Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 3

परमेश्वराने इतर राष्ट्रातील त्या लोकांना इस्राएलींचा प्रदेश सोडण्यास भाग पाडले नाही. परमेश्वराला इस्राएल लोकांची परिक्षा घ्यायची होती. या पिढीतील इस्राएल लोकांनी कनानातील देश काबीज करण्यासाठी लढाईत भाग घेतला नव्हता. तेव्हा त्या राष्ट्रांमधील लोकांना परमेश्वराने तेथेच राहू दिले. (कधी युद्ध माहीत नसलेल्या या इस्राएल लोकांना धडा शिकवण्यासाठी परमेश्वराने असे केले.) तेथे राहू दिलेल्या राष्ट्रांची नावे अशी. पलिष्ठ्यांचे पाच राजे, सर्व कनानी लोक, सीदोनी, व बआल-हर्मोनच्या डोंगरापासून ते लेबो हमाथपर्यंतच्या लबानोन डोंगरावर राहणारे हिव्वी. या योगे इस्राएल लोकांची परीक्षा पाहावी आणि मोशेमार्फत त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही हे पाहावे म्हणून परमेश्वराने असे केले.

कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या लोकांबरोबर इस्राएल लोक राहिले. इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्ने केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.

पहिला न्यायाधीश अथनिएल

इस्राएल लोक दुर्वर्तन करत आहेत हे परमेश्वराने पाहिले. ते त्यांचा देव परमेश्वर ह्याला विसरले आणि बआल हे दैवत व अशेरा देवी यांची उपासना करु लागले. त्यामुळे परमेश्वर इस्राएल लोकांवर संतप्त झाला. मेसोपटेमियाचा राजा कुशन-रिशाथईम याचे करवी परमेश्वराने इस्राएल लोकांचा पराभव होऊ दिला व त्याची सत्ता त्यांच्यावर आणली. इस्राएल लोक आठ वर्षे त्याच्या अंमलाखाली होते. तेव्हा इस्राएल लोकांनी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने अथनिएलला त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. कालेबचा धाकटा भाऊ कनाज याचा अथनिएल मुलगा होता. त्यांने इस्राएल लोकांचे रक्षण केले. 10 अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशन-रिशाथईमचा पराभव केला. 11 आणि कनाजपुत्र अथनिएलच्या मृत्यूपर्यंत चाळीस वर्षे त्या प्रदेशात शांतता होती.

दुसरा न्यायाधीश एहूद

12 पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे आचरण करु लागले. ते परमेश्वराने पाहिले. तेव्हा मवाबचा राजा एग्लोन याला इस्राएल लोकांना पराभूत करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने दिले. 13 अम्मोनी आणि अमालेकी लोकांची मदत त्याला मिळाली. त्यांनी इस्राएल लोकांवर एकत्रित हल्ला केला. एग्लोनच्या सैन्याने इस्राएलवर विजय मिळवला व त्यांना यरीहो हे खजुरीच्या झाडांचे नगर सोडायला भाग पाडले. 14 पुढे एग्लोन या मवाबच्या राजाने इस्राएलींवर अठरा वर्षे राज्य केले.

15 त्यांनी पुन्हा परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने एहूदला लोकांच्या रक्षणासाठी पाठवले. एहूद हा डावरा असून, बन्यामीनच्या वंशातील गेरा याचा मुलगा होता. इस्राएल लोकांनी एहूदला नजराणा घेऊन एग्लोनकडे पाठवले. 16 एहूदने एक अठरा इंच [a] लांबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपड्याखाली झाकली जाईल अशी बांधली.

17 मग मवाबचा राजा एग्लोन याच्याकडे तो नजरणा घेऊन गेला. (एग्लोन हा अतिशय लठ्ठ होता.) 18 एहूदने एग्लोनला नजराणा दिला व तो बरोबर घेऊन आलेल्यांना त्याने पाठवून दिले. 19 त्यांनी राजवाडा सोडला जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला. एहूद राजा एग्लोनला म्हणाला, “हे राजा, मी तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे.”

