M’Cheyne Bible Reading Plan
यहूदाची कनान्यांवर चढाई
1 यहोशवा वारला. त्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केली. ते म्हणाले, “कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी आमच्यापैकी कोणत्या वंशाच्या लोकांनी प्रथम चढाई करावी?”
2 परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “यहूदाच्या वंशातील लोकांनी प्रथम जावे. हा प्रदेश ताब्यात घेण्यास मी त्यांना मदत करीन.”
3 यहूदाच्या लोकांनी शिमोनच्या वंशातील आपल्या बांधवांकडे मदतीची मागणी केली. ते म्हणाले, “परमेश्वराने आपल्या सर्वांना जमिनीत हिस्सा द्यायचे अभिवचन दिले आहे. आमची जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली तर तुमची जमीन ताब्यात घ्यायला आम्ही तुमच्या मदतीला येऊ.” तेव्हा शिमोनचे लोक या लढाईत यहूदी लोकांना साथ द्यायला तयार झाले.
4 परमेश्वराच्या मदतीने यहूदाच्या लोकांनी कनानी आणि परिज्जी यांचा पराभव केला. बेजेक नगरात यहूदाच्या लोकांनी दहा हजार माणसे मारली. 5 बेजेकचा राजा त्यांच्या हाती आला. त्याच्याशी ते लढले. तसेच कनानी व परिज्जी यांना पराभूत केले.
6 बजेकच्या राजाने पळून जायचा प्रयत्न केला. पण यहूदाच्या लोकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याच्या हातापायाचे अंगठे तोडले. 7 तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत सत्तर राजांच्या हातापायांचे अंगठे कापले आहेत. मी ताटाबाहेर टाकलेले अन्न त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांबरोबर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यरुशलेम येथे नेले. तेथेच तो मरण पावला.
8 यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचाही युध्दात पाडाव केला. ते ताब्यात घेतले. तलवारींचा वापर करुन त्यांनी तेथील लोकांना कापून काढले. नंतर शहराला आग लावली. 9 यहूदाचे लोक पुढे डोंगराळ प्रदेशात, नेगेबमध्ये तसेच पश्चिमेकडील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या आणखी काही कनानी लोकांवर चढाई करुन गेले.
10 मग हेब्रोन (म्हणजेच पूर्वीचे किर्याथ-आर्बा) या शहरात राहणाऱ्या कनानी लोकांशी यहूद्यांनी लढाई केली. शेशय, अहीमन आणि तलमय या तिघांना यहूद्यांनी पराभूत केले.
कालेब आणि त्याची मुलगी
11 येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.) 12 यहूदाच्या लोकांनी उठाव करण्यापूर्वी कालेब त्यांना म्हणाला, “किर्याथ सेफरचा पाडाव व्हावा अशी माझी इच्छा आहे. जो कोणी युध्दात हे नगर घेईल त्याला मी माझी मुलगीअखसा देईन. ती त्याची पत्नी होईल.”
13 कालेबला कनाज नावाचा धाकटा भाऊ होता. त्याचा मुलगा अथनिएल. अथनिएलने किर्याथ-सेफर नगर काबीज केले. तेव्हा कालेबने अथनिएलशी अखसाचा विवाह करुन दिला.
14 ती अथनिएल जवळ राहायला गेली. अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी थोडी जमीन मागायला सांगितले. ती आपल्या वडीलांकडे गेली. ती जेव्हा गाढवावरुन उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले, “काय झाले?”
15 अखसा वडीलांना म्हणाली, “मला आशीर्वाद द्या. मला तुम्ही नेगेबमधील कोरडे वाळवंट असलेली जमीन दिली आहे. तेव्हा पाणी असलेली अशी काही जमीन मला द्या.” तेव्हा कालेबने तिला हवेतसे वरच्या व खालच्या बाजूचे झरेही दिले.
16 केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.)
17 काही कनानी लोक सफात नगरात राहात होते. तेव्हा यहूदा आणि शिमोनच्या लोकांनी या कनान्यांवर हल्ला केला. त्यांनी ते नगर पूर्णपणे उध्वस्त केले आणि त्या नगराचे नाव हर्मा ठेवले.
