Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 20-21

आश्रयाची नगरे

20 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, इस्राएल लोकांना सांग “मोशे मार्फत मी माझी आज्ञा तुमच्यापर्यंत पोचवली. मोशेने तुम्हाला सुरक्षिततेसाठी खास नगरे उभारायला सांगितले. एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला, व त्याचा खुनाचा उद्देश नसेल तर तो माणूस या नगरात आश्रयाला जाऊ शकतो.

“त्याने असे करावे. पळून जाऊन अशा नगराशी पोचल्यावर वेशीपाशी थांबावे. तेथे गावातील वडीलधाऱ्यांना झालेली हकीकत सांगावी. मग त्यांनी त्याला आत येऊ द्यावे. त्याला आपल्यात राहण्यासाठी जागा द्यावी पण त्याचा पाठलाग करत येणारा माणूसही तेथे येऊन पोचेल तर तेव्हा या वडीलधाऱ्यांनी त्याला थोपवून धरावे. आश्रयासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देऊ नये. त्यांनी त्याला संरक्षण द्यावे. कारण ज्याला मृत्यू आला त्याला या व्यक्तीने जाणून बुजून मारलेले नाही. ती चुकून योगायोगाने घडलेली गोष्ट होती. रागाच्या भरात. मारायचे ठरवून त्याने काही केले नाही. त्यावेळी ते चुकून झाले, इतकेच. न्यायनिवाडा होईपर्यंत त्याने त्या नगरात राहावे. किंवा तेथील मुख्य याजक हयात असेपर्यंत राहावे. नंतर जेथून आला त्या आपल्या स्वतःच्या नगरात, आपल्या घरी त्याने परत जावे.”

तेव्हा “आश्रयस्थाने” म्हणून इस्राएल लोकांनी काही नगरांची निवड केली. ती नगरे अशी; नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील, गालील मधले केदेश, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम, यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-आर्बा (म्हणजेच हेब्रोन) यार्देनच्या पूर्वेला रऊबेनींच्या प्रदेशापैकी वाळवंटातील यरीहो जवळचे बेसेर, गाद वंशाच्या विभागापैकी गिलादमधील रामोथ. मनश्शेच्या वंशातील बाशानमधील गोलान.

इस्राएल लोक किंवा त्यांच्यात राहणारे परकीय यांच्यापैकी कोणाच्याही हातून चुकून मनुष्यवध झाल्यास त्याने पळून जाऊन आश्रय घ्यावा म्हणून ही नगरे नेमली. म्हणजे त्या व्यक्तीला संरक्षण मिळेल व तिचा पाठलाग करणाऱ्याच्या हातून ती व्यक्ती मारली जाणार नाही. मग त्या नगरातील न्यायसभेने निवाडा करावा.

याजक आणि लेवी यांच्यासाठी नगरे

21 मग लेवी घराण्याचे प्रमुख हे एलाजार याजक नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वेगवेगळ्या वंशाचे प्रमुख यांच्याशी बोलायला आले. ही भेट कनान देशातील शिलो येथे झाली. लेवी प्रमुख त्यांना म्हणाले, “आम्हाला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या गुराढोरांना चरण्यासाठी कुरणे द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी ही परमेश्वराची आज्ञा पाळली. त्यांनी पुढील नगरे आणि गायराने लेवींना दिली.

कहाथी हे लेवी वंशातील एक कूळ, त्याच्यातील अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा शिमोन आणि बन्यामीन यांच्या वाटणीच्या प्रदेशातील तेरा नगरे मिळाली.

एफ्राईम, दान आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्या मालकीच्या प्रदेशातील दहा नगरे उरलेल्या कहाथी कुळांना मिळाली.

इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशानमधील मनश्शेचा अर्धा वंश यांच्या भूभागातून गेर्षोनच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.

मरारीच्या वंशजांना रऊबेन गाद आणि जबुलून यांच्या वाटच्या प्रांतांतून बारा नगरे मिळाली.

परमेश्वराने मोशेला दिलेली आज्ञा इस्राएल लोकांनी पाळली व लेवी लोकांना पुढील नगरे व त्याभोवतालची शिवारे दिली.

