M’Cheyne Bible Reading Plan
शमशोन पलिष्ट्यांना भस्म करतो
15 गव्हाच्या कापणीच्या हंगामात शमशोन आपल्या बायकोच्या भेटीला निघाला. एक करडूही त्याने भेटीदाखल घेतले. माझ्या पत्नीच्या दालनात मी जातो असे तो म्हणाला.
पण तिच्या वडीलांनी त्याला आत जायला मज्जाव केला. 2 ते त्याला म्हणाले, “तुला तर ती नकोशी झाली आहे असे मला वाटले. म्हणून तुमच्या विवाहातील सोबत्याशी मी तिचे लग्न लावून दिले. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा देखणी आहे. तेव्हा तू तिच्याशी लग्न कर.”
3 पण शमशोन म्हणाला, “आता पलिष्ट्यांचे नुकसान करायला मला चांगले निमित्त मिळाले आहे. मला आता त्याबद्दल कोणी दोष देणार नाही.”
4 मग बाहेर पडून त्याने तीनशे कोल्हे धरले दोन दोन कोल्ह्यांच्या शेपट्या एकत्र बांधून तिथे एक एक मशाल बांधली. 5 त्याने त्या मशाली पेटवून दिल्या आणि सर्व कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या धान्याच्या उभ्या पिकात धावायला सोडले. त्यामुळे शेतातील कापणी झालेले, न झालेले असे सर्व पीक भस्मसात झाले. एवढेच नव्हे तर द्राक्षाचे आणि जैतुनाचे मळेही बेचिराख झाले.
6 “कोणी केले हे सगळे?” पलिष्टी विचारु लागले.
कोणी तरी म्हणाले. “तिम्ना येथील एकाचा जावई शमशोन हा या सगळ्याच्या पाठीमागे आहे. कारण त्याच्या सासऱ्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहातील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ट्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले.
7 तेव्हा शमशोन पलिष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. आता मी ही तुमच्याशी वाईट वागेन त्यानंतरच मी थांबेन.”
8 शमशोनने मग पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक जण ठार झाले. त्यानंतर शमशोन एटाम खडकांमधील गुहेत राहिला.
9 इकडे पलिष्टी लोक यहूदात गेले आणि लेही या ठिकाणी त्यांनी तळ दिला. तेथून त्यांनी युध्दाची तयारी सुरु केली. 10 तेव्हा यहूद्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलात काय?”
ते म्हणाले, “आम्ही शमशोनला ताब्यात घ्यायला आलो आहोत. त्याला आम्हाला कैद करायचे आहे. त्याने आमच्या लोकांशी केलेल्या वर्तणुकीची सजा त्याला द्यायची आहे.”
11 हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ट्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?”
शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्यांना मी शिक्षा दिली आहे.”
12 त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुसक्या बांधून तुला पलिष्ट्यांच्या स्वाधीन करायला आलो आहोत.”
शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वतः मला इजा करणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या.”
13 यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्का लावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन दोरखंडांनी बांधून गुहेतून वर आणले.
14 शमशोन लेही या ठिकाणी आला तेव्हा पलिष्टी लोक त्याला सामोरे आले. ते आनंदाने आरोळ्या मारत होते त्याच वेळी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा प्रचंड सामर्थ्यानिशी संचार झाला. तेव्हा शमशोनचे दोरखंड जसे काही वाखाच्या जळलेल्या दोरीप्रमाणे कुचकामी झाले आणि त्यामुळे ते त्याच्या दंडांवरून आपोआप गळून पडले. 15 तेव्हा शमशोनला तिथे एका मृत गाढवाचे जबड्याचे हाड सापडले. त्याच्या साहाय्याने त्याने एक हजार पलिष्टी लोकांना ठार केले.
16 तेव्हा शमशोन म्हणाला.
“गाढवाच्या जबड्याच्या हाडाने
मारली मी माणसे हजार!
गाढवाच्या जबड्याच्या हाडाने
रचली मी त्यांची उंच रास.” [a]
17 बोलणे संपल्यावर शमशोनने ते हाड तेथेच खाली टाकले. म्हणून त्या जागेचे नाव पडले, “रामथ-लेही” म्हणजेच जबड्याच्या हाडाची टेकडी.
18 शमशोन तहानेने व्याकुळ झाला. तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. तो म्हणाला, “तुझा मी दास आहे. हा एवढा मोठा विजय तू मला मिळवून दिलास तेव्हा आता मला तहानेने तू खचितच मरु देणार नाहीस? ज्यांची सुंताही झालेली नाही अशा लोकांच्या तावडीत मी सापडू नये.”
19 तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन-हक्कोरे म्हणजे “धावा करणाऱ्याचा झरा” असे ठेवले. लेही शहरात हा झरा अजूनही आहे.
20 पलिष्ट्यांच्या अमदानीत शमशोन वीस वर्षे इस्राएलचा न्यायाधीश होता.
इफिस येथे पौल
19 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले. 2 पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?”
ते अनुयायी त्याला म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही!”
3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?”
ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”
5 जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. 6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. 7 या गटात सर्व मिळून बारा पुरुष होते.
