Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 11

उत्तरेकडील शहरांचा पराभव

11 या सर्व घटना हासोराचा राजा याबीन याने ऐकल्या. तेव्हा त्याने अनेक राजांच्या फौजा एकत्र आणण्याचे ठरवले. मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचा राजा, अक्षाफाचा राजा. तसेच उत्तरेत डोंगराळ प्रदेशात व वाळवंटी भागात राज्य करीत असलेले राजे यांना याबीनने त्याप्रमाणे कळवले. किन्नेरोथ, नेगेव येथील व पश्चिमेकडील डोंगर उत्तरणीच्या भागातील राजांनाही निरोप पाठवले. पश्चिमेकडील नाफोत दोर येथील राजाला तसेच पूर्व व पश्चिमेच्या कनानी लोकांच्या राजांनाही कळवले. अमोरी, हित्ती, परिज्जी व डेंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना तसेच हर्मोन डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मिस्पा जवळील हिव्वी लोकांनाही खबर दिली. तेव्हा या सर्व राजांच्या फौजा एकत्र आल्या. अगणित योध्दे जमा झाले. घोडे, रथ बहुसंख्य होते. ती एक अतिविशाल सेना होती असंख्य माणसांचा समुदाय समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांसारखा पसरला होता.

हे सर्व राजे मेरोम या लहानशा नदीजवळ भेटले. त्या सर्वांनी तेथेच तळ ठोकला आणि ते इस्राएलविरुध्द लढाईची आखणी करू लागले.

तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याला घाबरू नको. मी तुमच्याहातून त्यांचा पराभव करवीन. उद्या या वेळेपर्यंत तुम्ही त्या सर्वांचा संहार केलेला असेल. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडा व रथांना आगी लावा.”

यहोशवा व त्याचे सैन्य यांनी शत्रूला विस्मयचकित केले. मेरोम नदीपाशीच त्यांनी शत्रूवर हल्ला केला. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पराभव केला परमेश्वरानेच त्यांना हे बळ दिले. इस्राएलने त्यांचा सीदोन महानगरापर्यंत तसेच मिस्त्रपोथ-माईमापर्यंत व पूर्वेकडील मिस्पाच्या खोऱ्यापर्यंत पाठलाग केला. शत्रुसैन्यातील सर्वांचा संहार होईपर्यंत इस्राएल लोकांनी लढा दिला. परमेश्वराने सांगितले होते तसेच यहोशवाने केले. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडले व रथ अगीच्या भक्ष्यस्थानी टाकले.

10 मग मागे वळून यहोशवाने हासोर घेतले. हासोरच्या राजाला त्याने ठार केले. (इस्राएलविरुध्द लढणाऱ्या सर्व राज्यांचे नेतृत्व हासोरने केले होते.) 11 इस्राएल सैन्याने या नगरातील सर्वांना ठार केले. सर्वांचा समूळनाश केला. जिवंतपणाची खूण म्हणून शिल्लक ठेवली नाही. नंतर नगराला आग लावली.

12 यहोशवाने ही सर्व नगरे घेतली तेथील सर्व राजांना ठार केले. या नगरांमधील सर्वच्या सर्व गोष्टींचा विध्वंस केला. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे त्याने हे केले. 13 पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले व त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले. 14 या नगरांमध्थे मिळालेली लूट इस्राएल लोकांनी स्वतःकरता ठेवली. तसेच तेथील जनावरेही घेतली. पण तेथील लोकांना मारले कोणालाही जिवंत ठेवले नाही. 15 परमेश्वराने आपला सेवक मोशे याला फार पूर्वीच ही आज्ञा दिली होती. नंतर मोशेने हे यहोशवाला सांगितले होते. यहोशवाने परमेश्वराचे ऐकले. परमेश्वराने मोशेला सांगितले ते ते सर्व यहोशवाने न चुकता केले.

16 अशाप्रकारे यहोशवाने त्या संपूर्ण प्रदेशातील सर्व लोकांचा पराभव केला. डोंगराळ प्रदेश, नेगेव, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमेकडील डोंगरपायथा, यार्देनचे खोरे. इस्राएलचा व त्याच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश यावर त्याने ताबा मिळवला. 17 सेईर जवळच्या हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनच्या खोऱ्यातील बालगाद पर्यंतचा सर्व प्रदेशही यहोशवाने हस्तगत केला. तेथील सर्व राजांना बंदी करून त्यांना ठार केले. 18 अनेक दिवस या राजांशी त्याने हा लढा दिला होता. 19 या सर्व प्रदेशातील फक्त एकाच नगराने इस्राएल लोकांशी शांततेचा करार केला. ते म्हणजे गिबोन मधील हिव्वी. इतर सर्व नगरांचा युध्दात पाडाव झाला. 20 आपण समर्थ आहोत असे त्यांना वाटावे अशी परमेश्वराचीच इच्छा होती. जेव्हा ते इस्राएलविरुध्द लढायला उभे राहतील, तेव्हा त्यांच्यावर दया न दाखवता संहार करता येईल. मोशेला परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे, यहोशवा त्यांचा धुव्वा उडवेल (अशीच ती योजना होती)

