M’Cheyne Bible Reading Plan
दावीद आणि मूर्ख नाबाल
25 शमुवेल मरण पावला. तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले.
नंतर दावीद पारानच्या वाळवंटाकडे गेला. 2 मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला. 3 हा कालेब वंशातला असून त्याचे नाव नाबाल होते. त्याची बायको अबीगाईल. ती हुशार तसेच सुंदर होती. पण नाबाल मात्र नीच आणि दुष्ट होता.
4 नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवंटात होता. त्याला काही नाबालची गोष्टी कळली. 5 तेव्हा दावीदाने दहा तरुणांना त्याच्याशी बोलायला पाठवले. तो म्हणाला, “कर्मेलला जा. नाबालला भेटा आणि माझ्यातर्फे त्याला नमस्कार सांगा.” 6 दावीदाने याखेरीज नाबालसाठी निरोपही दिला. तो असा, “तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे कुशल आहेना? तुझे सर्व व्यवस्थित चालले आहेना? 7 तुझ्याकडे लोकर कातरण्याचे काम चालले आहे असे मी ऐकले. तुझ्याकडचे धनगर नुकतेच इथे आले होते. त्यांना आमच्याकडून काहीही उपद्रव झालेला नाही. कर्मेल येथे ते असताना त्यांच्याकडून आम्ही काही घेतलेले नाही. 8 तू त्यांनाही विचार तेही हेच सांगतील. मी पाठवलेल्या या तरुणांवर लोभ असू दे. तुझ्या या भरभराटीच्या काळात आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तेव्हा या तरुणांना तू तथाशक्ती काही तरी द्यावेस. माझ्यासाठी, तुझा या मित्र दावीदासाठी म्हणून एवढे कर.”
9 दावीदाच्या सांगण्याप्रमाणे ते तरुण नाबाल कडे गेले. त्यांनी दावीदचा निरोप नाबालला सांगितला. 10 पण नाबाल त्यांच्याशी अतिशय क्षुद्रपणे वागला. तो म्हणाला, “कोण हा दावीद? हा इशायचा मुलगा कोण? आजकाल बरेच दास आपल्या मालकांकडून पळून जातात. 11 भाकर आणि पाणी माझ्याकडे आहे. तसेच या लोकर कातरणाऱ्या माझ्या नोकरांसाठी काही मांस आहे. पण असल्या अनोळखी लोकांना मी काहीही देणार नाही.”
12 हे एकून ते सगळे दावीदकडे परत आले आणि नाबाल बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. 13 तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.
अबीगईल हे संकट टाळते
14 नाबालच्या एका सेवकाने अबीगईलला ही खबर दिली. तो म्हणाला, “दावीदाने आपल्या धन्याकडे काही तरुणांना भेटायला पाठवले होते. पण नाबाल त्यांच्याशी क्षुद्रपणे वागला. 15 त्या माणसांची वागणूक मात्र चांगली होती. मेंढरांबरोबर आम्ही उघड्यावर होतो. दावीदची माणसेही तेथेच वावरत होती. पण त्यांनी आमचे काहीही वाकडे केले नाही. आमची कुठलीही गोष्ट चोरीला गेली नाही. 16 दावीदाच्या लोकांनी आमचे दिवस रात्र रक्षण केले. जणू त्यांनी आमच्या भोवती तटच उभारला होता. आम्ही मेंढरांमागे असतांना त्यांचे आम्हाला संरक्षण होते. 17 आता तुम्हीच विचार करून काय ते ठरवा. नाबालचे कृत्य अविचारीपणाचे आहे. त्या मुळे आमच्या धन्यावर आणि त्याचा कुटुंबावर संकट ओढवणार आहे.”
18 अबीगईलने तेव्या वेळ न गमावता दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे धान्य, द्राक्षाचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्या दोनसे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले। 19 आपल्या नोकरांना तिने संगितले, “तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आलेच.” नवऱ्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.
20 आपल्या गाढवावर बसून ती डोंगराच्या दुसऱ्या बाजूकडून जायला लागली. तेव्हा तिला समोरून दावीद आणि त्याचा बरोबरची माणसे येताना दिसली.
