M’Cheyne Bible Reading Plan
यरीहो काबीज
6 तेव्हा नूनाचा पुत्र यहोशवाने सर्व याजकांना बोलावले त्यांना तो म्हणाला. “परमेश्वराचा पवित्र करारकोश घेऊन चला. तसेच सात याजकांना रणशिंगे घेऊन करार कोशापुढे चालायाला सांगा.”
7 मग तो लोकांना म्हणाला, “आता निघा आणि शहराला फेऱ्या घाला. सशस्त्र सैनिकांनी परमेश्वराच्या करार कोशापुढे चालावे.”
8 यहोशवाचे सांगून झाल्यावर सात याजकांनी परमेश्वरापुढे चालायला सुरूवात केली. आपली सात रणशिंगे फुंकीत ते चालले होते. परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहणारे याजक त्याच्यामागून चालले होते. 9 सशस्त्र सैन्य सर्व सतत वेळ याजकांच्या पुढे चालत होते आणि पवित्र करार कोशामागून पृष्ठरक्षक चालले होते आणि रणशिंगे फुंकली जात होती. 10 यहोशवाने लोकांना युध्दगर्जना न करण्यास बजावले होते. तो म्हणाला, “आरडा ओरडा करू नका. मी सांगेपर्यंत एक चकार शब्दही तोंडातून काढू नका. सांगेन तेव्हाच गर्जना करा.”
11 मग यहोशवाने याजकांना परमेश्वराचा करारकोश घेऊन नगराभोवती एक फेरी मारायला लावली. नंतर सर्वांनी छावणीत परतून ती रात्र काढली.
12 यहोशवा पहाटे उठला. याजकांनी परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलला. 13 सात याजक सात रणशिंगे घेऊन सज्ज झाले. परमेश्वराच्या पवित्र करारकोशापुढे रणशिंगे वाजवत ते पुढे चालू लागले. सशस्त्रधारी सैनिक त्यांच्यापुढून चालू लागले. परमेश्वराच्या पवित्र कोशामागून पृष्ठ संरक्षक निघाले सर्व सतत वेळ रणशिंगे फुंकली जात होती. 14 दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी नगराभोवती एकदा फेरी मारली. मग ते छावणीत परतले. असे त्यांनी ओळीने सहा दिवस केले.
15 सातव्या दिवशी ते पहाटे उठले. त्यांनी नगराला सात वेळा फेऱ्या घातल्या. त्यांनी सर्व पूर्वी प्रमाणेच केले, फक्त फेऱ्या तेवढ्या सात घातल्या. 16 सातव्यांदा नगराभोवती फेरी घालताना याजकांनी रणशिंगे वाजवली. ती ऐकताच यहोशवाने आज्ञा केली, “गर्जना करा हे शहर परमेश्वराने तुम्हाला दिले आहे. 17 हे शहर आणि यातील सर्वकाही परमेश्वराचे आहे. [a] फक्त रहाब ही वेश्या आणि तिच्या घरातील मंडळी यांना धक्का लावू नका. रहाबने आपल्या दोन हेरांना लपविले तेव्हा तिच्या घरातल्यांना मारू नका. 18 बाकी सर्व गोष्टींचा नाश करा. लक्षात ठेवा त्यातील काहीही घेऊ नका. तेथील एखादी वस्तू घेतलीत आणि तळावर आणलीत तर तुमचा नाश होईल. सर्व इस्राएल लोकांचाही त्यामुळे नाश होईल. 19 सोन्याचांदीच्या तसेच तांब्या-लोखंडाच्या सर्व वस्तू परमेश्वराच्या आहेत. त्या परमेश्वराच्या भांडारात जमा केल्या पहिजेत.”
20 याजकांनी रणाशिंगे वाजवली. लोकांनी ती ऐकून मोठ्याने जयघोष केला. त्याने तटबंदी कोसळली आणि इस्राएल लोक सरळ नगरात घुसले. त्यांनी नगराचा पाडाव केला. 21 लोकांनी शहरातील सर्व गोष्टींचा नाश केला. तरूण आणि वृध्द पुरूष, तरूण आणि वृध्द स्त्रिया, जनावरे, शेळ्या मेंढ्या, गाढवे अशा सर्व सजीवांची त्यांनी हत्या केली.
