Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 11:12-40

अम्मोनी राजाला इफ्ताहचा संदेश

12 इफ्ताहने अम्मोनी लोकांच्या राजाकडे दूतानकरवी संदेश पाठवला तो असा: “अम्मोनी लोक आणि इस्राएल लोक यांच्यामध्ये कोणताही तंटा बखेडा नसताना तू आमच्यावर चढाई का करतोस?”

13 त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले. “इस्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. आर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लढत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.”

14 हा निरोप दूतांनी इफ्ताहाकडे येऊन सांगितला. [a] तो ऐकल्यावर इफ्ताहने पुन्हा अम्मोनी राजाला संदेश पाठवला. 15 संदेश असा होता:

“इफ्ताहचे म्हणणे असे. मवाब किंवा अम्मोनी लोकांची भूमी लोकांनी बळकावलेली नाही. 16 मिसरमधून बाहेर पडल्यावर इस्राएल लोक प्रथम वाळवंटात गेले तेथून ते लाल समुद्राकडे गेले त्यानंतर ते कादेश येथे आले. 17 त्यानी अदोमच्या राजाकडे संदेश पाठवला. संदेश घेऊन जाणाऱ्या दूतांनी त्या देशामधून जाऊ देण्याची राजाला विनंती केली. पण अदोमच्या राजाने ती मानली नाही. तेव्हा असाच संदेश आम्ही मवाबच्या राजालाही पाठवला. त्यानेही ते झिडकारले. तेव्हा इस्राएल लोक कादेश येथे राहिले.

18 “अदोम आणि मवाब या देशांना वळसा घालून इस्राएल लोक वाळवंटामधून गेले. मवाबच्या पूर्वेकडे त्यांनी अर्णोन नदीच्या पलीकडच्या तीरावर तळ ठोकला. त्यांनी मवाबची सीमा ओलांडली नाही. (अर्णोन नदी हीच मवाबची सीमा.)

19 “नंतर इस्राएल लोकांनी अमोऱ्यांवा राजा सीहोन याच्याकडे दूत पाठवले. सीहोन हा हेशबोनचा राजा. दूत सीहोनला म्हणाले, ‘आम्हा इस्राएल लोकांना तुझ्या भूमीतून जाऊ दे आम्हाला आमच्या प्रदेशात पोहोंचायचे आहे.’ 20 पण अमोऱ्यांचा राजा सीहोन इस्राएल लोकांना आपल्या हद्दीतून जाऊ देईना. उलट त्याने आपले सैन्य गोळा केले आणि याहस येथे तळ दिला. इस्राएल लोकांशी अमोऱ्यांनी युध्द केले. 21 यावेळी इस्राएलच्या परमेश्वर देवाने सीहोन आणि त्याचे सैन्य यांचा पराभव करायला इस्राएल लोकांना मदत केली. त्यांमुळे अमोऱ्यांची भूमी ही इस्राएल लोकांची मालमत्ता बनली. 22 अर्णोन नदीपासून याब्बोक नदीपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देन नदीपर्यंत अमोऱ्यांचा सर्व प्रदेश इस्राएल लोकांच्या ताब्यात आला.

23 “इस्राएलच्या परमेश्वर देवाने अमोऱ्यांना आपला प्रदेश सोडून द्यायला भाग पाडले आणि तो प्रदेश इस्राएल लोकांना दिला. आता इस्राएल लोकांना तो प्रदेश सोडायला लावणे तुला जमेल असे तुला वाटते? 24 कमोश या तुमच्या देवाने दिलेल्या भूमीत तुम्ही खुशाल राहू शकता. म्हणजे आमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत आम्ही राहू. 25 मवाबचा राजा सिप्पोर पुत्र बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इस्राएल लोकांशी युध्द करायला सरसावला का? 26 हेशबोन शहरआणि त्याच्या आसपासची गावे यात इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे राहात आहेत. अरोएर आणि त्याच्या भोवतालची गावे, अर्णोन नदीच्या काठावरची गावे या सर्व ठिकाणी इस्राएल लोक गेली तीनशे वर्षे आहेत. त्या काळात तुम्ही कधी ती परत मिळवायचा प्रयत्न का केला नाहीत? 27 इस्राएल लोकांनी तुमचे कधी वाकडे केले नाही पण तुम्ही मात्र त्यांच्यावर अन्याय करत आहात. आता, इस्राएल लोकांची बाजू न्यायाची आहे की अम्मोनी लोकांची याचा निर्णय खुद्द तो न्यायाधीश परमेश्वरच करो!”

