M’Cheyne Bible Reading Plan
इफ्ताहचे नवस आणि एफ्राईम
12 एफ्राईमच्या लोकांनी सैन्याची जमवाजमव केली आणि नदी ओलांडून ते साफोन येथे गेले. ते इफ्ताहला म्हणाले, “अम्मोन्यांशी लढायला गेलास तेव्हा तू आम्हाला मदतीसाठी का बोलावले नाहीस? आता आम्ही तुझ्यासकट तुझ्या घराला आग लावतो.”
2 इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोक आपल्याला वरचेवर त्रास देत होते. म्हणून मी माझ्या सैन्यासह त्यांच्यावर चालून गेलो. तेव्हा मी तुम्हाला बोलावले होते पण तुम्ही कुमक पाठवली नाही. 3 तुमची मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उतरुन मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?”
4 मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युध्द केले. ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वतःचा प्रदेश सुध्दा नाही. तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला.
5 एफ्राईम देशाकडे जाणारे यार्देन नदीचे उतार गिलादांनी ताब्यात घेतले. कोणीही जिवंत राहिलेला एफ्राईम माणूस आला आणि नदी ओलांडून जाऊ देण्याची विनंती करायला लागला की गिलाद विचारत, “तू एफ्राईमचा आहेस का?” तो म्हणे, “नाही” 6 मग ते त्याला “शिब्बोलेथ” हा शब्द उच्चारायला सांगत. एफ्राईम लोकांना तो नीट म्हणता येत नसे. तो म्हणे, “सिब्बोलेथ” तेव्हा हा माणूस एफ्राईम असलेयाचे त्यांच्या ध्यानात येई. नदीच्या उतारापाशी त्याला मारून टाकत. अशाप्रकारे त्यांनी बेचाळीस हजार एफ्राईम माणसे मारली.
7 इफ्ताह सहा वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता. त्याचे निधन झाल्यावर गिलादमधील त्याच्या गावी त्याचे दफन करण्यात आले.
नंतरचा न्यायाधीश इब्सान
8 मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले. 9 त्याला तीस मुलगे आणि तीस मुली होत्या त्याने आपल्या तीसही मुलींना गोत्राबाहेर लग्ने जमवण्यास सांगितले आणि सर्व मुलांसाठी तशाच बाहेरच्या मुली केल्या. इब्सान सात वर्षे न्यायाधीश होता. 10 त्याच्या निधनानंतर बेथलहेममध्थे त्याचे दफन करण्यात आले.
न्यायाधीश एलोन
11 त्यानंतर जबुलून वंशातील एलोन इस्राएलांचा न्यायाधीश झाला. तो त्या जागी दहा वर्षे होता. 12 मग तो वारला तेव्हा जबुलूनमधील अयालोन येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
न्यायाधीश अब्दोन
13 एलोन नंतर हिल्लेलचा मुलगा अब्दोन न्यायाधीश झाला तो पिराथोनचा होता. 14 त्याला चाळीस मुलगे आणि तीस नातू होते. ते सत्तर गाढवांवर स्वार होत. अब्दोन आठ वर्षे इस्राएलांचा न्यायाधीश होता. 15 पुढे त्याच्या मृत्यूनंतर पिराथोन येथे त्याला पुरण्यात आले. एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन हे ठिकाण आहे.
तीमथ्य पौल व सीला यांच्यासह जातो
16 पौल दर्बे व लुस्त्र या शहरांमध्ये गेला. तेथे रिव्रस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तीमथ्य, तो होता. तीमथ्याची आई एक यहूदी विश्वासणारी स्त्री होती. त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य होता. 2 तीमथ्याविषयी लुस्त्र व इकुन्या येथील बंधुजनांचे फार चांगले मत होते. 3 तीमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौताची इच्छा होती. पण त्या भागात राहणाऱ्या यहूदी लोकांना माहीत होते की, तीमथ्याचे वडील ग्रीक (यहूदीतर) आहेत. म्हणून पौलाने यहूदी लोकांचे समाधान होण्यांसाठी तीमथ्याची सुंता केली.
