Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
शास्ते 2

बोखीम येथे परमेश्वराचा दूत

परमेश्वराचा दूत गिलगाल नगरातून बोखीम या नगरात आला. इस्राएल लोकांना त्याने परमेश्वराचा संदेश सांगितला. संदेश असा होता; “मी तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशापर्यंत तुम्हाला आणले. तुमच्याशी केलेला करार मी मोडणार नाही असे मी तुम्हाला सांगितले होते. त्यामुळे तुम्ही त्या प्रदेशात राहणाऱ्यां लोकांशी करार करू नका. त्यांच्या वेद्यां उध्वस्त करा असे मी तुम्हाला स्पष्ट सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही.”

“म्हणून मी म्हणतो, ‘आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोट्या देवता जाळ्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.’”

देवदूताने परमेश्वराचा हा संदेश इस्राएल लोकांना ऐकवल्यावर ते आक्रोश करु लागले. म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्यांनी बोखीम असे ठेवले. बोखीम येथे त्यांनी परमेश्वरासाठी यज्ञ केले.

आज्ञाभंग आणि पराभव

मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले. तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले. यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मृत्यूनंतर. वडीलधारी मंडळी जिवंत असे पर्यंत इस्राएलचे लोक परमेश्वराची उपासना करत होते. या वृध्द मंडळीनी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या होत्या. परमेश्वराचा सेवक नूनपुत्र यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन वाराला. इस्राएल लोकांनी त्याचे दफन केले. तिम्नाथ-हेरेस येथे, गाश डोंगराच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याला मिळालेल्या जमिनीत त्याला त्यांनी पुरले.

10 जुन्या पिढीतील सर्व मृत्यू पावल्यानंतर नवीन पिढी पुढे आली. त्यांना परमेश्वराविषयी आणि परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी काय केले याविषयी काहीही माहिती नव्हती. 11 तेव्हा या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशी दृष्कृत्ये केली आणि बआल या दैवताच्या भजनी लागले. हे निंद्य कृत्य करताना त्यांना परमेश्वराने पाहिले. 12 परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोट्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला. 13 इस्राएल लोकांनी आता परमेश्वराला सोडून बआल आणि अष्टारोथ यांची उपासना करायला सुरुवात केली.

14 परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाल्यामुळे त्यांच्यावर शत्रू चाल करुन येऊ लागला व त्यांना लुटू लागला. भोवताली राहणाऱ्या शत्रूंकडून ते पराभूत होऊ लागले. इस्राएल लोकांना शत्रूपासून आपले रक्षण करता येईना. 15 लढाईत त्यांना नेहमी अपयश येऊ लागले. परमेश्वराची साथ आता त्यांना नसल्यामुळे ते पराजित होऊ लागले. त्यांच्या भोवती राहणाऱ्या लोकांच्या दैवतांची सेवा केल्यास इस्राएल लोकांना पराभव पत्करावा लागेल हे परमेश्वराने आधीच बजावले होते.

16 तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत. 17 इस्राएल लोक या न्यायाधीशांनाही जुमानीतनासे झाले. आपल्या परमेश्वराशी इस्राएल लोक निष्ठावंत राहिले नाहीत ते इतर दैवतांच्या भजनी लागले. [a] पूर्वी या इस्राएल लोकांचे पूर्वज परमेश्वराच्या आज्ञा पाळत असत. पण आता त्यांच्या वागणुकीत बदल झाला आणि परमेश्वराने सांगितलेला मार्ग त्यांनी सोडून दिला.

18 अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूंपासून रक्षण झाले. 19 पण प्रत्येक न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा पुन्हा पापाकडे झुकत आणि अन्य दैवतांची उपासना करत आणि त्यांची सेवा करत असत. त्यांच्या पूर्वजांपेक्षाही ते अधिक वाईट वागत असत. त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे आपल्या दुर्वतनात फरक करायला त्यांनी नकार दिला.

