M’Cheyne Bible Reading Plan
तीन वंशाचे लोक स्वस्थानी परततात
22 यहोशवाने मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक यांना एकत्र बोलवले. 2 त्यांना तो म्हणाला, “परमेश्वराचा सेवक मोशे याने तुम्हाला जे जे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही वागलात. माझ्याही सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात. 3 आजपर्यंत तुम्ही आपल्या इस्राएल बांधवांनाही पाठिंबा दिलात. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काटेकोरपणे पाळल्या आहेत. 4 सर्व कठीण प्रसंगातून शांतता देण्याचे तुमच्या परमेश्वर देवाने इस्राएल लोकांना वचन दिले होते. आणि परमेश्वराने आपला शब्द खरा केला आहे. तेव्हा आता तुम्ही आपल्या घरी जाऊ शकता. यार्देनच्या पूर्वेकडील प्रदेश परमेश्वराचा सेवक मोशेने तुम्हाला दिला आहे. तेथे तुम्ही आता जाऊ शकता. 5 पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोशेचे नियम पाळत चला. परमेश्वर देवावर प्रेम करा आणि त्याच्या आज्ञा पाळा. परमेश्वराच्या मार्गाने जा आणि मनोभावे त्याची सेवा करा.”
6 एवढे बोलून यहोशवाने त्यांना निरोप दिला आणि ते निघाले. ते आपल्या घरी परतले 7 बाशानची भूमी मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिली होती. उरलेल्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यार्देनच्या पश्चिमेकडील काही जमीन यहोशवाने दिली. त्यांना आशीर्वाद देऊन यहोशवाने निरोप दिला. 8 तो म्हणाला, “तुम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले आहे. भरपूर गुरेढोरे आहेत सोने, रुपे, मौल्यवान दागदागिने तुमच्याकडे आहेत. सुंदर, तलम वस्त्रे आहेत. शत्रूच्या लुटीतील अनेक वस्तू तुम्ही घेतल्या आहेत. त्यांची आपापसात वाटणी करुन आता आपापल्या ठिकाणी परत जा.”
9 तेव्हा रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी इस्राएल लोकांचा निरोप घेऊन प्रस्थान केले. ते कनान देशातील शिलो येथे होते. तेथून निघून ते गिलाद कडे गेले. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जो प्रांत त्यांना द्यायला सांगितला होता तेथे म्हणजेच आपल्या वतनाकडे ते परत गेले.
10 रऊबेन, गाद आणि मनश्शे या वंशातील लोक गालिलोथ ठिकाणी आले. कनान देशातील यार्देन नदीच्या जवळ हे आहे. या ठिकाणी त्यांनी एक मोठी वेदी बांधली. 11 या तीन वंशांच्या लोकांनी ही वेदी बांधल्याची बातमी शिलो येथे असलेल्या इतर इस्राएल लोकांनी ऐकली. कनान देशाच्या सीमेजवळ गलिलोथ येथे ही वेदी बांधल्याचे त्यांच्या कानावर आले. इस्राएलांच्या भागात यार्देन नदी जवळ हे ठिकाण होते. 12 या बातमीने क्रुध्द होऊन सर्व इस्राएल लोकांनी एक होऊन या तीन वंशांच्या लोकांवर चढाई करण्याचे ठरवले.
13 इस्राएल लोकांनी रऊबेन, गाद व मनश्शे यांच्या वंशजांशी बोलणी करण्यास काही जणांना पाठवले. एलाजार याजकाचा मुलगा फिनहास हा त्यांचा प्रमुख होता. 14 त्याखेरीज, शिलो येथे असलेल्या इस्राएलांच्या प्रत्येक कुळातून एक अशा दहा जणांनाही पाठवले. हे दहाजण आपापल्या कुळाचे प्रमुख होते.