यहूदा आणि शिमोनच्या वाटच्या प्रदेशातील नगरे दिली त्यांची नावे पुढे दिली आहेत. 10 चिठ्ठ्या टाकल्या त्यात पहिली चिठ्ठी कहाथी कुळातील लेवींची निघाल्यामूळे ही नगरे त्यांची. 11 किर्याथ-आर्बा त्यांना मिळाले (म्हणजेच हेब्रोन. अनाकचा पिता आर्बा याचे नाव या नगराला मिळाले होते.) त्याच्या आसपासची थोडी जमीनही गायरान म्हणून त्यांना मिळाली. 12 पण किर्याथ-आर्बांच्या भोवतालची शेते व खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याची होती. 13 तेव्हा त्यांनी हेब्रोन नगर अहरोनच्या वंशजांना दिले. (हेब्रोन हे आश्रयाचे नगर होते.) त्याखेरीज लिब्ना 14 यतीर, एष्टमोवा, 15 होलोन, दबीर, 16 अईन, युट्टा, आणि बेथ-शेमेश ही नगरे व गुरांसाठी शिवारे दिली. अशाप्रकारे ही नउ नगरे त्या दोन वंशांना दिली.

17 बन्यामीनच्या प्रदेशातील नगरे अहरोनच्या वंशजांना मिळाली. ती म्हणजे, गिबोन, गेबा, 18 अनाथोथ, अलमोन ही चार नगरे व भोवतालची गायराने. 19 अहरोनच्या वंशातील याजकांना त्यांनी ही तेरा नगरे व शिवारे दिली.

20 एफ्राईमच्या वाटच्या जमिनीतील नगरे कहाथी वंशातील उर्वरित लोकांना मिळाली. ती अशी: 21 एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम हे आश्रयाचे नगर, गेजेर, 22 किबसाईम व बेथ-होरोन ही चार नगरे व भोवतालची गायराने.

23 दानच्या हिश्श्यातून एल एतके. गिब्बथोन, 24 अयालोन, गथ-रिम्मोन ही चार गावे व गुरांसाठी शिवार दिले.

25 मनश्शाच्या अर्ध्या वंशाच्या मालकीच्या प्रदेशातून तानख व गथ-रिम्मोन ही दोन नगरे व शिवारे दिली.

26 कहाथी वंशाला अशी एकंदर दहा नगरे व आसपासची गायराने मिळाली.

27 लेवी वंशातील गेर्षोन कुळाला ही काही नगरे मिळाली. ती अशी:

मनश्शाच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्यांना बाशान मधील गोलान दिले (गोलान हे आश्रयस्थान होते.) बैश्तरा देखील दिले. म्हणजेच एकंदर दोन नगरे व शिवार दिली.

28 इस्साखारच्या वंशजांनी किश्शोन, दाबरथ 29 यर्मूथ, एलगन्नीम चार नगरे भोवतालची शिवारे दिली.

30 आशेरच्या वंशाजांनी मिशाल, अब्दोन, 31 हेलाकाथ, रहोब, ही चार नगरे गुरांसाठी भोवतालचे थोडे गायरान दिले.

32 नफतालीच्या कुळातील लोकांनी गालील मधले केदेश दिले. (केदेश हे आश्रयाचे नगर) नफतालींनी हम्मोथ दोर आणि कर्तान ही ही दिली. म्हणजे एकंदर तीन नगरे व गुरांना चरण्यासाठी भोवतालची शिवारे दिली.

33 गेर्षोन वंशजांना अशी एकंदर तेरा नगरे व गायराने मिळाली.

34 मरारी हे लेवी वंशातील एक कूळ, त्यांना मिळालेली नगरे अशी; जबुलूनच्या वंशजांनी यकनाम, कर्ता 35 दिम्ना नहलाल ही चार नगरे व शिवार दिली. 36 रऊबेनींनी बेसेर, याहस 37 कदेमोथ, मेफाथ ही चार नगरे व गायराने दिली. 38 गाद वंशातील लोकांनी गिलादमधील रामोथ (हे आश्रयाचे नगर) दिले. शिवाय महनाईम, 39 हेशबोन, याजेर अशी एकंदर चार नगरे व शिवारे दिली.

40 अशाप्रकारे मरारी या लेवी वंशातील शेवटच्या कुळाला बारा नगरे मिळाली.