21 हब्रोन, दबीर, अनाब व यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा व नगरांचा संपूर्ण संहार केला. 22 इस्राएलाच्या देशात एकही अनाकी माणूस शिल्लक उरला नाही. गज्जा, गथ व अश्दोद येथे मात्र काही अनाकी लोक जिवंत राहीले. 23 परमेश्वराने मोशेला फार पूर्वीच सांगून ठेवल्याप्रमाणे यहोशवाने सर्व इस्राएल देश ताब्यात घेतला. परमेश्वराने कबूल केल्या प्रमाणे हा प्रदेश इस्राएल लोकांना दिला. यहोशवाने इस्राएलाच्या वंशांप्रमाणे त्यांची हिश्श्यांमध्ये वाटणी केली. अखेर युध्द संपले आणि शांतता नांदू लागली.

स्तोत्रसंहिता 144

दावीदाचे स्तोत्र

144 परमेश्वर माझा खडक आहे.
    परमेश्वराला धन्यवाद द्या.
परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो.
    परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.
परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो.
    परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे.
परमेश्वर माझी सुटका करतो.
    परमेश्वर माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवतो.
    परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.

परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात?
    आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो?
माणसाचे आयुष्य म्हणजे हवेचा झोत,
    माणसाचे आयुष्य म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली.

परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये,
    पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल.
परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव,
    तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव.
    मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस.
    मला त्या परक्यांपासून वाचव.
हे शत्रू खोटारडे आहेत.
    ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन.
    मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन.
10 परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो.
    परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले.
11 मला या परक्यांपासून वाचव.
    हे शत्रू खोटारडे आहेत.
    ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

12 आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत.
    आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
13 आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत.
    आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत.
14     आमचे सैनिक सुरक्षित आहेत.
कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रयत्न करीत नाही.
    आम्ही लढाईवर जात नाही.
    आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.

15 अशा वेळी लोक खूप आनंदी असतात.
    जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.

यिर्मया 5

यहुदाच्या लोकांचे पाप

परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमच्या रस्त्यावरुन चाला. सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. जो सत्याचा शोध घेतो, जो सच्चेपणाने वागतो असा एखादा सज्जन माणूस सापडू शकतो का ते पाहा. जर तुम्हाला एक तरी सज्जन व सत्यशील माणूस सापडला तरी मी यरुशलेमला क्षमा करीन. लोक शपथ घेतात आणि म्हणतात, ‘परमेश्वर असेपर्यंत.’ पण ते काही त्यांच्या मनात नसते.”

हे परमेश्वरा, मला माहीत आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याशी
    एकनिष्ठपणे वागायला हवे आहे.
तू यहूदातील लोकांना चोपलेस
    पण त्यांना काही वेदना झाल्या नाहीत.
तू त्यांचा नाश केलास,
    पण त्यांनी धडा शिकण्यास नकार दिला.
ते फार दुराग्रही झालेत.
    त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना खेद वाटला नाही.

पण मी (यिर्मया) मनाशी म्हणालो,
“गरीब लोकच एवढे मूर्ख असले पाहिजेत.
    परमेश्वराच्या चालीरिती ते शिकलेले नाहीत.
    त्यांना, त्यांच्या देवाची शिकवण माहीत नाही.
म्हणून मी यहुदाच्या नेत्यांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन.
    नेत्यांना परमेश्वराच्या चालीरिती नक्कीच माहीत असतात.
त्यांना त्यांच्या देवाचे नियम माहीत असतात.
    ह्याची मला खात्री आहे!”
पण परमेश्वराच्या सेवेतून मुक्त होण्यासाठी
    सर्व नेते एकत्र जमले होते.
ते देवाच्या विरुद्ध् गेले म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करील.
    जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील.
चित्ता त्यांच्या शहराजवळ लपला आहे.
    शहरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचे तो तुकडे तुकडे करील.
यहूदातील लोकांनी पुन्हा पापे केल्याने हे घडून येईल.
    ते, अनेक वेळा, देवापासून दूर भटकत गेले आहेत.

