M’Cheyne Bible Reading Plan
हन्नाचे धन्यवाद
2 हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;
“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही.
त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले [a]
माझ्या शत्रुंना मी हसते. [b]
माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
2 परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही.
देवा, तुझ्यावाचून कोणी नाही.
आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
3 लोकहो, बढाया मारु नका.
गर्वाने बोलू नका.
कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे.
तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
4 शूरांची धनुष्यं भंगतात
आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
5 पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते
त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.
आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते
ते आता आराम करत आहेत.
आजपर्यंत नि:संतान होती
तिला आता सात मुलं आहेत.
पण मुलबाळ असलेली दु:खी आहे.
कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.
6 परमेश्वर लोकांना मरण देतो
आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो.
तोच अधोलोकाला नेतो
आणि वरही आणतो.
7 परमेश्वरच काहीना दरिद्री तर
काहींना श्रीमंत करतो.
काही लोकांना लाचार करतो
तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
8 गरीबांना धुळीतून उचलून
त्यांचे दु:ख हरण [c] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. [d]
9 सज्जनांना तो आधार देतो.
त्यांना लटपटू देत नाही.
पण दुर्जनांचा संहार करतो.
त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ
अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन
त्याच्यावर गर्जेल.
दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील.
राजाला सामर्थ्य देईल.
आपल्या खास राजाला बलवान करील.”
11 एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलोह येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.
एलीचे कुपुत्र
12 एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती. 13 याजकांनी लोकांना जशी वागणूक द्यावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची. 14 तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढेच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलोह येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इस्राएलीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते. 15 पण एलीची मुले मात्र असे करत नसत. वेदीवर चरबीचे हवन करण्याआधीच त्यांचा नोकर लोकांजवळ येऊन म्हणे, “याजकांसाठी म्हणून थोडे मांस भाजायला द्या. शिजलेले मांस ते घेणार नाहीत.”
16 “हवान तर होऊ दे, मग हवे तेवढे त्यातून काढून घे,” असे कोणी म्हणालेच तर तो नोकर म्हणे, “नाही, आत्ताच द्या नाहीतर मी जबरदस्तीने काढून घेईन.”
17 परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबली विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदरभाव नव्हता हेच यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुध्द असलेले मोठे पाप होते.
18 पण शमुवेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोद घालून तो मदत करी. 19 त्याची आई दरवर्षी त्याच्यासाठी लहानसा अंगरखा शिवत असे. दरवर्षी नवऱ्याबरोबर शिलोह येथे यज्ञासाठी जाताना ती तो घेऊन जाई.
20 एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होवो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”
हन्ना आणि एलकाना मग घरी परतली. 21 परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुवेल परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात वाढत होता.
एली आपल्या नीच मुलांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी
22 एली आता म्हतारा होत चालला. शिलोह येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.
23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता? 24 मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फार वाईट बोलत आहेत. 25 एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”
पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.
26 शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.
एलीच्या घराण्याविषयी अरिष्ट सूचक भविष्य
27 एकदा परमेश्वराचा संदेष्टा एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे: ‘तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो. 28 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले. 29 तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वतःसाठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’
30 “तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील. 31 तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घायुषी होणार नाही.. 32 इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल. [e] तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही. 33 माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील. 34 हे सर्व खरेच घडणार आहे याची प्रचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील. 35 मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील. 36 मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”’”
तुम्ही यहूदीसुद्धा पापी आहात
2 म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस. 2 आता आपणांला माहीत आहे की, जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो. आणि देवाचा न्याय योग्य असतो. 3 तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता पण तुम्हीसुद्धा त्याच गोष्टी करता म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे की, देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करुन घेणे तुम्हांला शक्य होणार नाही. 4 देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.
5 पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. 6 देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. 7 नेटाने चांगले करीत राहून गौरव, मान, अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंतकाळचे जीवन देईल. 8 परंतु जे स्वार्थीपणामुळे सत्यात चालणे नाकारतात, व अनीतिने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. 9 जो जे वाईट ते करतो, त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दु:खे येतील. म्हणजे पहिल्यांदा यहूद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील. 10 परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल. प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. 11 देवाजवळ पक्षपात नाही.
12 जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील. व जितक्यांनी नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल. 13 कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नितिमान आहेत असे नाही. परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील.
14 कारण जेव्हा यहूदी नसलेले (विदेशी) ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही, तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात ते स्वतःच नियमशास्त्र आहेत. 15 म्हणजे ते त्यांच्या ह्रदयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.
