M’Cheyne Bible Reading Plan
आय नगराचा संहार
8 मग परमेश्वर यहोशवाला म्हणला, “भिऊ नको, हात पाय गाळू नको. सर्व योध्द्यांना घेऊन आय वर चाल करून जा. आयच्या राजाचा पराभव करायला मी मदत करीन.तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी तुमच्या हाती देईन. 2 यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”
3 तेव्हा यहोशवाने सर्व सैन्यासह आय नगराकडे मोहरा वळवला. आपल्या सैन्यातील तीस हजार उत्कृष्ट योध्द्यांची निवड केली व त्यांना रातोरात पाठवले. 4 त्यांना आज्ञा केली, “मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. नगराच्या मागील बाजूस दबा धरून बसा. हल्ल्याच्या योग्य वेळेची वाट पाहा. फार लांब जाऊ नका. टेहेळणी करत तयारीत राहा. 5 नगरावर हल्ला करायला लोकांना घेऊन मी पुढे जाईन. नगरातील लोक आमचा सामना करायला समोर येतील. तेव्हा आम्ही माघार घेऊन मागील वेळेप्रमाणे पळत सुटू. 6 हे लोक आमचा पाठलाग करत नगरापासून दूर येतील. पूर्वींप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत असे त्यांना वाटेल (त्यांचा हा समज कायम ठेवायला) आम्ही पळत सुटू. 7 तेव्हा तुम्हीआपल्या लपण्याच्या जागा सोडून बाहेर या आणि नगराचा ताबा घ्या. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जिंकण्याचे सामर्थ्य देईल.
8 “परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागा. माझ्याकडे लक्ष असू द्या नगरावर हल्ला करण्याची मी आज्ञा देईन. तेव्हा नगर काबीज करून त्याला आग लावा.”
9 मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.
10 दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व लोकांना एकत्र आणले यहोशवा व इस्राएलाच्या पुढाऱ्यांनी या लोकांसह आय कडे मोर्चा वळवला. 11 सर्व सैन्य आयवर चाल करून गेले. नगराजवळ पोचल्यावर त्यांनी उत्तरेस तळ दिला. हे सैन्य आणि आय यांच्यामध्ये एक दरी होती.
12 यहोशवाने मग जवळजवक पाच हजार माणसांना आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या मध्ये दबा धरून बसण्यास पाठवले. 13 अशाप्रकारे त्याने आपल्या सैन्याला सज्ज ठेवले होते. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेला होती. इतर माणसे पश्चिमेला दबा धरून बसली होती. रात्री यहोशवा त्या दरीत राहिला.
14 आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो व नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.
15 आयच्या सैन्यापुढे आपली पीछेहाट होते आहे असे यहोशवा व इस्राएलच्या लोकांनी भासवले आणि ते वाळवंटाच्या दिशेला पूर्वेकडे पळत सुटले. 16 आयच्या सैन्याने आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. नगरातील सर्व लोक यात सामील झाले नगरतील सगळे नगर सोडून बाहेर पडले. 17 आय आणि बेथेल मधील एकूणएक माणसे इस्राएल सैन्याच्या पाठलागावर गेली. नगर मोकळे झाले. त्याचे रक्षण करायला कोणी उरला नाही.
18 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आता तुझ्या हातातील शस्त्र आय नगरावर उगार. मी हे नगर तुझ्या हवाली करत आहे.” तेव्हा यहोशवाने आयवर आपली बरची उगारली. 19 दबा धरून बसलेल्या इस्राएलांनी हे पाहताच आपल्या जागा सोडल्या आणि ते तात्काळ नगरावर चालून गेले. नगरात शिरून त्यांनी त्याचा ताबा घेतला. लगेचच त्यांनी नगरात जाळपोळ सुरू केली.