4 मग पौल व त्याच्याबरोबर असलेले लोक इतर शहरांमधून प्रवास करीत निघाले. यरुशलेममधील प्रेषितांनी व वडीलजनांनी दिलेले नियम व त्यावरचे निर्णय ते विश्वासणाऱ्यांना देत गेले. त्यांनी विश्वासणाऱ्यांना त्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. 5 मग मंडळ्या विश्वासात भक्कम होत गेल्या व संख्येतदेखील त्या वाढत गेल्या.
पौलाला आशियातून बोलावतात
6 पौल व त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया व गलतीया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले. 7 पौल व तीमथ्य मिसिया देशाच्या जवळ गेले. त्यांना बिथनीया प्रांतात जायचे होते. पण येशूच्या आत्म्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. 8 म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.
9 त्या रात्री पौलाने एक दृष्टान्त पाहिला, या दृष्टान्तामध्ये “मसेदोनियाला या आणि आम्हांला मदत करा!” अशी विनंति मासेदिनियातील कोणीतरी मनुष्य उभा राहून पौलाला करीत होता. 10 पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.
लीदीयाच्या मनाचा पालट
11 नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो. 12 नंतर आम्ही फिलिप्पैला गेलो. ते त्या भागातील मासेदोनियातील पहिले नगर आहे. ते रोमी लोकांचे नगर आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
13 शब्बाथवारी आम्ही त्या नगराच्या वेशीच्या बाहेर प्रार्थना करण्यासाठी नदीकाठी सुरक्षित जागा आढळेल असे वाटल्यावरुन तेथे जाऊन बसलो, आणि तेथे जमा झालेल्या स्त्रियांशी बोलू लागलो. 14 त्यांच्यामध्ये लुदिया नावाची स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती, ती किरमीजी रंगाच्या कापडाचा व्यापार करीत असे, ती चांगली देवभक्त होती. लीदीयाने पौलाचे बोलणे ऐकले. देवाने तिचे अंतःकरण उघडले. पौलाने जे सांगितले त्यावर तिने विश्वास ठेवला. 15 तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हांला तिच्या घरी बोलाविले, ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभु येशूमध्ये विश्वासणारी आहे, तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हांला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली.
पौल व सीला तुरुंगात
16 एकदा आम्ही प्रार्थनेला जात असताना. एक दासीकाम करणारी मुलगी आम्हांना भेटली, तिच्या अंगात येत असे [a] ती दैवप्रश्ना सांगून आपल्या घरधन्यास पुष्कळ मिळकत करुन देत असे. 17 ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, “हे लोक सर्वेच्च देवाचे सेवक आहेत! ते तुम्हांला सांगत आहेत की, तुमचे तारण कसे होईल!” 18 तिने हे असे बरेच दिवस केले. त्यामुळे पौल विचलित झाला. मग तो वळला व त्या आत्म्याला म्हणाला, “येशू रिव्रस्ताच्या सामर्थ्याने, मी तुला आज्ञा देतो, तिच्यातून बाहेर निघ!” ताबडतोब तो आत्मा बाहेर आला.
19 ज्या लोकांची ही मुलगी नोकरी करीत असे त्यांनी हे पाहिले. त्यांनी हे ओळखले की, आता ते त्या मुलीचा वापर पैसे कमविण्यासाठी करु शकणार नाहीत. म्हणून त्यांनी पौल व सीला यांना धरुन शहरातील सभेच्या ठिकाणी ओढून नेले. शहराचे अधिकारीही तेथे होते. 20 त्या लोकांनी पौल व सीला यांना पुढाऱ्यांपुढे आणले, व ते म्हणाले, “हे लोक यहूदी आहेत. आपल्या शहरात ते त्रास देत आहेत. 21 आमच्यासाठी च्या गोष्टी योग्य नाहीत त्या करण्यासाठी ते लोकांना सांगत आहेत. आम्ही रोमी नागरिक आहोत व या गोष्टी आम्ही करणार नाही.”
