M’Cheyne Bible Reading Plan
मवाबातील करार
29 इस्राएलांशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात आणखी एक पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो हा पवित्र करार होय.
2 मोशेन सर्व इस्राएलांना जवळ बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मिसरमध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे. 3 ती संकटे, चमत्कार आणि विस्मयकारक गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. 4 पण नेमके काय झाले हे तुम्हांला आजही समजू शकलेले नाही. तुम्ही जे पाहिलेत आणि ऐकलेत त्याचे खरे आकलन परमेश्वराने तुम्हाला होऊ दिलेले नाही. 5 परमेश्वराने तुम्हांला वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. 6 तुम्हीं भाकरी खाल्ली नाही की द्राक्षारस अथवा मद्य प्यायले नाही. पण परमेश्वराने तुमची काळजी वाहिली. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून त्याने असे केले.
7 “तुम्ही येंथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग आपल्यावर चढाई करुन आले. पण आपण त्यांचा पराभव केला. 8 त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना ते इनाम म्हणून दिला. 9 या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.
10 “आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडीलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात. 11 तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्यातील सर्व उपरे हे ही इथे आहेत. 12 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे. 13 त्याद्वारे तो तुम्हांला आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हांला आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे. 14-15 हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी-आज इथे उपस्थित असलेल्यांबरोबरच नव्हे तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर नसलेल्या आपल्या वंशजांसाठीही आहे. 16 आपण मिसरमध्ये कसे राहात होतो ते तुम्हांला आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला याचीही तुम्हांला आठवण आहे. 17 त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या आपल्याला तिरस्करणीय असलेल्या मूर्तीही पाहिल्यात. 18 आपल्या परमेश्वर देवापासून परावृत होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, बाई, एखादे कुटुंब किंवा कूळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विषवल्लीसमान असतात.
19 “एखादा हे बोलणे ऐकूनही, ‘मी मला हवे तेच करणार. माझे काहीही वाकडे होणार नाही’ असे स्वतःचे समाधान करुन घेत असेल. पण त्याने हे लक्षात ठेवावे की त्याचा त्याला त्रास तर होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळते या न्यायाने निरपराध्यांनाही त्रास होईल. 20-21 परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वतःच्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.
22 “या देशाची कशी वाट लागली हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती आणि परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील. 23 येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
24 “‘परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?’ असे इतर राष्ट्रातील लोक विचारतील. 25 त्याचे उत्तर असे की, आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांना बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला. 26 हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते. 27 म्हणून त्यांच्यावर तो क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्या बाबतीत खरी करुन दाखवली. 28 क्रोधायमान होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?
29 “काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
जायिन
49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो.
आणि तू माझे सांत्वन केलेस.
तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला.
पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो.
परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे
सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव
आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
हेथ
57 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य आहे,
असा निर्णय मी घेतला आहे.
58 परमेश्वरा, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे.
वचन दिल्याप्रमाणे तू माझ्याशी दयाळूपणे वाग.
59 मी माझ्या आयुष्याचा अगदी काळजी पूर्वक विचार केला
आणि मी तुझ्या कराराकडे परत आलो.
60 अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.
61 वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले.
पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.
62 मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल
तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
63 जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे.
जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.
64 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम पृथ्वी व्यापून टाकते.
मला तुझे नियम शिकव.
तेथ
65 परमेश्वरा, तू माझ्यासाठी, तुझ्या सेवकासाठी चांगल्या गोष्टी केल्यास.
तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले होतेस त्याच गोष्टी केल्यास.
66 परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे.
माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे.
67 दुख: सोसण्यापूर्वी मी बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या
परंतु आता मी तुझ्या आज्ञा काळजी पूर्वक पाळतो.
68 देवा, तू चांगला आहेस आणि
तू चांगल्या गोष्टी करतोस. मला तुझे नियम शिकव.
69 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोटं सांगितलं पण परमेश्वरा,
मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.
70 ते लोक फार मूर्ख आहेत
पण मला तुझ्या शिकवणीचा अभ्यास करणे फार आवडते.
71 मी दुख: सोसले ते चांगले झाले.
त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
72 परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे.
ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
सगळी राष्ट्रे परमेश्वराला अनुसरतील
56 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “सगळ्या लोकांशी न्याय्यबुध्दीने वागा. योग्य गोष्टीच करा. का? लवकरच माझे तारण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. माझा चांगुलपणा लवकरच सर्व जगाला दिसेल.” 2 जो देवाचा शब्बाथाचा नियम पाळतो त्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. जो माणूस पाप करीत नाही. तो सुखी होईल. 3 यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
4-5 ह्या नपुसकांनी असे म्हणू नये कारण परमेश्वर म्हणतो, “ह्यातील काही शब्बाथाचा नियम पाळतात. मला पाहिजे त्याच गोष्टी निवडून करतात. खरोखरच ते माझ्या कराराप्रमाणे [a] वागतात म्हणून मी माझ्या मंदिरात त्यांच्या स्मरणार्थ एक शिला ठेवीन. माझ्या नगरात त्यांच्या नावांचे स्मरण केले जाईल. मी त्यांना संततीपेक्षा काही चांगल्या गोष्टी देईन. मी त्यांना चिरंतन राहणारे नाव ठेवीन. मी त्यांना माझ्या माणसांतून तोडून अलग करणार नाही.”
