M’Cheyne Bible Reading Plan
शमशोनचा जन्म
13 इस्राएल लोकांनी दुष्कृत्ये करायला सुरुवात केली आहे असे पुन्हा परमेश्वराच्या लक्षात आले. तेव्हा त्याने चाळीस वर्षे पलिष्ट्यांच्या हातात सत्ता दिली.
2 सरा नगरामध्ये मानोहा नावाचा एक माणूस होता. तो दान वंशातील होता. त्याच्या बायकोला मूलबाल होत नव्हते. 3 एकदा परमेश्वराच्या दूताने तिला दर्शन देले. तो तिला म्हणाला, “तुला आजतागायत मूल झाले नाही पण आता तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल. 4 मात्र द्राक्षारस किवा मद्य पिऊ नको. तसेच कोणताही अशुद्ध पदार्य खाऊ नकोस. 5 कारण तू गर्भवती राहून पुत्राला जन्म देशील. तो परमेश्वराचा असेल. तो नाजीर होईल. त्यांचे जावळ काढू नको. जन्माला येण्याअगोदर पासूनच परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी असेल. पलिष्ट्यांपासून तो इस्राएलांचे रक्षण करील.”
6 तिने आपल्या नवऱ्याला सर्व काही सांगितले. ती म्हणाली, “देवाकडून एक माणूस माझ्याकडे आला होता. त्याचे रूप देवाच्या देवदूताप्रमाणे भिती आणि आदर निर्माण करणारे होते. त्याला पाहून मी भयभीत झाले. त्याचा ठावठिकाणा मी विचारला नाही. त्यानेही त्याचे नाव सांगितले नाही. 7 पण तो मला म्हणाला, ‘तुला दिवस राहातील आणि मुलगा होईल. मद्य किंवा द्राक्षारस पिऊ नको. तसेच कोणतेही अशुध्द अन्न खाऊ नको. कारण हा मुलगा जन्माला यायच्या आधीपासून मरेपर्यंत देवाचा नाजीर असणार आहे.’”
8 हे ऐकून मानोहाने परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला. “हे परमेश्वरा, त्या दूताला परत आमच्याकडे पाठव या जन्माला येणाऱ्या मुलाचे संगोपन आम्ही कसे करावे हे आम्हाला त्याच्याकडून पुन्हा ऐकू दे.”
9 परमेश्वराने मानोहाची ही विनवणी ऐकली. परमेश्वराचा दूत पुन्हा तिच्याकडे आला. ती शेतात बसली होती आणि तिचा नवरा तिच्याजवळ पास नव्हता. 10 “तो पुन्हा आलाय त्यादिवशी आलेला माणूस आज परत येथे आला आहे” असे सांगत ती धावतच नवऱ्याला बोलवायला गेली.
11 मानोहा उठून बायकोच्या मागोमाग गेला. त्या माणसाजवळ आल्यावर त्याला म्हणाला, “पूर्वी माझ्या बायकोशी बोलून गेलास तो तूच का?”
दूत म्हणाला, “हो, तोच मी”
12 तेव्हा मानोहा म्हणाला, “आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून येवो त्या मुलाचा जीवनक्रम कसा असेल? तो काय काय करील? आम्हाला सर्व काही सांग.”
13 तेव्हा मानोहाला तो परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुझ्या बायकोला मी जे सांगितले त्याप्रमाणे तिने वागावे. 14 द्राक्षवेलाचा कोणताही भाग तिने खाऊ नये. द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये. अशुध्द अन्नाचे सेवन करु नये माझ्या आज्ञा कसोशीने पाळाव्यात.”
15 मानोहा त्यावर परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “तुम्ही थोडावेळ आमच्यात राहा तुमच्या पाहुणचारासाठी आम्ही करडू शिजवतो.”
16 परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुम्ही मला ठेवून घेतलेत तरी मी तुमचे काही खाणार नाही. पण तुम्हाला काही करायचेच असेल तर परमेश्वरासाठी होमार्पण करा.” (हा खरच परमेश्वराचा दूत आहे याची मानोहाला कल्पना नव्हती.)