22 लोक पौल व सीला यांच्याविरुद्ध होते. मग पुढाऱ्यांनी पौलाचे व सीलाचे कपडे फाडले व लोकांना सांगितले की, त्यांना काठीने मारा. 23 लोकांनी पौलाला व सीला यांना पुष्कळ मारले. मग पुढाऱ्यांनी त्या दोघांना तुंरुंगात टाकले, पुढाऱ्यांनी तुंरुंगाधिकाऱ्याला सांगितले, “फार काळजीपूर्वक यांच्यावर पहारा ठेवा!” 24 अधिकाऱ्याने तो खास आदेश मिळाल्यावर पौल व सीला यांना तुरुंगात आत दूरवर ठेवले. त्याने त्यांचे पाय लाकडाच्या ओंडक्यांमध्ये बांधले.
25 मध्यरात्रीच्या वेळी पौल व सीला, देवाची गीते गात होते व प्रार्थना करीत होते व इतर कैदी ऐकत होते. 26 अचानक मोठा धरणीकंप झाला. तो इतका जबरदस्त होता की त्यामुळे तुरुगाचे पाये डळमळले. मग तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले. सर्व कैद्यांची त्यांच्या साखळदंडातून सुटका झाली. 27 तुरुंगाधिकारी जागा झाला. त्याने पाहिले की, तुरुंगाचे दरवाजे उघडे आहेत. त्याला वाटले कैदी अगोदरच पळाले असतील म्हणून अधिकाऱ्याने आपली तरवार काढली, तो स्वतःला मारणार होता 28 इतक्यात पौल ओरडला, “स्वतःला इजा करुन घेऊ नकोस आम्ही सर्व येथेच आहोत!”
29 अधिकाऱ्याने कोणाला तरी दिवा आणायला सांगितले. मग तो आतमध्ये पळाला. तो थरथर कापत होता. तो पौल व सीला यांच्यापुढे पडला. 30 मग त्यांने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, “पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?”
31 ते त्याला म्हणाले, “प्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल-तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल.” 32 पौलाने व सीलाने तुरुंगाधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्यालासुद्धा प्रभूचा संदेश सांगितला. 33 त्या वेळी बरीच रात्र झाली होती, पण तुरुंगाधिकाऱ्यांने पौल व सीला यांच्या जखमा धुतल्या. मग अधिकारी व त्याच्या घरातील सर्वांना बाप्तिस्मा झाला. 34 नंतर त्याने पौल व सीला यांना घरी नेले व अन्न खावयास दिले. सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते. कारण ते आता देवावर विश्वास ठेवीत होते.
35 दुसऱ्या दिवशी सकाळी पुढाऱ्यांनी काही शिपायांना पाठविले व तुरुंगाधिकाऱ्याला निरोप दिला की, “त्या लोकांना (पौल व सीला) यांना मोकळे सोडा!”
36 तुरुंग आधिकारी पौलाला म्हणाला, “पुढाऱ्यांनी या शिपायांना तुम्हाला सोडण्याविषयी सांगितले आहे. तुम्ही आता जाऊ शकता. शांतीने जा.”
37 परंतु पौल त्या शिपायांना म्हणाला, “तुमच्या पुढाऱ्यांनी आम्ही चूक केली आहे हे सिद्ध केले नाही. परंतु त्यांनी आम्हांला लोकांसमोर मारले व तुरुंगात टाकले. आम्ही रोमी नागरिक आहोत म्हणून आम्हांला अधिकार आहेत. आता पुढाऱ्यांना वाटते की आम्ही गुप्त्पणे निघून जावे. नाही! पुढाऱ्यांनी येऊन आम्हांना बाहेर काढले पाहिजे!”
