M’Cheyne Bible Reading Plan
शौलाचा राज्याभिषेक
10 शमुवेलने मग एका खास तेलाची कुपी घेतली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवडले) आहे. त्यांचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खरे आहे. याची साक्ष पटवणाऱ्या या खुणा ऐक [a] 2 येथून निघालास की तुला बन्यामीनांच्या हद्दीत सेल्सह येथे राहेलीच्या कबरीजवळ दोन माणसे भेटतील. तुला ती म्हणतील, ‘तुमची गाढवे मिळाली. तेव्हा तुमच्या वडिलांची काळजी मिटली, पण आता ते तुमच्या काळजीत पडले आहेत. आता माझ्या मुलाला कुठे शोधू असे ते म्हणत आहेत.’”
3 शमुवेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला ताबोरचा एला ओक वृक्ष लागेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथलकडे निघालेली तीन माणसे भेटतील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल. 4 ती माणसे तुझी विचारपूस करतील. त्यांच्याजवळच्या दोन भाकरी ते तुला देतील आणि तू त्या घेशील. 5 मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ट्यांचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेष्टे तुला भेटतील. भविष्य कथन करतील ते चालू असतानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशगुल असतील. ते सतार, संबळ, सनई, वीणा ही वाद्ये वाजवत असतील. 6 तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तू राहणार नाहीस. अगदी वेगळाच होशील. त्यांच्याबरोबर तूही भविष्यकथन करु लागशील. 7 असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.
8 “गिलगाल येथे तू माझ्याआधी जा. मग मी तिथे येईन. यज्ञात होमार्पण आणि शांत्यर्पणे करीन. माझी तू सात दिवस वाट पाहा. मग मी तुला भेटेन आणि काय करायचे ते सांगेन.”
शौल संदेष्ट्यासारखा वागतो
9 शमुवेलला निरोप देऊन शौल जायला निघताच परमेश्वराने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. सर्व खुणांचा प्रत्यय त्याला त्या दिवशीच आला. 10 शौल आपल्या नोकरासह गिबाथ एलोहिम या टेकडीवर आला. तिथे त्याला इतर संदेष्टे भेटले. परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तो ही इतर संदेष्ट्यां प्रमाणे भविष्य करु लागला. 11 त्याला आधीपासून ओळखणाऱ्या लोकांनी हे पाहिले. तेव्हा ते आपापसात याची चर्चा करु लागले. “कीशच्या मुलाला काय झाले? तो ही संदेष्ट्यांपैकीच आहे की काय?” असे म्हणून लागले.
12 तिथे राहणारा एक माणूस म्हणाला, “हो ना! हा यांचा नेता आहे असे दिसते.” [b] तेव्हापासून “शौल संदेष्ट्यांपैकीच आहे की काय” अशी म्हणंच पडली.
शौल घरी परत येतो
13 यानंतर शौल आपल्या घराजवळच्या भक्तीस्थळापाशी पोचला.
14 त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले.
शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाहीत तेव्हा शमुवेलला भेटायला आम्ही गेलो.”
15 तेव्हा काका म्हणाला, “मग काय म्हणाला शमुवेल ते सांग ना!”
16 शौलने सांगितले, “गाढवांचा शोध लागला आहे असे शमुवेल म्हणाला.” शमुवेलच्या इतर वक्तव्याबद्दल, राज्याबद्दल त्याने काकाला काहीही सांगितले नाही.
शमुवेल शौलला राजा म्हणून घोषित करतो
17 शमुवेलने सर्व इस्राएली लोकांना मिस्पा येथे पमरेश्वराजवळ बोलावले. 18 शमुवेल त्यांना तेव्हा म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे: इस्राएलला मी मिसरमधून बाहेर काढले. मिसर आणि इतर राष्ट्रे यांच्या जाचातून मुक्त केले. 19 सर्व आपत्तीतून तुम्हाला सोडवणाऱ्या परमेश्वराचाच आज तुम्ही त्याग करायला निघालेला आहात. राजा हवा अशी तुमची मागणी आहे. तेव्हा आता आपापल्या वंशांप्रमाणे, घराण्यांसकट परमेश्वरापुढे हजर व्हा.”
20 सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली. 21 व त्यापैकी प्रत्येक कुळाला क्रमाक्रमाने समोर बोलावले. त्यातून मात्रीच्या कुळाची निवड केली. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला समोरुन जायला सांगितले. अशा रीतीने कीशचा मुलगा शौल याची निवड केली.
पण लोकांना शौल कुठे दिसेना. 22 त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”
परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”
23 लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून बाहेर आणले. तो सर्वांच्या घोळक्यात उभा राहिला. सगळ्यांपेक्षा तो उंच होता. 24 शमुवेल तेव्हा सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “परमेश्वराने निवडलेला माणूस पाहा. याच्यासारखा तुमच्यात कोणीही नाही.”
तेव्हा लोकांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयजयकार केला.
25 शमुवेलने राज्याचे सर्व नियम लोकांना समजावून सांगितले. राजनीतीचा ग्रंथ लिहून परमेश्वरापुढे ठेवला आणि लोकांना घरोघरी परतायला सागितले.
26 शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले. 27 पण काही कुरापती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही.
अम्मोन्यांचा राजा नाहाश
अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इस्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालाही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यार्देन नदीच्या पुर्वेकडील एकाही इस्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इस्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली
पवित्र आत्म्यात जीवन
8 म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही. 2 कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हांला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. 3 नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दूर्बळ आहोत त्यामुळे वाचु शकत नाही, देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरुपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला. 4 यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.
