Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 7

यरूब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लवकर उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नावाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोऱ्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते.

तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “माझ्या मदतीने तुम्ही मिद्यानी लोकांचा पराभव करु शकाल पण तुझ्या सैन्यात जरुरीपेक्षा जास्त माणसे आहेत उद्या कदाचित हे इस्राएल लोक मला विसरतील आणि आमचे रक्षण आम्ही स्वतःच केले अशी प्रौढी मिरवतील. तेव्हा आता एक गोष्ट जाहीर कर. त्यांना सांग, ‘कोणी लढाईला घाबरत असेल तर त्याने आत्ताच गिलाद डोंगर सोडून घरी परत जावे.’”

त्यावेळी बावीस हजार माणसे गिदोनला सोडून गेली. तरी दहा हजार राहिली.

तेव्हा परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही देखील फार आहेत. त्यांना घेऊन खाली झऱ्याशी जा मी त्यांची परीक्षा पाहतो. ‘याने तुझ्या बरोबर यावे’ असे मी म्हणीन त्याच माणसाने तुझ्याबरोबर जावे. ‘ज्याने जाऊ नये’ असे सांगीन तो तुझ्याबरोबर येणार नाही.”

तेव्हा गिदोन त्या लोकांना झऱ्यापाशी घेऊन आला. तेथे गिदोनला परमेश्वर म्हणाला, “आता या लोकांची मी सांगतो त्याप्रमाणे विभागणी कर. जे कुत्र्याप्रमाणे जिभेने लपलप करत पाणी पितील त्यांचा एक गट कर. जे गुडघे टेकून वाकून पाणी पितील त्यांना दुसऱ्या गटात टाक.”

पाण्याची ओंजळ तोंडाशी नेऊन कुत्र्याप्रमाणे लपक लपक करीत पिणारे तीनशेजण निघाले बाकी सर्व वाकून पाणी प्यायले परमेश्वर गिदोनला म्हणाला, “ही तीनशे माणसे मी निवडतो मिद्यानींच्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी जे लपक लपक करत पाणी प्यायले त्यांचा मी उपयोग करुन घेईन मी त्यांच्या मार्फत इस्राएल लोकांचा बचाव करीन. इतरांना परत जाऊ दे.”

तेव्हा गिदोनने बाकीच्यांना परत पाठवून तीनशे जणांना आपल्या बरोबर राहू दिले. जे परत गेले त्यांची शस्त्रसामुग्री आणि रणवाद्ये तीनशे जणांनी ठेवून घेतली.

गिदोनच्या तळाच्या खालच्या खोऱ्यातच मिद्यानी लोकांचा तळ होता. रात्री परमेश्वर गिदोनशी बोलला तो म्हणाला “ऊठ मिद्यानी सैन्य मी आत्ताच तुझ्या हाती सोपवतो. त्यांच्या तळावर जा. 10 तुला एकट्याला भीती वाटत असली तर तुझा सेवक पुरा याला बरोबर घेऊन जा. 11 तेथे जाऊन ते लोक काय बोलतात ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे मग तुला त्यांच्यावर हल्ला चढवायला भीती वाटणार नाही.”

तेव्हा गिदोन आपल्या पुरा या सेवकासह शत्रूच्या शिबिराच्या कडेशी गेला. 12 मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडील सर्व लोक त्या खोऱ्यात होते. त्यांचा जमाव टोळ धाडीसारखा दिसत होता. किनाऱ्यावरील वाळुकणांइतके असंख्य उंट त्यांच्याबरोबर होते.

13 शत्रूतळाशी येताच गिदोनला एकाचे बोलणे ऐकू आले. आपल्याला काय स्वप्न पडले ते तो आपल्या मित्राला सांगत होता. “पावाची एक गोल लादी मिद्यानी लोकांच्या तळापाशी घरंगळत आली. आणि तंबूला तिने इतक्या जोरात धक्का दिला की तंबू उलटला आणि पार आडवा झाला.”

14 त्या मित्राला या स्वप्नाचा अर्थ माहीत होता. तो म्हणाला, “याचा अर्थ एकच असू शकतो योवाशचा मुलगा गिदोन या इस्राएल लोकांबद्दल हे स्वप्न आहे. परमेश्वर त्याच्या करवी मिद्यानी सैन्याचा पाडाव करणार आहे.”

