Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 10

सूर्य स्थिर राहिला तो दिवस

10 त्यावेळी यरूशलेमचा राजा अदोनीसदेक हा होता. यहोशवाने आय चा पाडाव ते पूर्ण उध्वस्त केल्याचे त्याने ऐकले. यरीहो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले. गिबोनच्या रहिवाश्यांनी इस्राएलांशी शांतीचा करार केल्याचे ही त्याच्या कानावर आले. आणि ते तर यरूशलेमच्या जवळच होते. तेव्हा अदोनीसदेक व त्याचे लोक फार घाबरले. कारण गिबोन काही आयसारखे छोटे नगर नव्हते. ते एखाद्या राजधानीचे असावे तसे मोठे शहर [a] होते. तेथील लोक चांगले लढवय्ये होते. साहाजिकच राजा अदोनीसदेक घाबरला. त्याने हेब्रोनचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला, “गिबोन ने यहोशवा व इस्राएल लोक यांच्याशी शांतीचा करार केला आहे. तेव्हा गिबोनवर हल्ला करण्यासाठी माझ्या बरोबर चला आणि मला मदत करा,” अशी मदतीची याचना त्याने केली.

तेव्हा यरूशलेमचा राजा, हेब्रोनचा राजा, यर्मूथचा राजा, लाखीशचा राजा तसेच एग्लोनचा राजा या अमोऱ्यांच्या पाच राजांनी आघाडी केली आणि आपले सैन्य घेऊन ते गिबोनवर चढाई करून गेले. सैन्याने त्या शहराला वेढा दिला आणि लढाईला सुरुवात केली.

ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”

तेव्हा यहोशवा आपल्या सर्व सैन्यानिशी गिलगालमधून बाहेर पडला. त्याच्याबरोबर खंदे लढवय्ये होते. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याची भीती बाळगू नका. त्यांचा पराभव करण्याची मी तुम्हाला आनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही.”

यहोशवा आणि त्याचे सैन्य रातोरात निघून गिबोनला पोहोंचले. यहोशवा येईल अशी शत्रूला सुतराम कल्पना नव्हती. म्हणून त्याने हल्ला केला तेव्हा ते चकित झाले.

10 परमेश्वराने इस्राएलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपीट केली. इस्राएल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला. गिबोनपासून बेथ-होरोनच्या वाटेपर्यंत इस्राएलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला, आणि अजेका व मक्केदा पर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले. 11 इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.

12 इस्राएल लोकांच्या हातून परमेश्वराने त्यादिवशी अमोऱ्यांचा पराभव केला तेव्हा यहोशवा सर्व इस्राएल लोकांसमोर उभा राहून म्हणाला,

“हे सूर्या गिबोनावर स्थिर राहा.
    हे चंद्रा, स्थिर राहा तू.
    अयालोनच्या खोऱ्यावर.”

13 तेव्हा लोकांनी शत्रूंचा पराभव करीपर्यंत सूर्य स्थिर राहिला, चंद्र ही थांबून राहिला. याशारच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे. सूर्य पूर्ण दिवसभर आकाशाच्या मध्यभागी थांबलेला होता. 14 असे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर ही कधी घडले नाही. परमेश्वराने त्या दिवशी माणसाचे ऐकले. परमेश्वर खरोखरच त्यादिवशी इस्राएलच्या बाजूने लढत होता.

15 यानंतर सर्व सैन्यासह यहोशवा गिलगालच्या छावणीत परतला. 16 भर युध्दात त्या पाचही राजांनी पळ काढून मक्केदा जवळच्या गुहेत आसरा शोधला होता. 17 पण कोणी तरी त्यांना तेथे लपलेले पाहिले. ते यहोशवाच्या कानावर आले. 18 तो म्हणाला, “गुहेचे तोंड प्रचंड दगड लावून बंद करा. तिथे माणसांचा पाहारा बसवा 19 पण तुम्ही स्वतःतेथे थांबून राहू नका. शत्रूंचा पाठलाग करून त्यांच्यावर मागून हल्ला करत राहा. शत्रूला त्यांच्या नगरात परतू देऊ नका. कारण तुमच्या परमेश्वर देवाने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे.”