15 अशी अकरा माणसे गिलाद येथे गेली. रऊबेन, गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांच्याशी बोलणी करताना ते म्हणाले, 16 “सर्व इस्राएल लोकांची विचारणा आहे की. परमेश्वराविरुद्ध असलेली ही गोष्ट तुम्ही का केलीत? तुम्ही हे बंड का केलेत? परमेश्वराच्या शिकवणी विरूध्द ही वेदी तुम्ही का बांधलीत? 17 पौराला काय झाले ते आठवते ना? त्या पापाचे फळ आपण अजून भोगत आहोत. त्या भंयकर पापाची शिक्षा म्हणू आपल्यावर आजारपण ओढवले. त्यातून आपण अजूनही पूर्णतः बरे झालो नाही. 18 आणि तरी तुम्ही तेच करतात! हे परमेश्वराविरुद्ध बंड आहे. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणार आहात काय? तुम्ही हे थांबवले नाहीत तर सर्व इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप होईल.
19 “परमेश्वराच्या उपासनेला तुमची भूमी तुम्हाला चांगली वाटत नसेल तर आमच्या भागात या. आमच्या भागात परमेश्वराचे निवासस्थान आहे आमच्या वाट्याची थोडी जमीन घेऊन हवे तर राहू शकता. पण परमेश्वराच्या शिकवणुकी विरुद्ध वागू नका. आता आणखी वेदी बांधू नका. परमेश्वर देवाच्या निवासमंडपात आमच्या येथे एक वेदी आहेच.
20 “जेरहाचा मुलगा आखान आठवतो का? त्याने, नष्ट करुन टाकायच्या वस्तू विषयीची आज्ञा पाळायचे नाकारले. देवाची आज्ञा त्याने एकट्याने मोडली पण शिक्षा मात्र सर्व इस्राएल लोकांना झाली. आखान, त्याच्या पापामुळे मेला पण आणखीही बरीच माणसे मरण पावली.”
21 तेव्हा रऊबेन गाद आणि मनश्शेच्या वंशातील लोक यांनी या अकरा जणांना उत्तर दिले. ते म्हणाले, 22 “परमेश्वर हाच आमचा देव आहे. [a] परमेश्वर हाच आमचा समर्थ परमेश्वर आहे. आणि आम्ही हे का केले हे देवाला माहीत आहे. तुम्हीही समजून घ्या. आम्ही केले ते उचितच आहे हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकलो अशी तुमची खात्री पटली तर आम्हाला जिवंत ठेवू नका. 23 आम्ही देवाचा नियम मोडला असेल तर परमेश्वरानेच आम्हाला शिक्षा करावी. 24 आम्ही ही वेदी होमार्पण धान्यार्पण किंवा शांति-अर्पण करण्यासाठी बांधली असे तुम्हाला वाटते का? नाही, आम्ही ती त्यासाठी बांधली नाही. मग का बांधली बरे? उद्या कदाचित् तुमचे वंशज आम्हाला आपल्यापैकीच एक म्हणून ओळखणार नाहीत अशी आम्हाला भीती वाटली. तुम्ही कोण इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवाची आराधना करणारे? असे कदाचित् ते विचारतील. 25 देवाने आम्हाला यार्देनच्या पलीकडच्या तीरावरची जमीन दिली आहे. नदीमुळे आपण वेगळे पडलो आहोत. उद्या तुमची मुले मोठी होऊन तुमच्या प्रदेशावर सत्ता गाजवू लागली की, आम्हीही तुमच्यापैकीच आहोत हे ती विसरतील मग ते म्हणतील, ‘हे रऊबेन आणि गाद इस्राएलांपैकी नव्हेत’ आणि तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराची आराधना करायला प्रतिबंध करतील.