देव म्हणाला, “यहूदा, मी तुला क्षमा करावी म्हणून तू मला एक तरी सबळ कारण सांग.
    तुझ्या मुलांनी माझा त्याग केला.
    त्यांनी मूर्तींपुढे शपथा वाहिल्या.
    पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत.
तुझ्या मुलांना पाहिजे ते सर्व मी दिले.
    पण तरी त्यांनी माझा विश्वासघात केला.
    त्यांनी आपला बराच वेळ वारांगनेबरोबर घालविला.
ते लोक, भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे आहेत.
    शेजाऱ्याच्या बायकोला वासनेने हाका मारणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते आहेत.
ह्या कर्मांबद्दल मी यहूदातील लोकांना शिक्षा करावी का?”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“हो! अशा रीतीने जीवन जगणाऱ्या राष्ट्राला मी शिक्षा करीनच, हे तू जाणतेस.
    त्यांच्या लायकीप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.

10 “यहूदाच्या द्राक्षवेलींच्या रांगातून जा.
    वेली तोडून टाका (पण त्यांचा संपूर्ण नाश करु नका)
    त्यांच्या फांद्या तोडा.
    का? ह्या फांद्या परमेश्वराच्या मालकीच्या नाहीत.
11 यहूदा व इस्राएल येथील घराणी, प्रत्येक बाबतीत,
    माझा विश्वासघात करीत आली आहेत.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.

12 “हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले.
ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही.
    आमचे काही वाईट होणार नाही.
    आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही.
    आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’
13 खोटे संदेष्टे पोकळ वाऱ्या प्रमाणे आहेत.
    देवाचे शब्द त्यांच्याजवळ नाहीत [a] त्यांचे वाईट होईल.”

14 सर्वशक्तिमान परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या.
“मी त्यांना शिक्षा करणार नाही असे ते लोक म्हणाले म्हणून,
यिर्मया, मी जे शब्द तुला देतो, ते आगीप्रमाणे असतील,
    ते लोक लाकडाप्रमाणे असतील,
ती आग त्यांना पूर्णपणे जाळून टाकील.”
15 इस्राएलच्या वारसांनो हा परमेश्वराचा संदेश आहे.
“दूरवरच्या राष्ट्राला मी, तुमच्यावर हल्ला करण्यासाठी लवकरच आणीन.
ते शक्तिशाली राष्ट्र आहे.
    ते प्राचीन राष्ट्र आहे.
त्या राष्ट्रांतील लोक तुम्हाला माहीत नसणारी भाषा बोलतात.
    ते काय बोलतात ते तुम्ही समजू शकणार नाही.
16 त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत.
    त्यांची सर्व माणसे शक्तिशाली सैनिक आहेत.
17 तुम्ही गोळा केलेले सर्व धान्य ते खातील.
    ते तुमचे सर्व अन्न खाऊन टाकतील.
ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील (त्यांचा नाश करतील) ते तुमची गुरे, शेळ्या, मेंढ्या खातील.
    ते तुमची द्राक्षे आणि अंजिरे फस्त करतील.
त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील.
    तुम्ही ज्या शहरांवर विसंबता ती भक्कम शहरे ते नष्ट करतील.”

18 “पण जेव्हा ते भयानक दिवस येतील.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे,
    तेव्हा, यहूदा, मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
19 यहूदाचे लोक तुला विचारतील,
    ‘यिर्मया, आमच्या परमेश्वर देवाने आमचे असे वाईट का केले?’
त्यांना पुढील उत्तर दे,
‘यहूदाच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराला सोडले
    आणि तुमच्या देशात तुम्ही परक्या मूर्तींची सेवा केली.
तुम्ही असे वागलात म्हणून आता
    तुम्ही परक्या देशात परक्यांचीच सेवा कराल.’”