21 ती भेटायच्या आधी दावीद म्हणत होता, “मी वाळवंटात नाबालच्या मालमत्तेचे रक्षण केले. त्याची मेंढरे चुकू दिली नाहीत. मी काहीही अपेक्षा न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागूनही तो आता असे वाईट वागत आहे. 22 आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकजण जरी उद्यापर्पंत शिल्लक राहिला तरी देव मला शिक्षा करील.”
23 तेवढ्यात अबीगईल तेथे पोचली. दावीदला पाहताच ती लगबगीने गाढवावरुन उतरली. दावीदला तिने वाकून आभिवादन केले. 24 त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे. 25 तुमच्या माणसांना मी पाहिले नाही. त्या नीच नाबालकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे. त्याच्या नावाचा अर्थच नीच असा आहे आणि तो खरोखर तसाच आहे. 26 निर्दोष लोकांची हत्या तुमच्याहातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचवले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत तुम्ही येथे असेपर्यंत, तुमच्या वाईटावर असलेले लोक, तुमचे शत्रु यांची गत नाबाल प्रमाणेच होईल असे वाटते. 27 मी आत्ता तुमच्यासाठी हे भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या. 28 माझ्याहातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या घराण्यातील खुप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वतीने युद्ध करता म्हणून परमेश्वर हे घडवून आणील. तुमच्या हयातीत तुमच्या बद्दल लोकांच्या मनात कधीही किंतू उदभवणार नाही. 29 कोणी तुमच्या जिवावर उठले तर परमेश्वर तुमचे रक्षण करील. पण गोफणीतीले धोंड्याप्रमाणे त्या मारेकऱ्याचा मात्र जीव घेईल. 30 परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याचे वचन तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इस्राएलचा प्रमुख म्हणून नेमेल. 31 निर्दोष लोकांच्या हत्येचे पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही असा सूड उगवणार नाही. तुमची भरभराट होईल तेव्हा माझी आठवण असू द्या.”
32 तेव्हा दावीद अबीगईलला म्हणाला, “परमेश्वराचे, इस्राएलच्या परमेश्वराचे आभार मान. मला भेटायला पाठवल्या बद्दल परमेश्वराची स्तुतीकर. 33 तुझ्या निर्णयाबद्दल देव तुझे भले करो. आज निरपराध लोकांच्या हत्येपासून तू मला वाचवलेस. 34 खरोखर परमेश्वराची शपथ, तू लगबगीने आत्ता मला भेटायला आली नसतीस तर उद्या सकाळपर्यंत नाबालच्या कुटुंबातील एकही जण वाचला नसता.”
35 दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”
नाबालचा मृत्यु
36 अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही. 37 सकाळी नशा उतरल्यावर तो पूर्ण भानावर आला. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सर्व काही सांगितले. हे ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो दगडासारखा कड़क बनला. 38 जवळपास दहा दिवसानंतर परमेश्वराने त्याला मृत्युमुखी लोटले.
39 नाबालच्या मृत्युची बातमी दावीदाने ऐकली. तेव्हा तो म्हणाला, “परमेश्वर धन्य होय. नाबालने माझा अपमान करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वानेच मला वाचवले. माझ्या हातून अपराध घडणार होता. पण नाबालच्या चुकीबद्दल परमेश्वराने त्याला मृत्युदंड दिला.”
दावीदाने मग अबीगईलकडे निरोप पाठवला. तिला आपली पत्नी होण्याविषयी विनंती केली. 40 दावीदाचे सेवक कर्मेल येथे गेले आणि तिला म्हणाले, “दावीदाने आम्हाला पाठवले आहे. तू त्याच्याशी लग्न करवेस अशी त्याची इच्छा आहे.” 41 तिने नतमस्तक होऊन अभिवादन केले. ती म्हणाली, “मी तुमची दासी आहे. तुमच्या सेवेला तत्पर आहे. माझ्या धन्याच्या सेवकांचेही चरण धुण्यास माझी तयारी आहे.” [a]
42 मग ती तात्काळ गाढवावर बसून, त्या सेवकांबरोबर दावीदकडे निघाली. आल्याबरोबर तिने पाच दासी घेतल्या. दावीदची ती पत्नी झाली. 43 इज्रेल येथील अहीनवाम ही सुध्दा दावीदची बायको होती. तेव्हा अबीगईल आणि अहीनवाम अशा त्याच्या दोन बायका झाल्या. 44 शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणून तिचे पालती याच्याशी लग्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.
