो. 13 तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात. 14 त्याचप्रकारे, प्रभूने आज्ञा केली आहे की, जे सुवार्ता गाजवितात त्यांनी त्या सुवार्ता गाजविण्याकडून आपला चरितार्थ चालवावा.

15 परंतु मी या कोणत्याही अधिकाराचा वापर केला नाही. आणि माझ्या बाबतीत असे घडावे म्हणूनही मी हे लिहिले नाही. कारण माझे अभिमान बाळगण्याचे कारण कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करीन, 16 कारण जर मी सुवार्ता गाजवितो, तर मला अभिमान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण मला ते करणे आवश्यक आहे. आणि जर मी सुवार्ता गाजविली नाही तर माझ्यासाठी ते किती वाईट असेल! 17 कारण जर मी हे स्वेच्छेने करतो तर मी बक्षिसास पात्र आहे, पण जर एखादे कार्य माझ्यावर सोपविले आहे जे माझ्या आवडीने नव्हे 18 तर माझे बक्षीस कोणते? ते हे की मी फुकट सुवार्ता सांगावी यासाठी की, सुवार्ता सांगत असताना मी वेतन मिळण्याच्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करु नये.

19 कारण, जरी मी सर्व लोकांपासून मुक्त असलो तरी मी स्वतःला सर्व लोकांचा गुलाम करुन घेतले आहे. 20 यासाठी की, मी अधिक मिळवावे. यहूदी लोकांना जिंकण्यासाठी यहूदी लोकांसाठी मी यहूदी झालो. जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांच्यासाठी 21 मी नियम शास्त्राधीन असणाऱ्या लोकांसारखा झालो. (जरी मी नियमशास्त्राधीन नाही तरी तसा झालो). यासाठी की जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना मी नियमशास्त्रविरहीत असा झालो. (जरी मी देवाच्या नियमशास्त्राशिवाय नाही) तरी मी ख्रिस्ताच्या नियमाधीन आहे. यासाठी की, जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना जिंकता यावे. 22-23 जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी मी दुर्बल झालो यासाठी की दुर्बलांना मला जिंकता यावे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे यासाठी की त्या आशीर्वादाचा वाटेकरी मला होता यावे.

24 तुम्हांला माहीत नाही का मैदानातील शर्यतीत धावणारे सर्व धावतात, परंतु एकालाच बक्षिस मिळते? अशा प्रकारे धावा की तुम्ही ते जिंकाल. 25 प्रत्येक जण जो शर्यतीत धावतो तो सर्व बाबतीत कडक रीतीने प्रशिक्षण घेतो (आत्मसंयमन करतो.) ते नाशवंत गौरवाचा मुगुट मिळविण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुगुट मिळविण्यासाठी करतो. 26 यास्तव मी अनिश्चितपणे नाही तर ज्याला ध्येय आहे अशासारखा धावतो, तसेच जो कोणी नुसताच वाऱ्यावर प्रहार करीत नाही, तसे मी मुष्टीयुद्ध करतो. 27 त्याऐवजी मी आपल्या शरीराला कठोरपणे वागवितो आणि त्याला ताब्यात आणतो म्हणजे दुसऱ्यांना उपदेश केल्यानंतर देवाकडून मी नाकारला जाऊ नये.

यहेज्केल 7

मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, हा आहे परमेश्वराचा, तुझ्या प्रभूचा, इस्राएलच्या भूमीसाठी संदेश.

“शेवट येत आहे.
    संपूर्ण देशाचा नाश होईल.
आता तुमचा अंतकाळ येत आहे.
    मी तुमच्यावर किती रागावलो आहे ते दाखवीन.
तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन.
तुम्ही केलेल्या भयंकर कृत्यांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.
मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही.
    मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही.
तुमच्या दुष्कृत्यांबद्दल
    मी तुम्हाला सजा देत आहे.
तुम्ही फारच भयंकर कर्मे केलीत.
    आता तुम्हाला कळेल की मीच देव आहे.”

