M’Cheyne Bible Reading Plan
देव यहोशवाची नेमणूक करतो
1 मोशे परमेश्वराचा सेवक होता. नूनाचा पूत्र यहोशवा मोशेचा मदतनीस होता. मोशेच्या निधनानंतर परमेश्वर यहोशवाशी बोलला. परमेश्वर म्हणाला, 2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे आता तू आणि हे लोक यार्देन नदी पलीकडे जा. मी इस्राएल लोकांना देणार असलेल्या प्रदेशात तू गेले पाहिजेस. 3 तुम्हाला हा प्रदेश द्यायचे मी मोशेला कबूल केले आहे. तेव्हा ज्याठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले. 4 वाळवंट व लबानोन पासून फरात महानदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश तुमचाच होईल. तसेच येथपासून पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापर्यंत म्हणजेच मावळतीपर्यंतचा देश तुमच्या हद्दीत असेल. 5 मोशेला दिली तशीच तुलाही मी साथ देईन. तुला आता कोणी तुझे आयुष्य असेपर्यंत अटकाव करू शकणार नाही. मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही.
6 “यहोशवा, तू खंबीर हो, हिंमत धर. या लोकांचे नेतृत्व कर म्हणजे ते तो देश घेऊ शकतील. हा देश त्यांना द्यायचे मी त्यांच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 7 पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील. 8 नियमशास्त्राच्या त्या ग्रंथात लिहिलेल्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रात्रंदिवस त्या ग्रंथाचे मनन कर म्हणजे तुझ्या हातून त्याचे पालन होईल. असे वागलास तर अंगिकारलेल्या सर्व गोष्टीत सफल होशील. 9 खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”
यहोशवा नेतुत्व स्वीकारतो
10 तेव्हा यहोशवाने लोकांमधील अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. तो म्हणाला, 11 “छावणीतून फिरुन लोकांना अन्न वगैरेची तयारी करुन सज्ज व्हायला सांगा. तीन दिवसाच्या आत आपल्याला यार्देन नदी पार करायची आहे. परमेश्वर देव देत आहे तो देश ताब्यात घ्यायला आपण निघत आहोत.”
12 मग रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांच्या या लोकांशी यहोशवा बोलला. तो म्हणाला, 13 “परमेश्वराचा सेवक मोशे याने काय सांगितले त्याची आठवण करा परमेश्वर देव तुम्हाला विसाव्याचे स्थान देणार असल्याचे त्याने सांगितले. परमेश्वर तो देश तुम्हाला देणार आहे. 14 यार्देन नदीच्या पूर्वेकडील ही जमीन खरे तर परमेश्वराने तुम्हाला आधीच दिली आहे. तुमच्या बायकामुलांना व जनावरांना येथेच राहू द्या. पण सर्व योध्द्यांनी सशस्त्र होऊन, आपल्या बांधवांबरोबर यार्देन पलीकडे जावे. तुम्ही युध्दाची तयारी करून तो देश घ्यायला त्यांना मदत करावी. 15 तुम्हाला परमेश्वराने विसाव्याची जागा दिली आहेच. आता तुमच्या या बांधवानाही तो ती देईल. पण परमेश्वर देव देणार असलेली ती जमीन त्यांच्या ताब्यात येईपर्यंत त्यांच्या मदतीला थांबा. मग तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील या तुमच्या देशात परत येऊ शकता. परमेश्वराचा सेवक मोशे याने तो तुम्हाला दिला आहे.”
16 तेव्हा लोक म्हणाले. “तू आज्ञा केली आहेस त्याप्रमाणे आम्ही वागू. तू म्हणशील तेथे आम्ही जाऊ. 17 मोशेचे म्हणणे ऐकले तसेच तुझेही सर्व ऐकू, परमेश्वर देवाकडे फक्त आम्ही एक मागतो. तो मोशे बरोबर राहिला तसाच तुझ्या बरोबरही राहो. 18 म्हणजे एखाद्याने तुझी आज्ञा पाळायला नकार दिला किंवा तुझ्याविरूध्द बंड केले तर तो मारला जाईल. तू मात्र बलवान व खंबीर राहा.”
वर मंदिरांत जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
120 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने मला वाचवले.
2 परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
3 खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का?
त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
4 सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि
जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
5 खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे,
केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ
मी खूप काळ राहिलो आहे.
7 मी म्हणालो, मला शांती हवी,
म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
वर मंदिरांत जाण्याच्या वेळेचे स्तोत्र.
121 मी वर डोंगरांकडे बघतो.
पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 माझी मदत परमेश्वराकडून,
स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 देव तुला खाली पडू देणार नाही.
तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही.
देव कधीही झोपत नाही.
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे
तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही.
आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील.
परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 परमेश्वरा तुला जाण्या-येण्यात मदत करील.
परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दाविदाचेस्तोत्र.
122 “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,”
असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
2 आपण इथे आहोत.
यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
3 हे नवीन यरुशलेम आहे.
हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
4 कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा.
इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात.
ही कुटुंबे देवाची आहेत.
5 राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली.
दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.
6 यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा.
“जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,
7 अशी मी आशा करतो.
तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”
8 तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”.
माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
9 आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी
या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.
