Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 4

दबोरा, स्त्री न्यायाधीश

एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली. तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन याला इस्राएल लोकांचा पराभव करु दिला. हासोर नावाच्या नगरात हा राजा राज्य करत होता. सीसरा हा त्याचा सेनापती होता. हरोशेथ या नगरात सीसरा राहात होता. सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.

तेव्हा दबोरा नांवाची एक संदेष्ट्री होती. ती लप्पिदोथ नांवाच्या माणसाची पत्नी होती. ती इस्राएल लोकांची न्यायाधीश होती. एक दिवस ती खजुरीच्या झाडाखाली बसलेली असताना सीसराबद्दल विचार विनिमय करण्यासाठी इस्राएल लोक तिच्याकडे आले. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रामा व बेथल यांच्यामध्ये हे खजुरीचे झाड होते. तिने बाराक नामक माणसाला बोलावणे पाठवले. बाराक हा अबीनवामचा मुलगा होता. तो नफतालीच्या भागातील केदेश या नगरात राहात असे. दबोरा त्याला म्हणाली, “इस्राएल लोकांच्या परमेश्वराची तुला आज्ञा आहे की, नफताली आणि जबुलून यांच्या वंशातील दहाहजार पुरुषांना गोळा कर. त्यांना घेऊन ताबोर डोंगराकडे जा. मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.”

त्यावर बाराक दबोराला म्हणाला, “तूही माझ्याबरोबर येणार असलीस तर मी हे करीन. तू नसलीस तर मात्र करणार नाही.”

दबोरा म्हणाली, “अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही. परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे.”

आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली. 10 तेथे बाराकने जबुलून आणि नफताली यांच्या वंशातील लोकांना बोलावून दहाहजार जणांना घेतले. दबोराही बाराक बरोबर होती.

11 हेबेर नावाचा एक माणूस केनी लोकांमध्ये होता. तो आपल्या लोकांपासून वेगळा झाला होता. (केनी लोक होबाबचे वंशज होते. होबाब म्हणजे मोशेचा सासरा) केदेशजवळच्या साननीम येथे एलोन वृक्षाजवळ हेबेरने तळ दिला होता.

12 अबीनवामचा मुलगा बाराक ताबोर डोंगरापाशी आला असल्याचे कोणीतरी सीसराला सांगितले. 13 तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.

14 तेव्हा दबोरा बाराकला म्हणाली, “आज सीसराचा पराभव करायला परमेश्वर तुला मदत करणार आहे. त्याने आधीच तुझा मार्ग मोकळा केला आहे हे तुला माहीतच आहे.” तेव्हा बाराक ताबोर डोंगरावरुन दहाहजार माणसांसह निघाला. 15 त्यांनी सीसरावर हल्ला चढवला. लढाईत सीसरा, त्याचे रथ, सैन्य यांच्यामध्ये परमेश्वराने गोंधळ माजवला त्यांना काय करावे हे सुचेना. बाराक व त्याचे सैन्य यांनी सीसराच्या सैन्याचा पराभव केला. सीसरा रथ सोडून पळाला. 16 बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने व त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा व सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.

17 पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला. 18 याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.

19 सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.

20 तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि ‘आत कोणी आहे का?’ असे कोणी विचारले तर ‘नाही’ म्हणून सांग.”

21 मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.

22 तेवढ्यात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.

23 त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला. 24 या याबीनला नामोहरम करत शेवटी त्याचा नाश करीपर्यंत इस्राएल लोकांचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 8

विश्वासणाऱ्यांवर संकट

स्तेफनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरु झाला. प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहूदा व शोमरोन प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले.

Trouble for the Believers

2-3 काही धार्मिक माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिेस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली. तो घरोघर जाई. स्त्रिया व पुरुष यांना धरुन खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे. विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.

शोमरोनात फिलिप्पाची सेवा

फिलिप्प [a] शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले. फिलिप्प ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.

शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. 10 अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत. ते म्हणत असत. “देवाची महान शक्ति असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे!” 11 त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकीत केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. 12 परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या. 13 स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप्प बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला.

14 यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. 15 जेव्हा पेत्र व योहान आले. तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. 16 या लोकांचा प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता. 17 मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.

18 शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. 19 शिमोन म्हणाला, “मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल, अशी शक्ति मला सुध्दा द्या.”

20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुइया पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास! 21 या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. 22 आपले ह्रदय बदल, तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या सोडून दे. प्रभूला (देवाला) प्रार्थना कर. कदाचित तुइया पश्चात्तप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. 23 कारण तुइया मनात कटू मत्सर भरलेला आहे. व तू पापाचा दास झालेला आहेस, हे मला दिसून आले आहे!”

24 शिमोनाने उत्तर दिले, “आपण दोघेही माइयासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. यासाठी की, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माइयावर न येवो!”

25 नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली (जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले.) त्यांनी प्रभुचा संदेश त्यांना सांगितला. मग ते यरुशलेमला परत गेले. परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावांत सुवार्ता सांगितली.