22 यहोशवा त्या दोन हेरांशी बोलला. तो त्यांना म्हणाला, “त्या वेश्येच्या घरी जा आणि तिला व तिच्या घरातल्यांना घेऊन या. तिला तुम्ही तसे वचन दिले आहे तेव्हा त्यांना तेथून बाहेर काढा.”
23 तेव्हा ते दोन हेर रहाब कडे गेले आणि त्यांनी तिला तसेच तिचे आईवडील भावंडे, घरातील इतर माणसे यांना बाहेर काढले इस्राएल लोकांच्या छावणीबाहेर या सर्वांना त्यांनी सुरक्षित जागी ठेवले.
24 मग इस्राएल लोकांनी त्या नगराला आग लावली. फक्त सोने, चांदी, तांबे व लोखंड यांच्या वस्तू परमेश्वराप्रीत्यर्थ वगळून सर्व काही भस्मसात केले आणि त्या वस्तू परमेश्वराच्या खजिन्यात जमा केल्या. 25 यहोशवाने रहाब तिचे कुटुंबीय व तिच्या बरोबर असलेली इतर माणसे यांना संरक्षण दिले. कारण यरीहोला त्याने पाठवलेल्या दोन हेरांना तिने मदत केली होती. रहाबच्या कुटुंबाचे वास्तव्य आजही इस्राएल लोकांमध्ये आहे.
26 यावेळी यहोशवाने एक महत्वाची शपथ घातली. तो म्हणाला:
“जो कोणी यरीहो पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करील
त्याला परमेश्वराचा शाप भोगावा लागेल.
जो या नगराची पायाभरणी करेल
त्याचा ज्येष्ठ पुत्र मरण पावेल.
जो याच्या वेशी उभारील
त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
27 याप्रमाणे परमेश्वराने यहोशवाला साथ दिली आणि यहोशवाची सर्व देशात ख्याती पसरली.
135 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
2 त्याचे गुणवर्णन करा.
परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो,
आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
3 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
त्याच्या नावाचे गुणगान करा.
कारण तो चांगला आहे.
4 परमेश्वराने याकोबाला निवडले.
इस्राएल देवाचा आहे.
5 परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे.
आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे.
6 परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात
आणि खोल महासागरात करत असतो.
7 देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो.
विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
8 देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा
जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले.
9 देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या.
देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
10 देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला.
देवाने शक्तिशाली राजांना मारले.
11 देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला.
देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला.
देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
12 आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली.
देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली.
13 परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील.
परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल.
14 परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली.
पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
15 दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते.
त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते.
16 त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते.
त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
17 पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते.
त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.
18 आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील.
का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.
19 इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
20 लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
21 परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या
यरुशलेममधून धन्यवाद मिळोत.
परमेश्वराची स्तुती करा.
136 परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
2 देवांच्या देवाची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
3 परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
4 देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
5 ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
6 देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
7 देवाने मोठा प्रकाश निर्माण केला.
त्याचे प्रेम सदैव असते.
8 दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
9 देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
10 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
11 देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
12 देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
13 देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
14 देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
15 देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
16 देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
17 देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
18 देवाने बलवान राजांचा पराभव केला.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
19 देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
20 देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
21 देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
22 देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
23 आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
24 देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
25 देव प्रत्येक माणसाला अन्न देतो.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
26 स्वर्गातल्या देवाची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव असते.
देव सर्व राष्ट्रांना न्याय देईल
66 देव असे म्हणाला,
“आकाश माझे सिंहासन आहे
आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे.
मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही.
तुम्हाला ते शक्य नाही.
तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही.
तुम्ही जागा देऊ शकणार नाही.
2 मी स्वतःच सर्व गोष्टी निर्माण केल्या.
मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.”
परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो?
मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो.
हे लोक फार दु:खी आहेत.
माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.