41 म्हणजे लेवी वंशाजांना सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व गुरांना चारायला शिवारे मिळाली. इस्राएल लोकांमधील इतर सर्व वंशांच्या लोकांच्या मालकीतील ही शहरे आणि जमीन होती. 42 प्रत्येक गावाला गायरान होते. सर्वच नगराच्या बाबतीत हे खरे होते.

43 अशाप्रकारे इस्राएल लोकांना दिलेला शब्द परमेश्वराने खरा केला. कबूल केल्याप्रमाणे सर्व जमीन त्याने लोकांना दिली. लोकांनी ती ताब्यात घेतली व ते तेथे राहू लागले. 44 तसेच परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांना शब्द दिल्याप्रमाणे, सगळीकडे सर्वत्र शांतता नांदू लागली. यांना कोणताही शत्रू नामोहरण करु शकला नाही. उलट परमेश्वराच्या करणीने शत्रूच इस्राएल लोकांच्या हाती आला. 45 अशाप्रकारे परमेश्वराने दिलेले प्रत्येक वचन पुरे झाले. काहीही पुरे व्हावयाचे शिल्लक राहिले नाही. प्रत्येक शब्द प्रत्यक्षात आला.

प्रेषितांचीं कृत्यें 1

लूक दुसरे पुस्तक लिहितो

प्रिय थियफिलस,

येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले. येशूच्या सुरुवातीपासून ते, तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले. हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित [a] निवडले होते त्यांच्याशी तो बोलला. येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या. हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते. परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की, तो जिवंत आहे. येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्ये करुन दाखवून हे सिद्ध केले. मरणातून उठविले गेल्यानंतर चाळीस दिवसांपर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले. येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला. एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की, यरुशलेम सोडू नका. येशू म्हणाला, “पित्याने तुम्हांला अभिवचत दिले आहे; मी तुम्हांला त्याविषची पूर्वी सांगितले होते. येथे (यरुशलेमात) त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पाहा. योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा [b] केला. परंतु थोड्याच दिवसांत तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने [c] होईल.”

येशू वर स्वर्गात घेतला जातो

सर्व प्रेषित एकत्र जमले होते. त्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, ह्याच काळात यहूदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय?”

येशू त्यांना म्हणाला, “केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे. ह्या गोष्टीची माहिती असणे तुम्हा कडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हांला शक्ति मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माइयाविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहूदीया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.”

नंतर येशूने प्रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर, तो आकाशात उचलला गेला. प्रेषित हे पाहत असताना येशू ढगाआड गेला. आणि ते त्याला पाहू शकले नाहीत. 10 येशू दूर जात होता, आणि प्रषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परीधान केलेले दोन पुरुष (देवदूत) अचानक त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले. 11 आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले, “गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला (येशूला) जाताना तुम्ही पाहिलेत त्याच मार्गाने तो परत येईल.”

एक नवा प्रेषित निवडण्यात येतो

12 नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरुन यरुशलेमास परत गेले. (हा डोंगर यरुशलेमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.) 13 प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोट [d] म्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).

14 हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्राथेना करीत होते. काही स्त्रिया, मरीया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते.

15 काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली. (तेथे सुमारे 120 जण होते.) तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला, 16-17 “बंधुंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दावीदाकरवी बोलला ते, काहीतरी घडणे आवश्यक आहे. आपल्या गटातील एक जण जो यहूदा त्याच्याविषयी तो बोलत होता. ते असे की, यहूदा आपल्याबरोबर सेवा करीत होता. आत्मा म्हणाला की, येशूला धरुन देण्यासाठी यहूदा लोकांचे पुढारीपण करील.”

18 यहूदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्यात आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले. परंतु यहूदा आपल्या डोक्यावर पडला. त्याचे शरीर तुटले. व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. 19 यरुशलेम येथील सर्व लोकांना हे समजले. म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव हकलदमा असे ठेवले. त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ “रक्ताचे शेत” असा होता.