राजाने त्याला गप्प बसायची खूण करुन सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला सांगितले. 20 एहूद राजाच्या अगदी जवळ गेला. एग्लोन आता आपल्या राजवाड्याच्या दालनात अगदी एकटा होता.

तेव्हा एहूद म्हणाला, “तुला देवाकडून एक संदेश आहे.” राजा सिंहासनावरुन उठला आता तो एहूदच्या अगदी निकट होता. 21 राजा उठल्याबरोबर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली. 22 तलवारीचे पाते थेट मुठीपर्यंत राजाच्या शरीरात घुसले. राजाच्या अंगातील चरबीने पाते बरबटले. तेव्हा एहूदने ती तशीच तेथे राहू दिली.

23 मग तो बाहेर पडला आणि दालनाचे दरवाजे बंद करुन त्याने त्यांना कुलूप लावले. 24 एहूद बाहेर पडल्याबरोबर सेवक आत शिरले. पाहतात तो दरवाजे बंद केलेले. ते पाहून, राजा स्वच्छतागृहात असेल असे त्यांना वाटले. 25 ते तसेच बाहेर बराच वेळ थांबले. शेवटी त्यांना काळजी वाटायला लागली. किल्ली आणून त्यांनी कुलूप उघडून दार उघडले. आत शिरतात तर जमिनीवर त्यांना राजाचा मृतदेह पसरलेला दिसला.

26 नोकर राजाच्या दालनाबाहेर वाट पाहात होते तेवढ्या वेळात एहूद निसटून जाऊ शकला. मूर्तीवरुन पुढे जाऊन तो सेईराकडे निघाला. 27 तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले, एहूद त्यांच्या पुढे निघाला. 28 तो म्हणाला, “माझ्या मागोमाग या, आपला शत्रू मवाब याला पराभूत करायला परमेश्वराने आपल्याला मदत केली आहे.”

तेव्हा इस्राएल लोक त्याच्या पाठोपाठ निघाले. यार्देन नदी सहजगत्या पार करुन जिथून मवाब प्रदेशात जाता येते अशा सर्व जागांचा त्यांनी ताबा घेतला. कोणालाही त्यांनी यार्देन पार करु दिली नाही. 29 मवाबांपैकी जवळजवळ दहाहजार शूर आणि कणखर लोकांना इस्राएल लोकांनी ठार केले. एकही मवाब व्यक्ती पळून जाऊ शकला नाही. 30 त्या दिवसापासून इस्राएल लोकांचे मवाबांवर राज्य सुरु झाले. पुढे ऐंशी वर्षे त्या प्रदेशात शांतता नांदली.

तिसरा न्यायाधीश शमगार

31 एहूदनंतर आणखी एक जण इस्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुलगा शमगार, त्याने बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले.

प्रेषितांचीं कृत्यें 7

स्तेफनाचे भाषण

प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, “हे सर्व खरे आहे काय?” स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते. देव अब्राहामाला म्हणाला, ‘तुझा देश व तुझे नातेवाईक सोड. आणि मी दाखवीन त्या देशात जा!’ [a]

“म्हणून अब्राहामाने आपले वतन खास्द्यांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला. अब्राहामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात. परंतु देवाने अब्राहामाला या जमिनीतील काही दिले नाही. देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुध्दा जमीन त्याला दिली नाही. परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल. व त्याच्या मुलांनाही देईल. अब्राहामाला संतान होण्यापूर्वी हे घडले.

“देव त्याला म्हणाला, ‘तुझी संतती उपरी होईल. ते दुसऱ्या देशात राहतील. तेथील लोक तुइयावंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना चारशे वर्षे वाईट रीतीने वागवतील. परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन.’ [b] देव असे सुद्धा म्हणाला, ‘त्या गोष्टी घडल्यानंतर, तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील.’ [c]

“देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.

“या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता. 10 योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. 11 मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.

12 “जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती. 13 ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. 14 मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. 15 मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. 16 नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.

17 “देवाने अब्राहामाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. 18 शेवटी, ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा इजिप्तवर राज्य करु लागला. 19 त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.

20 “त्या काळात मोशेचा जन्म झाला. आणि तो (देवाच्या नजरेत) फार सुंदर बालक होता. तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला. 21 आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारख वाढवल. 22 इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला.