नंतर परमेश्वराने, माझ्या प्रभुने पुढील गोष्टी सांगितल्या. “एकापाठोपाठ एक अरिष्ट येईल. शेवट येत आहे. तो लवकरच येईल. इस्राएलवासीयांनो, तुम्ही शिटीचा आवाज ऐकत आहात ना? शत्रू येत आहे. शिक्षेची ती वेळ लवकरच येत आहे. पवर्तांवरुन शत्रूचा आवाज अधिकाधिक वाढत चालला आहे. आता लवकरच, तुम्हाला, मी किती रागावलो आहे, ते कळेल. मी माझा सगळा राग तुमच्यावर काढीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कर्मांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन. मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करत आहे. तुम्ही फारच भयानक कृत्ये केली. आता तुम्हाला कळेल की तुम्हाला दणका देणारा मी तुमचा परमेश्वर आहे.

10 “रोप उगवते व वाढते आणि त्याला फुले येतात, त्याप्रमाणे शिक्षेची ती वेळ आली आहे. देवाने खूण केली आहे. शत्रू तयार झाला आहे. शिक्षेला सुरवात होत आहे. हातातील काठीला अंकुर फुटले आहेत. [a] गर्विष्ठ राजा (नबुखद्नेस्सर) अधिक तयार झाला आहे. 11 तो हिंसक माणूस त्या दुष्टांना शिक्षा करायला सज्ज झाला आहे. इस्राएलमध्ये खूप लोक आहेत पण तो त्यांच्यातला नाही. तो त्या गर्दीतला एक नाही. तो कोणी त्या लोकांचा मोठा नेता नाही.

12 “ती शिक्षेची वेळ आली आहे. तो दिवस जवळच आहे. विकत घेणाऱ्यांना आनंद होणार नाही, विकणाऱ्यांना खेद वाटणार नाही. का? कारण प्रत्येकालाच ती भयंकर शिक्षा भोगावी लागले. 13 स्वतःची मालमत्त विकणाऱ्या लोकांना ती कधीच परत मिळणार ना. [b] एखादा जरी जिवंत राहिला, तरी त्याला ती मिळणार नाही. का? कारण हा दृष्टान्त सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे एखादा जिवंत राहिल्यास, बाकीच्यांना काही आनंद होणार नाही.

14 “ते तुतारी फुंकून लोकांना सावध करतील. लोक लढायला सज्ज होतील पण ते लढण्यास पुढे सरसावणार नाहीत. का? कारण मी सगळ्यांना माझ्या कोपाची तीव्रता दाखवून देईन. 15 शत्रू नगरीबाहेर तलवार घेऊन सज्ज आहे. रोगराई व उपासमार नगरीत आहेत. एखादा बाहेर गेला, तर शत्रू सैनिक त्याला ठार करील आणि ते नगरीत राहिले तर, उपासमार व रोगराई त्यांचा नाश करील.

16 “पण काही लोक निसटतील ते पवर्ताकडे धाव घेतील. पण त्यांना सुख लागणार नाही. पण स्वतःच्याच पापांमुळे ते दु:खी होतील. ते रडतील आणि दु:खाने पारव्याप्रमाणे घुमतील. 17 लोक इतके दमलेले व दु:खी कष्टी असतील की ते हात उचलू शकणार नाहीत, त्यांचे पाय पाण्याप्रमाणे होतील. 18 ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील. 19 ते त्यांच्याजवळील चांदीच्या मूर्ती रस्त्यावर टाकतील. सोन्याच्या मूर्ती त्यांना घाणेरड्या चिंध्यांप्रमाणे वाटतील. का? कारण परमेश्वराच्या क्रोधाग्नीतून त्या मूर्ती त्यांना वाचवू शकणार नाहीत. त्या मूर्ती म्हणजे फक्त लोकांचे पतन व्हावे (पाप करावे) म्हणून रचलेले सापळे होते. त्या लोकांना त्यांच्या मूर्ती अन्न देणार नाहीत व स्वतःचेही पोट भरणार नाहीत.