3 काही लोक बैलांना मारून होमार्पण देतात,
पण ते लोकांनाही चोपतात
ते लोक होमार्पण अर्पण करण्यासाठी मेंढ्या मारतात
पण ते कुत्र्यांच्याही माना मुरगळतात.
ते डुकराचे रक्त मला अर्पण करतात.
ते लोक आठवणीने धूप जाळतात,
पण ते त्यांच्या शून्य किंमतीच्या मूर्तीवरही प्रेम करतात.
ते लोक त्यांचे स्वतःचे मार्ग निवडतात.
माझे मार्ग निवडत नाहीत.
ते त्यांच्या भयानक मूर्तीवर प्रेम करतात.
4 म्हणून मी त्यांच्याच युक्त्या वापरायचे ठरविले आहे.
ह्याचाच अर्थ ते ज्या गोष्टींना फार भितात, त्या वापरून मी त्यांना शिक्षा करीन.
मी त्या लोकांना बोलाविले पण त्यांनी ऐकले नाही.
मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांना ते ऐकू आले नाही म्हणून मी त्यांच्यासाठी तीच गोष्टी करीन.
मी ज्यांना पापे म्हटले, त्या गोष्टी त्यांनी केल्या.
मला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी निवडल्या.”
5 परमेश्वराच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकहो
तुम्ही परमेश्वर ज्या गोष्टी सांगतो त्या ऐकाव्या.
“तुमच्या भावांनी तुमचा तिरस्कार केला.
ते तुमच्याविरूध्द् गेले, कारण तुम्ही मला अनुसरलात.
तुमचे भाऊ म्हणाले, ‘परमेश्वराचा सन्मान केला गेल्यावर आम्ही परत तुमच्याकडे येऊ.
मग आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद होईल.’
त्या वाईट लोकांना शिक्षा केली जाईल.”
शिक्षा आणि नवे राष्ट्र
6 ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
7-8 “कळा आल्याशिवाय बाई मुलाला जन्म देत नाही. आपण जन्म दिलेल्या मुलाला पाहण्यासाठी बाईला कळा सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे कोणीही नव्या जगाचा आरंभ एका दिवसात झालेला पाहिला नाही. एका दिवसात नवीन राष्ट्र उभे राहिल्याचे कोणीही ऐकलेले नाही. राष्ट्राला प्रथम प्रसूतिवेदनांसारख्या वेदना व्हाव्याच लागतात. प्रसूतिवेदनानंतर सियोन तिच्या मुलांना जन्म देईल. 9 त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.”
परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला.
10 यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा!
यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
11 का? कारण आईच्या स्तनातून येणाऱ्या दुधासारखी दया तुम्हाला मिळेल,
ते “दूध” तुम्हाला खरी तृप्ती देईल.
तुम्ही ते दूध प्याल आणि तुम्ही यरूशलेमच्या वैभवाने खरोखरीच आनंदित व्हाल.
12 परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी तुम्हाला शांती देईन.
मोठ्या नदीप्रमाणे ही शांती वाहत वाहत तुमच्याकडे येईल.
पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल.
पुराप्रमाणे हा संपत्तीचा ओघ येईल.
तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल.
मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन.
मी तुम्हाला मांडीवर खेळवीन.
13 तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल.
आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
14 खरोखरी आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील.
तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि गवताप्रमाणे वाढाल.
परमेश्वराचे सेवक त्याचे सामर्थ्य पाहतील
आणि परमेश्वराचे शत्रू त्याचा राग अनुभवतील.
15 पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे.
परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे.
आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील.
परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.
16 परमेश्वर लोकांना न्याय देईल.
मग तो लोकांना अग्नीने आणि त्याच्या तलवारीने नाश करील.
परमेश्वर खूप लोकांचा नाश करील.