20 आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली. 21 आपल्या माणसांनी नगराचा ताबा घेतला आहे आणि नगरातून धूर निघत आहे हे पाहताच यहोशवाने व इस्राएल लोकांनी मागे वळून आयच्या लोकांवर हल्ला केला. 22 ते पाहून लपून राहिलेली आणखी माणसे त्यांच्यावर चाल करू आली. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी चाल करून येऊन इस्राएलांनी आयच्या लोकांची चांगलीच कोंडी केली. त्यांनी आयचा पराभव केला. आय वासियांपैकी एकहीजण जिवंत राहिला नाही की निसटून जाऊ शकला नाही. 23 आयच्या राजाला मात्र जीवदान मिळाले. त्याला पकडून यहोशवापुढे हजर करण्यात आले.
युध्दाचे सारांशवर्णन
24 या लढाईत इस्राएलाच्या सैन्याने आयच्या लोकांचा मोकळ्या मैदानात तसेच वाळवंटात पाठलाग करत त्या साऱ्यांची कत्तल केली. नंतर ते नगरात परतले व तेथे उरलेल्या सर्वांची हत्या केली. 25 अशाप्रकारे आय मधील सर्वजण त्यादिवशी मरण पावले. बायकापुरूष मिळून ती बारा हजार माणसे होती. 26 हे नगर उध्वस्त करायचा इशारा म्हणून यहोशवाने आपली बरची आयवर उगारलेली होती आणि सर्वांचा संहार होईपर्यंत त्याने ती तशीच उगारलेली ठेवली. 27 शहरातील गुरेढोरे आणि इतर मालमत्ता इस्राएल लोकांनी स्वतःसाठी ठेवली. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिल्या तेव्हा यासाठी अनुमती दिलेलीच होती.
28 यहोशवाने नंतर हे शहर बेचिराख करून टाकले. तेथे निव्वळ दगडधोंड्यांची रास उरली. आजही तेथे तशीच स्थिती आहे. 29 आयच्या राजाला यहोशवाने एका झाडावर फाशी दिले आणि संध्याकाळपर्यंत त्याचे प्रेत तसेच तेथे टांगत ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी त्याने ते लोकांना उतरवायला सांगितले. त्यांनी ते झाडावरून काढून नगराच्या वेशीपाशी टाकले. व तो मृतदेह दगडाधोंड्यांनी झाकून टाकला. तीही रास आज तशीच आहे.
आशीर्वाद आणि शाप यांचे वाचन
30 मग यहोशवाने एबाल पर्वतावर इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवासाठी वेदी बांधली. 31 परमेश्वराचा सेवक मोशे याने वेद्या कशा बांधाव्यात हे इस्राएल लोकांना सांगितले होते. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्रात लिहून ठेवल्या बरहुकूम यहोशवाने ती बांधली. त्यासाठी कोणत्याही हत्याराचा स्पर्श न झालेले अखंड पाषाण वापरले. अशा वेदीवर त्यांनी होमार्पणे तसेच शांत्यार्पणे वाहिली.
32 त्याठिकाणी समस्त इस्राएल लोकांसाठी म्हणून यहोशवाने मोशेच्या नियमशास्त्राची पाषाणांवर नक्कल करून ठेवली. 33 यावेळी सर्व वडीलधारी माणसे, अंमलदार, न्यायाधीश व इतर इस्राएल लोक पवित्र करारकोशाभोवती उभे होते. हा परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहून नेणाऱ्या लेवी याजकांसमोर ते उभे होते. उपस्थितात मूळचे इस्राएल लोक तसेच परकेही होते. त्यांच्यापैकी निम्मे एबाल पर्वतासमोर तर निम्मे गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिले. परमेश्वरचा सेवक मोशे याने आशीर्वादाच्या वाचनासाठी त्यांना तसे उभे राहायला सांगितले होते.
34 मग यहोशवाने नियमशास्त्रातील आशीर्वचने आणि शापवाणी वाचून दाखवली त्यात एका शब्दाचाही फेरफार केला नाही. 35 स्त्रिया, मुले, परकीय यांच्यासह सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. त्यांना मोशेच्या सर्व आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो.
परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे
तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस.
मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो.
आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन,
“दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही
तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
19 देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक.
त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
20 ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात.
ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात.
21 परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो.
जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
22 मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो.
तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत.
23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि
माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ
आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.
