M’Cheyne Bible Reading Plan
25 “दोन व्यक्तिमंध्ये वाद झाल्यास त्यांनी न्याय मागण्यासाठी न्यायाधीशांकडे जावे. वादाचा निवाडा न्यायाधीश करील. 2 दोषी व्यक्ति फटक्यांच्या शिक्षेला पात्र ठरल्यास न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे व आपल्या समक्ष त्याला फटके मारुन घ्यावेत. फटक्यांची संख्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी. 3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास त्याचा जीव तुमच्या लेखी, महत्त्वाचा नाही असा त्याचा अर्थ होईल.
4 “धान्याची मळणी करताना बैल धान्यात तोंड घालील या भीतीने त्याच्या मुसक्या बांधू नका.
5 “दोन भाऊ एकत्र राहात असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे. 6 यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलमधून नामशेष होणार नाही. 7 त्या मृत व्यक्तीच्या भावाने आपल्या विधवा भावजयीशी लग्न करण्याचे नाकारले तर तिने गावाच्या वेशीपाशी वडीलधाऱ्या पंचांकडे जावे व सांगावे की आपला दिर त्याच्या भावाचे नाव इस्राएलमध्ये राखायला राजी दिसत नाही. दिराच्या कर्तव्याला अनुसरुन तो माझ्याशी वागत नाही. 8 अशावेळी पंचानी त्याला बोलावून त्याच्याशी बोलावे. यावरही तो ऐकायला तयार नसेल, तिच्याशी लग्न करायला तयार नसेल 9 तर सर्वांसमोर त्याच्यापुढे येऊन तिने त्याच्या पायातला जोडा काढावा. त्याच्या तोंडावर थुकावे आणि म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचा वंश वाढवत नाही त्याचे असेच करावे.’ 10 ‘जोडा काढून घेतलेल्याचे घराणे,’ अशी मग त्याची इस्राएलभर ख्याती होईल.
11 “दोन पुरुषांच्या मारामारीमध्ये त्यातील एकाची बायको आपल्या नवऱ्याच्या मदतीसाठी मध्ये पडली असता तिने दुसऱ्याचे नाजूक इंद्रिय पकडू नये. 12 तसे केल्यास दयामाया न दाखवता तिचा हात तोडावा.
13 “बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अती जड किंवा अती हलकी नसावीत. 14 आपल्या जवळची मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत. 15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. 16 खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव तिरस्कार करतो.
अमालेकांचा नाश करावा
17 “तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा. 18 त्यांना देवाविषयी आदर नव्हता. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले. 19 म्हणून अमालेकांची आठवण सुद्धा तुम्ही पृथ्वीच्या पाठीवरुन पुसून टाकली पाहिजे. देव तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात प्रवेश केल्यावर तुम्ही हे अंमलात आणा. इतर शत्रूंपासून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला विसावा दिल्यावर अमालेकांचा न विसरता समाचार घ्या.
116 परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो
ते मला खूप आवडते.
2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो
आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
3 मी जवळ जवळ मेलो होतो.
मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते.
माझ्या भोवती थडगे आवळले जात होते.
मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो.
4 नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले.
मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
5 परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे.
देव दयाळू आहे.
6 परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो.
मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला.
7 माझ्या आत्म्या शांत हो!
परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे.
8 देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस
तू माझे अश्रू थोपविलेस.
तू मला पतनापासून वाचविलेस.
9 मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची
सेवा करणे चालूच ठेवीन.
10 “माझा सत्यानाश झाला”
असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले.
11 मी घाबरलो होतो तेव्हा सुध्दा मी म्हणालो होतो,
सगळे लोक खोटारडे आहेत.
12 मी परमेश्वराला काय देऊ शकतो?
माझ्या जवळ जे आहे ते मला परमेश्वरानेच दिले आहे.
13 त्याने मला वाचवले म्हणून मी त्याला पेय अर्पण करीन
आणि मी परमेश्वराला त्याच्या नावाने हाक मारीन.
14 मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन.
आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.
15 परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
16 मी तुझा सेवक आहे.
मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे.
परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.
17 मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन.
मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन.
आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.
19 मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन.
परमेश्वराचा जयजयकार करा.
इस्राएलला वाचविले जाईल
52 ऊठ, सियोना ऊठ.
कपडे घालून तयार हो.
बलशाली हो.
पवित्र यरुशलेम, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर.
ज्यांनी देवाला अनुसरायचे नाकारले आहे [a]
असे लोक पुन्हा कधीही तुझ्यात प्रवेश करणार नाहीत.