16 जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
यहूदी आणि नियमशास्त्र
17 परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहूदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, 18 त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे. 19 तुम्हाला वाटतें की ज्यांना योग्य मार्ग माहित नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात, जे लोक अंधारात (पापांत) आहेत, त्यांचा तुम्ही प्रकाश आहात आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचें पुढारी, जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, 20 मूर्खांचे शिक्षक, बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हांला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरुप मिळाले आहे. 21 तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वतः चोरी का करता? 22 तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता? 23 तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता, ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? 24 शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे “विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.” [a]
25 तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुंतेला मोल आहे. पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर, तुमची सुंता न झाल्यासारखी आहे. 26 सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? 27 ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.
28 कारण जो बाहेरुन यहूदी आहे तो खरोखर यहूदी नाही व देहाची बाह्यत्कारी सुंता ही सुंता नव्हे. 29 पण जो अंतःकरणाचा यहूदी, तो यहूदी आहे आणि खरी सुंता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता होय, त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे, तर देवाकडून होते.
यिर्मयाची मुक्तता
40 यिर्मयाची रामा येथे, सुटका झाल्यावर परमेश्वराकडून संदेश आला. बाबेलच्या राजाच्या खास सैनिकांचा प्रमुख नबूजरदान ह्याला रामा शहरात यिर्मया सापडला. यिर्मयाला बेड्या घातल्या होत्या. यरुशलेम व यहूदा येथील सर्व कैद्यांबरोबरच तो होता. त्या सर्वांना कैद करुन बाबेलला नेले होते. 2 नबूजरदानला यिर्मया सापडताच, तो त्याच्याशी बोलला तो म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराने, तुझ्या देवानेच हे अरिष्ट ह्या स्थळी येणार म्हणून भाकीत केले होते. 3 आणि आता परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच सर्व घडले आहे. तुम्ही यहूदातील लोकांनी परमेश्वराविरुध्द पाप केल्यानेच हे अरिष्ट आले. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. 4 यिर्मया, आता मी तुझी सुटका करीन. मी तुझ्या बेड्या काढतो तुझी इच्छा असल्यास तू माझ्याबरोबर बाबेलला ये. मी तुझी चांगली काळजी घेईन. पण, तुझी इच्छा नसल्यास, तू माझ्याबरोबर येऊ नको. सर्व देश तुझ्यापुढे मोकळा आहे तुला पाहिजे तेथे जा. 5 किंवा शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे परत जा. बाबेलच्या राजाने त्याला यहूदातील शहरांचा राज्यपाल म्हणून नेमले आहे. परत जा आणि गदल्याबरोबर लोकांमध्ये राहा. नाहीतर तुला पाहिजे तेथे तू जा.”
नंतर नबूजरदानने त्याला अन्न व बक्षीस देऊन सोडून दिले. 6 मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो गदल्याबरोबर यहूदात मागे राहिलेल्या लोकांमध्ये राहिला.
गदल्याचे अल्पकालीन राज्य
7 यरुशलेमचा नाश झाला तेव्हा यहूदाच्या सैन्यातील काही सैनिक, अधिकारी आणि त्यांची काही माणसे रानात राहात होती. बाबेलच्या राजाने अहीकामचा मुलगा गदल्या ह्यास, मागे राहिलेल्या लोकांचा अधिपती म्हणून नेमले आहे, हे त्यांना कळले. अगदी गरीब स्त्री पुरुष व मुले ह्यांना कैद करुन बाबेलला नेले नव्हते हे लोक मागेच राहिले होते. 8 मग ते सैनिक मिस्पा येथे गदल्याकडे आले. ते सैनिक म्हणजे नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहाचा मुलगा योहानान व त्याचा भाऊ योनाथान तान्हुमेथचा मुलगा सराया, नटोफाथी एफै याचे मुलगे, माकाथाचा मुलगा याजन्या व ह्यांच्याबरोबरचे काही लोक होत.
9 शाफानाचा मुलगा अहीकाम व अहीकामचा मुलगा गदल्या ह्या गदल्याने त्या सैनिकांना अधिक सुरक्षित वाटेल असे करण्याची शपथ घेतली. गदल्या त्यांना म्हणाला “खास्द्यांची सेवा करण्यास तुम्ही घाबरु नका. (इस्राएलमध्ये) देशात वस्ती करा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा. असे केल्याने तुमचे भले होईल. 10 मी स्वतः मिस्पात राहीन. मी येथे येणाऱ्या खास्द्यांशी तुमच्यावतीने बोलीन. तुम्ही हे काम माझ्यावर सोपवा. तुम्ही द्राक्षरस, ग्रीष्मातील फळे व तेल यांचे उत्पादन करुन रांजणात साठवून ठेवावे तुम्ही ताबा मिळविलेल्या शहरात तुम्ही राहा.”
