M’Cheyne Bible Reading Plan
8 एफ्राईम लोक गिदोनवर चिडले होते. त्यामुळे गिदोनला भेटले तेव्हा त्यांनी विचारले, “तू मिद्यान्यांवर चढाई केलीस तेव्हा आम्हाला का बोलावले नाहीस? आम्हाला तू् अशी वागणूक का दिलीस?”
2 गिदोनने तेव्हा एफ्राईम लोकांना सांगितले, “माझे तुमच्या इतके चांगले चाललेले नाही. आमच्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त पीक घेता. आम्ही अबियेजर जितकी द्राक्षे काढतो त्यापेक्षा जास्त द्राक्षे तर तुम्ही तशीच मव्व्यात पडू देता. हे खरे नाही काय? 3 याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. ओरेब जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्याच्याशी मी माझ्या यशाची तुलना कशी करु?” गिदोनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला.
गिदोन मिद्यानचे दोन राजे कैद करतो
4 मग गिदोन आपल्या तीनशे माणसांसह यार्देन नदी उतरुन पलीकडे गेला. पाठलाग करताना ते सर्व थकलेले आणि भुकेलेले होते. 5 गिदोन सुक्कोथ नगरातील लोकांना म्हणाला, “माझे सैनिक फार थकले आहेत. त्यांना काहीतरी खायला द्या अजूनही आम्हाला जेबह आणि सलमुन्ना या मिद्यानी राजांचा पाठलाग करायचा आहे.”
6 तेव्हा सुक्कोथ येथील अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना खायला का द्यावे? अजून तर तुम्ही त्या दोन राजांना पकडलेलेही नाही.”
7 त्यावर गिदोन म्हणाला, “तुम्ही आम्हाला अन्न देत नाही तर जेबह आणि सलमुन्ना यांना ताब्यात घ्यायला परमेश्वरच आमच्या मदतीला येईल. मग मी परत इथे येईन. तेव्हा वाळवंटातील काटेरी झुडुपांनी मी तुमची चामडी लोळवीन.”
8 गिदोन मग सुक्कोथहून पनुएल शहराकडे निघाला. तेथील लोकांकडेही त्याने अन्नाची मागणी केली. पण पनुएल येथील लोकांनीही सुक्कोथ येथील लोकांनी दिले तसेच उत्तर दिले. 9 तेव्हा गिदोन त्या लोकांना म्हणाला, “विजयी होऊन परत आल्यावर मी येथील मनोरा उध्वस्त करीन.”
10 जेबह, सलमुन्ना आणि त्यांचे सैन्य कर्कोर नगरात होते. त्यांच्या सैन्यात पंधरा हजार माणसे होती. पूर्वेकडच्या लोकांमधून जगले वाचले ते एवढेच त्यांचे एक लाख वीस हजार शूर योध्दे मारले गेले. 11 मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले व त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता. 12 मिद्यान्यांचे राजे जेबह व सलमुन्ना पळून गेले. गिदोनने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. शत्रूसैन्याचा गिदोनच्या सैन्याने पाडाव केला.
13 त्यानंतर हेरेसच्या घाटातून योवाशपुत्र गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सैन्य परत फिरले. 14 गिदोनने सुक्कोथमधील एका तरुणाला पकडले आणि त्याला काही प्रश्न विचारले. त्या तरुणाने सुक्कोथ नगरातील अधिकारी आणि वडीलधारी अशा सत्याहत्तर जणांची नावे गिदोनला लिहून दिली.
15 त्यानंतर गिदोन सुक्कोथला आला. नगरवासीयांना तो म्हणाला, “हे पाहा जेबह आणि सलमुन्ना. ‘तुझ्या दमलेल्या सैनिकांना आम्ही अन्न का द्यावे? तुम्ही अजून जेबह आणि सलमुन्ना यांना कुठे पकडले आहे?’ असे म्हणून माझी चेष्टा करत होतात नाही का?” 16 नंतर गिदोनने शहरातील वडीलधाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी वाळवंटातील काटेरी झुडुपांनी फोडून काढले. 17 पनुएल मधील मनोऱ्याचीही त्याने मोडतोड केली. नंतर नगरात राहणाऱ्या लोकांना ठार केले.