ते लोक शुध्द आणि निर्मळ नाहीत.
2 तुझ्या अंगावरची धूळ झटक, चांगली वस्त्रे परिधान कर.
यरूशलेम, सियोनकन्ये, तू उठून बस, तू कैदी होतीस.
पण आता तुझ्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या पाशापासून स्वतःची मुक्तता कर.
3 परमेश्वर म्हणतो,
“तुला पैशासाठी विकले नव्हते.
म्हणून, तुझी मुक्तता करण्यासाठी, मी पैशाचा उपयोग करणार नाही.”
4 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझ्या माणसांनी प्रथम मिसरमध्ये वस्ती केली आणि मग ते गुलाम झाले, नंतर अश्शूरने त्यांना गुलाम केले. 5 काय घडले आहे ते आता पाहा दुसऱ्या एका राष्ट्राने माझ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. माझ्या लोकांना गुलामाप्रमाणे ताब्यात घेणारे हे राष्ट्र कोणते? माझ्या लोकांना गुलाम म्हणून घेताना त्यांनी काहीही किंमत मोजली नाही. हे राष्ट्र माझ्या लोकांवर सत्ता गाजविते. त्यांची थट्टा करते. ते लोक नेहमीच माझी निंदा करतात.”
6 परमेश्वर म्हणतो, “असे घडले आहे. पण त्यामुळेच माझ्या लोकांना माझी ओळख पटेल. मी कोण आहे हे त्यांना कळेल. लोकांना माझा लौकिक कळेल आणि त्यांच्याशी बोलणारा मी म्हणजेच तो [b] आहे हे समजेल.”
7 “शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोना, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.
8 टेहळणी करणारे [c] आरडाओरडा करतात.
ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत.
का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनाला परत येताना पाहिले आहे.
9 यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील.
तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल.
का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
10 परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील.
देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.
11 तुम्ही लोकांनी बाबेल सोडावे.
ते ठिकाण सोडा,
याजकांनो, पुजेचे साहित्य नेण्यासाठी
स्वतःला शुध्द् करा.
अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका.
12 तुम्ही बाबेल सोडाल.
पण ते तुम्हाला घाईने बाबेल सोडण्याची सक्ती करणार नाहीत.
ते लोक तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडणार नाहीत.
तुम्ही निघून याल.
आणि परमेश्वर तुमच्याबरोबर असेल.
परमेश्वर तुमच्या पुढे असेल.
आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल. [d]
यातना भोगणारा देवाचा सेवक
13 “माझ्या सेवकाकडे पाहा. तो नक्कीच यशस्वी होईल. [e] त्याला अतिशय महत्व येईल. भविष्यात लोक त्याचा आदर करतील. त्याला मान देतील. 14 माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांना धक्का बसला. त्याला इतकी दुखापत झाली होती की मनुष्य म्हणून त्याला ओळखणे त्यांना शक्य नव्हते. 15 पण त्यांना अधिकच आश्चर्य वाटेल. राजे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातील पण ते एकही शब्द बोलणार नाहीत. माझ्या सेवकाची गोष्ट ह्या लोकांनी ऐकलेली नाही. काय झाले ते त्यांनी पाहिले. त्यांनी जरी ती गोष्ट ऐकली नसली तरी त्यांना ती सर्व समजलेली आहे.”
22 नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती. 2 आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती.
3 त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. देवाचे सेवक त्याची उपसना करतील. 4 आणि ते त्याचे मुख पाहतील. व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. 5 त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरंज पडणार नाही; कारण प्रभु देव आपला प्रकाश त्यांना पुरवील. आणि ते लोक अनंतकाळ राज्य करतील.
6 नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. जो प्रभु संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभु आहे, त्याने आपला दूत पाठविला. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे.” 7 “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य!”
8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करु लागलो. 9 परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करु नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर!”
10 नंतर देवदूत मला म्हणाला, “भावी काऴाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. 11 जो मनुष्य अयोग्य वागतो, तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे! जो मलिन आहे, त्याला आणखी मलिन राहू दे! जो मनुष्य पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे.”
12 “पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळ देईन. 13 मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील. 15 परंतु ‘कुत्रे’ चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडी करणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.
16 “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
17 आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये!” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
18 या पुस्तकात भविष्याकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्याला मी गंभीरपणे सावधान करतो: जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणिल. 19 आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील, त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”
आमेन, ये प्रभु येशू, ये!
21 प्रभु येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center