28 पण इफ्ताहच्या या संदेशाकडे अम्मोनी लोकांच्या राजाने सरळसरळ दुर्लक्ष केले.

इफ्ताहचे नवस

29 मग परमेश्वराचा आत्मा इफ्ताहमध्ये संचारला. इफ्ताह गिलाद आणि मनश्शे यांच्या प्रदेशातून गिलादमधील मिस्पा नगरात आला. तेथून तो अम्मोनी लोकांच्या प्रदेशात घुसला.

30 इफ्ताह परमेश्वराला नवस बोलला तो म्हणाला, “तू जर मला अम्मोन्यांचा पराभव करु दिलास तर, 31 विजयी झाल्यावर मी परत येईन तेव्हा माझ्या घरातून जो कोणी मला सामोरा येईल त्याला मी तुला होमबली म्हणून अर्पण करीन”

32 मग इफ्ताहने अम्मोन्यांवर हल्ला चढवला. त्यांचा पराभव करण्यात त्याला परमेश्वराचे साहाय्य झाले. 33 अरोएर नगरापासून मिन्नीथ नगरापर्यंत वीस नगरे त्याने काबीज केली. आबेल करामीम येथपर्यंत त्याने अम्मोन्यांचा बीमोड केला. इस्राएल लोकांनी अम्मोन्यांचा पराभव केला. अम्मोन्यांचा हा पराभव प्रचंड होता.

34 इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूलबाळ नव्हते. 35 तिलाच प्रथम आलेली पाहताच दु:खावेगाने तो अंगावरची वस्त्रे फाडू लागला. तो म्हणाला, “मुली, सत्यानाश झाला. मला तू दु:खाच्या खाईत लोटले आहेस. मी तर परमेश्वराला नवस बोललो आहे आणि मला आता माझा शब्द फिरवता येणार नाही.”

36 तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबा, तुम्ही नवस बोलला आहात तर तो फेडायलाच हवा. कबूल केलेत त्याप्रमाणे आता वागा. परमेश्वराने ही अम्मोन्यांचा पराभव करायला तुम्हाला साहाय्य केलेच की नाही?”

37 पुढे ती आपल्या वडीलांना म्हणाली, “पण माझ्यासाठी एक करा. दोन महिने मला एकटीला राहू द्या. डोंगरांमध्ये मी राहीन. आता माझे लग्न होणार नाही की मला मुलेबाळे होणार नाहीत. तेव्हा मला आणि माझ्या सख्यांना गव्व्यात गळे घालून शोक करू द्या.”

38 इफ्ताह म्हणाला, “खुशाल तसे कर” त्याने दोन महिन्यांसाठी तिची रवानगी केली. ती आणि तिच्या मैत्रिणी डोंगरांमध्ये राहिल्या. कुमारिका म्हणूनच तिला मरण येणार म्हणून त्यांनी शोक केला.

39 दोन माहिने असे गेल्यावर ती आपल्या बापाकडे परत आली. इफ्ताहने परमेश्वराला नवस बोलल्याप्रमाणे सर्व काही केले. इफ्ताहची मुलगी कुमारिकाच राहिली. तेव्हा इस्राएलामध्ये एक प्रथा पडून गेली. 40 गिलादमधील इफ्ताहच्या मुलीचे सर्व इस्राएल स्त्रिया स्मरण ठेवतात दरवर्षी चार दिवस त्या तिच्या प्रीत्यर्थ शोक करतात.

प्रेषितांचीं कृत्यें 15

यरुशलेम येथील सभा

15 मग काही माणसे यहूदीया प्रांतातून अंत्युखियास आली. ती बंधुजनांना (यहूदीतर) शिक्षण देऊ लागली: “तुमची सुंता झालेली नसेल तर तुमचे तारण होणार नाही. मोशेने आम्हांला हे करायला शिकविले.” पौल व बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने व बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा व इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित व वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.