Judging Problems Between Believers
6 जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडणतंटा असेल तर ती समस्या (वाद) देवाच्या पवित्र लोकांपुढे न आणता ती व्यक्ति तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करते? 2 किंवा तुम्हांला माहीत नाही का की देवाचे पवित्र लोक जगाचा न्याय करतील? आणि जर जगाचा न्याय तुमच्याकडून होणार आहे तर लहानशा बाबींमध्ये त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही अपात्र आहात काय? 3 आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हांला माहीत नाही का? तर मग रोजच्या जीवनातील साध्या गोष्टींचा विचारसुद्धा कशाला? 4 म्हणून जर दररोज तुम्हांला प्रकरणे निकालात काढायची असतील, तर ज्यांना मंडळीत काही पाठिंबा नाही, अशा माणसांना न्यायाधीश म्हणून का नियुक्त करता? 5 तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी हे म्हणत आहे. गोष्टी इतक्या वाईट होत आहेत का की, तुमच्यामध्ये एकही सुज्ञ मनुष्य नाही जो त्याच्या (ख्रिस्ती) भावांचा समेट घडवून आणू शकेल? 6 पण एक भाऊ दुसऱ्या भावाविरुद्ध न्यायालयात जातो आणि तुम्ही हे सर्व अविश्वासणाऱ्यांसमोर करीत आहात?
7 वास्तविक, तुमचे एकमेकांविरुद्ध खटले आहेत यातच तुमचा संपूर्ण पराभव झाला आहे. त्याऐवजी तुम्ही स्वतःवर अन्याय का होऊ देत नाही? त्याऐवजी तुम्ही स्वतःची लुबाडणूक का होऊ देत नाही? 8 उलट तुम्ही स्वतः अन्याय करता व लुबाडणूक करता, आणि तुम्ही हे सर्व तुमच्या ख्रिस्ती बांधवांना करता!
9-10 किंवा तुम्हांला माहीत नाही का की, अनीतिमान लोकांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही? तुमची स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका! जारकर्मी, मूर्तिपूजक, व्याभिचारी, पुरुषवेश्या (पुरुष जे समलिंगी संबंधास तयार होतात), समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, किंवा दरोडेखोर, लोभी, दारुडे, निंदा करणारे, फसविणारे यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. 11 आणि तुमच्यातील काही असे होते. पण तुम्ही स्वतःस धुतलेले होते, तुम्हाला देवाच्या सेवेला समर्पित केलेले होते. प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही नीतिमान ठरला होता व देवाच्या आत्म्यामध्ये नीतिमान ठरला होता.
देवाच्या गौरवासाठी तुमच्या शरीरांचा उपयोग करा
12 “मी काहीही करण्यास मुक्त आहे.” पण प्रत्येक गोष्ट हितकारक नसते, होय, “मी काहीही करण्यास मुक्त आहे,” पण कोणत्याही गोष्टीचे वर्चस्व माइयावर होऊ देणार नाही. 13 “अन्न पोटासाठी आहे व पोट अन्नासाठी आहे.” आणि हे खरे आहे. पण देव अन्नाचा व पोटाचा अशा दोघांचाही नाश करील. आणि आमची शरीरे ही जारकर्मसाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी आणि प्रभूच्या शरीराच्या हितासाठी आहेत. 14 आणि देवाने केवळ प्रभूलाच मरणातून उठविले असे नाही तर तो आम्हंलाही आपल्या सामर्थ्याने मरणातून उठवील. 15 तुम्हाला माहीत नाही का की, तुमची शरीरे ख्रिस्ताला जोडलेली आहेत? तर मग जे ख्रिस्ताशी जोडलेले आहे ते घेऊन मी वेश्येला जोडावे काय? निश्चितच नाही! किंवा तुम्हांस ठाऊक नाही काय की, जो वेश्येशी जडतो तो तिच्याशी एकदेह होतो. 16 “कारण ती दोघे एकदेह होतील असे शास्त्रच सांगते.” 17 पंरतु जो स्वतः प्रभूशी जडतो तो त्याच्याशी आत्म्यात एक आहे.