20 यहोशवा व इस्राएल लोक यांनी शत्रूला ठार केले पण त्यातील काही कसेबसे सुटून नगरात जाऊन लपले. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले. 21 लढाई थांबल्यावर सर्व लोक मक्केदा येथे यहोशवाकडे परत आले. पण इस्राएल लोकांविरुध्द एकही शब्द काढण्याचे धैर्य कोणाचे झाले नाही.

22 यहोशवा म्हणाला, “आता ते गुहेच्या तोंडावरचे दगड हलवून त्या राजांना माझ्याकडे आणा.” 23 तेव्हा यरुशलेम. हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोनच्या त्या राजांना यहोशवाच्या माणसांनी बाहेर काढले. 24 व यहोशवासमोर हजर केले. यहोशवाने आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलावले. आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांना तो म्हणाला “पुढे व्हा आणि या राजांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा अधिकाऱ्यांनी जवळ येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.

25 यहोशवा आपल्या लोकांना म्हणाला, “खंबीर राहा आणि हिंमत धरा, घाबरु नका इथून पुढे तुम्ही ज्यांच्याशी लढाल त्या शत्रूचे परमेश्वर काय करुन टाकील ते मी तुम्हाला दाखवतो आहे.”

26 मग यहोशवाने त्या पाच राजांना ठार केले. त्यांची प्रेते पाच झाडांना लटकावली. संध्याकाळपर्यंत ती तशीच लटकत ठेवली. 27 सूर्यास्ताच्या वेळी त्याने ती झाडावरुन उतरविण्यास सांगितली. ज्या गुहेत ते राजे लपले होते तिथे ती यहोशवाच्या माणसांनी टाकून दिली आणि गुहेचे तोंड मोठमोठे दगड लोटून बंद केले. ती प्रेते त्या गुहेत आजतागायत आहेत.

28 त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.

दक्षिणे कडील नगरांचा पाडाव

29 मग सर्व इस्राएल लोकांसह यहोशवा मक्केदाहून निघाला. ते सर्व लिब्ना येथे पोहोंचले व त्या नगरावर त्यांनी हल्ला केला. 30 परमेश्वराच्या कृपेने, हे नगर आणि त्याचा राजा यांचा इस्राएल लोकांनी पराभव केला. तेथील सर्वजण प्राणाला मुकले. कोणीही त्यातून जिवंत राहिला नाही. आणि यरीहोच्या राजाचे केले तसेच इस्राएल लोकांनी या राजाचेही केले. 31 मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक लिब्ना येथून निघून लाखीशला आले. त्या नगराभोवती वेढा देऊन मग त्यांनी चढाई केली. 32 परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली. 33 गेजेरचा राजा होराम लाखीशच्या मदतीला आला होता पण यहोशवाने त्याच्या सैन्यासही पराभूत केले. त्यांच्यापैकीही कोणी वाचू शकला नाही.

34 मग लाखीशहून निघून सर्व इस्राएल लोक व यहोशवा एग्लोन येथे आले. एग्लोन भोवती तळ देऊन त्यांनी त्या शहरावर हल्ला केला. 35 त्याच दिवशी त्यांनी ते शहर काबीज करून सर्व लोकांना ठार केले. लाखीशमध्ये जसे झाले तसेच येथेही झाले.

36 एग्लोनहून ते पुढे हेब्रोनला गेले व हेब्रोनवर चढाई केली. 37 हेब्रोन शहर आणि त्याच्या भोवतालची छोटी गावे त्यांनी काबीज केली. नगरातील सर्वांचा इस्राएल लोकांनी संहार केला. एकूण एक लोक प्राणाला मुकले. एग्लोन प्रमाणेच येथेही त्यांनी शहर उध्वस्त केले व लोकांना ठार केले.