23 “जेव्हा तो चाळीस वर्षांचा झाला, त्याने विचार केला की, आपले बांधव, जे यहूदी लोक त्यांना जाऊन भेटावे, 24 आणि जेव्हा त्याने आपल्या इस्राएली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाश्याला मारले, व आपल्या बांधवाची सुटका केली; छळ केला जाणाऱ्या यहूदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला. 25 देव त्याच्या हातून यहूदी लोकांची सुटका करीत आहे, हे यहूदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही.

26 “दुसऱ्या दिवशी दोन यहूदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली, ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करु लागला. तो त्यांना म्हणाला, ‘पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात?’ 27 परंतु जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी वाईट रीतीने वागत होता, त्याने मोशेला एका बाजूला सारुन म्हटले, ‘आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले? 28 काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस; तसाच माझाही जीव घेण्याचे तुइया मनात आहे का?’ [d] 29 जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला. आणि मिद्यान्यांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले.

30 “चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले. 31 जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता. 32 प्रभु म्हणाला, ‘मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे-अब्राहाम, इसहाक, याकोब यांचा देव आहे.’ मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करुन पाहण्याचे धाडस त्याला होईना.

33 “देव त्याला म्हणाला, ‘तुझ्या पायातील वहाणा काढ! कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. 34 माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे. आणि त्यांचे विव्हळ्णे माझ्या कानी आले आहे. म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे.’ [e]

35 “मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते. 36 म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्ये व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ, आणि वाळवंटात चाळीस वर्षे केल्या.

37 “हा तोच मोशे आहे, ज्याने यहूदी लोकांना असे म्हटले: ‘देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल. तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल. तो माइयासारखाच भविष्यवादी असेल’ 38 जो अरण्यात यहूद्दांबरोबर होता, सीनाय पर्वतावर आपणाबरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडीलांबरोबर होता ज्याला आम्हास देण्यासठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय,

39 “परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही. आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. 40 आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. कारण इजिप्त देशातून काढून आम्हांला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही’. 41 त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हातांनी घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला! 42 पण देवाने त्या लोकांकडे पाठ फिरविली आणि आकाशातील समूहांची (तारे, नक्षत्र, अशा खोट्या देवांची) भक्ति करीत राहण्यासाठी मोकळे सोडले. कारण भविष्याद्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे:

‘देव म्हणतो, अहो यहूदी लोकांनो, तुम्ही वधलेल्या पशूंची अर्पणे मला आणली नाहीत,
    रानातील चाळीस वर्षांत.
43 तुम्ही तुमच्याबरोबर मोलेखासाठी तंबू (उपासनेचे स्थळ)
    आणि तुमचा देव रेफान यासाठी तान्यांच्या मूर्ती नेल्यात
या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हांला उपासना करता यावी
    म्हणून मी तुम्हांला दूर बाबेलोनपलीकडे पाठवीन.’ (A)

44 “अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. 45 नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करुन इतर देशांच्या जमिनी काबिज केल्या. ती राष्टे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दावीदाच्या काळापर्यंत तो ठेवला. 46 दावीद देवाच्या मर्जीचा असल्याने, याकोबाच्या देवासाठी मंदीर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. 47 परंतु देवाचे मंदिर शलमोनाने बांधले.

48 “कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितातः

49 ‘प्रभु म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे.
    पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे.
तुम्ही माइयासाठी कसले घर बांधू शकता?
    मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही.
50 माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’” (B)

51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”

स्तेफनाचा वध होतो

54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”

57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.

यिर्मया 16

अरिष्टाचा दिवस

16 मला परमेश्वराचा संदेश आला: “यिर्मया, तू लग्न करता कामा नये. या ठिकाणी तुला मुले होता कामा नयेत”

यहूदामध्ये जन्मणाऱ्या मुलांबद्दल आणि त्यांच्या आईवडिलांबद्दल परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “त्या लोकांना भयंकर वाईट प्रकारे मृत्यू येईल. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही. त्यांचे कोणीही दफन करणार नाही. त्यांची प्रेते शेणाप्रमाणे जमिनीवर उघडी पडतील. ते लोक शत्रूकडून मारले जातील वा उपासमारीने मरतील. त्यांची प्रेते पक्षी व वन्य प्राणी ह्यांचे भक्ष्य होतील.”