20 तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला व तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही. 21 तेव्हा मी यापुढे त्यांच्या शत्रूंचा पराभव करुन इस्राएल लोकांचा मार्ग मोकळा करत जाणार नाही. यहोशवा वारला तेव्हा जी राष्ट्रे या भूमीत होती त्यांना मी येथेच राहू देईन. 22 इस्राएल लोकांच्या कसोटीसाठी मी या राष्ट्रांचा वापर करीन. आपल्या पूर्वजांप्रमाणे आताचे इस्राएल लोक परमेश्वराची आज्ञा पाळतात का ते बघू.” 23 तेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्या त्या ठिकाणी राहू दिले. त्यांना तो देश लगेच सोडून जायची बळजबरी केली नाही. त्यांचा पराभव करायला परमेश्वराने यहोशवाच्या सैन्याला साहाय्य केले नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 6

विशेष कामासाठी सात जणांची निवड केली जाते

अधिकाधिक लोक येशूचे अनुयायी होत होते. पण याचवेळी ग्रीक बोलणाऱ्या अनुयायांचा यहूदी अनुयायांशी वाद झाला. ते म्हणाले की, अनुयायांना मिळणारा जो रोजचा अन्नाचा वाटा असतो, तो त्यांच्या विधवांना मिळण्याविषयी दुर्लक्ष होते. बारा प्रेषितांनी सर्व अनुयायांना एकत्र बोलाविले.

प्रेषित त्यांना म्हणाले, “देवाचे वचन शिकविण्याचे आमचे काम थांबलेले आहे. हे चांगले नाही! लोकांना काही खाण्यासाठी देणे यापेक्षा देवाचे वचन सातत्याने शिकविणे हे आमच्यासाठी अधिक चांगले. म्हणून बंधूनो, तुमचे स्वतःचे सात लोक निवडा. लोकांनी त्यांना हे चांगले आहेत असे म्हटले पाहिजे. ते ज्ञानाने व आत्म्याने पूर्ण भरलेले असावेत. आणि त्यांना ही सेवा करण्यास आपण देऊ. मग आपण संपूर्ण वेळ प्रार्थना करण्यात व देवाचे वचन शिकविण्यात घालवू शकतो.”

बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास व पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), [a] प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता). नंतर त्यांनी या सात जणांना प्रेषितांसमोर उभे केले. प्रेषितांनी त्यांच्यावर हात ठेवले व प्रार्थना केली.

देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकवर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या.

स्तेफनाविरुद्ध यहूदी लोक

स्तेफन (सात लोकांपैकी एक) यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भूत चमत्कार करण्याचे सामर्ध्य दिले होते. परंतु काही यहूदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. हे यहूदी सभास्थानातून [b] आले होते. त्याला लिबर्तीनांसाठी सभास्थान असे म्हणत. (हे सभास्थान कुरेने, आणि अलेक्सांद्र येथील यहूदी लोकांसाठी सुद्धा होते). किलीकिया व आशियातील यहूदीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. ते सर्व आले आणि स्तेफानबरोबर वाद घालू लागले. 10 परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहूदी लोकांचा टिकाव लागेना.

11 तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.” 12 त्यामुळे लोकसमुदाय, यहूदी वडीलजन आणि परुशी लोक भडकले. ते इतके चिडले की, त्यांनी येऊन स्तेफनाला धरले. आणि त्याला यहूदी लोकांच्या (पुढाऱ्यांच्या) सभेत नेले.

13 आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले, ते म्हणाले, “हा मनुष्य (स्तेफन) पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो. आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. 14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की, नासरेथचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.” 15 धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.

यिर्मया 15

15 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग. ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,

“‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे,
    ते मरतीलच.
काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे,
    त्यांना तसेच मरण येईल.
काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे;
    ते अन्नावाचून मरतील.
काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे;
    त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.
मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक सोडीन.’
हा परमेश्वराचा संदेश आहे.
‘मी त्यांना मारण्यासाठी तलवारधारी शत्रू पाठवीन.
त्यांची शवे खेचून नेण्यासाठी मी कुत्र्यांना पाठवीन.
त्यांची प्रेते खाण्यासाठी मी पक्षी
    व हिंस्र प्राणी सोडीन.
पृथ्वीवरच्या सर्व लोकांना,
    एखाद्या भयंकर गोष्टीसाठी देण्याचे उदाहरण म्हणून
मी यहूदाच्या लोकांचा उपयोग करीन.
    मनश्शेने यरुशलेममध्ये जे काय केले,
    त्यासाठी मी यहूदातील लोकांना शिक्षा करीन.
    कारण मनश्शे हा हिज्कीया राजाचा मुलगा व यहूदाचा राजा होता.’

