M’Cheyne Bible Reading Plan
पहिले उत्पन्न
26 “लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल. 2 तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व उत्पन्न गोळा कराल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा. 3 त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की परमेश्वराने आमच्या पूर्वजांना आम्हांला जमीन देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे मी येथे पोहोंचलो आहे, हे सांगायला मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दारी आलो आहे!
4 “मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील. 5 तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, ‘आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र बनले. 6 तेथे मिसरी लोकांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्हाला गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला. 7 मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले. 8 मग त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठे चमत्कार प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले. 9 आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली. 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’
“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा. 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.
12 “दर तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तृप्त होतील. 13 या वेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. 14 मी दु:खी [a] मनःस्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी तुझे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे. 15 आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांना आशीर्वाद दे. आम्हाला दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हाला द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.
परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा
16 “तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मनःपूर्वक पाळा. 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे. 18 परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे. 19 इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याची खास प्रजा व्हाल.”
117 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
2 देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
देव आपल्याशी सदैव खरा वागतो.
परमेश्वराचा जयजयकार करा!
118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
2 इस्राएल, म्हण
“त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
3 याजकांनो, म्हणा,
“त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
4 परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा,
“त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
5 मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
6 परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही.
लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
7 परमेश्वर मला मदत करणारा आहे.
माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
8 परमेश्वरावर विश्वास ठेवणे
हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
9 परमेश्वरावर विश्वास ठेवणे
हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
10 बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते.
परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
11 शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले,
मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
12 शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते.
परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला.
मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
13 माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि
माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
17 मी जगेन आणि मरणार नाही
आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराने आपला उध्दार केला. [a]
26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा.”
याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.
27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो.
बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.”
28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो.
तुझी स्तुती करतो.
29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
53 आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
2 तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला. ओसाड जमिनीवर वाढणाऱ्या अंकुराप्रमाणे तो होता. त्याच्यात काही विशेष नव्हते. त्याला विशेष शोभा नव्हती. आपण त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपल्याला आवडावा असे त्याच्यात काहीही वैशिष्ट्य नव्हते. 3 लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दुखी: व व्यथित माणूस होता. घृणा व दुख: म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही.
4 पण त्याने आमचा त्रास स्वतःचा मानला. त्याने आमचे दुख: आणि वेदना स्वतः भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे. 5 पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दुख: सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो. 6 पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वतःच्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.
7 त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही. 8 लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली. 9 तो मेल्यावर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. त्याने काहीही चूक केली नव्हती. तो कधीही खोटे बोलला नाही पण तरीही त्याच्या बाबतीत हे घडून आले.
10 परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वतःचा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील. 11 त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल.
“माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेईल. 12 ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वतः वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”
येशूचा कुलवृत्तांत(A)
1 येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: तो दाविदाच्या कुळात जन्मला. दावीद अब्राहामाच्या कुळातील होता.
2 अब्राहाम इसहाकचा पिता होता.
इसहाक याकोबाचा पिता होता.
याकोब यहूदा व त्याच्या भावांचा पिता होता.
3 यहूदा पेरेस व जेरहाचा पिता होता. (त्यांची आई तामार होती.)
पेरेस हेस्रोनाचा पिता होता.
हेस्रोन रामाचा पिता होता.
4 रामा अम्मीनादाबाचा पिता होता.
अम्मीनादाब नहशोनाचा पिता होता.
नहशोन सल्मोनाचा पिता होता.
5 सल्मोन बवाजाचा पिता होता. (बवाजाची आई राहाब होती.)
बवाज ओबेदचा पिता होता. (ओबेदची आई रूथ होती).
ओबेद इशायचा पिता होता.
6 इशाय दावीद राजाचा पिता होता.
दावीद शलमोनाचा पिता होता. (शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)
7 शलमोन रहबामचा पिता होता.
रहबाम अबीयाचा पिता होता.
अबीया आसाचा पिता होता.
8 आसा यहोशाफाटाचा पिता होता.
यहोशाफाट योरामाचा पिता होता.
योराम उज्जीयाचा पिता होता.
9 उज्जीया योथामचा पिता होता.
योथाम आहाजचा पिता होता.
आहाज हिज्कीयाचा पिता होता.
10 हिज्कीया मनश्शेचा पिता होता.
मनश्शे आमोनचा पिता होता.
आमोन योशीयाचा पिता होता.
11 योशीया यखन्या व त्याचे भाऊ यांचा पिता होता. (जेव्हा यहूदी लोकांना गुलाम म्हणून बाबेलास नेण्यात आले तेव्हा हे झाले.)
12 त्यांना बाबेलला नेण्यात आल्यानंतरचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे:
यखन्या शल्तीएलचा पिता होता.
शल्तीएल जरूब्बाबेलचा पिता होता.
13 जरूब्बाबेल अबीहूदचा पिता होता.
अबीहूद एल्याकीमचा पिता होता.
एल्याकीम अज्जुराचा पिता होता.
14 अज्जुर सादोकचा पिता होता.
सादोक याखीमचा पिता होता.
याखीम एलीहूदचा पिता होता.
15 एलीहूद एलाजारचा पिता होता.
एलाजारचा मत्तानचा पिता होता.
मत्तान याकोबाचा पिता होता.
16 याकोब योसेफाचा पिता होता.
योसेफ मरीयेचा पती होता.
मरीया येशूची आई होती. येशूला ख्रिस्त [a] म्हटले आहे.
17 याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत चौदा पिढ्या झाल्या आणि दाविदापासून बाबेलच्या बंदीवासापर्यंत चौदा पिढ्या झाल्या. बाबेलच्या बंदिवासापासून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत चौदा पिढ्या झाल्या.
येशू ख्रिस्ताचा जन्म(B)
18 येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. 19 तिचा भावी पती योसेफ चांगला मनुष्य होता. तिची लोकांमध्ये बदनामी होऊ नये म्हणून त्याने गुपचूप तिला सूटपत्र देण्याचा विचार केला.
20 पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा, [b] मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून [c] होणार आहे. 21 त्याचे नाव तू येशू [d] ठेव. कारण तो त्याच्या लोकांची पापापासून सुटका करील.”
22 हे सर्व यासाठी घडले की, प्रभुने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते, त्याची पूर्तता व्हावी. 23 “कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”
24 जेव्हा योसेफ जागा झाला तेव्हा देवदूताने जशी त्याला आज्ञा केली होती तसेच त्याने केले, त्याने मरीयेशी लग्न केले. 25 पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. आणि योसेफाने त्याचे नाव येशू ठेवले.
2006 by World Bible Translation Center