8 पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे. 9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले. व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोच त्यांच्याशी चर्चा केली. 10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांपर्यंत प्रभु येशूचे वचन पोहोंचले.
11 देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. 12 पौलाने वापरलेले रुमाल आणि कपडेही काही लोक नेत असत. लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवीत असत. जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
13-14 काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत. ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तिमधून प्रभु येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत. ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो.” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.
15 परंतु एकदा एक अशुद्ध आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”
16 मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली. त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.
17 इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांना हे समजले. तेव्हा सर्वांना भीति वाटली, आणि लोक प्रभु येशूच्या नावाचा अधिकच आदर करु लागले. 18 पुष्कळसे विश्वासणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. 19 काही विश्वासणान्यांनी जादूची कामे केली होती. या विश्वासणान्यांनी आपली जादूची पुस्तके सर्व लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली. 20 अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.
Paul Plans a Trip
21 या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरविले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरुशलेमला जायचे. तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोमदेखील पाहिलेच पाहिजे.” 22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
इफिस येथे दंगा
23 याकाळामध्येत्यामार्गाविषयी (ख्रिस्ती चळवळीविषयी) मोठा गोंधळ उडला. 24 देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे. जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.
25 त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले, आणि तो म्हणाला, “लोकहो, तुम्हांला माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. 26 पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे! तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, माणसांच्या हातून बनविलेले देव खरे देव नाहीत. 27 यामुळे केवळ आपल्या धंद्याची बदनामी होण्याची भीति नसून अर्तमी या महान देवीच्या मंदिराचे महत्व नाहीसे होईल व तिचे मोठेपण नाहीसे होण्याची भीति आहे. ही अशी देवी आहे की, जिची पूजा सर्व आशियात व जगात केली जाते.”
28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले, आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” 29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला. आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदिनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले. 30 पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्याला असे करु देईनात 31 पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगुहात जाऊ नये अशी कळकळीची विनंति केली.
32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करु लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करु लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला. आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या नाय्यभवनात एकत्र का आलोत. 33 यहूदी लोकांनी अलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्याला ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु लागला. 34 पण जेव्हा लोकांना समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरंची अर्तमी देवी थोर आहे!”
35 शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय? 36 ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करु नये.
37 “तुम्ही या दोघांना (गायस व अरिस्तार्ख) येथे घेऊन आलात. वस्तुतःत्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही. 38 जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत. तेथे ते एकमेकांवर आरोप करु शकतात!
39 “परंतु जर तुम्हांला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. 40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरु केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीति आहे.” 41 असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.
खोटा संदेष्टा हनन्या
28 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात [a] हनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला, 2 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘यहूदाच्या लोकांच्या मानेवर बाबेलच्या राजाने ठेवलेले जोखड मी मोडीन. 3 दोन वर्षांच्या आत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातून नेलेल्या वस्तू मी परत आणीन. नबुखद्नेस्सरने त्या वस्तू बाबेलमध्ये नेल्या आहेत. पण मी त्या यरुशलेमला परत आणीन. 4 यहूदाचा राजा यकन्या यालासुद्धा मी येथे परत आणीन. यकन्या यहोयाकीमचा मुलगा आहे. नबुखद्नेस्सरने यहूदातील ज्या लोकांना बळजबरीने घरे सोडून बाबेलला नेले, त्या सर्व लोकांनाही मी परत आणीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘अशा रीतीने बाबेलच्या राजाने यहूदाच्या लोकांवर लादलेले जोखड मी मोडीन.’”
5 संदेष्टा हनन्याच्या ह्या वक्तव्यानंतर यिर्मया बोलला. ते परमेश्वराच्या मंदिरात उभे होते. याजक व सर्व लोक यिर्मयाचे बोलणे ऐकू शकत होते. 6 यिर्मया हनन्याला म्हणाला, “तथास्तु! (आमेन) परमेश्वर खरोखरच असे करो! परमेश्वर तुझा संदेश खरा करील, अशी मी आशा करतो. परमेश्वर खरोखरच त्याच्या मंदिरातील बाबेलला नेलेल्या वस्तू परत येथे आणो आणि बळजबरीने घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांना परमेश्वर येथे परत आणो!
7 “पण हनन्या, मला जे सर्व लोकांना सांगितले पाहिजे, ते तूही ऐक. 8 तू आणि मी संदेष्टा होण्याच्या खूप पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, हनन्या त्यांनी पुष्कळ देशांत आणि राज्यांत युद्ध, उपासमार आणि रोगराई येईल असे भाकीत केले. 9 पण जे संदेष्टे शांतीचा उपदेश करतात, ते खरोखरच परमेश्वराने पाठविलेले आहेत का, ते तपासून पाहिलेच पाहिजे. जर त्यांचा संदेश खरा ठरला, तर तो खरोखरच परमेश्वराने पाठविलेला संदेष्टा आहे हे लोकांना समजेल.”