20 पेत्र म्हणाला, “स्तोत्रसांहितेत (यहूदाविषयी) असे लिहिले आहे:

‘त्याच्या जमिनीजवळ (मालमत्तेजवळ) लोक न जावोत;
    कोणीही तिच्यात वस्ती न करो!’ (A)

आणखी असे लिहिले आहे:

‘त्याचा कारभार दुसरा घेवो.’ (B)

21-22 “म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे. प्रभु येशू आपल्याबरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे, योहान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले त्या वेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकीच हा मनुष्य असला पाहिजे.”

23 प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले. एक जण योसेफ बर्सबा होता. (त्याचे उपनाव युस्त होते.) व दुसरा मत्थिया होता. 24-25 प्रेषितांनी प्रार्थना केली, “प्रभु, तू सर्वांची मने जाणतोस. या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहेस हे आम्हांला सांग. यहूदाने या सेवेकडे पाठ फिरवली. आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला.” 26 नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे (सोंगट्या) टाकले. फाशावरुन प्रभुला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले. म्हणून तो इतर अकरा शिष्यांसह प्रेषित झाला.

यिर्मया 10

परमेश्वर आणि मूर्ती

10 इस्राएलच्या वंशजांनो, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वर असे म्हणतो,

“दुसऱ्या देशांतील लोकांचे अनुकरण करु नका.
    आकाशात दिसणाऱ्या काही खास गोष्टींना घाबरु नका.
या आकाशातील गोष्टी बघून दुसरे देश घाबरतात.
    परंतु तुम्ही अजिबात घाबरु नका.
त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत.
त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत
कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो.
ते लोक, त्या मूर्ती चांदीसोन्याने मढवून त्यांना सुंदर रुप देतात.
त्या खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने
    खिळे मारुन घट्ट बसवितात.
इतर देशांतील अशा मूर्ती काकडीच्या
    मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत.
त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत.
    लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात.
तेव्हा त्यांना घाबरु नका.
    त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत
व चांगलेही करु शकत नाहीत.”

परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.
    तू महान आहेस.
    तुझ्या नावातच मोठेपण व सामर्थ्य आहे.
परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे.
    तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस.
म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत
    पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही.

दुसऱ्या देशातील लोक मतिमंद आणि मूर्ख आहेत.
दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्ती त्यांना उपदेश करतात.
ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा
    आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात.
ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितात त्या मूर्तीवर ते निळ्या
आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात
    “शहाणे लोक” असे “देव” तयार करतात.
10 पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे.
    खरा सजीव असा केवळ देवच आहें
    शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें
त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते.
    त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत.

11 परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या.
    ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही.
    ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.’”m

12 ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे.
    आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन
त्याने जग निर्माण केलें आपल्या समंजसपणाच्या
    आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले.
13 ढगांचा गडगडाट आणि
    आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ही देवाचीच करणी आहे.
पृथ्वीच्या प्रत्येक भागावरील आकाशात तो मेघ पाठवितो.
    पावसाबरोबर वीज पाठवितो.
    आपल्या भांडारातून वारा आणतो.

14 लोक अगदी मूर्ख आहेत.
    आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार मूर्ख बनविले जातात.
त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे.
    ते फक्त थोतांडच [a] आहे
15 त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत.
    त्या खोट्या आहेत, न्यायदानाच्या वेळी त्यांचा नाश होईल.
16 पण याकोबाचा देव त्या मूर्तीसारखा नाही.
त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली
    आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वतःचे खास लोक म्हणून निवड केली.
“सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव.

विनाश येत आहे

17 आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा.
यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून
    तुम्ही आता अडकला आहात.
18 परमेश्वर म्हणतो,
“यावेळी, मी यहूदाच्या लोकांना ह्या देशा बाहेर घालवून देईन.
    मी त्यांना त्रास देऊन दु:ख भोगण्यास भाग पाडीन
    म्हणजे त्यांना धडा मिळेल.”