परमेश्वराचा मुक्तीचा संदेश
61 परमेश्वराचा सेवक म्हणतो, परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले. 2 परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले. 3 सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्यांचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना “चांगले वृक्ष” आणि “परमेश्वराची सुंदर रोपटी” अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
4 त्या वेळेला नाश केली गेलेली जुनी शहरे पुन्हा वसविली जातील. ती आरंभी होती तशी नव्याने केली जातील. फार फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी केली जातील.
5 नंतर तुमचे शत्रू तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मेंढ्यांची काळजी घेतील. तुमच्या शत्रूंची मुले तुमच्या शेतांतून आणि मळ्यांतून कामे करतील. 6 तुम्हाला “परमेश्वराचे याजक”, “आमच्या देवाचे सेवक” असे म्हटले जाईल. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्हाला मिळेल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.
7 पूर्वीच्या काळी लोकांनी तुमची अप्रतिष्ठा केली, तुमची निंदा केली. इतर लोकांपेक्षा तुमची अप्रतिष्ठा जास्त झाली. म्हणून तुमच्या जमिनीतून तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट पीक मिळेल. तुम्हाला अखंड आनंद मिळेल. 8 असे का घडेल? कारण मी परमेश्वर आहे आणि मला प्रामाणिकपणा आवडतो. मला चोरी व प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. म्हणून मी लोकांना योग्य तेच फळ देईन. मी माझ्या लोकांबरोबर कायमचा, करार केला आहे. 9 सर्व राष्ट्रांतील एकूण एक लोक माझ्या लोकांना ओळखतील. माझ्या राष्ट्रातील मुलांना प्रत्येकजण ओळखेल. त्यांना पाहताच कोणालाही कळून येईल की ह्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे.
देवाचा सेवक तारण व चांगुलपणा आणतो
10 परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो.
देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे.
परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो.
हे कपडे स्वतःच्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत.
परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो.
वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
11 जमीनीमुळे रोपे वाढतात.
लोक शेतांत बी पेरतात.
ते बी जमिनीत रूजून वाढते.
त्याचप्रमाणे परमेश्वर चांगुलपणा वाढवील,
सर्व राष्ट्रांत त्याची प्रशंसा अधिकच वाढवील.
येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो(A)
9 येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला. 2 तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले. “तरुण मुला, काळजी करू नकोस. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
3 नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे.”
4 त्यांचे विचार ओळखून येशू म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? 5 कारण, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे, किंवा उठून चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? 6 परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की, मनुष्याच्या पुत्राला, पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ! आपला बिछाना घे आणि घरी जा.” 7 मग तो उठून आपल्या घरी गेला. 8 लोकांनी हे पाहिले व ते थक्क झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
येशू मत्तयाची निवड करतो(B)
9 मग येशू तेथून पुढे निघाला, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या माणसाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
10 येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले. 11 परूशांनी ते पाहिले त्यांनी येशूच्या शिष्यांस विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी यांच्याबरोबर का जेवतो?”
12 येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजारी आहेत त्यांना आहे. 13 मी तुम्हांला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका: ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.” [a]
येशू इतर धार्मिक यहुद्यांसारखा नाही(C)
14 मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परुशी पुष्कळ वेळा उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”
15 येशूने त्यांना उत्तर दिले, “नवरा मुलगा (वर) सोबत असताना त्याचे वऱ्हाडी दु:खी कसे राहतील? अशी वेळ येईल जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील.
16 “कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडापासून निघून जाईल व छिद्र अधिक मोठे होईल. 17 तसेच नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशवीत कोणी घालीत नाहीत, घातला तर पिशव्या फुटतात व त्यांचा नाश होतो. म्हणून लोक नवा द्राक्षारस नव्या पिशव्यात घालतात. तेव्हा दोन्हीही चांगले राहतात.”
येशू मृत मुलीला जीवंत करतो आणि आजारी स्त्रीला बरे करतो(D)
18 येशू या बोधकथा सांगत असता यहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मेली आहे. परंतु आपण येऊन आपल्या हाताचा स्पर्श केला तर ती पुन्हा जिवंत होईल.”
19 तेव्हा येशू व त्याचे शिष्य त्या सेनाधिकाऱ्याबरोबर निघाले.
20 वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव असलेली एक स्त्री मागून येऊन येशूच्या जवळ पोहोंचली व त्याच्या वस्त्राला शिवली. 21 कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
22 तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “बाई काळजी करू नकोस! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
23 मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले. 24 येशू म्हणाला, “जा, मुलगी मेलेली नाही, ती झोपेत आहे.” तेव्हा लोक येशूला हसले. 25 मग त्या जमावाला बाहेर पाठविल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. 26 आणि ही बातमी त्या प्रांतात पसरली.
येशू आणखी लोकांना बरे करतो
27 तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”
28 येशू आत गेला तेव्हा ते आंधळेही आत गेले. त्याने त्यांना विचारले. “मी तुम्हांला दृष्टि देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभु,” त्यांनी उत्तर दिले.
29 मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.” 30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आलि. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” 31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या प्रदेशात सगळीकडे ही बातमी पसरविलि.
32 मग ते दोघे निघून जात असताना लोकांनी एका भूतबाधा झालेल्या माणसाला येशूकडे आणले. 33 जेव्हा येशूने त्यामधून भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही झालेले पाहण्यात आले नाही.”
34 परंतु परूशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
येशूला असहाय लोकांविषयी कळवळा वाटतो
35 येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला. 36 आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. 37 तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. 38 म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
2006 by World Bible Translation Center