17 मानोहाने त्याला विचारले, “तुमचे नाव काय? तुमच्या म्हणण्याप्रमणे सर्व घडून आल्यावर आम्ही तुमचा सन्मान करु.”
18 परमेश्वराचा दूत म्हणाला “माझे नाव कशाला विचारता? ते अति आश्चर्यकारक [a] आहे. तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.”
19 मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला व आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले. 20 मग जे जे घडले ते मानोहा व त्याची पत्नी यांनी पाहिले वेदीवरुन ज्वाळा आकाशाकडे झेपावत असताना त्यातूनच तो परमेश्वरदूत स्वर्गस्थ झाला.
हे पाहताच उभयतांनी जमिनीवर लोटांगण घातले. 21 तो परमेश्वराचाच दूत असल्याची मानोहाची खात्री पटली. पुन्हा मानोहा आणि त्याची पत्नी यांना त्याने दर्शन दिले नाही. 22 मानोहा बायकोला म्हणाला, “आपण आता खात्रीने मरणार. कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे.”
23 पण ती नवऱ्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या”
24 यथावकाश तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मोठा होऊ लागला. त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला. 25 सरा आणि अष्टावोल या नगरांमधल्या महने-दान नगरात तो असताना परमेश्वराच्या आत्म्याने शमशोनमध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली.
थेस्सलनीका येथे पौल
17 पौल व सीला अंफिपुली व अपुल्लोनिया या प्रदेशांतून प्रवास करीत गेले. ते थेस्सलनीका शहरात आले. त्या शहरात यहूदी लोकांचे सभास्थान होते. 2 यहूदी लोकांना भेटण्यासाठी पौल सभास्थानात गेला. तो असे नेहमीच करीत असे. तीन आठवडे प्रत्येक शब्बाथवारी पवित्र शास्त्राविषयी पौलाने यहूदी लोकांशी चर्चा केली. 3 पौलाने पवित्र शास्त्रातील वचने यहूदी लोकांना स्पष्ट करुन सांगितली. त्याने दाखवून दिले की, रिव्रस्ताने मरणे अगत्याचे होते. तसेच त्याचे मरणातून उठणेही अगत्याचे होते. पौल म्हणाला, “हा मनुष्य ‘येशू’ ज्याच्याबद्दल मी तुम्हांला सांगत आहे तो ‘ख्रिस्त’ आहे.” 4 सभास्थानांमध्ये काही ग्रीक लोक होते, जे खऱ्या देवाची उपसाना करीत. तेथे काही महत्वाच्या स्त्रियाही होत्या. यातील पुष्कळ लोक पौल व सीला यांना जाऊन मिळाले.
5 पण ज्या यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नव्हता, ते जळफळू लागले. शहरातून काही दुष्ट माणसांना त्यांनी भाड्याने आणले. त्या दुष्ट माणसांनी आणखी लोकांना जमा केले व शहरात अशांतता निर्माण केली. लोक यासोनाच्या घरी गेले. पौल व सीला यांचा शोध घेत ते गेले. त्या लोकांची अशी इच्छा होती की, पौल व सीला यांना लोकांसमोर आणायचे. 6 पण त्यांना पौल व सीला सापडले नाहीत. म्हणून लोकांनी यासोनाला व आणखी काही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना नगराच्या अधिकाऱ्यांपुढे ओढीत नेले. ते मोठ्याने ओरडून म्हणाल, “या लोकांनी जगात सगळीकडे उलथापालथ केली. आणि आता ते येथेसुद्धा आले आहेत! 7 यासोनाने त्यांना आपल्या घरी ठेवले. कैसराच्या [a] नियमांविरुद्ध हे लोक करतात. ते म्हणत की, आणखी एक राजा आहे. त्याचे नाव येशू आहे.”