18 जारकर्मापासून दूर पळा. मनुष्य एखादे पाप करणे शक्य आहे ते त्याच्या शरीराबाहेरचे आहे. परंतु जो जारकर्म करतो तो त्याच्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. 19 किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हांला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे, आणि स्वतःचे असे तुम्ही नाही? 20 कारण तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या.
4 “मानवपुत्रा, एक वीट घे. त्यावर यरुशलेमचे चित्र कोर 2 मग तू म्हणजे नगरीला वेढा घातलेले सैन्य आहेस असे मान. नगरीभोवती मातीची भिंत बांध. म्हणजे नगरीवर हल्ला करणे सोपे होईल. त्या भिंतीपर्यंत जाणारे कच्चे रस्ते तयार कर. भिंती फोडण्यासाठी मोठे ओंडके आण आणि नगरीभोवती सैन्याचा तळ ठोक. 3 एक लोखंडी कढई तुझ्या व नगरीच्या मध्ये ठेव. ही कढई म्हणजे तुला व नगरीला विभागणारी भिंतच होय, ह्या रीतीने तू त्या नगरीच्या विरुद्व आहेस हे दाखव. तू त्या नगरीला वेढा घालून हल्ला करशील. का? कारण हे इस्राएलच्या लोकांसाठी प्रतीक वा खूण असेल. ह्यावरुन मी (देव) यरुशलेमवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट होईल.
4 “तू तुझ्या डाव्या कुशीवर निजले पाहिजेस आणि इस्राएल लोकांची पापे तू तुझ्या शिरावर घेतलीस असे दाखविणाऱ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस. तू जितके दिवस डाव्या कुशीवर झोपशील, तितके दिवस तुला त्यांच्या अपराधांचा बोजा वाहावा लागेल. 5 तू 390 दिवस [a] इस्राएलच्या अपराधांचा बोजा वाहिला पाहिजेस एक दिवस एक वर्षाबरोबर असेल. अशा प्रकारे, इस्राएलला किती काळ शिक्षा होईल ते मी तुला सांगत आहे.
6 “त्यानंतर तू 40 दिवस तुझ्या उजव्या कुशीवर झोपशील. ह्या वेळी, 40 दिवस तू यहूदाच्या अपराधांचा भार वाहशील. एक दिवस एक वर्षाबरोबर असेल. अशा रीतीने मी तुला यहुदाच्या शिक्षेचा काळ सांगत आहे.”
7 देव पुन्हा बोलला तो म्हणाला, “आता अस्तन्या सावर आणि विटेवर हात उगार. तू यरुशलेमवर हल्ला करण्याचे नाटक कर. तू माझा दूत म्हणून लोकांशी बोलत आहेस हे दाखविण्यासाठी असे कर. 8 आता पाहा, मी तुला दोरीने बांधतो म्हणजे नगरीवरचा हल्ला पूर्ण होईपर्यंत [b] तू एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर वळू शकणार नाहीस.”