15 गिदोनने हा संवाद ऐकला तेव्हा त्याने परमेश्वरापुढे दंडवत घातले. मग तो आपल्या तळावर परत आला. लोकांना हाका मारुन तो म्हणाला, “चला, तयार व्हा. मिद्यान्यांचा पराभव करायला परमेश्वर आता मदत करणार आहे.” 16 मग गिदोनने आपल्या तीनशे माणसांचे तीन गट केले. प्रत्येकाला एक रणशिंग आणि एक रिकामा घडा दिला. घड्यामध्ये पेटती मशाल होती. 17 मग गिदोनने सांगितले, “माझ्याकडे सर्वांचे लक्ष असू द्या. मी करतो तसे करा. शत्रूच्या तळापर्यंत माझ्या मागोमाग चला. तेथे पोचल्यावर मी करीन तसेच करा 18 तुम्ही शत्रूच्या शिबिराला वेढा घाला. मी आणि माझ्या बरोबरची माणसे रणशिंग फुंकू तेव्हा तुम्हीही तसेच करा नंतर ‘परमेश्वराचा जय असो, गिदोनचा जय असो’ अशी गर्जना करा.”

19 त्याप्रमाणे गिदोन आणि त्याच्या बरोबर शंभरजण शत्रूच्या शिबिरापर्यंत गेले. ते पोहोंचले तेव्हा नुकताच शत्रूपक्षाने पहारा बदलला होता. रात्रीचा तो मधला प्रहर होता. गिदोन आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी आपली रणशिंगे फुंकली आणि घडे फोडले. 20 त्याबरोबर तीनही गटातील लोकांनीही तसेच केले. त्यांच्या डाव्या हातात मशाली आणि उजव्या हातात रणशिंगे होती. ती फुंकत ते “परमेश्वराची तलवार, गिदोनची तलवार” अशा आरोव्व्या मारत होते.

21 गिदोनची माणसे होती तेथेच थांबली. पण आत मिद्यानी लोकांच्या तळावर पळापळ सुरु झाली. 22 ही तीनशे माणसे रणवाद्ये वाजवत असताना, परमेश्वराने मिद्यानी लोकांना एकमेकांना तलवारीने ठार मारायला लावले. त्यांनी पळ काढला.सरेरा कडे बेथ-शिट्टा आणि टब्बाथ जवळच्या आबेल महोल नगराच्या सीमेपर्यंत हे शत्रूसैन्य पळून गेले.

23 मग नफताली, आशेर आणि मनश्शे यांच्या वंशातील सैनिकांना मिद्यानी लोकांचा पाठलाग करायला सांगितले गेले. 24 एफ्राईमच्या डोंगराळ भागात गिदोनने सर्वत्र आपले दूत पाठवले. निरोप असा होता “खाली या आणि मिद्यान्यांवर हल्ला करा. बेथ-बारा आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश रोखून धरा. मिद्यानी लोकांना निसटू देऊ नका.”

तेव्हा एफ्राईमच्या वंशातील लोकांना त्यांनी बोलावले. त्यांनी बेथ-बारापर्यंत नदीलगतच्या प्रदेशाचा ताबा घेतला. 25 एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले, ओरेब आणि जेब हे दोन नेते होत. ओरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी ओरेबला मारले. जेबला जेबचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्याचा पाठलाग सुरुच ठेवला. ओरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदोनला दाखवायला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदोन होता.

प्रेषितांचीं कृत्यें 11

पेत्र यरुशलेमला परत येतो

11 यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्त्रीकार केला आहे हे यहूदा प्रांतातील प्रेषितांनी व बंधुंनी ऐकले. पण जेव्हा पेत्र यरुशलेमला आला, तेव्हा काही यहूदी विश्वासणाऱ्यांनी त्याच्याशी वाद घातला. ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व यहूदीतर आहेत अशा लोकांच्या घरी तुम्ही गेला, एकढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले!”

म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना स्पष्ट करुन सांगितल्या. पेत्र म्हणाला, “मी यापो शहरात होतो. प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला. मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले. ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते. व त्याचे चारही कोपरे धरुन ते खाली सोडले जात होते. ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले. मी त्याच्या आतमध्ये पाहिले. मी त्यात पाळीव आणि जंगली प्राणी पाहीले. सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी मी त्यात पाहिले. एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. ‘पेत्रा, ऊठ, यातील कोणताही प्राणी मार व खा!’