20 “त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन. 21 त्यांना मी परकीयांच्या हाती सोपवीन. ते परके त्यांची टर उडवितील. ते काहींना ठार करतील तर काहींना कैद करतील. 22 मी तोंड फिरवीन, त्यांच्याकडे पाहणारसुद्धा नाही. ते परके लोक माझ्या मंदिराचा विध्वंस करतील. त्या पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यात ते शिरतील आणि मंदिर अपवित्र करतील.

23 “कैद्यांसाठी बेड्या तयार करा. का? कारण पुष्कळ लोकांना, दुसऱ्यांना ठार मारल्याबद्दल, शिक्षा केली जाईल. नगरीच्या प्रत्येक जागी हिंसा होईल. 24 मी दुसऱ्या राष्ट्रांतून दुष्ट लोक आणीन. ते इस्राएलच्या लोकांची सर्व घरे बळकावतील. तुमचे गर्वाचे घर मी खाली करीन. तुमची पूजास्थाने दुसऱ्या राष्ट्रांतील लोक ताब्यात घेतील.

25 “तुम्ही भीतीने कापाल. तुम्ही शांतीचा शोध घ्याल पण ती कोठेच मिळणार नाही. 26 एकामागून एक वाईट गोष्टी तुम्ही ऐकाल. तुमच्या कानावर फक्त वाईट बातम्याच पडतील. तुम्ही संदेष्ट्याला शोधून दृष्टान्ताबद्दल विचारायला पाहाल, पण तुम्हाला असा कोणीच भेटणार नाही. याजकाजवळ तुम्हाला शिकविण्यासारखे काहीच नसेल. वडीलधारी मंडळी (नेते) तुम्हाला योग्य सल्ला देणार नाहीत. 27 तुमचा राजा मृतांसाठी रडत असेल. नेते शोकप्रदर्शक कपडे घालतील. सामान्य लोकांची घाबरगुंडी उडेल. का? कारण त्यांच्या कर्मांचे फळ मी त्यांना देईने. मी त्यांची शिक्षा ठरवीन, आणि ती अंमलात आणीन. मगच त्या लोकांना मीच परमेश्वर असल्याचे कळून येईल.”

स्तोत्रसंहिता 45

प्रमुख गायकासाठी कोरहाच्या कुटुंबाचे शोशन्नीमया सुरांवर बसवलेले मास्कील प्रीतीचे स्तोत्र

45 मी राजासाठी या गोष्टी लिहितो
    तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते.
एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत
    त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.

तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस.
    तू चांगला वक्ता आहेस,
    म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान,
    तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर.
तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये.
    तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
तुझे बाण तीक्ष्ण आहेत.
    तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
देवा [a] तुझे सिंहासन नेहमी साठी आहे.
    चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
तुला चांगुलपणा आवडतो
    आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा,
    तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा [b] राजा निवडले.
तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरु, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो.
    हस्तिदंताने अच्छादलेल्या महालातून तुला आनंदीत करण्यासाठी संगित ऐकू येते.
राजांच्या मुली करवल्या आहेत.
    तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.

10 मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल.
    तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
11 राजाला तुझे सौंदर्य आवडते.
    तो तुझा नवा नवरा (स्वामी) असेल.
    तू त्याला मान देशील.
12 सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील.
    श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील.

13 राजकन्या म्हणजे एक किमती
    आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.
14 सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते.
    तिच्या करवल्या तिच्या मागून जातात.
15 त्या अतिशय आनंदात आहेत.
    आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात.

16 राजा, तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील.
    तू त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिपती करशील.
17 मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन.
    लोक सदैव तुझी स्तुती करतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center