8 शहराच्या अधिकाऱ्यांनी व इतर लोकांनी हे ऐकले. ते खूपच अस्वस्थ झाले. 9 त्यांनी यासोनला व इतर विश्वासणाऱ्यांना दंड भरण्यास सांगितले. मग त्यांनी विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले.
पौल व सीला बिरुया येथे जातात
10 त्याच रात्री विश्वासणाऱ्यांनी पौल व सीला यांना बिरुया नावाच्या दुसऱ्या शहरी पाठविले. बिरुयामध्ये पौल व सीला यहूदी सभास्थानामध्ये गेले. 11 हे यहूदी लोक थेस्सलनीका येथील यहूदी लोकांपेक्षा बरे होते. पौल व सीला यांनी गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी आनंदाने ऐकल्या. बिरुया येथील हे यहूदी लोक पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करीत. या गोष्टी खऱ्याच घडल्या आहेत की काय याविषयी जाणून घेण्यास ते उत्सुक होते. 12 यातील पुष्कळ यहूदी लोकांनी विश्वास ठेवला. पुष्कळशा ग्रीक पुरुषांनी व स्त्रियांनी (ज्यांना समाजात महत्व होते.) त्यांनीसुद्धा विश्वास ठेवला.
13 परंतु जेव्हा थेस्सलनीका येथील यहूदी लोकांना समजले की पौल बिरुया येथेही देवाचे वचन सांगत आहे, ते बिरुया येथे सुद्धा आले. थेस्सलनीका येथील यहूदी लोकांनी बिरुया येथील लोकांना हैराण केले व त्रास दिला. 14 म्हणून विश्वासणाऱ्यांनी पौलाला ताबडतोब सुमुद्राकडे नेले. पण सीला व तीमथ्य तेथेच राहिले. 15 विश्वासणारे जे पौलाबरोबर गेले होते त्यांनी त्याला अथेनै शहरात आणले. या बांधवांनी पौलचा संदेश जो सीला व तीमथ्यासाठी होता, तो घेऊन ते परत आले. संदेशात असे म्हटले होते. ʇतुम्हांला शक्य होईल तितक्या लवकर माइयाकडे या.
अथेनै येथे पौल
16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत होता. पौलाचे मन अस्वस्थ झाले. कारण त्याने पाहिले की, ते शहर मूर्तीनी भरलेले आहे. 17 सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहूदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे. 18 काही एपिकूरपंथी व स्तोयिक पंथीय तत्वज्ञानी मंडळीने त्याच्याशी वाद घातला.
त्यांच्यातील काही म्हणाले, “या माणसाला तो काय बोलत आहे, ते त्याचे त्यालाच कळत नाही. तो काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” पौल त्यांना येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याची सुवार्ता सांगत होता. ते म्हणाले, “असे वाटते की तो आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी देवाबद्दल सांगत आहे.”
19 त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्या [b] सभेपुढे नेले ते म्हणाले, “तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा. 20 तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात त्या आमच्यासाठी नवीन आहेत. यापूर्वी आम्ही हे कधीही ऐकले नाही. या शिकवणीचा अर्थ काय हे आम्हांला जाणून घ्यायचे आहे.” 21 (अथेनै येथे राहणारे तसेच त्यांच्यात राहणारे विदेशी लोक नेहमी नव्या कल्पनांविषयी बोलण्यात वेळ घालवित असत).
22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, “अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात. 23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
24 “ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही! 25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. 26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
27 “त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. 28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे: ‘आम्ही त्याची मुले आहोत’
29 “आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही. 30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे. 31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
32 जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!” 33 पौल त्यांच्यापासून निघून गेला. 34 पण काही लोकांनी पौलावर विश्वास ठेवला व ते त्याला जाऊन मिळाले. त्यांच्यापैकी एक दिओनुस्य होता. तो अरीयपगा सभेचा सभासद होता. दामारि नावाच्या स्त्रीनेही विश्वास ठेवला. आणखीही काही लोक होते, ज्यानी विश्वास ठेवला.