38 मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले व तेथील लोकांशी लढाई केली. 39 त्यांनी ते नगर व त्याच्या आसपासची गावे घेतली तसेच राजाचा पराभव केला. नगरातील एकूण एक जणांना ठार केले. हेब्रोन आणि लिब्ना ही नगरे व तेथील राजे यांची जी गत केली तशीच दबीर व त्याच्या राजाचीही केली.

40 अशाप्रकारे यहोशवाने डोंगराळ प्रदेश नेगेव, पश्चिमेकडील व पूर्वेकडील डोंगर उताराचा भाग येथील सर्व शहरांचा व राजांचा धुव्वा उडवला. इस्राएलच्या परमेश्वर देवाने यहोशवाला सर्व लोकांचा संहार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे यहोशवाने कोणाला ही जिवंत ठेवले नाही.

41 कादेश बर्ण्यापासून गज्जापर्यंत सर्व नगरे यहोशवाने काबीज केली. मिसरमधील गोशेन प्रांतापासून गिबोन पर्यंतच्या कक्षेतील सर्व नगरे जिंकून घेतली. 42 एकाच मोहिमेत सर्व राजे व सर्व नगरे काबीज केली. इस्राएलचा देव परमेश्वर इस्राएलच्या बाजूने लढत असल्यामुळेच यहोशवाने हे केले. 43 त्यांनंतर यहोशवा सर्व इस्राएलसह आपल्या गिलगालच्या छावणीत परतला.

स्तोत्रसंहिता 142-143

दावीदाचे मास्कील तो गुहेत असतानाची प्रार्थना.

142 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन.
    मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन.
    मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे
    मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
    पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.

मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत.
    पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही.
    मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो.
    परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
परमेश्वरा, माझी प्रार्थना
    ऐक मला तुझी फार गरज आहे.
जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव.
    ते लोक मला फार भारी आहेत.
हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर,
    म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन.
चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील
    कारण तू माझी काळजी घेतलीस.

दावीदाचे स्तुतिगीत.

143 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे
    आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
    तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.
माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करु नकोस.
    कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपराधी ठरत नाही.
पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत.
    त्यांनी माझे आयुष्य घाणीत बरबाद केले आहे.
    ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधाऱ्याथडग्यात लोटत आहेत.
मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे.
    माझा धीर सुटत चालला आहे.
पण पूर्वी घडलेल्या घटना मला आठवत आहेत.
    तू ज्या गोष्टी केल्यास त्यांचा मी विचार करतो.
    तू आपल्या महान शक्तीने ज्या गोष्टी केल्यास त्या बद्दल मी बोलत आहे.
परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो.
    तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.

परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे.
    माझा धीर आता सुटला आहे.
माझ्यापासून दूर जाऊ नकोस.
    मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.
परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव.
    माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव.
    मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.
परमेश्वरा, मी तुझ्याकडे संरक्षणासाठी येतो.
    माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
10 मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव.
    तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे.
11 परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील.
    तू खरोखरच चांगला आहेस हे
मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
12 परमेश्वरा, मला तुझे प्रेम दाखव.
    जे शत्रू मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांचा पराभव कर.
    का? कारण मी तुझा सेवक आहे.

यिर्मया 4

हा परमेश्वराचा संदेश आहे
“इस्राएल तुला परत यायचे असेल
    तर माझ्याकडे परत ये.
तुझ्या मूर्ती फेकून दे.
    माझ्यापासून दूर जाऊन भटकू नकोस.
तू ह्या गोष्टी केल्यास,
    तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरु शकशील.
‘परमेश्वर असे तो पर्यंत,’
    असे तू म्हणू शकशील.
तू हे शब्द खऱ्या, प्रामाणिक आणि योग्य, तऱ्हेने वापरु शकशील.
    तू ह्या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल.
ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या
    कृत्यांबद्दल बढाया मारतील.”

परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो:

“तुमची शेते नांगरलेली नाहीत.
    ती शेते नांगरा.
    काट्यात बी पेरु नका.
परमेश्वराची माणसे व्हा.
    तुमची ह्रदये बदला [a] यहुदातील आणि
यरुशलेममधील लोकांनो तुम्ही बदलला नाहीत,
    तर मी खूप रागावेन.
माझा राग आगीप्रमाणे वेगाने पसरुन
    तुम्हाला जाळून टाकील.
असे का घडेल?
    तुम्ही केलेल्या दुष्कृंत्यांमुळे असे घडेल.”

उत्तरेकडून येणारे अरिष्ट

“यहूदाच्या लोकांना हा संदेश द्या.

यरुशलेममधील प्रत्येकाला सांगा:
    ‘सर्व देशभर रणशिंगे फुंका,’
मोठ्याने ओरडून सांगा,
    ‘एकत्र या.
    सुरक्षिततेसाठी आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’
खुणेचे ध्वज सियोनच्या दिशेने दाखवा.
    जीव वाचविण्यासाठी पळा. वाट पाहू नका.
कारण मी उत्तरेकडून अरिष्ट आणीत आहे.
    मी भयानक विध्वंस घडवून आणीत आहे.”
सिंह त्याच्या गुहेतून बाहेर आला आहे.
    राष्ट्रांचा नाश करणाऱ्याने कूच करायला सुरवात केली आहे.
तुमच्या देशाचा नाश करण्यासाठी त्याने त्याचे घर सोडले आहे.
तुमच्या शहरांचा नाश होईल.
    तेथे कोणीही शिल्लक राहणार नाही.
म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा.
    का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.
परमेश्वर म्हणतो, “हे घडत असताना,
    राजा आणि त्याचे अधिकारी यांचा धीर सुटेल,
याजक घाबरतील,
    संदेष्ट्यांना धक्का बसेल.”

10 नंतर, मी, यिर्मया, म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू तू यहुदातील आणि यरुशलेममधील लोकांना खरोखरच युक्तीने फसविलेस. ‘तू त्यांना म्हणालास की तुम्हाला शांती मिळेल.’ पण आता, तू तलवारीचे पातेच त्यांच्या नरड्याला लावीत आहेस.”

11 त्या वेळेला यहुदा व यरुशलेम येथील
    लोकांना एक संदेश दिला जाईल.
“उजाड टेकड्यावरुन गरम वारा वाहतो.
    तो वाळवंटातून माझ्या लोकांकडे वाहत येतो.
फोलकटापासून धान्य वेगळे करण्याकरिता शेतकरी ज्या वाऱ्याचा उपयोग करतात,
    तसा हा सौम्य वारा नाही.”
12 हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे
    आणि तो माझ्याकडून येतो आता,
“मी यहुदाच्या लोकांविरुद्ध् माझा निकाल जाहीर करीन.”
13 पाहा! शत्रू ढगाप्रमाणे वर येतो.
    त्याचे रथ वावटळीप्रमाणे दिसतात,
    त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत.
हे सर्व आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे.
    आपला विध्वंस झाला!
14 यरुशलेममधील लोकांनो, तुमच्या मनातील पाप धुवून टाका.
तुमची मने शुद्ध् करा.
    मग तुम्ही वाचविले जाऊ शकता.
    दुष्ट बेत करीत बसू नका.
15 ऐका! दान प्रांतातून दूताचा
    आवाज येत आहे.
एफ्राईम ह्या टेकड्यांच्या देशातून
    हा माणूस वाईट बातमी आणीत आहे.
16 “ही बातमी ह्या देशाला कथन करा.
    यरुशलेमच्या लोकांत ही बातमी पसरवा दुरवरच्या देशांतून शत्रू येत आहेत.
यहुदाच्या विरुद्ध् ते युद्धाची घोषण करीत आहेत.
17 शेताचे रक्षण करण्यासाठी लोक शेताभोवती कडे करतात
    तसा शत्रूने यरुशलेमला वेढा घातला आहे.
यहूदा, तू माझ्याविरुद्ध् गेलीस
    म्हणून शत्रू तुझ्याविरुद्ध् चढाई करण्यास येत आहे.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
18 “तू ज्या तऱ्हेने राहिलीस आणि जी कर्मे केलीस.
    त्यामुळे हे संकट तुझ्यावर आले.
तुझ्या पापाने तुझे जीवन कठीण केले.
तुझ्या पापी जीवनामुळे, तुझ्या अंतःकरणाला
    खोल जखमा होऊन वेदना झाल्या.”