20 परमेश्वर म्हणाला, “याकोबाच्या वंशजांना
    आणि यहूदातील राष्ट्रांना हा संदेश द्या.
21 ऐका! तुम्हा मूर्खांना अक्कल नाही.
    तुम्हाला डोळे असून दिसत नाही
    कान असून ऐकू येत नाही.
22 खरोखर तुम्हाला माझी भिती वाटते.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापावे.
    समुद्राला सीमा असावी म्हणून समुद्रकिनारे निर्माण करणारा मी एकमेव आहे.
    पाणी अखंड जागच्या जागी राहावे म्हणून मी असे केले.
    लाटा कधी किनाऱ्यावर आक्रमण करतात.
    पण त्या किनाऱ्याचा नाश करीत नाहीत.
    लाटा गर्जना करीत कधी कधी आत येतात, पण त्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
23 पण यहूदाचे लोक दुराग्रही आहेत.
    ते नेहमीच माझ्याविरुद्ध् जाण्यासाठी मार्ग आखत असतात.
    ते माझ्यापासून दूर गेले आणि त्यांनी माझा त्याग केला.
24 यहूदातील लोक आपल्या मनाशी असे कधीही म्हणत नाहीत
    ‘आपण आपल्या परमेश्वर देवाला घाबरु या आणि त्याचा मान राखू या.
    योग्य वेळेला तो आपल्याला आगोटीचा व वळवाचा पाऊस देतो.
    योग्य वेळी आपल्याला कापणी करता येईल, ह्याची तो खात्री करुन घेतो.’
25 यहूदातील लोकांनो, तुम्ही पाप केलेत म्हणूनच पावसाळा व सुगीचा हंगाम आला नाही.
    तुमच्या पापांनी परमेश्वराकडून मिळणाऱ्या ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतला आहे.
26 माझ्या माणसांत काही दुष्ट आहेत.
    ते फासेपारध्यांप्रमाणे आहेत.
हे लोक जाळे पसरवितात,
    पण पक्ष्यांना पकडण्या ऐवजी ते माणसांना पकडतात.
27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्या
    दुष्टांची घरे कपटांनी भरलेली असतात.
त्यांच्या कपटांनी त्यांना श्रीमंत व शक्तिशाली बनविले.
28     त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते पुष्ट व लठ्ठ झाले आहेत.
त्यांच्या दुष्कृत्यांना अंत नाही.
    ते अनाथांच्या वतीने बोलणार नाहीत.
    ते त्यांना मदत करणार नाहीत.
    ते गरीब लोकांना योग्य न्याय मिळवून देणार नाहीत.
29 त्यांनी केलेल्या ह्या कर्मांबद्दल मी त्यांना शिक्षा करावी का?”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“अशा राष्ट्राला मी शिक्षा करणार हे तुम्हाला माहीत आहे.
    त्यांना योग्य ती शिक्षा मी करीन.”

30 परमेश्वर म्हणतो, “यहूदात भयानक
    व धक्कादायक गोष्ट घडली आहे.
31 संदेष्टे खोटे सांगतात,
जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत.
    आणि माझ्या लोकांना हे आवडते!
पण तुमची शिक्षा जवळ
    आल्यावर तुम्ही काय कराल?”

मत्तय 19

येशू घटस्फोटाविषयी शिकवतो(A)

19 येशूने या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर तो गालीलातून निघून गेला. आणि यार्देन नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडील यहूदा प्रांतात गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे गेला आणि तेथील अनेक आजरी लोकांना येशूने बरे केले.

काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी काय?

येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, [a] आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’a म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.”

परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सोडचिठ्टी लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”

येशूने उत्तर दिले, “तुम्ही दावाची शिकवण मानण्यास नकार दिल्याने तुमच्या पत्नींना सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सोडचिठ्ठी देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हांसा सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”

10 मग त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”

11 येशूने उत्तर दिले, “लग्नाविषयीची अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येक मनुष्याला शक्य होणार नाही. परंतू काही जणांना देवाने ही शिकवण ग्रहण करण्यास संमति दिली आहे. 12 काही लोकांची लग्न न करण्याची कारणे निराळी असू शकतील. जन्मापासूनच काही माणसे अशी असतात की, ती मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. इतर काही माणसांनी काही जणांना तसे बनविलेले असते तर आणखी काही माणसांनी स्वर्गाच्या राज्याकरिता लग्न करने सोडून दिले आहे, परंतू ज्याला लग्न करणे शक्य होईल, त्या मनुष्याने लग्नाविषयी ही शिकवण मान्य करावी.”

येशू बालकांचे स्वागत करतो(B)

13 नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. 14 परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचेच आहे.” 15 मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला.

एक श्रीमंत मनुष्य येशूला अनुसरण्याचे नाकारतो(C)

16 एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”

17 येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंतकाळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”

18 त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?”

येशूने उत्तर दिले, “‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. 19 आपल्या आईवडिलांना मान दे’b आणि ‘जशी स्वतःवर प्रीति करतोस तशी इतंरावर प्रीति कर.’” [b]

20 तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?”

21 येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”

22 पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्याला फार दु:ख झाले. कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.

23 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, धनवान माणासाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. 24 मी तुम्हांला सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे जास्त सोपे आहे.”

25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”

26 येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”

27 पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत; मग आम्हांला काय मिळेल.?”

28 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा आसनांवर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. 29 ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल. 30 पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center