26 “म्हणून ही वेदी बांधायचे ठरवले. पण यज्ञार्पणे किंवा होमार्पणे करण्याच्या हेतूने ती बांधली नाही. 27 तुमचा आणि आमचा परमेश्वर एकच आहे हे दाखवणे हा वेदी बांधण्यामागचा उद्देश होता. तुम्हा आम्हाला व पुढच्या पिढ्यांना ही वेदी साक्ष राहील की हा आपला परमेश्वर आहे. आम्ही परमेश्वराला यज्ञार्पणे, अन्नार्पणे, शांतिअर्पणे करु. तुमच्याप्रमाणेच आम्हीही इस्राएल लोकांपैकी आहोत हे तुमच्या वंशजांना कळावे अशी आमची इच्छा आहे. 28 आम्ही इस्राएल नाही असे उद्या तुमची मुले म्हणाली तर आमची मुले म्हणतील, ‘ही पाहा आमच्या वाडवडिलांनी बांधलेली वेदी. ही वेदी तंतोतंत परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानामधील वेदीसारखीच आहे. ही आम्ही यज्ञासाठी वापरत नाही. आम्ही ही इस्राएलचाच एक भाग आहोत याची ही साक्ष आहे.’
29 “परमेश्वराविरुद्ध बंड करावे असे खरोखरच आम्हाला वाटत नाही. त्याच्या मार्गाने जायचे आम्ही थांबवणार नाही. परमेश्वराच्या निवासस्थानासमोरची वेदी हीच खरी हे आम्हाला माहीत आहे. तीच परमेश्वर देवाची आहे.”
30 रऊबेनी, गादी आणि मनश्शेचे लोक काय म्हणाले ते फिनहास याजक व त्याच्या बरोबर आलेले इतर प्रमुख यांनी ऐकले. त्यांना ते पटले. या लोकांचे म्हणणे खरे आहे असे त्यांचे समाधान झाले. 31 तेव्हा फिनहास याजक त्यांना म्हणाला, “परमेश्वराची आपल्याला साथ आहे हे आता आपण जाणतो. तुम्ही त्याच्याविरुध्द बंड केले नाही हे आम्हाला कळले. आता परमेश्वर इस्राएल लोकांना शिक्षा करणार नाही, म्हणून आम्हाला आनंद वाटतो.”
32 मग फिनहास आणि सर्व प्रमुख आपल्या घरी परतले. रऊबेनी आणि गादी यांना गिलाद मध्ये सोडून कनान येथे आले. त्यांनी इस्राएल लोकांना सर्व हकीकत सांगितली. 33 इस्राएल लोकांचेही त्याने समाधान झाले. आनंद वाटून त्यांनी परमेश्वराचे आभार मानले. रऊबेनी, गादी आणि मनश्शे या लोकांविरुद्ध चढाई न करण्याचे त्यांनी ठरवले. ते लोक जेथे राहात होते तो प्रदेश नष्ट न करण्याचे त्यानी ठरवले.
34 रऊबेनी आणि गादी यांनी या वेदीला नाव दिले, ते असे, “परमेश्वर हाच देव आहे असा आमचा विश्वास आहे ह्याची ही साक्ष.”
पवित्र आत्म्याचे आगमन
2 पन्रासावाचा [a] दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. 2 अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले. 3 त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. 4 ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता.
5 त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहूदी लोक होते. हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते. 6 या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला.ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली.
7 यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीली [b] आहेत! 8 पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्र देशाचे आहोतः 9 पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहूदा, कपदुकीया, पंत, आशिया [c] 10 फ्रुगिया, पंफिलीया, इजिप्त, कुरेने शहराजवळचा लिबीयाचा भाग, रोमचे प्रवासी, 11 क्लेत व अरब प्रदेश असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत. आपल्यापैकी काही जन्मानेच यहूदी आहेत. काही जण धर्मांतरीत आहेत. आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत. परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत! आपण सर्व ते देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो.”
12 ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?” 13 दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.
पेत्राचे लोकांपुढे भाषण
14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका. 15 सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हांला वाटते तसे हे लोक द्राक्षारसाच्या धुंदीत बोलत नाहीत! 16 परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेष्ट्याने लिहीले होते. योएल असे लिहिले:
17 ‘देव म्हणतो: शेवटल्या दिवसात
मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन
तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील
तुमच्या तरुणांना दृष्टांत [d] होतील;
तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील.
18 त्यावेळी मी माझा आत्मा माझ्यासेवकांवर,
पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन
आणि ते भविष्य सांगतील.
19 वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन,
खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन.
तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.