38 शिपायांनी पुढाऱ्यांना पौल जे म्हणाला, ते सांगितले, जेव्हा पुढाऱ्यांनी ऐकले की पौल व सीला रोमी नागारिक आहेत, तेव्हा ते घाबरले. 39 मग पुढाऱ्यांनी येऊन त्यांची क्षमा मागितली. पुढाऱ्यांनी येऊन त्यांना सोडविले व शहर सोडण्याविषयी सांगितले. 40 पण जेव्हा पौल व सीला तुरुंगाबाहेर आले, तेव्हा ते लीदीयाच्या घरी गेले. त्यांनी तेथे काही विश्वासणाऱ्यांना पाहिले, व त्यांना धीर दिला, मग पौल व सीला गेले.
यिर्मयाच्या प्रवचनाचा सारांश
25 यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाला मिळालेला देवाचा संदेश असा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी [a] हा संदेश आला. यहोयाकीम योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दींचे चौथे वर्ष हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीचे पहिलेच वर्ष होते. 2 यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना यिर्मयाने पुढील संदेश ऐकविला:
3 गेली 23 वर्षे मी परमेश्वराचे संदेश पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या 13 व्या वर्षापासून मी संदेष्टा आहे. मी तेव्हापासून आजपावेतो तुम्हाला परमेश्वराकडून आलेले संदेश ऐकविले आहेत. पण तुम्ही ऐकले नाही. 4 परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठविले पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही.
5 ते संदेष्टे म्हणाले, “तुमची राहणी बदला. त्या वाईट गोष्टी करु नका. तुम्ही तुमचे वागणे बदललेत, तर तुम्ही, परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात, परत जाऊ शकाल. त्याने तुम्हाला ही भूमी कायमची राहण्यास दिली होती. 6 दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची सेवा वा पूजा करु नका. एखाद्या माणसाने तयार केलेल्या मूर्तींची पूजा करु नका. त्यामुळे मला तुमचा रागच येतो. असे करुन तुम्ही स्वतःलाच दुखविता. [b]
7 “पण तुम्ही माझे ऐकले नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “माणासाने घडविलेल्या मूर्तीची तुम्ही पूजा केली. त्यामुळे मला राग आला त्यामुळे तुम्ही दुखविले जाता एवढेच.”
8 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. 9 म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील. 10 त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूंचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल. 11 ती सगळी भूमी वैराण वाळवंट होईल तेथील सर्व लोक, 70 वर्षांपर्यत बाबेलच्या राजाचे दास होतील.
12 “पण 70 वर्षांनंतर मी बाबेलच्या राजाला शिक्षा करीन. मी बाबेल राष्ट्रालाही शिक्षा करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी खास्द्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांच्या देशाला शिक्षा करीन. मी त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन. 13 बाबेलमध्ये खूप वाईट गोष्टी घडतील हे मी सांगितले आहेच त्या सर्व गोष्टी घडतीलच. यिर्मयाने त्या परक्या देशाबद्दल भविष्यकथन केलेच आहे आणि या पुस्तकात सर्व धोक्याचे इशारे लिहिले आहेत. 14 हो! बाबेलच्या लोकांना खूप राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.”
जगातील राष्ट्रांना निवाडा
15 परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने मला या गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, माझ्या हातातील द्राक्षरसाचा प्याला घे. तो माझ्या क्रोधाचा द्राक्षरस आहे. मी तुला वेगवेगळ्या राष्ट्रात पाठवीत आहे. त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव. 16 ते हा द्राक्षरस पितील. मग ते वांत्या करतील आणि वेड्याप्रमाणे वागतील. मी लवकरच त्यांच्यावर शत्रूला हल्ला करायला लावणार असल्याने ते असे वागतील.”