18 मग गिदोन, जेवह आणि सलमुन्ना यांना म्हणाला, “तुम्ही ताबोर डोंगरावर काही माणसे मारलीत. ती दिसायला कशी होती?”
जेबह आणि सलमुन्ना म्हणाले, “ती तुझ्याप्रमाणेच चांगली राजबिंडी दिसत होती.”
19 गिदोन म्हणाला, “ती माझी भावंडे होती. माझ्या आईची पोटची मुले. परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना मारले नसते तर मीही आता तुम्हाला मारले नसते”
20 मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.
21 तेव्हा ते राजे गिदोनला म्हणाले, “चल पुढे हो आणि तूच आमच्यावर प्रहार कर. तु पुरुष आहेस. तूच हे कृत्य करु शकशील.” तेव्हा गिदोनने त्यांना ठार केले. त्यांच्या उंटांच्या गव्व्यातील चंद्रकोरीच्या आकाराचे दागिने त्याने काढून घेतले.
गिदोन एफोद करतो
22 मग इस्राएल लोक गिदोनला म्हणाले, “तू आम्हाला मिद्यानी लोकांच्या तावडीतून सोडवले आहेस तेव्हा आता तू आमच्यावर राज्य कर. तू तुझा मुलगा, तुझा नातू यांनीही आमच्यावर राज्य करावे.”
23 पण गिदोन त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वरच सत्ताधीश आहे. मी किंवा माझा मुलगा तुमच्यावर राज्य करणार नाही.”
24 इस्राएल लोकांनी ज्या अनेकांचा पराभव केला त्यात इश्माएलीही होते. हे इश्माएली पुरुष सोन्याची कुंडले घालत. गिदोन इश्माएलींना म्हणाला, “तुम्ही जी लूट मिळवली आहे त्यातून तुमच्यापैकी प्रत्येकाने मला अशी सोन्याची कुंडले करुन द्या.”
25 त्याला इस्राएल लोक आनंदाने कबूल झाले त्यांनी जमिनीवर एक अंगरखा पसरला. त्यावर प्रत्येकाने कुंडले टाकले. 26 नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौंड भरले. इस्राएल लोकांनी गिदोनला दिलेल्या इतर भेटवस्तू वेगळ्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे मिद्यानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे,उंटांच्या गळ्यातील साखळ्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या.
27 या सोन्यातून गिदोनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इस्राएल लोक त्याची पूजा करु लागले. परमेश्वरावरची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदोन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्व्याप्रमाणे ठरुन त्यांना पापाचरणासाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला.
गिदोनचा मृत्यू
28 मिद्यान अशाप्रकारे इस्राएलांचा अंकित झाला. त्यांनी पुन्हा डोके वर काढले नाही. गिदोन जिवंत असेपर्यंत, पुढे चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदत होती.
29 योवाशपुत्र यरुब्बाल गिदोन आपल्या घरी परतला. 30 त्याला सत्तर मुलगे होते. कारण त्याला अनेक बायका होत्या. 31 शखेम शहरात त्याला एक उपपत्नी होती. तिच्यापासून त्याला अबीमलेख नावाचा मुलगा झाला.
32 पुढे गिदोन बराच वृध्द होऊन मरण पावला. योवाशच्या कबरीत त्याला पुरण्यात आले. अबियेजर लोक राहतात त्या अफ्रा या गावात ही कबर आहे. 33 गिदोनच्या मृत्यूनंतर लगेचच इस्राएल लोक पुन्हा बआलच्या मागे लागले त्यांनी बआल-बरीथ याला परमेश्वर मानले. 34 भोवतालच्या सर्व शत्रूपासून परमेश्वराने त्यांना वाचवले असले तरी देखील इस्राएल लोकांना आपल्या परमेश्वराचा विसर पडला. 35 यरुब्बाल (गिदोन) याने त्यांच्यासाठी इतके केले तरीसुध्दा त्याच्या कुटुंबीयांशी इस्राएल लोक एकनिष्ठ राहिले नाहीत.