“यरुशलेम नगरी, तुझ्याबद्दल कोणालाही वाईट वाटणार नाही.
    कोणीही दु:खाने आक्रोश करणार नाही.
    तुझे कसे काय चालले आहे याची कोणीही विचारपूस करणार नाही.
यरुशलेम, तू मला सोडून गेलीस!”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“तू पुन्हा पुन्हा माझा त्याग केलास म्हणून मी तुला शिक्षा करीन.
    तुझा नाश करीन.
    तुझी शिक्षा पुढे ढकलण्याचा आता मला वीट आला आहे.
मी माझ्या खुरपणीने यहूदाच्या लोकांना वेगळे काढीन
    आणि देशाच्या सीमेबाहेर पसरवून देईन
माझे लोक सुधारले नाहीत म्हणून मी त्यांचा नाश करीन.
    मी त्यांच्या मुलांना घेऊन जाईन.
पुष्कळ स्त्रिया विधवा होतील.
    समुद्रातील वाळूच्यापेक्षा त्यांची संख्या जास्त असेल.
भर मध्यान्ही मी संहारक आणीन.
    यहूद्यांच्या तरुण मुलांच्या आयांवर तो हल्ला करील.
मी यहूदामधील लोकांना क्लेश देईन आणि त्यांच्यात घबराट निर्माण करीन.
    लवकरच मी हे घडवून आणीन.
जे कोणी संहारातून बचावले असतील.
    त्यांना शत्रू हल्ला करुन आपल्या तलवारींनी ठार मारेल.
एखाद्या स्त्रीला जरी सात मुले असतील, तरी ती सर्व मरतील.
    त्या दु:खाने ती एवढा आक्रांत करील की अशक्त होऊन तिला श्वास घेणे कठीण होईल.
ती उदास होईल व गोंधळून जाईल.
    दु:खाने तिला दिवसा, उजेडीही अंधार पसरल्यासारखे वाटेल.”

यिर्मयाचे पुन्हा देवाकडे गाऱ्हाणे

10 माते, तू मला (यिर्मयाला) जन्म दिलास
    याचा मला खेद वाटतो.
वाईट गोष्टीबद्दल सर्व देशावर दोषारोप
    व टीका करणे माझ्यासारख्याला भाग पडते.
काहीही देणे घेणे नसताना,
    मला प्रत्येकजण शिव्याशाप देतो.
11 खरे म्हणजे परमेश्वरा, मी तुझी चांगली सेवा केली.
    संकटाच्या वेळी मी शत्रूंबद्दल तुझ्याकडे विनवणी केली.

देवाचे यिर्मयाला उत्तर

12 “यिर्मया, लोखंडाच्या तुकड्याचे कोणीही शतशा तुकडे करु शकत नाही,
    हे तुला माहीत आहे.
येथे लोखंड वा पोलाद हा शब्द मी उत्तरेकडून येणाऱ्या पोलादासाठी वापरत आहे.
    तसेच कोणीही काशाचे पण तुकडे तुकडे करु शकत नाही.
13 यहूदाच्या लोकांकडे बरीच संपत्ती आहे ती संपत्ती मी दूसऱ्या लोकांना देईन.
    ती त्या लोकांना विकत घ्यावी लागणार नाही.
मीच ती त्यांना देईन.
    का? कारण यहूदाच्या लोकांनी खूप पापे केली.
    यहूदाच्या प्रत्येक भागात त्यांनी पापे केली.
14 यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला तुमच्या शत्रूचे गुलाम करीन.
    तुम्हाला अनोळखी असलेल्या प्रदेशात तुम्ही गुलाम व्हाल.
मी खूप रागावलो आहे.
    माझा राग प्रखर अग्नीसारखा आहे.
    त्यात तुम्ही जाळले जाल.”