17 मग मी देवाच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी गेलो आणि तेथील लोकांना त्यातील द्राक्षरस प्यायला लावला. 18 मी यहूदा आणि यरुशलेम यामधील लोकांसाठी तो द्राक्षरस ओतला. यहूदातील राजे आणि नेते ह्यांना मी द्राक्षरस प्यायला लावला. ते वैराण वाळवंट व्हावेत, त्या ठिकाणाचा सर्वनाश व्हावा, तो नाश पाहून लोकांनी हायहाय करावे व त्याबद्दल कोसावे म्हणून मी असे केले आणि तसेच घडले. यहूदाचे आता तेच झाले आहे!
19 मी मिसरच्या फारोलाही द्राक्षरस प्यायला भाग पाडले. परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून मी मिसरच्या अधिकाऱ्यांना, महत्वाच्या नेत्यांना आणि लोकांना द्राक्षरस प्यायला लावला.
20 मी सर्व अरब व ऊस देशातील राजे यांनाही द्राक्षरस पिण्यास दिला.
मी पलिष्ट्यांच्या देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन या शहरांतील व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.
21 मग मी अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षरस प्यायला लावले.
22 सोरच्या व सीदोनच्या सर्व राजांनाही मी द्राक्षरस पाजला.
खूप दूरच्या देशातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस दिला. 23 ददान, तेमा व बूज येथील लोकांनाही मी त्या प्याल्यातून प्यायला लावले. मंदिरात दाढीच्या कडा कापणाऱ्या सर्व लोकांना मी द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. 24 अरबस्तानातील सर्व राजांनाही मी द्राक्षरस प्यायला दिला. हे राजे वाळवंटात राहतात. 25 जिमरी, एलाम व मेदी येथील सर्व राजांना मी द्राक्षरस पाजला. 26 उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळच्या राजांना मी हा द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. एकामागून एकाला मी तो प्यायला लावला. पृथ्वीवरील सर्व राज्यांना मी परमेश्वरच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून प्यायला लावले. पण बाबेलचा राजा, सर्व राष्ट्रांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.
27 “यिर्मया, तू त्या राष्ट्रांना सांग की सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘माझ्या क्रोधाच्या प्याल्यातून प्या. त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा. पडा आणि परत उठू नका. उठू नका कारण तुम्हाला ठार करण्यासाठी मी तलवार पाठवीत आहे.’
28 “ते लोक तुझ्या हातातून प्याला घेण्याचे नाकारतील. ते त्यातील द्राक्षरस पिण्यास नकार देतील पण तू त्यांना सांग ‘सर्वशक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. तुम्ही खरोखरच ह्या प्याल्यातून प्यावे. 29 माझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या यरुशलेम नगरीत वाईट गोष्टी घडवून आणण्यास मी अगोदरच सुरवात केली आहे. आपल्याला शिक्षा होणार नाही असे तुम्हाला वाटण्याचा संभव आहे. पण तुम्ही चुकता आहात. तुम्हाला शिक्षा होईलच. मी पृथ्वीवरील सर्व माणसांना मारण्यासाठी तलवारीला साद घालीत आहे.’” हा परमेश्वराचा संदेश आहे.
30 “यिर्मया, तू त्यांना पुढील संदेश दे:
‘परमेश्वर वरुन गर्जना करीत.
आहे तो त्याच्या पवित्र मंदिरातून गर्जना करीत आहे.
तो त्याच्या कुरणाला (लोकांना) ओरडतो.
द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, त्याप्रमाणे देवाच्या आरोळ्या मोठ्या आहेत.
31 तो आवाज पृथ्वीवरील सर्व लोकांपर्यंत पसरतो.
हा सगळा गोंगाट कशासाठी आहे?
परमेश्वर सर्व राष्ट्रांतील लोकांना शिक्षा करीत आहे.
परमेश्वराने लोकांच्याविरुद्ध आपले म्हणणे मांडले.
त्यांने लोकांचा न्यायनिवाडा केला.
आणि तो आता तलवारीने दुष्ट लोकांना ठार मारीत आहे.’”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
32 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“अरिष्ट एका देशातून
दुसऱ्या देशात लवकरच पसरेल.