हेरोद अग्रिप्पा ख्रिस्ती मंडळीला दुखावतो
12 त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणऱ्यांचा छळ करु लागला. 2 हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली, याकोब हा योहानाचा भाऊ होता. 3 हेरोदाने पाहिले की, यहूदी लोकांना हे आवडले आहे. म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरविले. (हे वल्हांडण सणाच्या काळात घडले.) 4 हेरोदाने पेत्राला अटक करुन तुरुंगात टाकले. सोळा शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते. हेरोदाला वल्हांडण होईपर्यंत थांबायचे होते. मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली. 5 म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.
पेत्र तुरुंग सोडतो
6 पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता. त्याला साखळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. 7 अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करुन त्याला उठविले. देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. 8 देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल.” मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये!”
9 मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की, देवदूत हे खरोखर काय करीत आहे. त्याला वाटले आपण दृष्टान्त पाहत आहोत. 10 पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोंचले. शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते. ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.
11 पेत्राला मग कळले की नेमके काय घडले. आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माइयाकडे पाठविला. व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहूदी लोकांना वाटले की, माझा छळ होईल. पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे.”
12 या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला. ती योहानाची आई होती. (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. 13 पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली. 14 तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती दार उघडण्याचेसुद्धा विसरुन गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे!” 15 विश्वासणारे रुदाला म्हणाले, “तू बावचळलीस!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिज!”
16 पण पेत्र बाहेरुन दार सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते. 17 पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला. “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा.” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.
18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. 19 हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्याला शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली.
हेरोद अग्रिप्पाचे मरण
नंतर हेरोद यहूदातून निघून गेला. तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला. 20 हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.
21 हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करु लागला. 22 लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. 23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्यांनी त्याला आतून खाल्ले आणि तो मेला.
24 देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्येत पसरत होता. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.
25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरुशलेम येथील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.
देव सिद्कीया राजाची विनंती नाकरतो
21 यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर व सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला. 2 पशहूर आणि सफन्या यिर्मयाला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. काय घडणार आहेत ते परमेश्वराला विचार. कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, म्हणून आम्हाला भविष्यात काय घडणार हे जाणून घ्यायचे आहे. कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील. कदाचित् परमेश्वर नबुखद्नेस्सरला स्वारी करण्यापासून परावृत्त करील व परतवून लावेल.”
3 नंतर पशूहर व सफन्या यांना यिर्मया म्हणाला, “सिद्कीया राजाला सांगा, 4 ‘परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन.
“‘बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन. 5 मी स्वतः यहूदाच्या लोकांविरुद्ध म्हणजे तुमच्याविरुद्ध लढेन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने तुमच्याशी युद्ध करीन. कारण मी तुमच्यावर फार रागावलो आहे. मी तुमच्याविरुद्ध जोरदार युद्ध करुन माझ्या तुमच्यावरील रागाची तीव्रता सिद्ध करीन. 6 यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांना मी ठार मारीन. सर्व शहरात रोगराई पसरवून मी माणसांना व प्राण्यांना मारीन. 7 असे घडल्यावर,’” हा परमेश्वराचा संदेश आहे, “‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवारीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’
8 “यरुशलेममधील लोकांना असेही सांग, ‘असे म्हणून परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, मी तुम्हाला जीवन मरण ह्यात निवड करण्याचे स्वातंत्र्य देईन. मी काय म्हणतो ते समजावून घ्या. 9 जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जगेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल. 10 यरुशलेम नगरीवर संकट आणण्याचे मी ठरविले आहे. मी तिला मदत करणार नाही.’” हा परमेश्वराचा संदेश आहे, मी बाबेलच्या राजाला यरुशलेम देऊन टाकीन. तो ती आगीत भस्मसात करील.
11 “यहूदाच्या राजघराण्याला हे सांगा:
‘परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका.
12 दावीदाच्या घराण्यातील लोकानो, परमेश्वर असे म्हणतो,
तुम्ही दररोज न्याय्यपणे लोकांचा निवाडा केला पाहिजे.