6 यहुदी नसलेले काही लोक परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या प्रेमाखातर स्वतःहून परमेश्वराला येऊन मिळतील. ते परमेश्वराचे सेवक होण्यासाठी येतील. ते शब्बाथचा दिवस हा उपासनेचा विशेष दिवस मानतील. आणि काटेकोरपणे माझ्या कराराचे (नियमांचे) सतत पालन करतील. 7 परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांना माझ्या पवित्र डोंगरावर आणीन. माझ्या प्रार्थनाघरात मी त्यांना सुखी करीन. त्यांनी मला अर्पण करण्यासाठी आणलेले होमबली आणि मला वाहण्यासाठी आणलेल्या वस्तू मला आवडतील. का? कारण माझे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाघर होईल.” 8 परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला.
इस्राएलच्या लोकांना सक्तीने त्यांचा देश सोडावा लागला. पण परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्र गोळा करील. परमेश्वर म्हणतो, “मी ह्या लोकांना गोळा करून एकत्र करीन.”
9 वन्य पशूंनो,
या व खा.
10 रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत.
ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही.
न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत.
ते फक्त आडवे पडून झोपा काढतात.
हो! त्यांना झोपायला आवडते.
11 ते भुकेल्या कुत्र्यांप्रमाणे आहेत.
त्यांचे कधीच समाधान होत नाही.
मेंढपाळांना आपण काय करीत आहोत हे माहीत नाही.
ते त्यांच्या भटकल्या गेलेल्या मेंढ्यांप्रमाणे आहेत.
ते हावरट आहेत.
त्यांना फक्त स्वतःचा लाभ हवा आहे.
12 ते येऊन म्हणतात,
“आम्ही थोडा द्राक्षारस पिऊ,
आम्ही थोडे मद्य पिऊ.
आम्ही उद्याही असेच करू.
फक्त थोडे जास्त मद्य पिऊ.”
येशूची परीक्षा(A)
4 मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले. 2 चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही. त्यानंतर त्याला खूप भूक लागली. 3 तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे.”
4 येशूने उत्तर दिले, “असे लिहिले आहे की,
‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही
तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल.’” (B)
5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरात (यरुशलेमात) नेले. सैतानाने येशूला मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले. 6 आणि त्याला म्हटले, “जर तू देवाचा पूत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की,
‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील
आणि तुझे पाय खडकावर आपटू नयेत म्हणून
ते तुला हातांवर झेलतील.’” (C)
7 येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की,
‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.’” (D)
8 मग सैतानाने येशूला एका खूप उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखविले. 9 सैतान म्हणाला, “जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सारे तुला देईन.”
10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की,
‘देव जो तुझा प्रभु त्याचीच उपासना कर
आणि केवळ त्याचीच सेवा कर.’” (E)
11 मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन त्याची देखभाल करू लागले.
येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(F)
12 नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला. 13 परंतू तो नासरेथ येथे राहिला नाही, तर गालील सरोवराजवळील कफर्णहूम नगरात जाऊन राहिला. जबुलून व नफताली ह्या प्रदेशांना लागुनच कफर्णहूम नगर आहे. 14 यशया ह्या संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. यशयाने वर्तविलेले भविष्य असे होते:
15 “जबुलून आणि नफताली प्रांत
समुद्राकडे येणारे मार्ग, यार्देन नदीपलीकडचा प्रदेश
व यहूदीतरांचा गालील यांमधील.
16 अंधारात वावरणाऱ्या लोकांनी
मोठा प्रकाश पाहिला.
मरणाचे सावट असलेल्या प्रदेशात
राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश अवतरला.” (G)
17 त्यावेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
येशू काही शिष्य निवडतो(H)
18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते. 19 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 20 मग ते मागेपुढे न पाहता लगेच जाळे टाकून देऊन ते त्याच्या मागे चालू लागले.
21 तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले. आणि त्याने त्यांना बोलावले. 22 तेव्हा ते आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्या मागे गेले.
येशू लोकांना शिकवितो आणि बरे करतो(I)
23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. 24 येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले. 25 मग गालील व दकापलीस, यरुशलेम व यहूदीया येथून व यार्देनेच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालले.
2006 by World Bible Translation Center