18 मग गज्जा व त्याभोवतालची खेडी तसेच अष्कलोन व एक्रोन ही नगरे व त्यांच्या भोवतालची खेडी हा सर्व प्रदेश यहूद्यांनी काबीज केला.
19 या लढाईत परमेश्वर यहूद्यांच्या बाजूचा होता. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील जमीन घेतली पण खोऱ्यांमधील जमीन घेण्यास ते असमर्थ ठरले. कारण तेथील लोकांकडे लोखंडी रथ होते.
20 हेब्रोन जवळची जमीन कालेबला द्यायची असे मोशेने वचन दिले होते. त्याप्रमाणे ती जमीन कालेबच्या वंशजांना मिळाली. अनाकच्या तिन्ही मुलांना कालेबच्या लोकांनी तेथून हद्दपार केले.
21 बन्यामीनचे वंशज यबूसी लोकांना यरुशलेममधून हुसकावून लावू शकले नाहीत. त्यामुळे आजतागायत ते यरुशलेममध्ये बन्यामीनी लोकां बरोबर राहात आहेत.
योसेफचे वंशज बेथेल ताब्यात घेतात
22-23 योसेफच्या वंशातील लोक बेथेल नगरावर हल्ला करायला चाल करुन गेले. (बेथेलचे नांव पूर्वी लूज असे होते.) योसेफच्या लोकांना परमेश्वराची साथ होती. योसेफच्या लोकांनी आधी काही हेर बेथेलला पाठवले. बेथेलचा पाडाव करण्याच्या दृष्टीने त्यांनी टेहेळणी केली. 24 ती करत असताना त्यांना एक माणूस नगराबाहेर येताना दिसला. त्याला ते म्हणाले, “आम्हाला या नगरात जायची गुप्त वाट दाखव आम्ही या नगरावर हल्ला करणार आहोत. तू आम्हाला एवढी मदत केलीस तर आम्ही तुला धक्का लावणार नाही.”
25 तेव्हा त्या माणसाने हेरांना एक गुप्त वाट दाखवली. योसेफच्या लोकांनी बेथेलमधील लोकांना तलवारीने कापून काढले. पण या माणसाला कोणतीही इजा पोचू दिली नाही. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही त्रास दिला नाही. त्या सर्वांना त्यांनी कोठेही निघून जायला मोकळीक दिली. 26 तेव्हा तो माणूस त्याच्या कुटुंबासह हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला व तेथे त्याने एक नगर उभे केले. त्याने त्या नगराचे नाव लूज असे ठेवले आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.
इतर वंशाच्या लोकांची कनान्यांशी लढाई
27 बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची खेडी यातही कनानी लोक राहात होते. मनश्शेच्या वंशातील लोक या सर्वांना नगर सोडून द्यायला भाग पाडू शकले नाहीत. आणि त्यामुळे कनानी लोक तिथेच राहिले. त्यानी आपला प्रदेश सोडायचे नाकारले. 28 पुढे इस्राएल लोक समर्थ बनले तेव्हा त्यांनी या लोकांना आपले गुलाम म्हणून काम करायला लावले. पण कनानी लोकांना शहर सोडून जायला ते भाग पाडू शकले नाहीत.
29 एफ्राईमच्या वंशजांच्या बाबतीतही असेच घडले. गेजेर मध्ये कनानी राहात होते. त्यांना एफ्राईमचे वंशज देशातून बाहेर काढू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी लोक एफ्राईम लोकांबरोबर गेजेरमध्ये राहू लागले.
30 हीच गोष्ट जबुलूनच्या वंशजांच्या बाबतीतही घडली. कित्रोन आणि नहलोल या शहरांमध्ये ही काही कनानी राहात होते. त्यांना जबुलूनचे लोक बाहेर घालवू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी जबुलून लोकांबरोबरच राहिले. जबुलून लोकांनी त्यांना आपल्या कामांसाठी गुलाम केले.