मंदिरात यिर्मयाचा बोधपर उपदेश
26 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा संदेश दे. मी तुला सांगितलेले सर्व यहूदातील सगळ्या लोकांना सांग. माझ्या संदेशातील कोणताही भाग गाळू नकोस. 3 कदाचित् ते ऐकतीलही आणि माझ्या संदेशाचे पालन करतील. पापी जीवन जगण्याचे ते कदाचित् सोडून देतील. त्यांचे परिवर्तन झाल्यास, त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. त्यांनी खूप वाईट कृत्ये केली. त्याबद्दल त्यांना शिक्षा करण्याची योजना मी आखत आहे. 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: मी तुम्हाला माझी शिकवण दिली. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागलेच पाहिजे. 5 माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. 6 तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणे [a] करीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.’”
7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले. 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, “अशा भयंकर गोष्टी सांगितल्याबद्दल तू मरशील! 9 परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर गोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस! शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल, असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस. यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस!” परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिगत कळली, म्हणून ते राजवाड्यातून बाहेर आले व देवाच्या मंदिरात गेले. तेथे ते नव्या प्रवेशद्वाराजवळ आपापल्या स्थानांवर बसले. “नवे प्रवेशद्वार” परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचे दार होते. 11 नंतर याजक व संदेष्टे राज्यकर्त्यांशी व लोकाशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरुशलेमबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे ऐकलेच आहे.”
12 मग यिर्मया यहूदाच्या राज्यकर्त्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “ह्या नगरीबद्दल व ह्या मंदिराबद्दल ह्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठविले. तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द परमेश्वराच्या तोंडचा आहे. 13 तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही. 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हाला योग्य व बरोबर वाटेल ते करा. 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध माणसाला मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही ह्या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसालाही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरीच मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही ऐकलेला संदेश खरेच परमेश्वराकडूनच आलेला आहे.”
16 मग राज्यकर्ते व सर्व लोक बोलले, त्या लोकांनी याजकांना व संदेष्ट्यांना सांगितले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्या देवाकडून येतात.”
17 नंतर काही वडीलधारी (नेते) उभे राहिले. ते सर्व लोकांना उद्देशून म्हणाले, 18 “संदेष्टा मीखा हा मोरष्टचा राहणारा होता. हिज्कीया यहूदाचा राजा असताना मीखा संदेष्टा होता. मीखाने यहूदाच्या लोकांना पुढील गोष्टी सांगितल्या. [b]
‘सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
सियोनेचा नाश होईल
सियोन नांगरलेले शेत होईल.
यरुशलेम दगडांची रास होईल.
मंदिर असलेल्या टेकडीवर रान माजेल.’ (A)
19 “हिज्कीया यहूदाचा राजा होता. पण हिज्कीयाने मीखाला ठार मारले नाही. यहूदातील कोणीही मीखाला ठार मारले नाही. हिज्कीयाला परमेश्वराबद्दल आदर होता, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याची इच्छा होती. हिज्कीया यहूदाचे वाईट करील असे परमेश्वराने सांगितले होते. पण हिज्कीयाने परमेश्वराची करुणा भाकली आणि परमेश्वराचे हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वराने त्या वाईट गोष्टी घडू दिल्या नाहीत. आपण जर यिर्मयाला इजा केली, तर आपण स्वतःवरच खूप संकटे ओढवून घेऊन ती आपलीच चूक ठरेल.”
20 पूर्वी आणखी एकाने परमेश्वराचा संदेश ऐकविला होता. त्याचे नाव उरीया तो शमायाचा मुलगा होता. उरीया किर्याथ यारीमचा रहिवासी होता. त्याने ह्या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच गोष्टी सांगितल्या होत्या. 21 राजा यहोयाकीम, त्याचे सैन्याधिकारी व यहूदातील नेते ह्यांनी उरीयाला संदेश देताना ऐकले. ते रागावले. यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता. हे उरीयाला कळले. तो घाबरला व मिसर देशात पळाला. 22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या माणसाबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठविले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता, 23 त्या माणसांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्याला यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर गरीब लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत फेकण्यात आले.