20 सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल
चंद्र रक्तासारखा लाल होईल
नंतर प्रभुचा महान व गौरवी दिवस येईल.
21 प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल.’ (A)
22 “माझ्या यहूदी बांधवानो, हे शब्द ऐका: नासरेथचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हांला हे स्प्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अदुभुत गोष्टी तुमच्यामध्ये करुन हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या. म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. 23 तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती. 24 येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही. 25 येशूविषयी दावीद असे म्हणतो:
‘मी प्रभूला नेहमी माइयासमोर पाहिले आहे;
मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माइया उजवीकडे असतो
26 म्हणून माझे हृदय आनंदात आहे
आणि माझे तोंड आनंदात बोलते.
होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील
27 कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत [e] राहू देणार नाहीस
तू तुइया पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28 तू मला कसे जगायचे ते शिकविलेस.
तू माइयाजवळ येशील.
आणि मला मोठा आनंद देशील.’ (B)
29 “माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दाविद याच्याविषयी मी तुम्हांला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला. आणि त्याची कबर आजच्या ह्या दिवसापर्यत आपल्यामध्ये आहे. 30 दावीद हा संदेष्टा [f] होता. आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की, तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील. 31 ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहीत होते. यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो:
‘त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही.
त्याचा देह कबरेमध्ये कुजला नाही.’
दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठविण्याविषयी म्हणत होता. 32 म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही! आम्ही सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले! 33 येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे. हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते. म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात! 34 दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वतः म्हणाला,
‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला:
मी तुझे वैरी
35 तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंत [g] माझ्या उजवीकडे बैस.’ (C)
36 “म्हणून, सर्व यहूदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभु व रिव्रस्त [h] असे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य!”
37 जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”
38 पेत्र त्यांना म्हणाला, “तुमची ह्रदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 39 हे अभिवचन तुम्हांसाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांनासुद्धा आहे. प्रभु आपला देव, ज्यांना स्वतःकडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.”
40 पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दांत त्यांना सावधान केले; त्याने त्यांना विनवणी केली, “ह्या युगाच्या दुष्टाई पासून स्वतःचा बचाव करा!” 41 मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.
विश्वासणाऱ्यांचा सहभाग
42 सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत. 43 प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत; आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला. 44 सर्व विश्वासणारे एकत्र राहत. प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत. 45 विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या. नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले. 46 सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात. आपले अन्न इतरंना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत. 47 विश्वासणारे देवाची स्तुति करीत. आणि सर्व लोकांना ते आवडत असत. आणि अधिकाधिक लोक तारले जात होते. व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभु रोज अनेक लोकांची भर घालीत असे.
करार मोडला आहे
11 यिर्मयाला मिळालेला संदेश असा होता: हा संदेश परमेश्वराचा होता: 2 “यिर्मया, या कराराची कलमे ऐक यहूदाच्या लोकांना या कलमांबद्दल सांग. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनाही सांग. 3 परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जे कोणी या कराराचे पालन करणार नाहीत. त्यांचे वाईट होईल.’ 4 तुमच्या पूर्वजांशी केलेल्या कराराबद्दल मी बोलत आहे. त्यांची मिसर देशातून सुटका करताना मी त्यांच्याशी हा करार केला होता. त्या वेळी मिसर देश म्हणजे पुष्कळ संकटांची भूमी होती. लोखंडालाही वितळवू शकणाऱ्या भट्टीप्रमाणे तो देश होता. मी त्या लोकांना सांगितले की तुम्ही माझी आज्ञा पाळलीत, तर तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईन.
5 “तुमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाकरिता मी हे केले. दूध व मध यांची रेलचेल असलेली सुपीक भूमी द्यायचे मी त्यांना कबूल केले होते. त्याच भूमीवर तुम्ही आता राहत आहात.”
मी (यिर्मयाने) “होय, परमेश्वरा!” म्हणून पुष्टी दिली.