31 आशेर लोकांच्या बाबतीतही हेच झाले. अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब या नगरांमधील लोकांना आशेर यांनी बाहेर काढले नाही. 32 कनान्यांना त्यांनी सक्तीने देश सोडायला लावला नाही. तेव्हा कनानी त्यांच्या बरोबरच राहिले.
33 नफतालींच्या बाबतीत हेच झाले. बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ येथील लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर घालवले नाही. नफताली त्या नगरांमधील लोकांबरोबर राहू लागले. तेथील कनानी लोक नफतालींचे गुलाम झाले.
34 अमोरी लोकांनी दानच्या वंशजांना डोंगराळ भागातच राहाणे भाग पाडले. त्यांना तेथेच राहावे लागले कारण अमोरी त्यांना खाली खोऱ्यात उतरुन वस्ती करु देईनात. 35 अमोरी लोकांनी हेरेस, अयालोन व शालबीम या डोंगरांमध्ये राहायचे ठरवले. पुढे योसेफचे वंशज जसे आणखी समर्य बनले तसे त्यांनी अमोऱ्यांना आपले दास म्हणून कामाला जुंपले. 36 अमोऱ्यांची सीमा अक्रब्बीम खिंडीपासून सेलापर्यंत व सेलावरुन पुढे डोंगराळ प्रदेशापर्यंत होती.
हनन्या आणि सप्पीरा
5 हनन्या नावाचा एक मनुष्य होता त्याच्या पत्नीचे नाव सप्पीरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली. 2 परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले, त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमति दिली होती.
3 पेत्र म्हणाला, “हनन्या, तू तुइया अंतःकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? 4 ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”
5-6 जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले, तो अति भयभीत झाला.
7 सुमारे तीन तासांनंतर त्याची पत्नी आत आली, सप्पीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. 8 पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हांला किती पैसे मिळाले, (अमुक) इतक्याच पैशांना मिळाले काय?”
सप्पीरास उत्तर दिले, “होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले.”
9 पेत्र म्हणाला, “देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्यानवऱ्याने का ठरविले? ऐक! त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत! (तुझ्या नवऱ्याला जसे नेले) तसेच ते तुलाही नेतील.” 10 त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. 11 सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले.
देवाचे पुरावे
12 प्रेषितांनी पुष्कळसे चमत्कार व सामर्थ्यशाली गोष्टी केल्या. सर्व लोकांनी या गोष्टी पाहिल्या. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. 13 आणि इतर लोकांतील कोणी त्यांच्याजवळ उभे राहण्याचे धैर्य करीत नसत. परंतु सर्व प्रेषितांची स्तुति करीत; 14 आणि किती तरी लोक पुढे येऊन प्रभु येशूवर विश्वास ठेवीत. अशा रीतीने बरेच पुरुष व स्त्रिया येऊन त्यांना मिळाल्या. 15 त्यामुळे पेत्र रस्त्याने जाऊ लागला म्हणजे त्याची सावली रोगी व आजारी लोकांच्यावर पडावी यासाठी लोक त्यांना वाटेवर खाट अगर अंथरुणावर ठेवीत असत. 16 लोक यरुशलेम सभोवतालच्या गावांगावातून येऊ लागले, आणि त्यांचे आजारी व भूतबाधा झालेले लोक यांना ते आणू लागले. तेव्हा ही सर्व माणसे बरी केली गेली.
यहूदी प्रेषितांना मना करण्याचा प्रयत्न करतात
17 प्रमुख याजक आणि त्याचे सर्व मित्र (सदूकी नावाचा एक गट) यांना फार हेवा वाट लागला. 18 त्यांनी प्रेषितांना धरले आणि तुरुंगात टाकले. 19 पण रात्रीच्या वेळी देवाच्या दूताने तुरुंगाचा दरवाजा उघडला. देवदूताने प्रेषितांना बाहेर आणले आणि म्हणाला, 20 “जा आणि मंदिरात उभे राहा. येशू ख्रिस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.” 21 जेव्हा प्रेषितांनी हे ऐकले, त्यांनी ती आज्ञा पाळली आणि मंदिरात गेले. ती पहाटेची वेळ होती, आणि तेथे लोकांना शिक्षण देऊ लागले, प्रमुख याजक व त्याचे मित्र सभास्थानात आले.