17 हे लोक त्यांच्या खास बागांमध्ये पूजा करण्यासाठी शुचिर्भूत व्हावे म्हणून स्नान करतात. ते एकमेकांच्या मागून खास बागांमध्ये जातात. मग ते मूर्तीची पूजा करतात. पण परमेश्वर त्या सर्व लोकांचा नाश करील. “ते लोक डुक्कर, उंदीर ह्यांचे मांस व इतर घाणेरडया गोष्टी खातात. पण ह्या सर्व लोकांचा एकत्रितपणे नाश केला जाईल.” (परमेश्वराने स्वतः ह्या गोष्टी सांगितल्या)
18 “ते लोक दुष्ट विचार करतात आणि पापे करतात म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी मी येत आहे मी सर्व राष्ट्रांना व सर्व लोकांना गोळा करीन. सर्व लोक एकत्र येऊन माझे सामर्थ्य पाहतील. 19 काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरदूरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील. 20 आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावा बहिणींना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमला, आणतील. तुमची ही भावंडे घोड्यांवरून गाढवांवरून, उंटांवरून, रथांतून आणि गाड्यांतून येतील. तुमची ही भावंडे म्हणजे जणू काही इस्राएलच्या लोकांनी निर्मळ तबकांतून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील. 21 ह्यातीलच काही लोकांना मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर हे सर्व म्हणाला.
नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी
22 “मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील. 23 प्रत्येक पूजेच्या दिवशी, सर्व लोक माझी उपासना करण्यासाठी येतील. ते प्रत्येक शब्बाथाला आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतील.
24 “ते लोक माझ्या पवित्र नगरात येतील. आणि ते जर नगराच्या बाहेर गेले तर त्यांना माझ्याविरूध्द् गेलेल्या लोकांची मृत शरीरे दिसतील. त्या मृत शरीरांत कधी न मरणारे किडे पडतील कधी न विझणारा अग्नी त्या मृत शरीरांना जाळून टाकील.”
हेरोद येशूविषयी ऐकतो(A)
14 त्या वेळी हेरोदाने [a] येशूविषयी बातमी ऐकली. 2 तेव्हा त्याने आपल्या सेवकांना म्हटले. “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. तो मेलेल्यातून उठला आहे. त्यामुळेच तो हे चमत्कार करीत आहे.”
बाप्तिस्मा करणारा योहान कसा मारला गेला
3 हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक करून तुरूंगात टाकले होते. 4 कारण योहान त्याला सांगत होता, “तू होरोदियाला ठेवणे योग्य नाही.” 5 हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
6 हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारीत नाच करून हेरोदाला संतुष्ट केले. 7 त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. 8 तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “मला तेथे तबकात बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर द्या.”
9 हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावे अशी आज्ञा केली. 10 आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर तोडले. 11 मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलाला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. 12 मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले, आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
येशू पाच हजारांहून अधिक लोकांना जेवू घालतो(B)
13 मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला व नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत व एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले. 14 मग तो किनाऱ्यावर आला, जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
15 मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
16 परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना खायला द्या.”
17 तेव्हा ते त्याला म्हणाले, “पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही.”
18 तो म्हणाला, “त्या इकडे आणा.” 19 मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या. 20 ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरुन घेतल्या. 21 स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरूष मात्र पाच हजार होते.
येशू सरोवरावरून चालातो(C)
22 स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले. 23 लोकांना पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता. 24 पण त्यावेळी नाव किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर होती व ती लाटांनी हेलकावत होती, कारण वारा समोरून वाहत होता.
25 मग पहाटेच्या वेळी तो पाण्यावरून चालत शिष्यांकडे आला. 26 शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.
27 पण येशू लगेच त्यांना म्हणाला, काळजी करू नका. मी आहे, भीऊ नका.
28 पेत्र म्हणाला, प्रभु जर तो तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग.
29 येशू म्हणाला, “ये.”
मग पेत्र नावेतून पाण्यात उतरला व पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. 30 पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा व लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, “प्रभु, मला वाचवा.”
31 आणि लगेंच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासू माणसा, तू संशय का धरलास?”
32 मग ते नावेत बसल्यावर वारा थांबला. 33 तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
येशू रोग्यानां बरे करीतो(D)
34 नंतर ते पलीकडे गनेसरेत येथे पोहोचले. 35 तेथील लोकांनी येशूला पाहिले व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठविला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. 36 आणि आम्हांला आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.
2006 by World Bible Translation Center