“पण मी म्हणालो, ‘प्रभु, मी असे कधीही करणार नाही. मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.’

“आकाशातून त्य वाणीने पुन्हा उत्तर दिले, ‘देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत. त्यांना अपवित्र म्हणू नकोस!’

10 “असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले. 11 तेवढयात तीन माणसे मी ज्या घरामध्ये राहत होतो, तेथे आली. कैसरीया शहरातून या तीन माणसांना माझ्याकडे पाठविण्यात आले होते. 12 आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. हे सहा बंधु (विश्वासणारे) जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते. आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो. 13 कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले. देवदूत कर्नेल्याला म्हणाला, ‘काही माणसे यापोस पाठव. शिमोन पेत्राला बोलावून घे. 14 तो तुझ्याशी बोलेल. तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.’

15 “त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला. 16 तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभु म्हणाला होता, ‘योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे. पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल!’ 17 आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. मग देवाचे काम मी कसा थांबवू शकत होतो?”

18 जेव्हा यहूदी विश्वासणाऱ्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्यांनी आपले म्हणणे थांबविले, त्यांनी देवाची स्तति केली आणि म्हणाले. “म्हणजे देव यहूदी नसलेल्यांना त्यांचे अंतःकरण बदलण्यासाठी मोकळीक देत आहे आणि आम्हांला जसे जीवन प्राप्त झाले तसे त्यांनाही देऊ इच्छीत आहे.”

अंत्युखियाला सुवार्ता येते

19 स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे पांगले. यतील काही दूरच्या ठिकाणी, उदा. फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली. 20 यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा ते ग्रीक लोकांशीही बोलले. त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली. 21 प्रभु विश्वासणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभुला अनुसरु लागले.

22 याविषयीची बातमी यरुशलेम येथील विश्वासणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरुशलेम येथील विश्वासणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठविले. 23-24 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांना खूपच आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.” पुष्कळ लोक ख्रिस्ताचे अनुयायी झाले.

25 जेव्हा बर्णबा तार्सस शहरी गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. 26 जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना “ख्रिस्ती” हे नाव पहिल्यांदा मिळाले.

27 याच काळात काही संदेष्टे यरुशलेमहून अंत्युखियास आले. 28 यांच्यापैकी एकाचे नाव अगाब होते. अत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.) 29 विश्वासणाऱ्यांनी ठरविले की, यहूदीया येथील आपल्या बंधु व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक विश्वासणाऱ्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरविले. 30 त्यांनी पैसे गोळा करुन बर्णबा व शौल यांच्याकडे दिले. मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे आणले.

यिर्मया 20

यिर्मया आणि पशहूर

20 पशहूर नावाचा एक याजक होता. परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. तो इम्मेरचा मुलगा होता. यिर्मयाने मंदिराच्या प्रांगणात केलेल्या भविष्यकथनात, ज्या सर्व गोष्टी सांगितल्या, त्या पशहूरने ऐकल्या. म्हणून त्यांने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व लाकडाच्या मोठ्या ठोकळ्यात त्याचे हातपाय अडकविले. मंदिराच्या वरच्या प्रवेशद्वाराजवळ बन्यामीनच्या प्रवेशद्वाराजवळ हे घडले. दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर ‘प्रत्येक बाजूला भय’ असे आहे. हेच तुझे नाव कारण परमेश्वर म्हणतो, ‘मी तुलाच तुझे भय करीन तुझ्या सर्व मित्रांना तू भीतिदायक होशील. तुझ्या मित्रांना शत्रू तलवारीने मारताना पाहशील. मी यहूदातील सर्व माणसांना बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करीन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्याचे सैन्य त्यांना तलवारीने कापून काढील. यरुशलेमच्या लोकांनी खूप कष्ट करुन वस्तू गोळा केल्या आणि ते श्रीमंत झाले. पण मी त्यांच्या सर्व गोष्टी शत्रूला देईन. यरुशलेमच्या राजाकडे पुष्कळ संपत्ती आहे. पण ती सर्व संपत्ती मी शत्रूला देईन. शत्रू ती सर्व संपत्ती बाबेल देशात नेईल. पशहूर, तुला आणि तुझ्या घरातील सर्व लोकांना घरातून नेले जाईल. तुम्हाला जबरदस्तीने नेले जाईल. तुम्हाला बाबेल देशात राहावे लागेल. तू तेथेच मरशील आणि त्या परक्या देशातच तुला पुरतील. तू तुझ्या प्रवचनात खोट्या गोष्टी सांगितल्यास. ह्या गोष्टी घडणार नाहीत. असे खोटे सांगितलेस. तुझे सर्व मित्रही बाबेलमध्येच मरतील आणि त्यांना तिथेच पुरले जाईल.’”

