Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 14

शमशोनचा विवाह

14 शमशोन तिम्ना येथे गेला असताना तिथे त्याने एक पलिष्टी तरुणी पाहिली. घरी परतल्यावर तो आपल्या आईवडीलांना म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.”

पण त्याचे आईवडील त्याला म्हणाले, “आपल्या नातेवाइकांच्या आणि इस्राएल लोकांच्या मुलीमध्ये तुझी पत्नी होण्यासारखी स्त्री नाही का? पलिष्ट्यांमधील मुलीशीच कशाला तुला लग्न करायला हवे? त्या लोकांची सुंताही झालेली नसते.”

पण शमशोन म्हणाला, “तीच मुलगी मला हवी मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.” (परमेश्वराच्या मनात तसेच आहे हे शमशोनच्या आईवडीलांना ठाऊक नव्हते. पलिष्टी तेव्हा इस्राएलींवर सत्ता गाजवत होते. त्यांच्या विरुद्ध काहीतरी करायची संधी परमेश्वर पाहात होता.)

शमशोन आपल्या आईवडीलांबरोबर तिम्ना येथे गेला. शहराजवळच्या द्राक्षमव्व्यापर्यंत ते पोहोंचले. तिथे अचानक एका तरुण सिंहाने शमशोनवर झेप घेतली. त्या क्षणी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला आणि करडू फाडावे तसे त्याने लीलया त्या सिंहाला नुसत्या हातांनी फाडून काढले. मात्र आपल्या या कृत्याचा त्याने आईवडीलांना सुगावा लागू दिला नाही.

शमशोनने पुढे जाऊन त्या पलिष्टी तरुणीची भेट घेतली. तिच्याशी बोलणे केले. त्याला ती फार आवडली. काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करायला परत जात असताना, त्या तरुण सिंहाचे कलेवर पाहायला वळला. त्याला त्याच्यावर मधमाश्यांनी पोळे केलेले दिसले. त्यात थोडा मधही होता. तो हाताने काढून घेऊन वाटेने खात खात तो गेला. त्यातील थोडा त्याने घरी पोहोंचल्यावर आपल्या आईवडीलांनाही दिला. त्यांनीही तो चाखला. पण तो मध त्याने मृत सिंहाच्या शरीरावरुन काढून घेतला आहे हे त्याने त्याना सांगितले नाही.

10 मग शमशोनचे वडील त्या पलिष्टी मुलीला पाहायला गेले. तेव्हा वराने मेजवानी द्यायची पध्दत होती त्याप्रमाणे शमशोनने मेजवानी दिली. 11 पलिष्टी लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या दिमतीला तीस माणसे पाठवली.

12 त्यांना शमशोन म्हणाला, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही मेजवानी सात दिवस चालणार आहे. मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर त्या कालावधीत शोधून काढा तुम्हाला या कोड्याचा अर्थ सांगता आला तर मी तुम्हाला तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख देईन. 13 मात्र तुम्ही हरलात तर तीस सुती अंगरखे आणि तीस पोषाख तुम्ही मला द्यायचे.” तेव्हा ती तीस माणसे म्हणाली, “ठीक आहे सांग तर तुझे कोडे.”

14 शमशोन ने कोडे घातले ते असे:

“भक्षकातून भक्ष्य निघाले आणि
    उग्रामधून मधुर निघाले तर ते काय?”

त्या तीस जणांनी तीन दिवस उत्तर शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही अर्थ उमगेना.

15 तेव्हा चौथ्या दिवशी [a] ते सगळे शमशोनच्या बायकोकडे आले. तिला म्हणाले, “आमची फजिती करायला इथे बोलावून घेतले आहे काय? काहीतरी युक्ती लढवून तू आपल्या नवऱ्याकडून या कोड्याचा अर्थ काढून घे. तसे केले नाहीस तर तुला आणि तुझ्या वडीलांच्या घरतील सर्वांना आम्ही घरादारासकट जाळून टाकू.”

16 तेव्हा शमशोनची बायको रडत शमशोनकडे गेली आणि त्याला म्हणाली, “तुझे माझ्यावर प्रेम नाही. तू माझा तिरस्कार करतोस. माझ्या लोकांना कोडे घालून त्याचे उत्तर मात्र तू मला सांगत नाहीस.”

शमशोनने उत्तर दिले, “मी माझ्या आईवडीलांनाही उत्तर सांगितलेले नाही, ते मी तुला का सांगावे?”

17 मेजवानीच्या काळात पुढील सातही दिवस तिने आक्रोश केला तेव्हा अखेर सातव्या दिवशी त्याने तिला कोड्याचा अर्थ सांगितला. तिने त्याचा पिच्छाच पुरवला म्हणून त्याला सर्व सांगावे लागले. मग ती आपल्या माणसात परतली आणि त्यांना तिने उत्तर सांगितले.

18 सातव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अशाप्रकारे पलिष्ट्यांना उत्तर मिळाले. ते शामशोनकडे येऊन म्हणाले.

“मधापेक्षा मधुर ते काय?
    सिंहापेक्षा उग्र ते काय?”

तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला.

“तुम्ही माझी कालवड नांगराला जुंपली नसती तर
    तुम्हाला हे कोडे कधीच उलगडले नसते.”

19 मग शमशोन खूप संतापला. परमेश्वराचा आत्मा प्रचंड सामर्थ्यानिशी त्याच्यात संचारला. आणि अष्कलोनवर चालून जाऊन त्याने तीस पलिष्ट्यांचा वध केला. मृतांचे कपडे आणि मालमत्ता त्याने काढून घेतली. ते सर्व त्याने ज्यांनी कोडे उलगडले त्या सर्वांना देऊन टाकले. मग तो आपल्या वडीलांच्या घरी परतला. 20 बायकोला मात्र त्याने आपल्याबरोबर घेतले नाही. विवाह सोहळ्यातील एका माणसाला देऊन टाकण्यात आले.

प्रेषितांचीं कृत्यें 18

करिंथमध्ये पौल

18 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला. करिथमध्ये पौल एका यहूदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विल्ला असे होते. तो पंत येथील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्य [a] याने काढला होता. पौल त्यांना (अक्विल्ला व प्रिस्किल्ला) भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनविणारे होते. तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करु लागला.

प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच रिव्रस्त आहे अशी साक्ष देऊ लागला. परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्याला ते (यहूदी लोक) वाईट रीतीने बोलले. तेव्हा आपला विषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहूदी लोकांना म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी जबाबदार नाही. येथून पुढे मी यहूदीतर लोकांकडेच जाईन.”

पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला. त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.

एके रात्री, प्रभु स्वप्नामध्ये पौलाशी बोलला, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको! 10 मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.” 11 म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांना शिकवीत राहिला.

पौलाला गल्लियोपुढे उभे करतात

12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले. 13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

14 पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकाना म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते. 15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!” 16 मग गल्लियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले.

17 मग त्या सर्वांनी यहूदी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.

पौल अंत्युखियास परत जातो

18 पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला. नंतर तो निघाला, व सूरिया देशाला समुद्रमार्गे गेला. आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे होती. पौलाने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडण केले. कारण त्याने नवस केला होता. 19 मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानान गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला. 20 जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही. 21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन.” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.

22 जेव्हा तो कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरुशलेमला गेला. आणि मंडळीला भेटला. मग तो खाली अंत्युखियाला गेला. 23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.

इफिस व अखया (करिंथ) येथे अपुल्लो

24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षिंत होता. तो इफिस येथे आला. त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते. 25 देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता. 26 नंतर तो यहूदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले. आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करुन सांगितले.

27 अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली. 28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.

यिर्मया 27

नबुखद्नेस्सरला परमेश्वर राजा करतो

27 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या [a] वर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता. परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, पट्ट्या आणि बांबू यांच्यापासून जोखड तयार कर. ते तुझ्या मानेवर ठेव. मग यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला भेटण्यासाठी यरुशलेमला अदोम, मवाब, अम्मोन, सोरा व सीदोन ह्या राजांचे जे दूत येतात, त्यांच्या हाती ह्या सर्व राजांना निरोप पाठव. [b] त्या दूतांना त्यांच्या स्वामींना असा निरोप द्यायला सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘तुमच्या राजांना सांगा मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन. सध्या मी तुमचे सर्व देश बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन केले आहेत. तो माझा सेवक आहे. मी वन्य प्राण्यांनासुद्धा त्याचा हूकूम पाळायला लावीन. सर्व राष्ट्रे, नबुखद्नेस्सर, त्याचा मुलगा आणि नातू ह्यांचे दास्य करतील. मग बाबेलच्या पराभवाची वेळ येईल. खूप राष्ट्रे आणि मोठे राजे बाबेलला त्याचा दास करतील.

“‘पण आता, काही राष्ट्रे वा राज्ये बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे दास्य करण्यास कदाचित् नकार देतील. ते त्याचे जोखड आपल्या मानेवर ठेवण्यास कदाचित तयार होणार नाहीत. असे झाल्यास मी काय करीन माहीत आहे? मी त्या राष्ट्रांवर युद्ध, उपासमार व भयंकर रोगराई ह्या आपत्ती आणून त्यांना शिक्षा करीन. हा परमेश्वराचा संदेश आहे. त्या राष्ट्रांचा नाश होईपर्यंत मी हे करीन. नबुखद्नेस्सरच्या विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांचा नाश मी त्याच्याच हातून करीन. तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही” असे सांगतात. 10 पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल.

11 “‘पण बाबेलच्या राजाच्या जोखडात आपल्या माना अडकविणारी व त्याचा हूकूम मानणारी राष्ट्रे जगतील. मी त्या राष्ट्रांना त्यांच्याच भूमीवर राहू देईन आणि बाबेलच्या राजाची सेवा करु देईन.’ हा देवाकडून आलेला संदेश आहे. ‘त्या राष्ट्रांतील लोक त्यांच्याच भूमीत राहून ती पिकवतील.’”