15 परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव
    व माझी काळजी घे.
लोक मला दुखवत आहेत
    त्यांना योग्य ती शिक्षा कर.
त्या लोकांशी तू संयमाने वागतोस.
    पण त्यांना संयम दाखविताना,तू माझा नाश करू नकोस.त्यांच्याशी त्यांच्याशी संयमाने वागताना,
    माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
16 मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.)
    तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला.
तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच सर्वशक्तिमान परमेश्वर असे आहे.
17 लोकांच्या हसण्याखिदळण्यात
    आणि जल्लोशांत मी कधीच सामील झालो नाही.
माझ्यावर तुझा प्रभाव असल्याने मी एकटाच बसून राहिलो.
आजूबाजूला असलेल्या दुष्टाईबद्दल तू माझ्यात क्रोध भरलास.
18 पण तरीसुद्धा मी दुखावला का जातो?
    माझ्या जखमा भरुन येऊन बऱ्या का होत नाहीत,
ते मला समजत नाही.
    देवा, मला वाटते तू बदललास पाणी आटून गेलेल्या झऱ्याप्रमाणे तू झालास.
    ज्यातून पाणी वाहायचे थांबले आहे अशा प्रवाहाप्रमाणे तू झालास.

19 मग परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, तू बदललास आणि माझ्याकडे परत आलास,
    तर मी शिक्षा करणार नाही.
मगच तू माझी सेवा करु शकतोस वायफळ बडबड न करता, महत्वाचे तेवढेच बोललास,
    तर तू माझे शब्द बोलू शकतोस.
यहूदातील लोकांनी बदलावे
    व तुझ्याकडे परत यावे.
यिर्मया! पण तू मात्र त्यांच्यासारखा होऊ नकोस.
20 त्या लोकांना तू काश्याची भिंत वाटशील,
एवढा मी तुला बलवान करीन.
    ते तुझ्याविरुद्ध लढतील,
पण ते तुझा पराभव करु शकणार नाहीत.
    का? कारण मी तुझ्या पाठीशी आहे
मी तुला मदत करीन आणि तुझे रक्षण करीन.”

हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
21 “त्या दुष्ट लोकांपासून मी तुझे रक्षण करीन.
    ते लोक तुला घाबरवितात.
    पण त्यांच्यापासून मी तुला वाचवीन.”

मार्क 1

येशू खिस्ताचे येणे(A)

देवाचा पुत्र [a] येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:

“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे
    तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. (B)

“तेथे रानात एक व्यक्ति ओरडून सांगत होती:
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
    त्याच्यासाठी वाटा सरळ करा.’” (C)

मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंतःकरणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल. यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला.

योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.

योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही. मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”

येशूचा बाप्तिस्मा(D)

त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. 10 येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. 11 आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

परीक्षा होण्यासाठी येशू दूर जातो(E)

12 नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले. 13 येशू रानात चाळीस दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता सैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता. पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते.

येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(F)

14 यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. 15 येशू म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”

येशू काही शिष्य निवडतो(G)

16 येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन [b] व शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

19 आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते. 20 त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले.

दुष्ट आत्मा असलेल्या मनुष्याला येशू बरे करतो(H)

21 येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले. 22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. 23 त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, 24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.”

25 परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” 26 नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला.

27 आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काही तरी नवीन शिकवीत आहे. आणि तो अधिकाराने शिकवीत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकातात!” 28 मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.

येशू पुष्कळ लोकांना बरे करतो(I)

29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. 30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. 31 तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.

32 संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. 33 तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. 34 त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.

येशू लोकांना सुवार्ता सांगण्याची तयारी करतो(J)

35 अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली. 36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, 37 आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.”

38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे.” 39 मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

येशू एका आजारी मनुष्याला बरे करतो(K)

40 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ आहे.”

41 येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, “मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्टरोग बरा होवो.” 42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शूद्ध झाला.

43 येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला, 44 “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वतःला याजकाला दाखव. व स्वतःच्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे यासाठी कर की, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सर्वांना साक्ष पटावी.” 45 परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center