म्हणून परमेश्वर म्हणतो, “यिर्मया, ज्या घरी लोक अंत्यसंस्कारानंतर जेवण करीत असतील, त्या घरी तू जाऊ नकोस. तेथे गेलेल्यासाठी शोक वा दु:ख प्रदर्शित करायला जाऊ नकोस. ह्या गोष्टी तू करु नकोस. का? कारण मी माझा आशीर्वाद मागे घेतला आहे. ह्या लोकांबद्दल मला दया वाटणार नाही. मला त्यांच्याबद्दल दु:ख होणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

“यहूदामध्ये महत्वाचे आणि सामान्य दोघेही मरतील. त्यांचे कोणी दफन करणार नाही. अथवा त्यांच्याबद्दल शोक करणार नाही. कोणीही दाढी करुन वा मुंडन करुन त्यांच्यासाठी शोक प्रदर्शित करणार नाही. मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.

“यिर्मया, ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात तू जाऊ, नकोस, अशा घरात खाऊ पिऊ नकोस. सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी लवकरच लोकांचा जल्लोश बंद पाडीन. लग्नसमारंभातील आनंदकल्लोळ मी बंद करीन. तुझ्या आयुष्यातच हे घडेल, इतक्या लवकर मी हे सर्व करीन.’

10 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या गोष्टी सांग लोक तुला विचारतील ‘परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे काय पाप केले?’ 11 तेव्हा तू त्यांना हे सांगितलेच पाहिजेस, ‘तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडल्याबद्दल ह्या भयंकर गोष्टी घडतील.’ हा देवाचा संदेश आहे.त्यांनी मलाअनुसरायचे सोडले व दुसऱ्या दैवतांनाअनुसरण्यास सुरवात केली.ते त्यांची सेवा करू लागले,त्यांनी दैवतांची पूजा केली. तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला आणि माझ्या आदेशांचे पालन करणे सोडले. 12 पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. तुम्ही फार हटवादी आहात. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करता. माझ्या आज्ञा पाळत नाही. तुमचेच खरे करता. 13 म्हणून मी तुम्हाला देशाबाहेर हाकलीन. तुम्हाला परदेशात जाणे भाग पाडीन, तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशांत तुम्ही जाल. त्या देशात, तुमच्या इच्छेप्रमाणे रांत्रदिवस खोट्या देवांची सेवा तुम्ही करु शकाल, मी तुम्हाला मदतही करणार नाही किंवा तुमच्यावर कृपाही करणार नाही.’

14 “आपल्या वचनाची खात्री देताना लोक म्हणतात ‘परमेश्वराचे अस्तित्व जेवढे खरे आहे, तेवढे आपले वचन पक्के आहे. मिसरच्या भूमीतून इस्राएलच्या लोकांची सुटका त्या परमेश्वरानेच केली आहे.’” पण आता देवाचा असा संदेश आहे, “लोक वर म्हटल्याप्रमाणे म्हणणार नाहीत. असा काळ येऊ घातलेला आहे. 15 लोक काहीतरी नवीनच म्हणतील, ‘त्या परमेश्वराचे अस्तित्व खात्रीचे आहे, ज्याने इस्राएलच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली. त्यांना निरनिराळ्या प्रदेशांत पाठवून तेथून त्यांना परत आणणारा तोच एकमेव आहे’ ते असे का म्हणतील? कारण इस्राएलच्या लोकांना मी त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत परत आणीन.