यिर्मयाचे पाचवे गाऱ्हाणे

परमेश्वरा, तू मला मोहित केलेस आणि मी पण मोहित झालो [a]
    तू माझ्यापेक्षा समर्थ असल्याने तू जिंकलास
मी हास्यास्पद ठरलो.
    लोक माझ्याकडे पाहून हसतात आणि माझी चेष्टा करतात.
प्रत्येक वेळी मी बोलतो, ओरडतो मी हिंसा
    आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो.
    मी मला परमेश्वराकडून आलेला संदेश लोकांना सांगतो.
पण लोक माझा फक्त अपमान करतात
    आणि माझी चेष्टा करतात.
कधी कधी मी स्वतःशीच म्हणतो,
“मी परमेश्वराला विसरुन जाईन.
    मी परमेश्वराच्या वतीने ह्यापुढे बोलणार नाही.”
पण मी असे म्हणताच परमेश्वराचा संदेश माझ्या मनात अग्नीप्रमाणे दाह निर्माण करतो.
    त्या वेळी, माझ्या हाडांच्या आत आत काही जळत आहे, असे मला वाटते.
मी परमेश्वराचा संदेश माझ्या मनात फार वेळ दाबून ठेवू शकत नाही
    आणि शेवटी तो मनात ठेवणे मला अशक्य होते.
10 लोक माझ्याबद्दल कुजबुजताना मी ऐकतो.
    सगळीकडून ज्या गोष्टी मी ऐकतो, त्याने मी घाबरतो इतकेच नाही,
    तर माझे मित्रही माझ्याविरुद्ध बोलतात.
मी काहीतरी चूक करावी म्हणून लोक वाट पाहात आहेत.
ते म्हणत आहेत,
    “आपण खोटे बोलू या आणि त्याने वाईट कृत्य केल्याचे सांगू या.
    यिर्मयाला फसविणे कदाचित् शक्य आहे.
    मग तो आपल्या हातात सापडेल
    व आपली त्याच्यापासून सुटका होईल.
    मग आपण त्याला पकडू आणि सूड घेऊ.”
11 पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे.
    परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे.
म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील.
    ते माझा पराभव करु शकणार नाहीत.
ते पडतील,
    त्यांची निराश होईल.
त्यांची नामुष्की होईल
    आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत.

12 सर्व शक्तिमान परमेश्वरा तू चांगल्या लोकांची परीक्षा घेतोस.
    तू माणसाच्या मनात खोलवर पाहतोस.
मी त्या लोकांविरुद्धचे माझे मुद्दे तुला सांगितले.
    मग आता तू त्यांना योग्य शिक्षा करताना मला पाहायला मिळू देत.
13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर गरिबांचे रक्षण करतो.
    तो दुष्टापासून त्यांना वाचवितो.

यिर्मयाचे सहावे गाऱ्हाणे

14 माझ्या जन्मदिवसाला शाप द्या.
    ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्माला आलो, त्या दिवसाला शुभ मानू नका.
15 माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलाना देणाऱ्या माणसाला शाप द्या.
    “तुम्हाला मुलगा झाला”
    असे त्याने सांगताच माझ्या वडिलांना खूप आनंद झाला.
16 परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला, [b] तसाच त्या माणसांचाही होवो.
    परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही.
त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत.
17 का? कारण त्या माणसाने,
    मी आईच्या पोटात असतानाच, मला मारले नाही.
त्याने मला मारले असते,
    तर आईच माझी कबर झाली असती
    व माझा जन्मच झाला नसता.
18 मी कशाला जन्मलो?
    मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले
    आणि माझे जीवन नामुष्कीत संपणार.