5 कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. 6 देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे. 7 मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही. 8 कारण जे देहस्वभावाच्या आधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्र करता येत नाही.
9 देवाचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो, तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. 10 उलट जर ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे व तुमचा देह पापामुळे मेला आहे तरी नीतिमत्वामुळे तुमच्या आत्म्याच जीवन आहे. 11 आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.
12 तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत, देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. 13 कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.
14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत. 15 पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो. 16 तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की, आपण देवाची मुले आहोत. 17 आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. खरोखर आपण त्याच्याबरोबर दु:ख भोगतो यासाठी की, त्याच्याबरोबर आपणांस गौरवही मिळावे.
भविष्यात आम्हांला गौरव मिळेल
18 कारण भविष्यकाळात आपल्याला प्रगट करण्यात येणाऱ्या गौरवाच्या तुलनेने सध्याच्या काळातील दु:खे काहीच नाहीत असे मी मानतो. 19 कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे. 20 निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते म्हणून, 21 या आशेने की, निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे.
22 कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत, वेदना भोगीत आहे. 23 परंतु निर्माण केलेले जगच नव्हे तर आपणांस ज्यांना आत्म्याचे प्रथम फळही मिळाले आहे ते, आपणही संपूर्ण दत्तकपणासाठी आपल्या शरीराच्या नाशवंत, मर्त्य स्वभावापासून मुक्ती व्हावी म्हणून आतल्याआत कण्हत आहोत. 24 आपण आपल्या मनातील या आशेने तारले गेलो आहोत. परंतु आपण ज्याची आशा धरली ते पाहू शकलो तर ही आशा नसेल. कारण जे पाहतो त्याची आशा कोण धरील? 25 परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.
26 जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वतः आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो. 27 परंतु जो देव आपली अंतःकरणे शोधतो त्याला आत्म्याचा हेतू काय आहे हे माहीत आहे. कारण देवाच्या इच्छेने आत्मा संताच्या वतीने मध्यस्थी करतो.
28 आणि आपणास माहीत आहे की, प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. 29 ज्यांना देवाने अगोदरच निवडले होते त्यांना त्याच्या पुत्राच्या सारखे व्हावे म्हणून नेमले होते. यासाठी की देवाचा पुत्र पुष्कळ बंधूंमध्ये ज्येष्ठ व्हावा. 30 देवाने ज्यांना अगोदरच नेमले होते, ज्यांना बोलाविले होते त्यांना नीतिमान केले आणि ज्यांना नीतिमान केले त्यांना गौरवसुद्धा दिले.
देवाची ख्रिस्त येशूमधील प्रीति
31 यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? 32 ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? 33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो. 34 दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे. 35 ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? 36 असे लिहिले आहे की,
“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत.
आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” (A)
37 तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत. 38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, 39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
पलिष्ट्यांविषयी संदेश
47 यिर्मया या सदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. तो पलिष्ट्यांबाबत होता. फारोने गज्जा शहरावर हल्ला करण्यापूर्वी हा संदेश आला.
2 परमेश्वर म्हणतो,
“पाहा! उत्तरेला शत्रू-सैनिक एकत्र आले आहेत
वेगाने वाहून काठावर पसरणाऱ्या नदीप्रमाणे ते येतील.
पूर ज्याप्रमाणे जमीन व्यापतो,
तसेच ते सर्व देशांत पसरतील शहरे
आणि त्यातील रहिवासी यांना ते गिळतील.
त्या देशात राहणारा प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करील.
3 त्यांना घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येतील
रथांचा गडगडाट व चाकांचा खडखडाट त्यांना ऐकू येईल.
वडील आपल्या मुलांचे रक्षण करु शकणार नाहीत.
ते इतके दुबळे होतील की ते मदत करु शकणार नाहीत.
4 सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे.
सोर आणि सीदोन यांच्या उरलेल्या साहाय्यकांच्या नाशाची वेळ आली आहे.
लवकरच परमेश्वर पलिष्ट्यांचा नाश करील.
कपतोर द्विपातील वाचलेल्यांचाही तो नाश करील.
5 गज्जाचे लोक दु:खी होतील आणि आपले मुंडन करतील.
अष्कलोनचे लोक शांत होतील.
दरीतील वाचलेल्या लोकांनो तुम्ही किती काळ स्वतःला जखमा करणार?
6 “परमेश्वराच्या तलवारी, तू अजून थांबली नाहीस!
किती काळ तू लढत राहणार?
परत आपल्या म्यानात जा.
थांब! शांत रहा!
7 पण परमेश्वराची तलवार विश्रांती कशी घेऊ शकेल?
परमेश्वराने तिला आज्ञा दिली
की अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यावर हल्ला कर.”
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
दावीदाचे स्तोत्र.
24 पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे.
जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
2 परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली.
ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
3 परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4 तिथे कोण उपासना करु शकतो?
ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्रदय शुध्द आहे,
ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही
आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
5 चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात.
ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
6 ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात.
ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
7 वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
8 तो गौरवशाली राजा कोण आहे?
परमेश्वरच तो राजा आहे.
तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे
तो गौरवशाली राजा आत येईल.
10 तो गौरवशाली राजा कोण आहे?
सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
2006 by World Bible Translation Center