तो पृथ्वीवरच्या अती दूरच्या
ठिकाणाहून वादळाप्रमाणे येईल.”
33 त्या लोकांची प्रेते पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहोचतील. त्यांच्यासाठी कोणीही रडणार नाही. कोणीही ती गोळा करुन पुरणार नाही. शेणाप्रमाणे ती जमिनीवर पडतील.
34 मेंढपाळांनो (नेत्यांनो) तुम्ही मेंढ्यांना (लोकांना) वळवावे.
प्रमुख नेत्यांनो, रडायला सुरवात करा.
मेंढ्यांच्या (लोकांच्या) नेत्यांनो, जमिनीवर दु:खाने लोळा.
का? कारण ही तुमच्या कत्तलीची वेळ आहे.
परमेश्वर तुम्हाला मोडील आणि सगळीकडे पसरवील.
तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पसराल.
35 मेंढपाळांना लपायला कोठेही जागा राहणार नाही.
ते नेते पळून जाऊ शकणार नाहीत.
36 मग मेंढपाळांच्या (नेत्यांचा) आरोळ्या ऐकू येतात.
त्यांचे रडणे ऐकून परमेश्वर
त्यांची कुरणें (देश) नष्ट करीत आहे.
37 त्या शांत कुरणांचा (जागांचा) नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवटे होतील.
परमेश्वर रागावल्याने असे घडले.
38 परमेश्वर गुहेत राहाणाऱ्या भयंकर सिंहाप्रमाणे आहे.
परमेश्वर रागावला आहे
आणि त्याचा क्रोध त्या लोकांना इजा करील.
त्यांचा देश ओसाड वाळवंट होईल.
येशू यरूशलेमेत राजासारखा प्रवेश करतो(A)
11 जेव्हा ते यरूशलेमजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठविले की, 2 “तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा. 3 आणि जर कोणी तुम्हांला विचारले, ‘तुम्ही हे का नेत आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
4 मग ते गेले आणि त्यांना रस्त्यावर, दाराजवळ एक शिंगरू बांधलेले दिसले. मग त्यांनी ते सोडले. 5 तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणाले, “हे शिंगरू सोडुन तुम्ही काय करीत आहात?” 6 त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरू नेऊ दिले.
7 त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. 8 पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. 9 पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले,
“‘होसान्ना’,
‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!’ (B)
10 “आमचा पूर्वज दावीद याचे
येणारे राज्य धन्यवादित असो!
स्वर्गात होसान्ना!”
11 नंतर येशूने यरूशलेमात प्रवेश केल्यावर तो मंदिरात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो बेथानीस गेला व शिष्यांना आपल्याबरोबर नेले.
येशू म्हणाला अंजिराचा झाड़ मरेल(C)
12 दुसऱ्या दिवशी ते बेथानी सोडून जात असताना येशूला भूक लागली. 13 त्याने दूर असलेल्या व पानांनी भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही. कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. 14 नंतर तो त्याला म्हणाला, “यापूढे तुझे फळ कोणीही कधीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
येशू मंदिरात जातो(D)
15 नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली. 16 येशूने मंदिरातून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही. 17 मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनामंदिर म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे.” [a]
18 मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला भीत होते. 19 त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
येशू विश्वासाचे सामर्थ्य दाखवितो(E)
20 सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. 21 पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
22 येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. 23 मी तुम्हांस खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात शंका न धरता, त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरील तर त्याच्यासाठी तसेच घडेल. 24 या कारणास्तव मी तुम्हांस सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हांला मिळेल. 25 जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. 26 परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी संशय घेतात(F)
27 ते परत यरूशलेमेस आले. आणि येशू मंदिरात फिरत असता मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले. 28 आणि त्याला म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणांस कोणी दिला?”
29 येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांस सांगेन. 30 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
31 त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही? 32 परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
33 मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही.”
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हांला सांगत नाही.”
2006 by World Bible Translation Center