M’Cheyne Bible Reading Plan
एफ्राईम आणि मनश्शे यांचा वाटा
16 योसेफच्या वंशजांच्या वाट्याची जमीन अशी: तिची हद्द यरीहो जवळ यार्देन नदी पासून सुरु होते व यरीहोच्या पूर्वेकडील जलाशयापर्यंत जाते. तेथून ती बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत चढत जाते. 2 मग ती बेथेल (लूज) पासून अर्की लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते. 3 मग ती पश्चिमेला वळून यफलेटी लोकांच्या सीमेजवळून लोअर बेथ-होरोन जवळ व तेथून गेजेर कडून भूमध्य समुद्राशी येऊन ठेपते.
4 योसेफची मुले: मनश्शे व एफ्राईम यांच्या वंशजांना मिळालेली जमीन अशी:
5 एफ्राईमचा वाटा; अप्पर-बेथ-होरोन जवळच्या अटारोथ अद्दार येथे पूर्वेकडील हद्द सूरु होते. 6 मिखथाथ जवळ पश्चिम हद्द सुरु होते. पूर्वेला ती तानथशिलोजवळ वळून तशीच पुढे पूर्वेकडे यानोहा येथपर्यंत जाते. 7 यानोहापासून अटारोथ व नारा येथपासून खाली येऊन यरीहोला पोचून यार्देन नदीशी थांबते. 8 तप्पूहापासून ही सीमा पश्चिमेला काना ओढ्यापर्यंत जाते व समुद्राशी तिचा शेवट होतो. ही एफ्राईमच्या लोकांना दिलेली जमीन सर्व कुळांना त्यात वाटा मिळाला. 9 एफ्राईमाची हद्दीलगतची बरीचशी गावे तशी मनश्शेच्या हद्दीतील होती. पण एफ्राईम लोकांना ती मिळाली. 10 तथापी, गेजेर मध्ये राहणाऱ्या कनानी लोकांना ते घालवू शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक अजूनही एफ्राईम लोकांमध्येच राहतात. व ते एफ्राईम लोकांचे दास झाले.
17 मनश्शेच्या वंशजांनाही जमिनीत वाटा मिळाला. मनश्शे हा योसेफचा मोठा मुलगा. आणि गिलादचा पुढारी माखीर म्हणजे मनश्शेचा मोठा मुलगा. माखीर हा मोठा लढवय्या होता. तेव्हा गिलाद आणि बाशान हे प्रदेश माखीर कुटुंबाला मिळाले. 2 मनश्शेच्या वंशातील इतर कुळांनाही जमिनीत वाटा मिळाला. अबीयेजेर, हेलेक, अस्त्रियेल, शेखेम, हेफेर व शमीदा हे ते योसेफ पुत्र मनश्शे याच्या वंशातील पुरुष होते. यांच्या कुटुंबांना जमिनीत हिस्से होते.
3 सलाफहाद हा हेफेरचा पुत्र; आणि हेफेर गिलादचा, गिलाद माखीरचा पुत्र आणि माखीर मनश्शे याचा. सलाफहादला मुलगा नव्हता त्याला पाचही मुलीच होत्या. महला, नोआ, हाग्ला, मिल्का व तिरसा ही त्यांची नावे. 4 या मुली एलाजार हा याजक व नूनाचा पुत्र यहोशवा तसेच पंच यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाल्या, “आम्हाला आमच्या पुरुष नातेवाइकांइतकाच वाटा द्यायला परमेश्वराने मोशेला सांगितले होते.” तेव्हा एलाजारने परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून त्यांनाही जमिनीत हिस्सा दिला. त्यांच्या वडीलांच्या भावांना मिळाला असता तसाच हिस्सा या मुलींना मिळाला.
5 अशाप्रकारे मनश्शेच्या वंशाला यार्देन नदीच्या पश्चिमेकडे दहा वाटे मिळाले. शिवाय नदीच्या दुसऱ्या बाजूला गिलाद आणि बाशान हे दोन प्रांत होतेच. 6 मनश्शेच्या मुलींना मुलांप्रमाणेच वाटा मिळाला. मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना गिलाद प्रांत मिळाला.
7 मनश्शेच्या जमिनी आशेरपासून मिखमथाथपर्यंत पसरलेल्या होत्या. हा भूभाग शखेम जवळचा. त्या सीमा दक्षिणेला एनतप्पूहा भागापर्यंत गेलेली होती. 8 तप्पूहा भोवतालची जमीन मनश्शेची होती, पण खुद्द तप्पूहा गाव त्याच्या अखत्यारीत नव्हते. ते मनश्शेच्या जमिनीच्या सीमेवर असून एफ्राईमाच्या वंशजाचे होते. 9 मनश्शेची हद्द तशीच पुढे दक्षिणेला काना नदीपर्यंत जात होती. हा भाग मनश्शेच्या वंशजांचा असला तरी नगरे एफ्राईमाच्या वंशजांच्या ताब्यात होती. नदीच्या उत्तरेला मनश्शेच्या जमिनीची हद्द असून ती पश्चिमेला भूमध्य समुद्रापर्यंत जात होती. 10 दक्षिणेकडील जमीन एफ्राईमची व उत्तरेकडील मनश्शेची होती. भूमध्य समुद्र ही पश्चिमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेकडील मनश्शेची होती भूमध्य समुद्र ही परिचमेकडील सीमा. ही सीमा उत्तरेला आशेरच्या जमीनीला आणि पूर्वेला इस्साखारच्या जमीनीला भिडलेली होती.