16 “लवकरच मी पुष्कळ कोळ्यांना येथे बोलावीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते कोळी यहूदाच्या लोकांना पकडतील असे झाल्यावर मी पुष्कळ शिकाऱ्यांना आणीन. ते शिकारी प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून यहूदाच्या लोकांची शिकार करतील. 17 त्यांची प्रत्येक कृती मला दिसते. यहूदाचे लोक त्यांची कृत्ये माझ्यापासून लपवू शकत नाहीत. त्यांचे पाप माझ्यापासून लपून राहात नाही. 18 ती यहूदाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परत फेड करीन. मी यहूदाच्या लोकांना त्याच्या पापांची किंमत दामदुपटीने मोजायला लावीन. त्यांनी माझी भूमी ‘अपवित्र’ केली म्हणून मी असे करीन. त्यांनी भयानक मूर्ती स्थापून माझी भूमी कलंकित केली. मी त्या मूर्तींचा तिरस्कार करतो. पण त्यांनी माझा देशच त्या मूर्तींनी भरुन टाकला.”

परमेश्वराजवळ प्रार्थना

19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस.
    संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस.
जगाच्या सर्व भागांतून राष्ट्रे तुझ्याकडे येतील.
    ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांनी खोटे देव जवळ बाळगले.
त्या दीडदमडीच्या मूर्तींची पूजा केली.
    पण त्या मूर्तींनी त्यांना काहीही मदत केली नाही.”
20 लोक स्वतःसाठी खरा देव निर्माण करु शकतात का?
नाही. ते फक्त मूर्ती तयार करु शकतात.
    पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत.

21 परमेश्वर म्हणतो “म्हणून त्या मूर्ती बनविणाऱ्या लोकांना मी धडा शिकवीन.
    प्रथम मी त्यांना माझ्या शक्तीची व सामर्थ्याची जाणीव करुन देईन.
मग त्यांना कळेल की मीच खरा देव,
    मीच खरा परमेश्वर आहे.”

मार्क 2

येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो(A)

नंतर काही दिवसांनी येशू कफर्णहूमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली. तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही. एवढेच नव्हे तर दाराबाहेरदेखील जागा नव्हती. येशू त्यांना उपदेश करीत होता. काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना, मग तो होता तेथील त्याच्यावरचे छपर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता. ती खाट त्यांनी छपरातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले. येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला, म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबूज करीत होते की, “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा देवाची निंदा करीत आहे. देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”

आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. तो त्यांस म्हणाला, “तुम्ही या गोष्टीविषयी आपसात का कुजबूज करता? तूझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा ऊठ आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा, असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?” 10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, 11 “मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”

12 मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या समक्ष बाहेर गेला. यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते.”

लेवी (मत्तय) येशूमागे जातो(B)

13 येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक तेथे त्याच्यामागे गेले आणि त्याने त्यांस शिक्षण दिले. 14 नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यांस जकातनाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्या मागे ये.” तेव्हा लेवी उठाला आणि येशूच्या मागे गेला.

15 नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्यच्या शिष्यांबरोबर जेवत होते. कारण तेथे जे त्याच्यामागे आले होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण होते, 16 काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परुशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांस म्हणाले, “येशू हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवत आहे?”

17 येशूने हे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांस वैद्याची गरज नाही पण रोग्यांस आहे. मी नीतिमान लोकांस नाही तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे.”

येशू इतर धार्मिक पुढाऱ्यांसारखा नाही(C)

18 जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपास करीत होते. ते काहीजण येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपास करतात परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत?”

19 येशू म्हणाला, “खरोखर जोपर्यंत वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय? जोपर्यंत त्यांच्याबरोबर वर आहे तोपयंर्त त्यांना उपास करणे शक्य नाही. 20 परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपास करतील.

21 “कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल. 22 तसेच नवा द्राक्षारस कोणीही द्राक्षारसाच्या जुन्या कातडी पिशवीत घातील नाही. जर तो असे करतो तर द्राक्षारस कातडी पिशवीला फाडील आणि द्राक्षारस व द्राक्षारसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून तो नवा द्राक्षारस नव्या पिशवीत घालतो.”

काही यहूदी येशूवर टीका करतात(D)

23 नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, जाताना त्याचे शिष्य कणसे मोडू लगले. 24 तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”

25 येशू म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यां लोकांना भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही ऐकले नाही काय? 26 अब्याथार प्रमुख याजक असताना, तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”

27 तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही. 28 म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचादेखील प्रभु आहे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center