19 अरेरे, मी (यिर्मया) फारच जखमी झालो.
    माझ्या जखमा भरुन येण्यासारख्या नाहीत.
तरीसुद्धा मी स्वतःलाच सांगतो, “हे माझे दु:ख
    मला पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
20 माझ्या तंबूचा नाश झाला.
    तंबूचे सर्व दोर तुटले आहेत.
माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत.
माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही.
    माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही.
21 मेंढपाळ (नेते) मूर्ख आहेत.
    ते परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत.
ते शहाणे नाहीत.
    त्यामुळे त्यांचे कळप (लोक) इतस्ततः विखरुन हरवले आहेत.
22 मोठा आवाज ऐका!
    तो आवाज उत्तरेकडून येत आहे;
यहुदातील शहरांचा तो नाश करील.
    युहदाचे निर्जन वाळवंट होईल.
    तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल.

23 परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वतःचा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे.
    लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत.
24 परमेश्वरा, आम्हाला सुधार!
    पण न्याय्य रीतीने सुधार!
रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस.
    नाही तर तू कदाचित् आमचा नाश करशील.
25 तुला राग आला असेल,
    तर दुसऱ्या राष्ट्रांना शिक्षा कर.
ते तुला जाणत नाहीत वा मान देत नाहीत.
    ते तुझी उपासना करीत नाहीत.
त्या राष्ट्रांनी याकोबच्या कुटुंबाचा विनाश केला.
    त्यांनी इस्राएल नेस्तनाबूत केले
    आणि इस्राएलच्या भूमीचा नाश केला.

मत्तय 24

मंदिराचा भावी नाश(A)

24 येशू मंदिरातून बाहेर निघून चालत निघाला होता तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. कारण त्यांना त्याला मंदिराच्या इमारती दाखवायच्या होत्या. प्रतिसादादाखल, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता. खरे ना? आता, मी तुम्हांला खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक दगड खाली टाकला जाईल.”

येशू जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात बोलावे म्हणून आले, ते म्हणाले, “आम्हांला सांगा की या गोष्टी कधी होतील? तुम्ही परत येण्याचा आणि जगाचा शेवट होण्याचा काळ जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या घटनांवरून ओळखावे?”

येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळा! कोणीही तुम्हांला फसवू नये मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, ‘मी ख्रिस्त आहे,’ आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील. तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. पण या सर्व गोष्टी म्हणजे प्रसूतीच्या कळांची सुरूवात अशा आहेत.

“लोक तुमच्याशी वाईट वागतील. तुमचा छळ व्हावा आणि तुम्हांला जिवे मारावे यासाठी लोक तुम्हांला राज्यकर्त्याच्या हाती देतील. सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून या गोष्टी तुमच्यावर ओढवतील. 10 अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. 11 अनेक खोटे संदेष्टे येतील, ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील. 12 सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीति कमी कमी होत जाईल. 13 पण जो मनुष्य शेवटपर्यंत खंबीरपणे वागेल तोच तारला जाईल. 14 सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल.

15 “दानीएल संदेष्ट्याने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की, जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी- मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.) 16 “त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17 जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये. 18 जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.

19 “त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल. 20 जेव्हा या गोष्टी होतील आणि तुम्हांला पळून जावे लागेल तेव्हा थंडीचे दिवस नसावेत अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21 कारण त्याकाळी फार पीडा येतील. जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी पीडा त्या काळी भोगावी लागेल.

22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.

23 “त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, ‘पहा! ख्रिस्त येथे आहे,’ किंवा ‘तो तेथे आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25 या गोष्टी होण्या अगोदरच मी तुम्हांला सावध केले आहे.

26 “एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, ‘पाहा, मशीहा ओसाड रानात आहे.’ तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, ‘ख्रिस्त, आतल्या खोलीत लपला आहे’, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणेदेखील असेल. 28 जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

29 “छळानंतर लगेच, असे घडेल:

‘सूर्य अंधकारमय होईल
    व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील.
    आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’ (B)

30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. 31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

32 “अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हांला कळते. 33 मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याबाबतीतही असेच होईल जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. 34 मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. 35 सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.

ती वेळं कोनती अशेल ते फक्त देवालाच ठाउक(C)

36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.

37 “नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. 38 महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यत लोक या गोष्टी करीत होते. 39 त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले.

“मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल. 40 दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 41 दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.

42 “म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे, 43 हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. 44 या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.

चांगला व वईट सेवक(D)

45 “शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? 46 मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य! 47 मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.

48 “पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? 49 तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50 आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. 51 मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center