मार्क 6

येशू आपल्या गावी जातो(A)

येशू तेथून निघाला आणि आपल्या गावी गेला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे गेले. शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या माणासाला ही शिकवण कोठून मिळाली? आणि त्याला कोणते ज्ञान देण्यात आले आहे की, यासारखे चमत्कार त्याच्या हातून केले जातात? तो सुतार नाही काय? तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.

मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही पण त्याच्या गावात, शहरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात होत नसतो.” आणि तेथे त्याला चमत्कार करता आला नाही. फक्त त्याने काही रोगी लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.

येशू बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवितो(B)

त्याने बारा शिष्यांना आपणांकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठविले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला. त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका. त्यांनी वहाणा घालाव्यात पण जास्तीचा अंगरखा नको. 10 तो त्यांना म्हणाला, ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा. 11 आणि ज्या ठिकणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत ते गाव तुम्ही सोडून जा. आणि त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून तुमच्या पायाची धूळ तेथेच झटकून टाका.”

12 मग शिष्य गेले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी उपदेश केला. 13 त्यांनी पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना जैतुनाचे तेल लावून त्यांना बरे केले.

हेरोद येशूला बाप्तिस्मा करणारा योहान समजतो(C)

14 हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ आहे.”

15 इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.”

तर काही जण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.”

16 परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.”

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला असे मारले गेले

17 कारण हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती. त्याचा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले. त्या कारणामुळे त्याने असे केले. 18 योहान हेरोदाला सांगत असे की, “तुझ्या भावाच्या पत्नीशी असे लग्न करणे तुला योग्य नाही.” 19 याकरिता हेरोदीयाने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्याला ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्याला मारु शकली नाही. 20 कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.

21 मग एके दिवशी संधी आली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालीलातील प्रमुख लोकांना मेजवानी दिली. 22 हेरोदीयाची मुलगी मेजवानीच्या ठिकाणी आली व तिने नाच केला आणि हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदीत केले.

तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23 तो गंभीरपणे शपथ वाहून म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मगशील ते मी तुला देईन.”

24 ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?”

आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”

25 आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”

26 राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्याला तिला नकार द्यावा असे वाटले नाही. 27 तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठविले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. 28 ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. 29 योहानाच्या शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते तेथे आले. त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.

येशू पाच हजारहूंन अधिक लोकांना जेवू घालतो(D)

30 प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले. 31 नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.”

32 तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले. 33 परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले. 34 येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.

35 या वेळेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि (दिवस मावळतीला आला होता) मग त्याचे शिष्य त्याच्याकडे आले व म्हणाले, “ही निर्जन जागा आहे व बराच उशीर झाला आहे. 36 लोकांना पाठवून द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”

37 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”

ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे दीनारांच्या [a] भाकरी विकत आणाव्या काय?”

38 तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा, की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”

त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

39 येशूने शिष्यांना सांगितले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.” 40 तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते.

41 येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने त्याचे वाटे केले. त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या. दोन मासेसुद्धा वाटून दिले.

42 मग ते सर्व जेवून तृप्त झाले. 43 त्यांनी भाकरीच्या व माशांच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या भरल्या. 44 आणि जे पुरुष जेवले, त्यांची संख्या पाच हजार होती.

येशू पाण्यावर चालतो(E)

45 नंतर येशूने लगेच शिष्यांना नावेत बसविले आणि पलीकडे असलेल्या बेथसैदा येथे त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने लोकांना निरोप देऊन घरी पाठवले. 46 त्यांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.

47 संध्याकाळ झाली तेव्हा नाव सरोवराच्या मध्यभागी होती आणि जमिनीवर येशू एकटाच होता. 48 मग त्याने त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे पाहिले. कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू नावेकडे गेला. येशू पाण्यावरून चालत होता व तो त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागला. 49 जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. 50 कारण त्या सर्वांनी त्याला पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भीऊ नका, मी आहे,” 51 नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. 52 कारण त्यांना भाकरीच्या संदर्भातील चमत्कार समजलाच नव्हता आणि त्यांची मने कठीण झाली होती.

येशु रोग्यानां बरे करीतो(F)

53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली. 54 ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले. 55 लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले. 56 खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे झाले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center