24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्यापासून वाचविले.
देव त्याचा पुत्र पाठवितो(A)
12 येशू त्यांना बोधकथा सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षारसासाठी कुंड खणले, आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला.
2 “हंगामाच्या योग्य वेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठविले. 3 परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. 4 नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठविले. त्यानी त्याचे डोके फोडले आणि त्याला अपमानकारक रीतीने वागविले. 5 मग धन्याने आणखी एका नोकराला पाठविले. त्यांनी त्याला जिवे मारले त्याने इतर अनेकांना पाठविले. शेतकऱ्यांनी काहींना हाणमार केली तर काहींना ठार मारले.
6 “धन्याजवळ पाठविण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले. तो म्हणाला, ‘खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील.’ तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्याला त्या शेतकऱ्यांकडे पाठाविले.
7 “परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपले होईल!’ 8 मग त्यांनी त्याला धरले, जिवे मारले, आणि द्राक्षमऴ्याबाहेर फेकून दिले.
9 “तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. 10 तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय?
‘जो दगड बांधणारांनी नाकारला
तो कोनशिला झाला.
11 हे प्रभुने केले.
आणि ते आमच्यासाठी आश्चर्य कारक आहे.’” (B)
12 मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्याला अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, ही बोधकथा त्याने त्यांनाच उद्देशून सांगितली होती. मग ते त्याला सोडून निघून गेले.
यहूदी पुढारी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(C)
13 नंतर त्यांनी त्याला चुकीचे बोलताना पकडावे म्हणून काही परुशी व हेरोदी यांना. त्याच्याकडे पाठविले. 14 ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी आम्हांस माहीत आहे की, आपण प्रामाणिक आहात आणि कुणाची तमा न बाळगता आपण देवाचा मार्ग खरेपणाने शिकविता. तर मग कैसरला कर देणे योग्य आहे की नाही? आणि आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
15 परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे (चांदीचे एक नाणे) आणा म्हणजे मी ते पाहीन.” 16 मग त्यांनी त्याच्याकडे नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.”
17 मग येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.
काही सदूकी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(D)
18 नंतर काही सदूकी त्याच्याकडे आले, (सदूकी पुनरूत्थान नाही असे समजतात) त्यांनी त्याला विचारले, 19 “गुरुजी. मोशाने आमच्यासाठी असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मेला व पत्नी राहिली, परंतु मूलबाळ नसले तर वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मेलेल्या भावाचा वंश वाढवावा. 20 असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ व होता मेला. 21 दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोही मूलबाळ न होता मेला. 22 तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मेली. 23 सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरूत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.”
24 येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ तुम्हांला माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात. 25 कारण जेव्हा लोक मेलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत. त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील. 26 परंतु मेलेल्यांचा पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशाच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, ‘मी अब्राहामाचा, इसहाकाचा आणि याकोबाचा देव आहे.’ [a] 27 तो मेलेल्यांचा देव नव्हे तर जिवंत लेकांचा देव आहे. तुम्ही फार चुकत आहा.”
सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती?(E)
28 त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वाची पाहिली आज्ञा कोणती?”
29 येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्त्राएला, ऐक, आपला प्रभु देव अनन्य आहे. 30 तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ [b] 31 दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ [c] यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
32 तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात. 33 त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
34 येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यांनतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(F)
35 येशू मंदिरात शिकवीत असता, तो म्हणाला, “रिव्रस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणतात ते कसे शक्य आहे? 36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला,
‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला,
मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बैस.’ (G)
37 दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभु’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकासमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.
येशू नियमशास्त्राच्या बोधकांचा टीका करतो(H)
38 शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. 39 आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. 40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांना फार कडक शिक्षा होईल.”
विधवा दान देण्याचा अर्थ दाखविते(I)
41 येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42 नंतर एक गरीब विधवा आली. तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली, ज्याची किंमत शंभरातील एका पैशाएवढी होती.
43 येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44 मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
2006 by World Bible Translation Center