6 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या शहरांतून व यरुशलेमच्या रस्त्यांतून हा संदेश शिकव. संदेश असा आहे. कराराच्या शर्ती ऐका आणि त्यांचे पालन करा. 7 मिसरच्या बाहेर येताना म्हणजेच मिसरमधून सुटका करताना मी तुमच्या पूर्वजांना इशारा दिला होता.तेव्हापासूनआतापर्यंत मी परत परत इशारादेत आलो आहे की माझी आज्ञा पाळा. 8 पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते दुराग्रही बनले आणि त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीला आवडेल तेच त्यांनी केले. माझ्या आज्ञा न पाळल्यास त्यांचे वाईट होईल असे करार सांगतो. मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व वाईट गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”
9 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांनी गुप्त योजना आखल्याचे मला माहीत आहे. 10 त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांची ते पुनरावृत्ती करीत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे संदेश ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”
11 म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यहूदाच्या लोकांना कसल्यातरी भयंकर संकटात टाकीन. त्यातून त्यांना त्यांची सुटका करुन घेता येणार नाही. त्यांना दु:ख होईल आणि मदतीसाठी ते माझा धावा करतील. पण मी त्यांचे ऐकणार नाही. 12 यहूदातील व यरुशलेममधील लोक त्या मूर्तीकडे जातील. त्यांची प्रार्थना करुन मदत मागतील ते त्या मूर्तीपुढे धूप जाळतात. पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
13 “यहूदावासीयांनो, तुमच्याकडे बऱ्याच मूर्ती आहेत. यहूदामध्ये जेवढी नगरे आहेत, जवळजवळ तेवढ्याच मूर्ती असतील. तिरस्करणीय बआल देवाची पूजा करण्यासाठी तुम्ही ज्या वेदी बांधल्या आहेत, त्याही जवळजवळ यरुशलेममधील रस्त्यांच्या संख्येइतक्या असतील.
14 “यिर्मया, तुझ्यापुरते बोलायचे झाल्यास, तू यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी आळवणी करु नकोस. मी काही ऐकणार नाही. जेव्हा ते दु:ख भोगायला लागतील, तेव्हा माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.
15 “माझी प्रेमिका (यहूदा) माझ्या घरात (मंदिरात) का?
तिला तेथे येण्याचा काही अधिकार नाही.
तिने बरीच पापे केली आहेत.
यहूदा, तुझी विशेष वचने आणि प्राण्यांचे बळी तुला विनाशापासून तारतील, असे तुला वाटते का?
मला यज्ञ अर्पण करुन तू शिक्षा टाळू शकशील असे तुला वाटते का?”
16 “दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार जैतुन झाडाचे नाव
परमेश्वराने तुला दिले.”
पण जोराच्या वादळाने देव त्या झाडाला आग लावील
आणि त्याच्या फांद्या जाळून टाकील.
17 सर्वशक्तिमान परमेश्वराने तुझे रोपटे लावले,
आणि आता तोच तुझ्यावर संकटे येणार असे म्हणतो.
का? कारण इस्राएल आणि
यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली.
त्यांनी “बआल” देवाला यज्ञ अर्पण केले
म्हणून मला राग आला.
यिर्मयाविरुद्ध कट
18 अनाथोथचे लोक माझ्याविरुद्ध कट करीत असल्याचे परमेश्वराने मला दाखविले. परमेश्वराने मला ते करीत असलेल्या गोष्टी दाखविल्या, त्यावरुन ते माझ्याविरुद्ध असल्याचे कळले. 19 लोक माझ्याविरुद्ध असल्याचे समजण्यापूर्वी मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. ते माझ्याविरुद्ध आहेत याची मला कल्पना नव्हती. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्याला मारुन टाकू म्हणजे लोक त्याला विसरतील” असे ते माझ्याबद्दल म्हणत. 20 पण परमेश्वरा तू खरा न्यायी आहेस. लोकांच्या ह्रदयांची व मनांची कशी परीक्षा करावयाची हे तू जाणतोस. मी तुला माझे मुद्दे सांगेन आणि त्यांना योग्य शिक्षा देण्याचे तुझ्यावर सोपवीन.