त्यांनी यहूदी पुढाऱ्यांची सभा आणि सर्व वडीलजन, जे यहूदी लोकांचे नेते होते यांची एकत्र सभा बोलाविली. मग प्रेषितांना तेथे घेऊन येण्यासाठी काही जणांना तुरुंगात पाठविले. 22 जेव्हा शिपाई तुरुंगामध्ये त्यांना पाहावयास गेले, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रेषित आढळले नाहीत. म्हणून त्यांनी परत जाऊन यहूदी पुढाऱ्यांना त्याविषयी सांगितले. 23 शिपाई म्हणाले, “तुरुंगाची दारे बंद केलेली व त्यांसा कुलुप लावलेले होते. तसेच पहारेकरीही दारावर पहारा देत आहेत. परंतु आम्ही जेव्हा दार उघडले, तेव्हा आतमध्ये कोणीच आढळले नाही!” 24 मंदिराच्या पहारेकऱ्यांच्या सरदाराने आणि प्रमुख याजकाने हे शब्द ऐकले. ते गोंधळात पडले, व यानंतर काय होईल याबद्दल बुचकळ्यात पडले.
25 नंतर कोणी एक आला आणि म्हणाला, “ज्या लोकांना तुम्ही तुरुंगात टाकले ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत!” 26 तेव्हा कप्तान व त्याचे लोक बाहेर गेले व प्रेषितांना पुन्हा घेऊन आले. त्यावेळी त्यांनी बळाचा वापर केला नाही, कारण त्यांना लोकांचे भय वाटले व असे वाटले की लोक कदाचित त्यांना दगडमार करतील.
27 त्यांनी प्रेषितांना आणून सभेपुढे उभे केले. प्रमुख याजकाने प्रेषितांना प्रश्न विचारले. 28 तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”
29 पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही! 30 तुम्ही येशूला मारले. तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळले. परंतु त्याच देवाने, जो आमच्या वाडवडिलांचा (पूर्वजांचा) देव होता, त्याने येशूला मरणातून उठविले! 31 देवाने त्याला उठविले व आपल्या उजवीकडे बसाविले. देवाने येशूला राजपुत्र व उद्धारकर्ता म्हणून उजवीकडे बसविले. देवाने हे यासाठी केले की, यहूदी लोकांनी त्यांची ह्रदये व जीविते बदलावीत. ह्या गोष्टी घडताना आम्ही पाहिल्या. 32 पवित्र आत्मासुद्धा हे खरे आहे हे दर्शवितो. जे लोक देवाची आज्ञा पाळतात त्या सर्वांना त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.”
33 जेव्हा यहूदी सभेच्या पुढाऱ्यांनी हे शब्द ऐकले, तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी प्रेषितांना जिवे मारण्यासंबधी विचार सुरु केला. 34 सभेमध्ये गमलीएल नावाचा एक परुशी उभा राहिला. नियमशास्त्राचा तो शिक्षक होता. आणि सर्व लोक त्याला मान देत असत, त्याने लोकांना सांगितले की, काही वेळासाठी प्रेषितांना बाहेर पाठवा. 35 नंतर तो त्यांना म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो, या लोकांना जे काही करण्याचा विचार तुम्ही करीत आहात त्याबद्दल सावधगिरी बाळगा. 36 काही काळापूर्वी थुदासचा जन्म झाला. आपण कोणी थोर असल्याचा दावा त्याने केला. सुमारे चारशे जण त्याला जाऊन मिळाले, पण त्याला ठार मारण्यात आले त्याचवेळी त्याचे अनुयायीही पांगले, ते काहीच करु शकले नाहीत. 37 नंतर, गालीलातून यहूदा नावाचा माणूस आला. ती वेळ जनगणनेची होती. त्यानेही काही अनुयायांचे नेतृत्व केले. त्यालासुद्धा मारण्यात आले. व त्याचे सर्व अनुयायी पांगले व पळून गेले. 38 म्हणून आता मी तुम्हांला सांगतो: या लोकांपासून दूर राहा. त्यांना एकटे सोडा. जर त्यांच्या योजना मनुष्यांच्या असतील तर ते अपयशी ठरतील. 39 पण जर हे देवापासून असतील तर तुम्ही त्यांना रोखू शकणार नाही. उलट तुम्ही देवाविरुद्ध लढत आहात असे होईल!”