यहूदा निष्ठावंत नव्हता
2 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. तो असा होता: 2 “यिर्मया, जा आणि यरुशलेममधील लोकांशी बोल. त्यांना सांग:
“‘तुमचे राष्ट्र तरुण होते त्या वेळी तुम्ही माझ्याशी निष्ठावंत होता.
नववधूप्रमाणे तुम्ही मला अनुसरलात.
तुम्ही वाळवंटातून आणि पडिक जमिनीतून माझ्या मागे आलात.
3 इस्राएलचे लोक म्हणजे परमेश्वराला मिळालेली पवित्र देणगी होती.
परमेश्वराने तोडलेले ते पहिले फळ होते.
त्यांना दुखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला अपराधी ठरविले गेले.
त्या पापी लोकांचे वाईट झाले.’”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
4 याकोबाच्या वंशजांनो, इस्राएलमधल्या कुळांनो,
परमेश्वराचा संदेश ऐका.
5 परमेश्वर असे म्हणतो:
“मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का?
म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का?
त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना
पूजले व स्वतः कवडीमोल झाले.
6 तुमचे पूर्वज असे म्हणाले नाहीत
‘परमेश्वराने आम्हाला मिसरहून आणले.
परमेश्वराने आम्हाला वाळवंटातून पार नेले.
त्यानेच आम्हाला ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून बाहेर नेले.
काळोख व धोका असलेल्या, निर्जन, जेथून कोणीही प्रवास करीत नाही
अशा प्रदेशातून देवाने आम्हाला पार केले.
तो परमेश्वर आता कोठे आहे?’”
7 परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी
भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले.
तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले.
पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली.
मी तुम्हाला दिलेली
ही भूमी तुम्ही खराब केली.
8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’
असे विचारले नाही.
कायदा जाणणाऱ्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
इस्राएलचे नेते माझ्याविरुद्ध् गेले.
संदेष्ट्यांनी खोटा देव बआल याच्या नावे भविष्य वर्तविले.
त्यांनी निरुपयोगी मूर्तींची पूजा केली.”
9 परमेश्वर म्हणतो, “म्हणून आता मी तुम्हाला पुन्हा दोषी ठरवीन
आणि तुमच्या नातवंडांनासुद्धा् दोषी ठरवीन.
10 समुद्र पार करुन कित्ती बेटावर जा.
कोणाला तरी केदारला पाठवा.
लक्षपूर्वक पाहा.
कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
11 कोणत्या राष्ट्राने, नवीन दैवतांची पूजा करायची म्हणून,
जुन्या, दैवतांना पूजायचे थांबविले आहे का?
नाही. आणि त्यांचे दैवत मुळी देवच नाही.
पण माझ्या लोकांनी त्यांच्या तेजस्वी देवाची पूजा करायचे
सोडून कवडीमोलाच्या मूर्तींची पूजा करणे सुरु केले.
12 “आकाशा, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्र्चर्याचा धक्का बसू दे.
भीतीने थरथर काप.”
हा परमेश्वराचा संदेश होता.
13 “माझ्या लोकांनी दोन पापे केली.
ते माझ्यापासून दूर गेले.
(मी जिवंत पाण्याचा झरा आहे.)
आणि त्यांनी स्वतःची पाण्याची टाकी खोदली.
(ते दैवंताकडे वळले.)
पण ती टाकी फुटली आहे.
त्यात पाणी राहू शकत नाही.
14 “इस्राएलचे लोक गुलाम झाले आहेत का?
गुलाम म्हणूनच जन्माला आलेल्या माणसाप्रमाणे ते आहेत का?
इस्राएलची संपत्ती लोकांनी का लुटली?
15 तरुण सिंह (शत्रू) इस्राएलकडे बघून डरकाळ्या फोडतात व गुरगुरतात.
त्यांनी इस्राएलचा नाश केला.
इस्राएलमधील शहरे जाळली गेली आहेत.
तेथे कोणीही मागे उरले नाही.
16 नोफ (मंमेफिस) आणि तहपन्हेस
येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे.
17 तुमच्याच चुकीने हे संकट आले आहे.