21 अनाथोथचे लोक यिर्मयाला मारायचे ठरवीत होते. ते लोक यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वराच्या नावावर भविष्यकथन करु नकोस, नाहीतर आम्ही तुला ठार करु” देवाने अनाथोथच्या लोकांबद्दल निर्णय घेऊन टाकला. 22 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “लवकरच अनाथोथच्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण युद्धात कामी येतील. त्यांची मुलेमुली भुकेने मरतील. 23 अनाथोथमधील एकही माणूस शिल्लक राहणार नाही. कोणीही वाचणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन. मी त्यांचे वाईट घडवून आणीन”
दहा कुमारिकांची बोधकथा
25 “त्या दिवसांत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. 2 त्या दहा मुलींपैकी पाच मुर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. 3 मूर्ख मुलींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. 4 शहाण्या मुलींनी दिव्याबरोबर तेलही घेतले. 5 वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
6 “मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, ‘वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’
7 “सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. 8 पण मूर्ख मुली, हुशार मुलींना म्हणाल्या, ‘तुमच्यातील काही तेल अम्हांला द्या. आमचे दिवे विझत आहेत.’
9 “पण उत्तरादाखल हुशार मुली म्हणाल्या, ‘नाही, आम्ही तुम्हांला काहीच देऊ शकत नाही, नाही तर तुम्हांला व आम्हांलाही पुरणार नाही. त्याऐवजी ते विकणाऱ्याकडे जा आणि आपणांसाठी तेल विकत आणा.’
10 “पाच मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले.
11 “शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘महाराज! महाराज! दार उघडा!’
12 “पण तो त्यांना उत्तरादाखल म्हणाला, ‘मी तुम्हांला खरे सांगतो:मी तुम्हांला ओळखत नाही!’
13 “म्हणून नेहमी तयार असा. कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हांला माहीत नाही.
तीन नोकरांची बोधकथा(A)
14 “स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासाला जाण्याअगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष देण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. 15 त्याच्यांतील एकाला त्याने पाच थैल्या रुपये दिले. दुसऱ्याला त्याने दोन थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने एक थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला. 16 ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे. 17 त्याचप्रमाणे, ज्याला दोन थैल्या रूपये मिळले होते त्याने आणखी दोन थैल्या रुपये कमविले. 18 पण ज्याला एक थैली मिळाली होती, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले.
19 “बराच काळ लोटल्यांनंतर त्या नोकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशेब घ्यायला सुरुवात केली. 20 ज्याला पाच थैल्या रुपये मिळाले होते, त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी पाच थैल्या आणून दिल्या, तो म्हणाला, ‘मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी पाच थैल्या रुपये मिळविले.’
21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि इमानी दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
22 “नंतर ज्या मनुष्याला रुपयांच्या दोन थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला रुपयांच्या दोन थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन थैल्या कमाविल्या.’
23 “मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि इमानी दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
24 “नंतर ज्याला रुपयाची एक थैली मिळाली होती तो मालकाकडे आला व म्हणाला, ‘मालक, मला माहीत होते की आपण एक करड्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. 25 मला आपली भीति होती. म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपवून ठेवली. हे घ्या! हे तुमचेच आहेत!’
26 “मालकाने उत्तर दिले, ‘अरे वाईट आणि आळशी नोकरा! मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते. 27 तर तू माझे पैसे पेढीत ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते.’
28 “म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, ‘याच्याजवळची रुपयांची थैली घ्या आणि ज्याच्याजवळ रुपयांच्या दहा थैल्या आहेत त्याला द्या. 29 कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल, आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.’ 30 नंतर मालक म्हणाला, ‘त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात घालवून द्या. तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
मनुष्याचा पुत्र सर्वाचा न्याय करील
31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल. 32 मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. 33 तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे. 35 हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात 36 मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात.
37 “मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? 38 आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? 39 आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो?’
40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.’
41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. 42 ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43 मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
44 “मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?’
45 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’
46 “मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.”
2006 by World Bible Translation Center