यहूदी लोकांनी गमलीएलचा सल्ला मानला. 40 त्यांनी पेषितांना पुन्हा बोलाविले, त्यांना फटके मारले. आणि येशूच्या नावाने पुन्हा त्यांनी काही बोलू नये असा आदेश दिला. आणि त्यांनी प्रेषितांना सोडून दिले. 41 प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदानालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आंनदी झाले. 42 आणि नंतर प्रेषितांनी लोकांना शिकविण्याचे सोडले नाही. प्रेषित लोकांना सातत्याने शुभवार्ता सांगत राहिले. येशू हा प्रभु आहे, हे ते दररोज मंदिरात व लोकांच्या घरांमध्ये सांगत असत.
अवर्षण आणि तोतये संदेष्टे
14 अवर्षणाबद्दल यिर्मयाला परमेश्वराने पुढील संदेश दिला.
2 “यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे.
यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत
ते जमिनीवर पडून आहेत.
यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.
3 नेते मंडळी आपल्या नोकरांना पाणी आणण्यासाठी पाठवितात.
नोकर पाण्याच्या टाक्यांकडे जातात,
पण त्यांना थोडेसुद्धा पाणी मिळत नाही.
त्यामुळे त्यांना रिकामी भांडी घेऊन परत यावे लागते.
म्हणून ते लज्जित व खजील होऊन आपले चेहरे झाकून घेतात.
4 कोठेही पाऊस न पडल्यामुळे कोणीही पिकांसाठी
जमिनीची मशागत करीत नाही. [a]
शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे
त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले आहेत.
5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसाला एकटेच सोडून देते.
6 उघड्या डोंगरावर उभी राहून,
जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे हवा हुंगतात.
पण त्यांना कोठेही काहीही खाण्यालायक दिसत नाही.
कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.
देवाकडून मदत मिळावी म्हणून प्रार्थना
7 “या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे.
आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत.
परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर.
कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे.
आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,
8 देवा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस.
संकटकाळी तू इस्राएलला वाचवितोस.
पण, आता, तू, फक्त रात्री मुक्काम करुन पुढे
जाणाऱ्या प्रवाशासारखा वाटतोस.
9 अचानकपणे हल्ला झाल्यावर चकित झालेल्या माणसाप्रमाणे तू वाटतोस.
कोणालाही वाचविण्यास असमर्थ असलेल्या हतबल सैनिकासारखा तू दिसतोस.
पण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस.
आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो तेव्हा आम्हाला मदत न करता जाऊ नकोस.”
यहुदासाठी देवाचा संदेश
10 यहूदाच्या लोकांबद्दल देवाचे म्हणणे असे आहे: “यहूदाच्या लोकांना माझा त्याग करणे आवडते. माझा त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. तेव्हा आता परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार नाही. तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.”
11 नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या लोकांच्या भल्यासाठी तू विनवणी करु नकोस. 12 यहूदाचे लोक कदाचित् उपवास करुन माझी प्रार्थना करतील. पण ती त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. जरी त्यांनी मला होमार्पण व धान्यार्पणचा नैवेद्य दाखविला, तरी मी त्या लोकांचा स्वीकार करणार नाही. मी युद्धात यहूदाच्या लोकांचा नाश करीन. अन्न तोडून मी त्यांची उपासमार करीन. भयंकर रोगराई पसरवून मी त्यांना नष्ट करीन.”
13 पण मी परमेश्वराला म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, संदेष्टे तर लोकांना काही वेगळेच सांगत होते. ते लोकांना सांगत होते, ‘शत्रू कधीच तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुमची कधीही उपासमार होणार नाही. परमेश्वर तुमच्या देशात शांती राखेल.’”