मंडळीने त्यांना प्रवासास जाण्यासाठी मदत केली. हे लोक फेनीके व शोमरोन प्रांतातून जात असता यहूदीतर विदेशी लोक देवाकडे कसे वळले, याविषयी सविस्तर हकीगत त्यांनी तेथील बंधुवर्गाला सांगितली. त्यामुळे ते फार आनंदित झाले. ते जेव्हा यरुशलेमला पोहोंचले तेव्हा तेथील ख्रिस्ती मंडळी, प्रेषित आणि वडीलजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पौल व बर्णबा यांनी आपल्या हातून देवाने जे काम करुन घेतले त्याविषयी सविस्तर सांगितले. परुशी गटातील काही विश्वासणारे उभे राहीले आणि म्हणाले, “यहूदीतर विश्वासणाऱ्यांची सुंता झालीच पाहिजे. तसेच आपण त्यांना मोशेचे नियम पाळण्याविषयी शिकविले पाहिजे!”

मग प्रेषित आणि वडीलजन या समस्येचा अभ्यास करण्यासाठी एकत्र जमले. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. मग पेत्र उभा राहिला. आणि त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूनो मला माहीत आहे, सुरुवातीला जे काही घडले, ते तुमच्या आठवणीत आहे. जे यहूदी नाहीत, त्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी तुमच्यामधून देवाने माझी निवड केली. यासाठी की, त्यांनीही विश्वास धरावा. देव सर्वांचे विचार जाणतो, आणि त्याने या यहूदीतर लोकांचा स्वीकार केला आहे. देवाने जसा आम्हांला पवित्र आत्मा दिला, तसाच त्यांनाही देऊन त्याने हे आम्हांस दाखवूत दिले. देवाच्या दृष्टीने ते लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला, तेव्हा त्याने त्यांची ह्रदये शुद्ध केली. 10 मग आता यहूदीतर लोकांच्या मानेवर जड जू तुम्ही का ठेवीत आहात? तुम्ही देवाला राग आणीत आहात काय? आपण व आपले वाडवडील (पूर्वज) हे ओझे वाहण्याइतके सशक्त नव्हतो. 11 आम्ही असा विश्वास धरतो की, आम्ही आणि हे लोक प्रभु येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.”

12 मग सगळे लोक शांत झाले, ते पौल व बर्णबाचे बोलणे ऐकू लागले. पौलाने व बर्णबाने लोकांना सांगितले की, देवाने त्यांच्याद्वारे यहूदीतर लोकांमध्ये चमत्कार व अदभूत कृत्ये केली. 13 पौलाने व बर्णबाने आपले बोलणे संपविले. मग याकोब बोलला. तो म्हणाला, “माझ्या बंधूनो, माझे ऐका. 14 शिमोन (पेत्र) याने यहूदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहूदीतर लोकांना स्वीकारले. आणि त्यांना आपले लोक बनविले. 15 संदेष्टेयांच्या शब्दांनी सुद्धा याला सहमती दर्शविली:

16 ‘मी (देव) यानंतर परत येईन
    मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन
    ते पडलेले आहे
त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन
    मी त्याचे घर नवे करीन
17 मग इतर सर्व लोक देवाचा शोध करतील
    सर्व यहूदीतर लोकसुद्धा माझे लोक आहेत असे मी मानतो.
प्रभु (देव) असे म्हणाला,
    व हे करणारा तोच आहे.’ (A)

18 ‘या सर्व गोष्टी सुरुवातीपासूनच माहीत आहेत.’

19 “म्हणून मला वाटते जे यहूदीतर बंधु देवाकडे वळले आहेत, त्याना आपण तसदी देऊ नये. 20 त्याऐवजी आपण त्यांना एक पत्र लिहू या. आपण त्यांना या गोष्टी सांगू:

मूर्तिपुढे ठेवलेले अन्न खाऊ नका.

    (त्यामुळे अन्न अशुद्ध होते)

कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.

रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.

21 त्यांनी या गोष्टी करु नयेत, कारण अजूनसुद्धा प्रत्येक शहारात यहूदी लोक आहेत जे मोशेचे नियम शिकवितात. बऱ्याच वर्षांपासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानातून मोशेचे नियम वाचण्यात येतात.”