इथिओपियाच्या मनुष्याला फिलिप्पा शिक्षण देतो

26 देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.”

27 मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता.

29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” 30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?”

31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होता:

“वधायला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता.
    लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला.
    त्याने आपले तोंड उघडले नाही.
33 त्याला लज्जित केले गेले, त्याचे हक्क काढून घेतले गेले.
    त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णीली जाणार नाही.
    कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” (A)

34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.

36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” 37 [b] 38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरुन पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. 39 जेव्हा ते पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. 40 आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.

यिर्मया 17

हृदयावर कोरलेला अपराध

17 “यहूदी लोकांची पापे, खोडता येणे शक्य नाही,
    अशा ठिकाणी लिहिली आहेत.
ती लोखंडी लेखणीने दगडावर कोरली आहेत.
    हिरकणीचे टोक असलेल्या लेखणीने ती पाषाणावर कोरली आहेत.
    तो पाषाण म्हणजेच त्यांचे ह्दय होय.
ती पापे वेदीच्या शिंगांवर कोरली आहेत.
खोट्या देवांना अर्पण केलेल्या त्या वेदी
    त्यांच्या मुलांना आठवतात.
अशेरला अर्पण केलेले लाकडी खांब
    त्यांना आठवतात.
टेकडीवरच्या व हिरव्या झाडाखालच्या
    त्या वस्तू त्यांना स्मरतात.
विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील
    त्या वस्तू त्यांना आठवतात
यहूदी लोकांकडे बरीच संपत्ती आहे
    ती सर्व मी दुसऱ्या देशांना देईन.
तुम्ही जेथे पूजाआर्चा करता आणि जे पाप आहे,
    अशी उच्च स्थाने दुसरे लोक नष्ट करतील.
मी तुम्हाला दिलेली भूमी तुम्ही गमवाल.
    मी तुमच्या शत्रूंना तुम्हाला गुलाम म्हणून अज्ञान भूमीत नेऊ देईन.
का? कारण मी खूप संतापलो आहे.
    माझा संताप प्रखर अग्नीप्रमाणे आहे, त्यात तुम्ही कायमचे जळून भस्म व्हाल.”

लोकांवरील विश्वास आणि देवावरील विश्वास

परमेश्वर म्हणतो,
“जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात,
    त्यांचे वाईट होईल.
सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात,
    त्याचे भले होणार नाही.
का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले.
ते लोक वाळवंटातील झुडुपाप्रमाणे होत.
    निर्जन, उष्ण आणि कोरड्या
    व वाईट जमिनीवरील झुडुपाप्रमाणे ते आहेत.
देव किती भले करु शकतो,
    ह्याची त्या झुडुपाला जाणीव नाही.
परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल.
    का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल.
तो माणूस पाण्याजवळ असलेल्या वृक्षाप्रमाणे बळकट होईल.
    त्या झाडाची मुळे लांब असल्याने त्याला पाणी मिळतेच.
उष्ण दिवसांचे त्याला भय नसते.
    त्याची पाने नेहमीच हिरवी असतात.
एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तरी त्याला चिंता नसते.
    त्याला नेहमीच फळे धरतात.

“माणसाचे मन फार कपटी असते.
    त्याच्यावर काही औषध नाही.
    म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही.
10 पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने,
    मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो.
प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला
    त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.
11 काही वेळा, एकादी पक्षीण स्वतः
    न घातलेले अंडे उबविते.
धनासाठी जो माणूस फसवणूक करतो,
    तो ह्या पक्षिणी सारखाच असतो.
अर्ध्या आयुष्यातच हा माणूस धन गमावेल.
    त्याच्या आयुष्याच्या सरत्या काळात तो दुष्ट म्हणून ओळखला जाईल.”

12 आरंभीपासून आमचे मंदिर म्हणजे
    देवासाठी एक भव्य आसन झाले आहे.
    ती महत्वाची वस्तू आहे.
13 परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस.
    तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस.
जो परमेश्वराला अनुसरणे सोडेल,
    त्याला लाजवले जाईल आणि त्याचे आयुष्य अल्प असेल. [a]

यिर्मयाची तिसरी तक्रार

14 परमेश्वरा, तू मला बरे केलेस,
    तर मी पूर्ण बरा होईन.
तू मला वाचविलेस,
    तर मी खरोखरच वाचेन.
देवा, मी तुझी स्तुती करतो.
15 यहूदातील लोक मला सतत प्रश्र्न विचारतात.
    ते विचारतात, “यिर्मया, परमेश्वराच्या संदेशाचे काय?
    तो खरोखरीच खरा ठरतो का ते पाहू या.”