14 मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वतःचे स्वप्नरंजन करतात. 15 माझ्या नावावर प्रवचने देणाऱ्या संदेष्ट्यांबद्दल बोलायचे झालेच तर, मी त्यांना पाठविले नाही. ते म्हणतात ‘या देशावर कोणीही हल्ला करणार नाही.’ ह्या देशाची कधीही उपासमार होणार नाही. पण ते संदेष्टेच उपासमारीने मरतील. शत्रू त्यांना ठार करील. 16 आणि ज्या लोकांशी ते संदेष्टे बोलले, ते लोक रस्त्यावर उघडे पडतील. उपासमार व शत्रू यांचे ते बळी ठरतील. त्यांचे वा त्यांच्या बायकामुलांचे दफन करण्यास कोणीही असणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन. [b]
17 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना
माझा संदेश सांग:
‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत.
माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन.
माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का?
कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे.
ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
18 मी जर त्या देशात गेलो,
तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील.
मी जर शहरात गेलो,
तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल.
कारण लोकांच्याजवळ अन्न नाही.
याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.’”
19 “परमेश्वरा, तू यहूदाला पूर्णपणे त्याज्य ठरविले आहेस का?
सियोनचा तुला तिरस्कार वाटतो का?
आमची स्थिती परत न सुधारण्याइतके तू आमचे नुकसान केले आहेस.
तू असे का केलेस?
आम्हाला शांती पाहिजे होती.
पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही.
जखमा भरुन येण्याची आम्ही आशा केली,
पण आमच्या वाट्याला फक्त भीती आली.
20 परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे.
आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली.
आम्ही तुझे अपराध केले.
21 परमेश्वरा, तुझ्या नावाचा लौकिक राखण्याकरिता,
आम्हाला दूर लोटू नकोस तुझ्या वैभवशाली सिंहासनाचा मान राख.
आमच्याशी केलेला करार आठव.
त्या कराराचा भंग करु नकोस.
22 परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही.
पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही.
तूच एक आमचे आशास्थान आहेस.
या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”
येशू मरणातून उठल्याची बातमी(A)
28 शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.
2 त्यावेळी तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून तेथे आला. तो देवदूत कबरेकडे गेला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला केली. नंतर तो देवदूत त्या घोंडेवर बसला. 3 चमकणाऱ्या विजेसारखा तो देवदूत दिसत होता. त्याचे कपडेबर्फासारखे शुभ्र होते. 4 कबरेवर पहारा करणारे शिपाई, देवदूत पाहून खूप घाबरले, ते थरथर कापू लागले. आणि ते मेलेल्या माणसासारखे झाले.
5 देवदूत म्हणाला, “भिऊ नका, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही पाहत आहात. 6 पण तो तेथे नाही. तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पाहा. 7 आता ताबडतोब निघा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, ‘येशू मरणातून उठला आहे. तो गालीलात जाणार आहे. तो तुमच्या अगोदर तेथे जाईल, तुम्ही त्याला तेथे पाहाल.’” नंतर देवदूत म्हणाला, “मी तुम्हांला सर्व काही सांगितले आहे.”
8 म्हणून त्या स्त्रिया लगबगीने कबरेजवळून निघाल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या. परंतु फार आनंदितही झाल्या होत्या. जे काही घडले ते सांगण्यासाठी त्या धावत निघाल्या. 9 अचानक येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो.” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याची उपासना केली. 10 मग येशू त्यांना म्हणाला, “मला अडवू नका. माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालीलात जावे. तेथेच त्यांची माझी भेट होईल.”
यहूदी पुढाऱ्यांना अहवाल
11 स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले. 12 नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले. आणि त्यांनी एक बेत रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले. 13 ते म्हणाले, “लोकांना असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले. 14 हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याला पटवून देऊ आणि तुम्हांला काही होऊ देणार नाही.” 15 मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर प्रचलित आहे.
येशू आपल्या शिष्यांशी बोलतो(B)
16 अकरा शिष्य गालीलास निघून गेले. येशूने सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले. 17 त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला. त्यांनी त्याची उपासना केली. पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी काहींचा विश्वास बसला नाही. 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20 आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.”
2006 by World Bible Translation Center