10 यिर्मयाच्या मानेवर जोखड होते, ते याजक हनन्याने काढून टाकले, व तोडून टाकले. 11 मग सगळ्या लोकांना ऐकू जावे म्हणून हनन्या मोठ्याने म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘ह्याप्रमाणेच मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जोखड तोडीन. त्याने ते जगातील सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवले आहे. पण दोन वर्षांच्या आतच मी ते तोडून टाकीन.’”
हनन्या असे म्हणताच, यिर्मया मंदिरातून निघून गेला.
12 जेव्हा यिर्मयाच्या मानेवरचे जोखड हनन्याने काढून तोडल्यानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 13 परमेश्वर यिर्मयाला म्हणाला, “हनन्याला जाऊन सांग ‘परमेश्वर असे म्हणतो की तू लाकडाचे जोखड तोडलेस. पण त्यांच्या जागी मी लोखंडाचे बनवीन.’ 14 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी सर्व राष्ट्रांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवीन. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची त्यांनी सेवा करावी, म्हणून मी असे करीन. ते त्याचे गुलाम होतील. मी नबुखद्नेस्सरला वन्यपशूंवरही अंकुश ठेवायला लावीन.’”
15 नंतर संदेष्टा यिर्मया संदेष्टा हनन्याला म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू यहूदाच्या लोकांना लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले. 16 म्हणून परमेश्वर म्हणतो, ‘हनन्या, लवकरच मी तुला ह्या जगातून उचलीन. ह्या वर्षी तू मरशील. का? कारण तू लोकांना परमेश्वराच्याविरुद्ध वागण्यास शिकविलेस.’”
17 त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात हनन्या मेला.
यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)
14 वल्हांडण [a] आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या [b] दोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते. 2 कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
एक स्त्री काही तरी विशेष करते(B)
3 येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतींपासून बनविलेल्या शूद्ध, सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर ओतले.
4 तेथे असलले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. 5 कारण हे सुगंधी तेल तीस दिनारापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” त्यांनी तिच्यावर कडक टीका केली.
6 पण येशू म्हणाला, “तिला एकाकी असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 7 गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे त्या वेळेला त्यांना मदत करणे तुम्हांला शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. 8 तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. 9 मी तुम्हांला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
यहूदा येशूचा शत्रु होतो(C)
10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी प्रमुख याजकांकडे गेला. 11 त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधि पाहू लागला.
येशू वल्हांडण सणाचे भोजन खातो(D)
12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
13 येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल, त्याच्या मागे जा. 14 आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ 15 आणि तो तुम्हांला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपणासाठी तयारी करा.”
16 शिष्य निघाले आणि ते शहरात गेले. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
17 संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला. 18 मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
19 शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक जण त्याला म्हणू लागला, “तो मी आहे का?”
20 तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे तोच. 21 हाय, हाय, त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याचा नाश होवो. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
प्रभु भोजन(E)
22 ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुति केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
23 नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुति केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यांतून प्याले. 24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे [c] रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
26 नंतर त्यांनी उपकारस्तुतिचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
येशू सांगतो त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून जातील(F)
27 येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व विश्वास गमावून बसाल. कारण असे लिहिले आहे की,
‘मी मेंढपाळास मारीन
आणि मेंढरे विखुरली जातील.’ (G)
28 परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”
29 पेत्र म्हणाला, “इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही.”
30 मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापुर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31 तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणांबरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणांला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.
येशू एकाटाच प्रार्थना करतो(H)
32 नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33 येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दु:ख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. 34 तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरणाइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
35 त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” 36 तो म्हणाला, “ अब्बा, [d] बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर पण मला पाहिजे ते नको तर तुला पाहिजे ते कर. (माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.)”
37 नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? 38 जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही मोहात पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
39 पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. 40 नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले. कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
41 तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांति घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. 42 उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे इकडे येत आहे.”
येशूला अटक करण्यात येते(I)
43 आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक-यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठविलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
44 घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि बाजूला काढा.” 45 मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी!” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 46 नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली. 47 तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि मुख्य याजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
48 नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लूटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकाडायला बाहेर पडलात काय? 49 मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हांबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” 50 सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
51 एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, 52 परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.
यहूदी पुढाऱ्यांबरोबर येशू(J)
53 नंतर त्यांनी येशूला तेथून मुख्य याजकाकडे नेले. आणि सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले. 54 थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र पहारेकऱ्याबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना. 56 पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती.
57 नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की, 58 ‘हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’” 59 परंतु तरीही या बाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.
60 नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?” 61 परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही.
नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू रिव्रस्त आहेस काय?”
62 येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
63 मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे? 64 तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हांला काय वाटते?”
सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्माविली. 65 काही जण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” पाहारेकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.
येशूला ओळखतो हे सांगण्यास पेत्र घाबरतो(K)
66 पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली. 67 आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”
68 परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.
69 जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.” 70 पेत्राने पुन्हा ते नाकारले.
नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”
71 पेत्र स्वतःची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”
72 आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दु:खी झाला व ढसढसा रडला.
2006 by World Bible Translation Center