परमेश्वर तुमचा देव तुम्हाला योग्य मार्गाने नेत होता.
पण तुम्हीच उलटे फिरलात.
18 यहूदातील लोकांनो, पुढील गोष्टींचा विचार करा.
मिसरला जाण्याने काही फायदा झाला का?
शिहोराचे (नील नदीचे) पाणी पिण्याने काही लाभ झाला का?
नाही. अश्शूरला जाण्याने आणि मोठ्या नदीचे (फरात नदीचे) पाणी पिण्याने काही मदत झाली का? नाही.
19 तुम्ही दुष्कृत्ये केली.
त्यामुळे तुम्हाला फक्त शिक्षा मिळेल.
तुमच्यावर संकट येईल.
मग तुम्हाला समजेल की देवापासून दूर जाणे कीती वाईट आहे!
मला न घाबरणे व
मान न देणे हे चूक आहे.”
माझ्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचा, हा संदेश होता.
20 “यहूदा, फार वर्षांपूर्वी तू तुझे जोखड दूर फेकलेस.
मी तुझ्यावर नियंत्रण ठेवत होतो ती बंधने तोडलीस.
तू मला म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’
प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या
झाडाखालील वारांगनेप्रमाणे तू झालीस.
21 यहूदा, मी खास वेल म्हणून तुला लावले.
तुम्ही सर्वजण उत्तम बीजाप्रमाणे होता.
मग वाईट फळे देणाऱ्या वेलीत तुझे रुपांतर कसे झाले?
22 जरी तू स्वतःला खारान धुतलेस,
खूप साबण लावलास,
तरी मला तुझ्या अपराधाचा डाग दिसू शकेल.”
हा परमेश्वर देवाकडून आलेला संदेश होता.
23 “यहूदा, ‘मी अपराधी नाही.
मी बआलदैवताच्या मूर्तीची पूजा केली नाही’ असे तू मला कसे म्हणू शकतेस?
तू दरीमध्ये केलेल्या गोष्टींचा विचार कर.
तू काय केलेस त्याबद्दल विचार कर.
एका जागेवरुन दुसऱ्या जागी
धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
24 तू वाळवंटात राहणाऱ्या रानगाढवीप्रमाणे आहेस.
समागमाच्या काळात ती वारा हुंगते.
ती माजावर असताना कोणीही तिला परत आणू शकत नाही.
त्या काळात ज्याला पाहिजे त्या नराला ती मिळू शकते.
तिला मिळविणे सोपे असते.
25 यहूदा, मूर्तीमागे धावण्याचे थांबव.
त्या दैवतांची लागलेली तहान आता पुरे़.
पण तू म्हणतेस, ‘त्याचा काही उपयोग नाही.
मी त्यांना सोडू शकत नाही.
मला ते दैवत आवडतात.
मला त्यांना अनुसरायचे आहे.’
26 “चोराला लोकांनी पकडताच
तो शरमिंदा होतो.
त्याचप्रमाणे इस्राएलचे लोक झाले आहेत.
राजे आणि नेते, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
27 ते लाकडाच्या तुकड्याशी बोलतात त्याला
‘माझे वडील’ म्हणतात.
ते खडकाशी बोलतात. ते म्हणतात,
‘तू मला जन्म दिलास.’
त्या सर्व लोकांना शरमेने मान खाली घालायला लागतील.
ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत.
त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे.
पण जेव्हा यहूदातील लोक संकटात सापडतात, तेव्हा ते मला म्हणतात,
‘ये आणि आम्हाला वाचव.’
28 त्या मूर्तींना येऊ देत आणि तुम्हाला वाचवू देत.
तुम्ही स्वतः घडविलेल्या त्या मूर्ती कोठे आहेत?
तुम्ही संकटात असताना त्या मूर्ती येऊन तुम्हाला सोडवितात का ते पाहू या.
यहूदा, तुला तुझ्या शहरांइतक्या मूर्ती आहेत!
29 “तुम्ही माझ्याशी वाद का घालता?