11 आशेर आणि इस्साखारच्या प्रांतातही मनश्शेच्या वंशजांची काही नगरे होती. बेथ-शान, इब्लाम आणि त्या भोवतालची खेडी मनश्शेच्या वंशजांची होती. ते दोर, एन-दोर, तानख, मगिद्दो ही शहरे व त्यांच्या भोवतालची छोटी गावे यात राहात होते. ते नफाथच्या तोज शहरात देखील राहात होते. 12 मनश्शेचे वंशज या शहराचा पाडाव करु शकले नाहीत. तेव्हा कनानी लोक बाहेर न पडता तेथेच राहिले. 13 पण इस्राएल लोकाचे सामर्ध्य वाढले. तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपल्या कामाला जुंपले. असे असले तरी त्यांना इस्राएल लोकांनी घालवून दिले नाही.
14 योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले, “तू आम्हाला जमिनीत एकच वाटा दिलेला आहेस पण आमची संख्या बरीच जास्त आहे. परमेश्वराने आम्हाला एवढी सगळी जमीन दिलेली असताना तू आम्हाला एकच हिस्सा का दिलास?”
15 यहोशवा त्यावर म्हणाला, “तुमची संख्या वाढली असेल तर मग त्या डोंगराळ प्रदेशात जा. सध्या ती जमीन परिज्जी व रेफाई यांच्या मालकीची आहे. पण एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला अपुरा पडत असेल तर त्या जमिनीचा ताबा घ्या.”
16 योसेफचे वंशज म्हणाले, “एफ्राईसचा डोंगराळ प्रदेश फारसा मोठा नाही हे खरेच. पण तेथील कनानी लोकांकडे सामर्थ्यवान आयुधे आहेत, लोखंडी रथ आहेत. इज्रेलचे खोरे, बेथ-शान आणि आसपासची गावे यांवर त्यांची हुकमत आहे.”
17 तेव्हा योसेफाचे पुत्र एफ्राईम व मनश्शे यांना यहोशवा म्हणाला, “पण तुम्ही तर संख्येने केवढेतरी आहात आणि तुमचे सामर्थ्यही मोठे आहे. तेव्हा तुम्हाला एका हिश्श्यापेक्षा जास्त भाग मिळायलाच हवा. 18 तुम्ही तो डोंगराळ प्रदेश काबीज करा. ते जंगलच आहे पण झाडे तोडून तुम्ही राहायला चांगली सपाट जागा करून घ्या. तो प्रदेश तुमच्या मालकीचा होईल. कनानी लोकांना तुम्ही तेथून घालवून द्याल. ते लोक दणकट असले आणि सशस्त्र सज्ज असले तरी तुम्ही त्यांना पराभूत कराल.”
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
8 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे: “त्या वेळी, लोक यहूदाच्या राजाची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील. ते ती हाडे चंद्र सूर्य तारे यांच्या खाली जमिनीवर पसरती. यरुशलेमच्या लोकांना चंद्र सूर्य तारे यांच्यावर प्रेम करायला, त्यांना अनुसरायला, त्यांचा सल्ला घ्यायला आणि त्यांची पूजा करायला आवडते. कोणीही ती हाडे गोळा करुन परत पुरणार नाही. ती हाडे जमिनीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
3 “मी यहूदातील लोकांना सक्तीने त्यांची घरे व त्यांचा देश सोडायला लावीन. लोकांना परक्या प्रदेशात नेले जाईल. यहूदातील जे दुष्टलोक युध्दात मारले गेले नाहीत, त्यांना आपण मारले गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
पाप आणि शिक्षा
4 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना हे सांग: ‘परमेश्वर असे म्हणतो:
“‘माणूस जमिनीवर पडल्यास
पुन्हा उठतो
व जर माणूस चुकीच्या मार्गाने गेला
तर फिरुन मागे येतो, हे तुम्हाला माहीत आहे.
5 यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले)
पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत?
ते त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.
ते वळून परत येण्याचे नाकारतात.
6 मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे.
ते योग्य ते बोलत नाहीत.
त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही.
त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत.
विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात.
युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत.
7 आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची
योग्य जाणीव असते.
करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना
नवीन घरट्यात केव्हा जायचे ते समजते.
पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.
8 “‘“आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत!” असे तुम्ही म्हणत राहता.
पण ते खरे नाही, का? कारण लेखक लेखण्यांच्या साहाय्याने खोटे बोलले आहेत.
9 त्या “शहाण्या लोकांनी” परमेश्वराची शिकवण ऐकण्याचे नाकारले
म्हणूनच ते अजिबात खरे शहाणे नाहीत.
ते “शहाणे लोक” सापळ्यात सापडले गेले.
त्यांना धक्का बसला. त्यांची अप्रतिष्ठा झाली.
10 म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन.
त्यांची शेते नव्या मालकांना देईन.
इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे.
अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत.
संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात.
11 माझे लोक अतिशय वाईट रीतीने दुखावले जात आले आहेत.
संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात
पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात, त्याप्रमाणे इलाज करतात.
ते म्हणतात, ‘ठीक आहे. ठीक आहेत.’
पण हे ठीक नाही.
12 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे.
पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही.
आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही.
म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल.
मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
13 “मी त्यांची फळे व पिके काढून घेईन.
मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“वेलींवर एकही द्राक्ष नसेल.
अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल.
एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील.
मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन. [a]
14 “आपण येथे नुसतेच का बसलो आहोत?
या भक्कम शहराकडे पळून जाऊ या,
जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या.
आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले.
म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
15 आम्ही शांतीची आशा केली
पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही.
तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले
पण अरिष्टच आले.
16 दानच्या कुळाच्या मालकीच्या भूमीवरुन
येणाऱ्या शत्रूंच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज आम्ही ऐकतो.
त्यांच्या खुरांच्या दणदणाटाने जमीन हादरते.
ते ही भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा
नाश करण्यासाठी आले आहेत.
ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना
नाश करण्यासाठी आले आहेत.
17 “यहूदाच्या लोकांनो, मी विषारी सर्प तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवीत आहे.
त्यांना आवरणे अशक्य आहे.
ते तुम्हाला दंश करतील.”
हा देवाकडून आलेला संदेश आहे.
18 देवा मी फार दु:खी आहे.
मी फार घाबरलो आहे.
19 माझ्या लोकांचे रडणे ऐक.
ह्या देशात सगळीकडे लोक मदतीसाठी आक्रोश करीत आहेत.
ते म्हणतात, “परमेश्वर अजून सियोनला आहे का?
सियोनचा राजा अजून तेथेच आहे का?”
पण देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांनी परक्या कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा केली.
त्याने मला खूप राग आला.
त्यांनी असे का केले?”
20 लोक म्हणतात,
“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा गेला,
आणि तरीही आम्हाला वाचवण्यात आले नाही.”
21 माझे लोक दुखावले म्हणजे मी दुखावलो.
मी दु:खातिरेकाने बोलू शकत नाही.
22 गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे.
तेथे नक्कीच वैद्य आहे.
मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
लोकांना भोजनाला दिलेल्या आमंत्रणाची बोधकथा(A)
22 येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकदा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला, 2 “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. 3 त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
4 “नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, ‘मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणी सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’
5 “नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला. 6 काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले. 7 राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.
8 “मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते, 9 म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ 10 मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.
11 “मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. 12 राजा त्याला म्हणाला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला. 13 तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, ‘या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’
14 “कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”
काही यहूदी पुढारी येशूला फसवू पाहतात(B)
15 मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. 16 परूशांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे (शिष्य) आणि हेरीदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही सर्वाना समान मानता. 17 म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
18 येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? 19 कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. 20 तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”
21 त्या लोकांनी उत्तर दिले, “त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.”
यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”
22 येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
काही सदूकी लोक येशूला फसवू पाहतात(C)
23 त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले (हे लोक असे समजतात की पुनरूत्थान नाही) त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला, 24 ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील. 25 आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. 26 असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले. 27 शेवटी ती स्त्री मेली. 28 आता प्रश्न असा आहे की, पुनरूत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्यांशी लग्न केले होते.”
29 उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही. 30 तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरूत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. 31 तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय? 32 तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ [a] हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”
33 जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.
कोणती आज्ञा सर्वात महत्त्वाची आहे?(D)
34 येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. 35 एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. 36 त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”
37 येशूने उत्तर दिले, “‘प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ [b] 38 ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. 39 हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.’ [c] 40 सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(E)
41 म्हणून परूशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला. 42 येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?”
परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
43 त्यावर येशू त्यांना म्हणाला, “मग दाविदाने त्याला ‘प्रभु’ असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,
44 ‘प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला,
मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत,
माझ्या उजव्या बाजूला बैस.’ (F)
45 आता, मग जर दाविद त्याला ‘प्रभु’ म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”
46 पण परूश्यांपैकी कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.
2006 by World Bible Translation Center