11 बाबेलच्या राजाने यहूदातील काही लोकांना त्यांच्या स्वतःच्या देशात राहू दिले आहे हे मवाब, अम्मोन, अदोम व इतर देशात राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांना समजले. ह्या मागे राहिलेल्या लोकांसाठी शाफानपुत्र अहीकाम याचा मुलगा गदल्या ह्यास बाबेलच्या राजाने, राज्यपाल म्हणून नेमले असल्याचेही त्यांना कळले. 12 ही बातमी कळताच यहूदाचे लोक यहूदात परतले ते सर्व ज्या ज्या देशांत पसरले गेले होते, तेथून ते गदल्याकडे मिस्पाला परतले, ते परत आले व त्यांनी द्राक्षरस व ग्रीष्मातील फळे यांचा पुष्कळ साठा केला.
13 कारेहाचा मुलगा योहानान व अजूनही रानात राहात असलेले यहूदाच्या सैन्यातील सर्व अधिकारी गदल्याकडे आले. गदल्या मिस्पामध्ये होता. 14 योहानान व त्याच्या बरोबरचे आधिकारी गदल्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बआलीस ह्याला तुला ठार मारायचे आहे, हे तुला माहीत आहे का? त्याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे” पण अहीकामचा मुलगा गदल्या ह्याचा ह्यावर विश्वास बसला नाही.
15 मग मिस्पा येथे, एकांतात कारेहाचा मुलगा योहानान हा गदल्याशी बोलला तो गदल्याला म्हणाला, “मी नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला मारतो तू मला परवानगी दे. ही गोष्ट कोणालाही कळणार नाही. इश्माएल तुला मारणार आहे, पण आम्ही त्याला तसे करु देणार नाही. कारण तसे झाल्यास तुझ्याभोवती गोळा झालेल्या सर्व यहूदी लोकांना पुन्हा इतर देशात पांगावे लागेल. ह्याचाच अर्थ यहूदाचे उरलेले थोडे शिल्लक राहणार नाही.”
16 पण अहीकामचा मुलगा गदल्या हा कारेहाचा मुलगा योहानान ह्यास म्हणाला “इश्माएलला मारु नको, तू त्याच्याबद्दल जे सांगत आहेस ते खरे नाही.”
दावीदाचे गाणे.
15 परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल?
तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
2 जो माणूस शुध्द जीवन जगतो, चांगल्या गोष्टी करतो,
अगदी मनापासून सत्य बोलतो तोच माणूस तुझ्या डोंगरावर राहू शकेल.
3 तशा प्रकारचा माणूस दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत नाही तो स्वत:च्या कुंटुबाविषयी लाजिरवाणे असे काही सांगत नाही.
त्यांना त्रास होईल असे काही करत नाही.
तो त्याच्या शेजाऱ्याशी वाईट वागत नाही.
4 तो माणूस देवाची हेटाळणी करणाऱ्या माणसाबद्दल आदर दाखवीत नाही.
परंतु तो जे लोक परमेश्वराची सेवा करतात अशा सर्वांचा आदर करतो.
त्याने जर शेजाऱ्याला वचन दिले असेल,
तर तो त्या वचनाला जागतो. [a]
5 जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील
तर तो कर्जावर व्याज आकारत नाही.
आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही.
जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील. [b]
दावीदाचे मिक्ताम [c] नावाचे स्तोत्र
16 देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.
2 मी परमेश्वराला म्हणालो,
“परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस
माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
3 परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो.
परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.
4 परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते.
ते त्या मूर्तींना रक्ताची भेट देतात.
मी त्यात सहभागी होणार नाही.
मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
5 माझा वाटा आणि प्याला परमेश्वराकडूनच येतो.
परमेश्वरा, तू माझा सांभाळ करतोस तुच मला माझा वाटा देतोस.
6 माझा वाटा फारच अद्भूत आहे
माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो कारण त्याने मला चांगले शिकवले रात्रीच्या वेळी मला
अगदी आतल्या गाभ्यातून आज्ञा मिळाल्या.
8 मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो
आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
9 त्यामुळे माझे ह्रदय आणि माझा आत्मा आनंदीत राहील
माझे शरीरही सुरक्षित असेल.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस.
तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. [d]
11 तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा,
केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल.
तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
2006 by World Bible Translation Center