तुम्ही सर्व माझ्याविरुद्ध गेलात.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
30 “यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला शिक्षा केली,
पण त्याचा काही फायदा झाला नाही.
तुम्हाला शिक्षा झाल्यावरही तुम्ही परत आला नाहीत
तुमच्याकडे आलेल्या संदेष्ट्यांना तुम्ही तलवारीने मारले.
तुम्ही धोकादायक सिंहासारखे होता.
तुम्ही संदेष्ट्यांना ठार मारले.”
31 ह्या पिढीतील लोकांनो, परमेश्वराच्या संदेशाकडे लक्ष द्या.
“इस्राएलच्या लोकांना मी वाळवंटासारखा आहे का?
मी काळोखी आणि धोकादायक प्रदेशासारखा त्यांना वाटतो का?
माझे लोक म्हणतात, ‘आमच्या मार्गाने जायला आम्ही स्वतंत्र आहोत.
परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे परत येणार नाही.’
ते असे का म्हणतात.?
32 तरुण स्त्री आपले दागिने विसरत नाही.
वधू आपला कमरपट्टा विसरत नाही.
पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.
33 “यहूदा, प्रियकरांचा (खोट्या देवांचा) पाठलाग कसा करायचा हे तुला बरोबर माहीत आहे.
दुष्कृत्ये करायला खरोखरच तू शिकली आहेस.
34 तुझ्या हातांना रक्त लागले आहे.
ते रक्त गरीब व निष्पाप माणसांचे आहे.
तुझे घर फोडताना तू त्यांना पकडले नाहीस.
तू कारण नसताना त्यांना ठार मारलेस.
35 पण तरी तू म्हणतेस, ‘मी निरपराध आहे.
परमेश्वर माझ्यावर रागावलेला नाही.’
मी तुला खोटे बोलल्याबद्दलही दोषी ठरवीन.
का? कारण तू म्हणतेस, ‘मी काहीही चूक केलेली नाही.’
36 मन बदलणे तुला अगदी सोपे आहे.
अश्शूरने तुझी निराशा केली, म्हणून तू अश्शूरला सोडले
आणि मदतीसाठी तू मिसरला गेलीस.
पण मिसरसुध्दा् तुझी निराशा करील.
37 मग अखेरीला तुला मिसरलाही सोडावे लागेल
आणि लाजेने तोंड लपवावे लागेल.
तू त्या देशांवर विश्वास ठेवलास.
पण परमेश्वराने त्या देशांना नाकारले.
म्हणून जिंकण्यासाठी ते तुला मदत करु शकत नाहीत.
यहुदी पुढारी येशूची परीक्षा पाहतात(A)
16 परूशी आणि सदूकी येशूकडे आले, त्यांना येशूची परीक्षा पाहायची होती. आम्हांला आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आभाळ तांबूस आहे, 3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत? 4 दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्यशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
येशू यहुदी पुढाऱ्यांविषयी सावध करतो(B)
5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. 6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
7 तेव्हा ते आपापसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
8 पण येशून हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपापसामध्ये का करता? 9 तुम्हांला अजून आठवत नाही काय? पाच भाकरींनी पाच हजार लोकांना जेवू घातले ते, आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हांला आठवत नाही काय? 10 तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी, आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हांला आठवत नाही काय? 11 मी भाकरी विषयी तुम्हांला बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हांला कसे समजत नाही?”
12 तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
पेत्र म्हणतो की येशू हा ख्रिस्त आहे(C)
13 येशू फिलिप्पाच्या कैसरिया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
14 आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
15 मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
16 शिमोनाने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
17 येशू म्हणाला, “शिमोन, योनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे प्रगट केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे प्रगट केले. 18 आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि मृत्युलोकाचा यावर अधिकार चालणार नाही. 19 मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. 20 तेव्हा त्यानी शिष्यांस निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका.”
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(D)
21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
22 तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभु, या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत!”
23 परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. 25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील. 26 जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाचा काय मोबदला देईल? 27 कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. 28 मी तुम्हांला खरे सांगतो की, येथे उभे राहाणाऱ्यातले काही जण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
2006 by World Bible Translation Center