12 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील. 13 जर तू बाबेलच्या राजाची सेवा करण्यास तयार झाला नाहीस, तर तू आणि तुझी प्रजा शत्रूचा हल्ला, उपासमार व रोगराई ह्यांनी मराल. परमेश्वर म्हणतो की जे बाबेलच्या राजाची सेवा करण्याचे नाकारतील त्यांच्याबाबतीत ह्या गोष्टी घडतीलच. 14 पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.

“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात. 15 मी त्या संदेष्ट्यांना पाठविलेले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते खोटे सांगतात व तो माझा संदेश आहे असे म्हणतात म्हणून मी तुम्हा लोकांना दूर पाठवीन. तुम्ही मराल आणि तुम्हाला खोटे सांगणारे ते संदेष्टेही मरतील.”

16 नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका. 17 त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबेलच्या राजाची सेवा करा. तुमच्या शिक्षेचा स्वीकार करा म्हणजे तुम्ही जगाल. या यरुशलेम नगरीच्या नाशास तुम्ही कारणीभूत होण्याचे काहीच कारण नाही. 18 ते जर खरेच संदेष्टे असतील आणि त्यांना परमेश्वराकडून खराच संदेश मिळाला असेल, तर त्यांना प्रार्थना करु द्या. ज्या गोष्टी अजूनही परमेश्वराच्या मंदिरात आहेत, त्यासाठी त्यांना आळवणी करु द्या. राजवाड्यात अजूनही शाबूत असलेल्या गोष्टींसाठी त्यांना विनवणी करु द्या. यरुशलेममध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींसाठी त्या याजकांना प्रार्थना करु द्या. ह्या सर्व गोष्टी बाबेलला नेल्या जाऊ नयेत म्हणून त्यांना आळवणी करु द्या.”

19 यरुशलेम मध्ये अजूनही शिल्लक असलेल्या गोष्टींबद्दल सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की मंदिरात अजूनही स्तंभ, काशाचे गंगाळ, हलविता येणाऱ्या बैठकी आणि इतर गोष्टी आहेत. 20 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने ह्या गोष्टी [c] यरुशलेममध्येच सोडून दिल्या. त्याने यहूदाचा राजा यकन्या ह्याला कैद करुन नेले, तेव्हा ह्या गोष्टी नेल्या नाहीत. यकन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. नबुखद्नेस्सरने यहूदातील व यरुशलेममधील इतर महत्वाच्या व्यक्तींनासुद्धा नेले. 21 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव, परमेश्वराच्या मंदिरात राजवाड्यात आणि यरुशलेममध्ये अजून शिल्लक राहिलेल्या वस्तूंच्याबद्दल पुढीलप्रमाणे भाकीत करतो, “ह्या सर्व वस्तूसुध्दा बाबेलला नेल्या जातील. 22 मी त्या वस्तू परत आणायला जाईपर्यंत त्या बाबेलमध्येच राहतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “नंतर त्या गोष्टी मी परत आणीन. मी त्या पुन्हा ह्याच जागेवर ठेवीन.”

मार्क 13

मंदिराचा भावी विध्वंस(A)

13 येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.”

येशू त्याला म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पडला जाईल.”

येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हांस सांगा. आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”

नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या आफवांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडाणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.

“तुम्ही सावध असा. ते तुम्हांला न्याय सभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हांला मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हांला राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे राहावे लागेल. 10 या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. 11 ते तुम्हांला अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळची करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचविले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.

12 “भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांविरूद्ध उठतील आणि ते त्यांना ठार करवितील. 13 आणि माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.

14 “जेव्हा तुम्ही ‘नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट’, (दानीयेल संदेष्ट्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगल पदार्थ) जो जिथे नको तेथे पाहाल.” (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) “तेव्हा जे येहूदीयांत आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे. 15 जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. 16 आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.

17 “त्या दिवसांत ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पीत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. 18 हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 19 कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. 20 देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.

21 “आणि जर कोणी तुम्हांला म्हणेल की पाहा,ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका. 22 कारण काही लोक आपण रिव्रस्त किंवा संदेष्टे आसल्याचा खोटा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसविण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. 23 तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे.

24 “परंतु त्या दिवसांत ही संकट येऊन गेल्यावर,

‘सूर्य अंधकारमय होईल
    व चंद्र प्रकाश देणार नाही.
25 आकाशातून तारे पडतील
    आणि आकाशातील बळे डळमळतील.’ (B)

26 “आणि लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. 27 नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशांतून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.

28 “अंजिराच्या झाडापासून धडा घ्या. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हांला उन्हाळा जवळ आला हे समजते. 29 त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. 30 मी तुम्हांला खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. 31 स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.

32 “त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. देवदूतालाही नाही व पूत्रासही नाही. फक्त पित्याला माहीत आहे. 33 सावध असा, जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.

34 “ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पाहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. 35 म्हणून तुम्ही जागरूक असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हांस ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हांला माहीत नाही. 36 जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका. 37 मी तुम्हांला सांगतो, ते सर्वांना सांगतो, ‘जागृत राहा.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center