M’Cheyne Bible Reading Plan
उपासनेत सहभागी होण्याविषयी
23 “जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याला परमेश्वराच्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई आहे. 2 ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
3 “अम्मोनी आणि मवाबी यांनी व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर उपासनेत सामील होवू नये. 4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच बलामला पैसे चारुन त्यांनी त्याला तुम्हांला शाप द्यायला लावले. (मेसोपोटेमियातील पथोर नगरामधला बौर याचा बलाम हा मुलगा.) 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याचा तुमच्यावर लोभ आहे. 6 या अम्मोनी किंवा मवाबी लोकांबरोबर कधीही सलोखा करु नका. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी मैत्री करु नका.
इस्राएलींनी कोणाला आपले म्हणावे?
7 “अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात. 8 अदोमी आणि मिसरी यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या प्रार्थनेत सहभागी व्हायला हरकत नाही.
सैन्यातील शुचिता
9 “युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा. 10 एखाद्याला रात्री स्वप्नावस्था झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये. 11 मग संध्याकाळी स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.
12 “प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी. 13 आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा. 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याहातून शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हांला सोडून जायचा.
इतर नियम
15 “एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका. 16 त्याला तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्याला जाच करु नका.
17 “इस्राएलच्या स्त्रीपुरुषांपैकी कोणीही देवळातील वेश्या होऊ नये. 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.
19 “आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका. 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
21 “तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल. 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही. 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. देव काही तुम्हाला ‘नवस बोला’ असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
24 “दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका. 25 कोणाच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण विळ्याने कापून नेऊ नका.
112 परमेश्वराची स्तुती करा.
जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील.
त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
2 त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील.
चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
3 त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल
आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
4 चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो.
देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
5 माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते.
माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
6 तो माणूस कधीही पडणार नाही.
चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
7 त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही.
त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
8 ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही.
तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
9 तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो
आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात.
ते रागाने त्यांचे दांत खातील आणि
नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.
113 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
2 परमेश्वराचे नाव आता आणि
सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.
3 पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत
परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
4 परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे.
त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.
5 कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही.
देव स्वर्गात उंच बसतो.
6 देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश
आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
7 देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो.
देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.
8 आणि देव त्या लोकांना महत्व देतो.
देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
9 स्त्रीला मूल होत नसेल तर देव तिला मुले देईल
आणि तिला आनंदी करेल.
परमेश्वराची स्तुती करा.
लोकांनी पापे केल्यामुळे इस्राएलला शिक्षा केली गेली
50 परमेश्वर म्हणतो,
“इस्राएलच्या लोकांनो, मी, तुमची आई यरूशलेमला, घटस्फोट दिला असे तुम्ही म्हणता.
पण मी तिला घटस्फोट दिला हे सिध्द करणारे कायदेशीर कागदपत्रे आहेत का?
माझ्या मुलांनो, मी कोणाचे पैसे देणे लागतो का?
कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हांला विकले का? नाही.
तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हाला देऊन टाकले.
तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले.
2 मी घरी आलो तर घरी कोणीच नव्हते.
मी खूप हाका मारल्या पण कोणीच उत्तर दिले नाही.
मी तुमचे रक्षण करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का?
तुमच्या सर्व संकटातून वाचविण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे.
बघा! जर मी समुद्राला वाळून जाण्याची आज्ञा दिली,
तर तो वाळून जाईल.
मग पाणी नसल्याने मासे मरतील
आणि त्यांना दुर्गंधी सुटेल.
3 मी आकाश काळे करू शकतो.
मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”
देवाचा सेवक खरोखरच देवावर अवलंबून आहे
4 परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो. 5 परमेश्वर, माझा प्रभू, मला शिकायला मदत करतो आणि मीही त्याच्याविरूध्द् कधी गेलो नाही. मी त्याला अनुसरण्याचे सोडणार नाही. 6 मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही. 7 परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.
8 परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द् करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू. 9 पण लक्षात ठेवा, माझा प्रभु मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल.
10 परमेश्वराला मानणारे लोक परमेश्वराच्या सेवकाचे ऐकतात. तो सेवक, काय घडणार आहे हे माहीत नसताना, पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगतो. त्याला देवाच्या नावाबद्दल खात्री वाटते आणि तो त्यावर अवलंबून राहातो.
11 “पाहा! तुम्ही लोक स्वतःच्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वतःचा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वतःच पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”
एक हजार वर्षे
20 आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठा साखळदंड होता. 2 त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि एक हजार वर्षासाठी साखळदंडाने बांधून ठेवले. 3 त्याने एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत राष्ट्रांना आणखी फसवू नये, म्हणून त्या देवदूताने त्याला खोल बोगद्यात टाकून दिले. आणि त्या दाराला कुलूप लावून शिक्का मारला. त्या काळांनंतर पुन्हा थोडा काळ त्याला मोकळे सोडण्यात येणार होते.
4 नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत, अशी काही सिंहासने मी पाहिली. या लोकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि येशूबाबतच्या सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभु देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जिवे मारण्यात आले, त्यांचे आत्मे मी पाहिले. त्या लोकांनी श्र्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती, आणि त्यांच्या कपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता. ते परत जिवंत झाले. आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. 5 (इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थान ते हेच होय. 6 ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य! त्या लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही; उलट ते लोक देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील; आणि ते त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
The Defeat of Satan
7 नंतर, जेव्हा एक हजार वर्षे संपतील, तेव्हा सैतानाला त्याच्या तुरुंगवासातून सोडण्यात येईल. 8 आणि जगाच्या चारही कोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रांना फसविण्यासाठी सैतान बंदीवासातून बाहेर पडेल. त्याने फसवून गोग व मागेग यांना लढाईसाठी एकत्र आणले. त्यांची संख्या सागराच्या वाळूच्या संख्येइतकी आहे.
9 ते सैतानाचे सैनिक जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाल करुन आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगराला वेढा दिला. परंतु स्वर्गातून अग्नि खाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली. 10 मग ज्याने त्यांना फसविले होते, त्याला त्या धगधगत्या सरोवरामध्ये, श्र्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल. आणि त्यांना अनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील.
People of the World are Judged
11 नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मी पाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती. 12 नंतर मेलेले लहानथोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती. आणि आणखी एक, म्हणजे जीवनी पुस्तक उघडले होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यात आला.
13 सागराने आपल्यामधील मेलेले लोक बाहेर सोडून दिले. तसेच मरण आणि अधोलोक यांनी आपल्यामधील मेलेले लोक सोडून दिले. आणि प्रत्येक मनुष्याचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार करण्यात आला. 14 नंतर मरण व अधोलोक यांना अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण होय. 15 आणि जर कोणाचे नाव जीवनी पुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते.
2006 by World Bible Translation Center