यहूदीतर विश्वासणाऱ्यांना पत्र

22 प्रेषितांना, वडीलजनांना व सगळ्या मंडळीला वाटत होते की, पौल व बर्णबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंत्युखियाला पाठवावीत, मंडळीने त्यांचे स्वतःजे काही लोक निवडलले. 23 त्यांनी यहूदा (बर्सब्बा) आणि सीला यांना निवडले. यरुशलेमधील बंधुवर्गामध्ये या माणसांचा आदर केला जात असे. मंडळीने या लोकांबरोबर हे पत्र पाठविले. पत्रात असे लिहिले होते की,

प्रेषित, वडीलजन आणि तुमचे बंधुजन

यांजकडून अंत्युखिया शहरातील तसेच सीरीया व किलकिया देशातील सर्व यहूदी नसलेल्या बांधवांस:

प्रिय बंधूनो,

24 आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला व तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही! 25 आम्ही सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शविली की, काही लेकांची निवड करुन त्यांना तुमच्याकडे पाठवावे. आमचे प्रिय मित्र पौल व बर्णबा यांच्यासह ते असतील. 26 बर्णबा व पौल यांनी आपल्या प्रभु येशू रिव्रस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन दिले आहे. 27 म्हणून आम्ही यहूदा व सीला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हांला त्याच गोष्टी सांगतील. 28 पवित्र आत्म्याला असे वाटते की, तुमच्यावर आता आधिक ओझे असू नये. आणि आम्हांला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यातः

29 कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका

रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.

कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.

जर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहाल, तर तुम्ही चांगले कराल

आता आम्ही तुमचा निरोप घेतो कळावे.

30 मग पौल, बर्णबा, यहूदा व सीला यांनी यरुशलेम सोडले. ते अंत्युखियास गेले. अंत्युखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले. आणि त्यांना ते पत्र दिले. 31 जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले. ते आनंदित झाले. पत्राने त्यांचे समाधात झाले. 32 यहूदा व सीला हेसुद्धा संदेष्टे होते. त्यांनी विश्वासणाऱ्या बंधूंना विश्वासात भक्कम करण्यासाठी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. 33 यहूदा व सीला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूंकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला, ज्या यरुशलेममधील बंधूनी यहूदा व सीला यांना पाठवले होते, त्यांच्याकडे ते परत गेले. 34 [a]

35 पण पौल व बर्णबा अंत्युखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला.

पौल व बर्णबा वेगळे होतात

36 काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”

37 बर्णबाला त्याच्यासोबत योहान (मार्क) यालाही घ्यायचे होते. 38 पण ज्याने पंफुलिया येथे त्याची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही, त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते 39 पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.

40 पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंत्युखियातील बांधवांनी, पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. 41 पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.

यिर्मया 24

चांगली अंजिरे आणि वाईट अंजिरे

24 परमेश्वराने मला पुढील गोष्टींचा दृष्टांन्त दिला: परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यकोन्याला कैद करुन नेले, त्यांनंतर हा दृष्टांन्त झाला. यकोन्या हा यहोयाकीम राजाचा मुलगा होता. यकोन्या आणि त्याचे महत्वाचे अधिकारी ह्यांना यरुशलेममधून दूर नेले गेले. त्यांना बाबेलला नेले गेले. नबुखद्नेस्सरने यहूदातील सर्व सुतार व लोहार यांनाही नेले.) एका टोपलीत खूप चांगली अंजिरे होती. ती मोसमाच्या सुरवातीला पिकलेल्या अंजिरासारखी होती. पण दुसऱ्या टोपलीत नासकी अंजिरे होती. ती खाण्यालायक नव्हती.

परमेश्वराने मला विचारले, “यिर्मया, तू काय पाहिलेस?”

मी म्हणालो, “मी अंजिरे पाहिली. चांगली अंजिरे फारच उत्तम आहेत. पण वाईट अंजिरे फारच नासकी आहेत. ती खाण्यासारखी नाहीत.”

नंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणाला, “यहूदातील लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेले गेले आहे. त्यांच्या शत्रूने त्यांना बाबेलला नेले. ते लोक ह्या चांगल्या अंजिरासारखे आहेत. मी त्यांच्यावर दया करीन. मी त्यांचे रक्षण करीन. मी त्यांना यहूदाला परत आणीन. मी त्यांचा नाश होऊ देणार नाही मी त्यांना परत उभे करीन. मी नुसतेच त्यांना वर काढणार नाही, तर त्यांना रुजवीन म्हणजे ते वाढू शकतील. मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन. मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन. बाबेलमधील हे सर्व कैदी अंतःकरणापासून माझ्याकडे परत आले आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन.

“पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील. मी त्यांना शिक्षा करीन. त्या शिक्षेने पृथ्वीवरील सर्व लोकांना धक्का बसेल. यहूदातील ह्या लोकांची इतर लोक चेष्टा करतील लोक एकमेकांना त्यांच्याबद्दलचे विनोदी किस्से सांगतील. मी त्यांना जेथे जेथे पाठवीन, तेथे तेथे लोक त्यांना शाप देतील. 10 मी त्यांच्यावर लढाई, उपासमार आणि रोगराई ह्या आपत्ती पाठवीन. ते सर्व ठार होईपर्यंत मी त्यांच्यावर हल्ला करीन. मग मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत.”

मार्क 10

येशू घटस्फोटाविषयी शिकवितो(A)

10 नंतर येशूने ती जागा सोडली आणि यहूदीया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला. लोक पुन्हा गटागटाने त्याच्याकडे आले. आणि जसा त्याचा परिपाठ होता तसे त्याने त्यांना शिकविले.

काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.

येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?”

ते म्हणाले, “मोशेने पुरूषाला सुटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे.”

येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण केले. [a] या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. [b] म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये.”

10 नंतर, येशू व शिष्य घरात असता शिष्यांनी या गोष्टीविषयी त्याला विचारले, 11 येशू त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. 12 आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”

येशू मुलांचा स्वीकार करतो(B)

13 त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले 14 येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. 15 मी तुम्हांस खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.” 16 तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि आशिर्वाद दिला.

श्रीमंत मनुष्य अनुसरण्याचे नाकारतो(C)

17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

18 येशू त्याला म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? एका देवाशिवाय कोणी उत्तम नाही. 19 तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरूणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.”

21 येशूने त्याच्याकडे पाहिले त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे सर्व आहे ते वीक. नंतर ते गोरगरिबांस वाटून टाक, स्वर्गात तूला संपत्ती प्राप्त होईल. तर मग चल आणि माझ्या मागे ये.”

22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ति होती.

23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याचा देवाच्या राज्यात (श्रीमंतांचा) प्रवेश होणे किती कठीण आहे.”

24 त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतू येशू त्यास म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उटांला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.”

26 ते यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”

27 त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला अशक्य नाही. कारण सर्व गोष्टी देवाला शक्य आहेत.”

28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत.”

29 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो की, ज्या कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले किंवा शेतीवाडी सोडली, त्याचा छळ झाला तरी 30 त्याला शंभरपटीने फायदा मिळेल आणि येणाऱ्या युगात त्याला अनंतकाळचे जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. 31 परंतु ज्यांना सध्या मोठे स्थान आहे भविष्यात त्यांना खालचे स्थान मिळेल व ज्यांना खालचे स्थान आहे त्यांना मोठे स्थान मिळेल.”

येशू पुन्हा आपल्या मरणाविषयी सांगतो(D)

32 ते वर यरूशलेमेच्या रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. 33 “ऐका! आपण वर येरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला यहूदीतर लोकांच्या हाती देतील. 34 ते त्याची थटृटा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”

याकोब व योहान येशूला मदतीसाठी विचारतात(E)

35 याकोब व योहान हे जब्दीचे मुलगे त्याच्याकडे आले. आणि त्याला म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणांजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.”

36 येशू त्यांना म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

37 ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.”

38 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात हे तुम्हांस कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याने घेणे शक्य आहे काय?”

39 ते त्याला म्हणाले, “आम्हांस शक्य आहे.”

मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, 40 परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत, त्यांच्यासाठीच त्या राखून ठेवल्या आहेत.”

41 दहा शिष्यांनी या विनंतिविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. 42 येशूने त्यांना जवळ बोलाविले आणि म्हटले, “तुम्हांस माहीत आहे की, परराष्ट्रीयांची जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवितात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवितात. 43 परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 44 आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. 45 कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे. व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”

येशू आंधळ्याला बरे करतो(F)

46 मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. 47 जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.”

48 तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”

49 मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा.”

तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.” 50 त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला.

51 येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”

आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, “गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”

52 मग येशू त्याला म्हणाला, “जा! तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस.” लगेच तो पाहू शकला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center