यिर्मयाचा आक्रोश

19 अरे रे! दु:खाने आणि काळजीने माझ्या पोटात खड्डा पडत आहे.
    मी वेदनेने वाकत आहे.
मी खरच खूप घाबरलो आहे.
    माझ्या ह्रदयात धडधडत आहे.
मी गप्प बसू शकत नाही का?
    मी रणशिंग फुंकलेले ऐकले आहे.
    रणशिंग सैनिकांना युद्धासाठी बोलावीत आहे.
20 अरिष्टामागून अरिष्ट येते.
    संपूर्ण देशाचा नाश झाला.
अचानक माझ्या तंबूचा नाश झाला.
    कनाती फाडल्या गेल्या.
21 परमेश्वरा, युद्धाची निशाणी मला किती काळ पाहिली पाहिजे?
    किती वेळ मी रणशिंग ऐकले पाहिजे?
22 देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत.
    ते मला ओळखत नाहीत.
ती मूर्ख मुले आहेत
    त्यांना समजत नाही.
दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत
    पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.”

अरिष्ट येत आहे

23 मी पृथ्वीकडे पाहिले.
    पृथ्वी उजाड आणि
    अस्ताव्यस्त होती.
पृथ्वीवर काहीही नव्हते.
    मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता. [b]
24 मी डोंगराकडे पाहिले ते कापत होते.
    सर्व टेकड्या थरथरत होत्या.
25 मी पाहिले पण कोठेही माणसे नव्हती.
    आकाशातील सर्व पक्षी दूर उडून गेले होते.
26 मी पाहिले आणि सुपीक जमिनीचे वाळवंट झाले.
    त्या भूमीवरील सर्व शहरांचा नाश झाला.
परमेश्वराने हे घडविले.
    परमेश्वराने आणि त्याच्या क्रोधाने हे घडवून आणले.

27 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:
“संपूर्ण देशाचा नाश होईल.
    (पण मी देशाचा संपूर्ण नाश करणार नाही.)
28 म्हणून देशातील लोक मृतांसाठी शोक करतील.
    आकाश काळे होईल.
मी बोललो आहे ते बदलणार नाही.
    मी निर्णय घेतला आहे आणि मी बदलणार नाही.”

29 यहुदातील लोक घोडेस्वारांचा व
    धनुर्धरांचा आवाज ऐकतील आणि ते पळून जातील.
काही लोक गुहांतून लपतील काही झुडुपांत लपतील.
    काही डोंगरकड्यांवर चढतील.
यहुदातील सर्व शहरे ओस पडतील.
    तेथे कोणीही राहणार नाही.

30 यहूदा, तुझा नाश होत आला आहे.
    मग आता तू काय करीत आहेस?
तुझा उत्तम लाल पोशाख तू का घालीत आहेस?
तुझे सोन्याचे दागिने तू का घालीत आहेस?
तू डोळ्यांचा साजशृंगार का करीत आहेस?
तू स्वतःला सुंदर बनवितेस
    पण हे वेळेचा अपव्यय करणे आहे.
तुझे प्रियकर तुझा तिरस्कार करतात.
    ते तुला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
31 स्त्री प्रसूतिवेदना होताना ओरडते, तसा आवाज मी ऐकतो.
    पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तशीच ती किंकाळी आहे.
    हा सियोनकन्येचा आवाज आहे.
ती प्रार्थनेसाठी हात जोडत आहे.
    ती म्हणत आहे, “हे देवा, मी चक्कर येऊन पडण्याच्या बेतात आहे.
    खुन्यांनी मला घेरले आहे!”

मत्तय 18

सर्वात महान कोण हे येशू सांगतो(A)

18 त्या वेळस शिष्य आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”

तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, आणि म्हटले, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. म्हणून जो कोणी आपणांला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे.

“आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.

पापाचा परिणामा बद्दल येशू इशारा देतो(B)

“परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे. जगाचा धिक्कार असो कारण त्याच्यातील काही गोष्टींमुळे ते लोकांना पापात पाडते. तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या गोष्टींना कारणीभूत होतात. त्यांना फार अहिताचे ठरेल.

“जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. तुम्ही एखादा अवयव गमावला, परंतु अनंतकाळचे जीवन मिळविले तर त्यात तुमचे जास्त हित आहे. दोन हात व दोन पाय यांच्यासह कधीही न विझणाऱ्या अग्नीत (नरकात) तुम्ही टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे होईल. जर तुमचा डोळा तुम्हांला पापात पाडीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या. कारण एकच डोळा असला आणि तुम्हाला अनंतकालचे जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यांसह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.

येशू हरवलेल्या मेंढराची बोधकथा सांगतो(C)

10 “सावध असा. ही लहान मुले कुचकामी आहेत असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो की, या लहान मुलांचे देवदूत स्वर्गात असतात आणि ते देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याबरोबर नेहमी असतात. 11 [a]

12 “जर एखाद्या मनुष्याजवळ 100 मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो 99 मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरु शोधायला जाईल की नाही? 13 आणि जर त्या मनुष्याला हरवलेले मेंढरू सापडले तर त्याला कधीही न हरवलेल्या 99 मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. मी तुम्हांला खरे सांगतो, 14 तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.

जेव्हा एखादी व्यक्ती तुमचे वाईट करते(D)

15 “जर तुझा भाऊ अगर तुझी बहीण तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्याला किंवा तिला तुझ्यावर काय अन्याय झाला ते सांग आणि तोही एकांतात सांग. जर त्यांने किंवा तिने तुझे ऐकले तर त्याला किंवा तिला आपला बंधु किंवा बहीण म्हणून परत मिळविले आहेस. 16 पण जर तो किंवा ती तुझे एकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, [b] 17 जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीसमोर ही गोष्ट मांड. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकाणार नाही, तर मग तो देवाचा नाही, असे समज किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.

18 “मी तुम्हांला खरे सांगतो, जेव्हा तुम्ही जगात न्याय कराल तेव्हा तो देवाकडून झालेला न्याय असेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा कराल तेव्हा ती देवाकडून झालेली क्षमा असेल. 19 “तसेच मी तुम्हाला सांगतो की, जर तुमच्यापैकी दोघांचे एखाद्या गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरिता प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही जी गोष्ट मागाल तुमचा स्वर्गीय पिता तिची पूर्तता करील. 20 हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”

क्षमा नकरणाऱ्या नोकराचा दाखला

21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?”

22 येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळा [c] अन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”

23 “म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले. 24 जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे 10,000 चांदीच्या नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले. 25 त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.

26 “परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हांला परत करीन.’ 27 त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले, म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले.

28 “नंतर त्याच नोकराचे काही शेकडे रुपये देणे लागत असलेला दुसरा एक नोकर पहिल्या नोकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या नोकराचा गळा पकडला आणि तो त्याला म्हाणाला, ‘तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.’

29 “परंतु दुसरा नोकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, ‘मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हांला देणे लागतो ते परत करीन.’

30 “पण पहिल्या नोकराने दुसऱ्या नोकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्याला तुरूंगात टाकले. तेथे त्याला त्याचे कर्ज फिटेपर्यंत राहावे लागणार होते. 31 घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या नोकरांनी पाहिला तेव्हा ते फार दु:खी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.

32 “तेव्हा पहिल्या नोकारच्या मालकाने त्याला बोलाविले व तो त्याला म्हणाला, ‘दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. 33 म्हणून तू तुझ्याबरोबरच्या नोकारालाही तशीच दया दाखवायची होतीस.’ 34 मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या नोकाराला तुरूंगात टाकले, आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरूंगातून सोडले नाही.

35 “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center