16 परमेश्वरा, मी तुला सोडून पळून गेलो नाही.
    मी तुला अनुसरलो.
    मी तुला पाहिजे तसा मेंढपाळ बनलो.
तो भयंकर दिवस उजाडावा असे मला वाटत नव्हते.
    मी सांगितलेल्या गोष्टी परमेश्वरा तुला माहीतच आहेत.
    काय घडत आहे, ते तू पाहतोसच.
17 परमेश्वरा, माझा नाश करु नकोस.
    संकटकाळी, मला तुझा आधार वाटतो.
18 लोक मला त्रास देतात.
त्यांना तू खजील कर.
    पण माझी निराशा करु नकोस.
त्यांना धाक दाखव
    पण मला घाबरवू नकोस
तो भयंकर अरिष्टाचा दिवस माझ्या शत्रूंवर आण
    आणि त्यांचा पुन्हा पुन्हा बिमोड कर.

शब्बाथचा दिवस पवित्र मानणे

19 परमेश्वराने मला पुढील गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, यहूदाचे राजे यरुशलेमच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या लोकद्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांना माझा सदेश सांग. मग यरुशलेमच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.”

20 त्या लोकांना सांग, “परमेश्वराचा संदेश ऐका. यहूदाच्या राजांनो आणि लोकांनो व यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्वांनो, माझे ऐका. 21 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या आहेतः ‘शब्बाथच्या दिवशी तुम्ही ओझे वाहणार नाही याची काळजी घ्या. त्या दिवशी, यरुशलेमच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका. 22 त्या दिवशी, तुमच्या घरांतून ओझी बाहेर आणू नका. त्या दिवशी कोणतेही काम करु नका. तुम्ही शब्बाथचा दिवस एक पवित्र म्हणून पाळा. तुमच्या पूर्वजांना मी हीच आज्ञा केली होती. 23 पण त्यांनी ती पाळली नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. तुमचे पूर्वज हटवादी होते. मी त्यांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी माझे ऐकले नाही. 24 पण तुम्ही माझी आज्ञा पाळण्याची काळजी घ्या. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. शब्बाथच्या दिवशी, यरुशलेमच्या प्रदेशद्वारातून, तुम्ही ओझी आणता कामा नये; शब्बाथचे पावित्र्य राखा. कोणतेही काम न करता तुम्ही हे करु शकता.

25 “‘तुम्ही जर ही आज्ञा पाळलीत, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेमच्या प्रदेशद्वारांतून येतील. ते रथांतून आणि घोड्यावरुन येतील. यहूदाचे आणि यरुशलेमचे नेते त्यांच्याबरोबर असतील. यरुशलेममध्ये लोक कायमचे वास्तव्य करतील. 26 यहूदाच्या शहरांतून लोक यरुशलेमला येतील, यरुशलेमच्या आजूबाजूच्या खेड्यातून, बन्यामीनच्या कुळातील लोक ज्या प्रदेशात राहतात, [b] त्या प्रदेशातून, पश्र्चिमेच्या डोंगरपायथ्याच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेवमधून लोक यरुशलेमला येतील, हे सर्व लोक होमार्पण, धान्यार्पण, धूप आणतील आणि कृतज्ञता व्यक्त करतील. ते हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आणतील.

27 “‘पण तुम्ही जर माझे ऐकले नाही अथवा माझी आज्ञा पाळली नाही, तर वाईट गोष्टी घडतील. जर तुम्ही शब्बाथच्या दिवशी ओझे वाहिले, तर तुम्ही त्या दिवसाचे पावित्र्य राखले नाही, असे होईल. मग कधींही विझू न शकणारी आग मी लावीन. यरुशलेमच्या प्रवेशद्वारापासून सुरु झालेली ही आग राजवाडे जाळेपर्यंत जळत राहील.’”

मार्क 3

येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करतो(A)

दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “लोकांच्या समोर उभा राहा.”

नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जिवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” परंतु ते गप्प राहीले.

येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतामुळे तो फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला. नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर [a] येशूविरूद्ध कट करू लागले.

पुष्कळ लोक येशूच्या मागे जातात

येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.

मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोटी होडी आणावयास सांगितली, 10 त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते. 11 जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” 12 पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.

येशू त्याचे बारा शिष्य निवडतो(B)

13 नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वतःकडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले. 14 त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषीत हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे. 15 व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा. 16 मग येशूने या बारा जणांची निवड केली

व जो शिमोन (त्याला पेत्र हे नाव दिले).

17 जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान (यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होतो हे नाव दिले.)

18 अंद्रिया,

फिलीप,

बर्थलमय,

मत्तय,

थोमा,

अल्फीचा मुलगा याकोब,

तद्दय,

शिमोन कनानी 19 आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.

काही यहूदी येशूमध्ये अशुद्ध आत्मा आहे असे म्हणतात(C)

20 नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत. 21 त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.

22 यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे. आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”

23 मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? 24 जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही. 25 आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही. 26 तर मग सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.

27 “खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.

28 “मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. 29 पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”

30 येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.

येशूचे अनुयायी हे त्याचे खरे कुटुंब आहे(D)

31 नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावयास पाठविले. 32 लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”

33 त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” 34 येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ. 35 जे जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center