गुन्हेगारांपासून बळींचे रक्षण करा.
तुम्ही असे केले नाही,
तर मी खूप रागावेन.
माझा राग, कोणीही विझवू न शकणाऱ्या अग्नीप्रमाणे असेल.
तुम्ही दुष्कृत्ये केली म्हणून असे होईल.’
13 “यरुशलेम, मी तुझ्याविरुद्ध आहे.
तू डोंगराच्या शिखरावर बसतेस.
तू ह्या दरीच्यावर राणीप्रमाणे बसतेस.
तुम्ही, यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणता,
‘कोणीही आमच्यावर हल्ला करु शकणार नाही.
कोणीही आमच्या भक्कम नगरीत येणार नाही.’”
पण परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका:
14 “तुम्हाला योग्य अशी शिक्षा मिळेल.
तुमच्या रानास मी आग लावेन
ती आग तुमच्याभोवतीचे सर्व काही जाळून टाकील.”
देवाचा नियम आणि माणसांनी बनविलेले नियम(A)
7 काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेमेहून आले होते ते येशूभोवती जमले. 2 आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध (म्हणजे हात न धुता) हातांनी जेवताना पाहिले. 3 (कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.) 4 बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीति ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसऱ्या इतर रुढीही पाळतात.
5 मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या रुढी का पाळत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
6 येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो,
‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात
परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत,
7 ते व्यर्थ माझी उपासना करतात
कारण ते लोकांना शास्त्र म्हणून जे शिकवितात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ (B)
8 तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आता तुम्ही मनुष्याची शिकवण पाळता आहात.”
9 आणखीतो त्यांना म्हणाला, “आपल्या स्वतःच्या रूढी प्रस्थापित करण्यासाठी देवाच्या आज्ञा दूर करण्यात तुम्ही पटाईत आहात. 10 मोशे म्हणाला, ‘तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर.’ [a] जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्याला ठार मारलेच पाहिजे. [b] 11 परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या आईला व वडिलांना असे म्हणू शकतो की, ‘तुम्हांला मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे. परंतु तुम्हाला मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही. मी ते देवाला देईन.’ 12 तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी काही करू देत नाही. 13 तुम्ही अशा रूढी पाळण्याचे शिकवून रुढींनी देवाचे वचन रद्द करता आणि तुम्ही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करता.”
14 येशूने लोकांना आपल्याकडे पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या. 15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. ज्या कुणाला ऐकायला कान आहेत तो ऐको.” 16 [c]
17 लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्याला या दाखल्याविषयी विचारले, 18 तो त्यांना म्हणाला, “तुम्हांलादेखील हे समजत नाही काय?” जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्याला अपवित्र करीत नाही हे तुम्हांला समजत नाही का? 19 कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते. नंतर ते शरीराबाहेर जाते. असे सांगून सर्व अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
20 आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या आतून बाहेर पडते ते माणसाला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. 21 जारकर्म, चोरी, खून, 22 व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, 23 या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि माणसाला अपवित्र करतात.”
यहूदी नसलेल्या स्त्रीला येशू मदत करतो(C)
24 येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांताच्या आसपासच्या प्रदेशात गेला. तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू तेथे आहे. तिच्या मुलीला अशुद्ध आत्मा लागलेला होता. 25 ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली. 26 ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.
27 येशू तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.”
28 परंतु ती त्याला म्हणाली, “प्रभु, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
29 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
30 मग ती घरी आली तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
येशू एका बहिऱ्या मनुष्याला बरे करतो
31 येशू सोर भोवतलच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलिसच्या वाटेने गालील समुद्राकडे आला. 32 तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंति केली.
33 येशूने त्याला लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली. नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला. 34 त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला व म्हणाला, “एफ्फात्था” म्हणजे मोकळा हो. 35 आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले. त्याला बोलता येऊ लागले. त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली.
36 येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला, (पण लोक त्याविषयी अधिकाअधिक सांगत गेले.) 37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”
2006 by World Bible Translation Center