9 देव असेही म्हणाला, “तू भाकरीसाठी थोडे धान्य मिळविले पाहिजे. गहू, सातू, कडधान्य, मसूर, मक्का व खपल्या गहू घे. तो एका भांड्यात एकत्र करुन दळ. भाकरी करण्यासाठी तू हे पीठ वापरशील. तू एका कुशीवर 390 दिवस झोपला असताना फक्त ह्याच पिठाच्या भाकरी खाशील. 10 रोजच्या भाकरीसाठी तुला फक्त 1 पेला [c] पीठ वापरता येईल. ह्या पिठापासून केलेली भाकरी दिवसभर पुरवून तू खाशील. 11 तुला रोज थोडेच म्हणजे 3 पेले [d] पाणी पिता येईल. दिवसभर पुरवून तुला ते प्यावे लागेल. 12 रोज तुला तुझी भाकरी केलीच पाहिजे. वाळलेल्या मानवी विष्ठेची शेणी घेऊन तुला ती जाळली पाहिजे. ती भाकरी त्या मानवी विष्ठेवर भाजून लोकांसमक्ष खाल्ली पाहिजे.” 13 नंतर परमेश्वर म्हणाला, “तुझे हे खाणे, परदेशांत इस्राएल लोकांना अमंगळ भाकरी खावी लागेल, हेच दाखवून देईल. मी त्या लोकांना सक्तीने इस्राएल सोडून परदेशांत जाण्यास भाग पाडले.”
14 मग मी (यहेज्केल) म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, पण मी कधीच अमंगळ अन्न खाल्लेले नाही. एखाद्या रोगाने मेलेल्या प्राण्याचे अथवा हिंस्त्र प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस मी कधीच खाल्लेले नाही. बालपणापासून आजपर्यंत मी कधीच अमंगळ मांस खाल्लेले नाही. असे काहीही मी कधीच तोंडात घातलेले नाही.”
15 मग देवा मला म्हणाला, “ठीक आहे! मी तुला भाकरी भाजण्यासाठी मानवी विष्ठेऐवजी शेण वापरु देईन. तुला मानवी विष्ठा वापरावी लागणार नाही.”
16 पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील. 17 का? कारण लोकांना पुरेसे अन्न व पाणी मिळणार नाही. लोक एकमेकांना भयंकर घाबरतील. त्यांच्या पापांमुळे ते क्षीण होत चाललेले एकमेकांना दिसतील.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
40 मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली.
त्याने माझे ओरडणे ऐकले.
2 परमेश्वराने मला विनाशाच्या खड्यातून उचलले.
त्याने मला चिखलातून बाहेर काढले.
त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले,
त्याने माझे पाय स्थिर केले.
3 परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले.
माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे.
बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील.
ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.
4 जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.
5 परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस
तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस.
परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही.
तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.
6 परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस. [a]
तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात.
होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.
7 म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे.
माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते.
8 माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे
मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.
9 मी विजयाची चांगली बातमी मोठ्या सभेत सांगितली,
मी माझे तोंड बंद ठेवले नाही.
परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
10 परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले.
मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही.
परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात.
मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.
11 म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस.
तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.”
12 माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे
ते मोजण्या न येण्याइतके आहेत.
माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे.
आणि मी त्यांपासून पळू शकत नाही.
माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत.
माझे धैर्य नाहीसे झाले आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव.
परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.
14 ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत.
परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर
आणि त्यांची निराशा कर.
ते लोक मला दु:ख देणार आहेत.
त्यांना शरमेने पळून जायला लाव.
15 ते वाईट लोक माझी थट्टा करतात.
त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर.
16 परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत
त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे.
त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
17 प्रभु, मी केवळ एक गरीब,
असहाय माणूस आहे.
मला मदत कर.
मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र
41 जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील.
संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल.
2 परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल.
पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल.
देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.
3 तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल.
तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.
4 मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”
5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?”
6 काही लोक मला भेटायला येतात
परंतु त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत.
ते माझ्याबद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात.
नंतर ते जातात आणि त्यांच्या अफवा पसरवतात.
7 माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात,
ते माझ्याविरुध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8 ते म्हणतात, “त्याने काही तरी चूक केली
म्हणूनच तो आजारी आहे.
तो कधीच बरा होऊ नये अशी मी आशा करतो.”
9 माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे.
10 म्हणून परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
मला उठू दे, मग मी त्यांची परत फेड करीन.
11 परमेश्वरा, माझ्या शत्रूंना मला दु:ख द्यायला संधी देऊ नकोस.
तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस.
12 मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास.
तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.
13 इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो.
तो नेहमी होता आणि नेहमी राहील.
आमेन आमेन.
2006 by World Bible Translation Center