M’Cheyne Bible Reading Plan
इतर नियम
22 “आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरु मोकाट सुटलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोंचते करा. 2 तो मालक जवळपास राहात नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा. 3 कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा.
4 “कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.
5 “बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे.
6 “वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. 7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.
8 “नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा [a] अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.
यांची सांगड घालू नये
9 “द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षं यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.
10 “बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
11 “लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.
12 “वेगवेगळे धागे एकत्र करुन त्यांचे गोंडे [b] आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
विवाहविषयक नियम
13 “एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि 14 ‘मी या बाईशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. 15 अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. 16 ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी तेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखवावी. 18 यावर गावाच्या पंचांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी. 19 त्याला चाळीस औंस चांदी [c] दंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
20 “पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर 21 गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
स्वैर वर्तन
22 “एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
23 “एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.
25 “पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले. 27 त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
28 “जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास 29 त्याने मुलीच्या वडीलांना वीस औंस चांदी [d] द्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
30 “आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”
दावीदाचे एक स्तुतीगीत.
110 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला,
“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन.
माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”
2 परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल.
तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
3 तू तुझ्या सैन्याची जमवाजमव करशील
त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील.
त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील.
हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. [a]
4 परमेश्वराने वचन दिले आहे
आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही.
“तू सदैव याजक राहिला आहेस
मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”
5 माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे.
तो रागावेल तेव्हा इतर सर्व राजांचा पराभव करील.
6 देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील.
सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल
आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील.
7 राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो.
तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवान [b] होईल.
111 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात
त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या
चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो.
त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे
हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो.
देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या
त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते.
त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात.
त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9 देव आपल्या माणसांना वाचवतो.
देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते.
जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात.
देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
देव त्याच्या खास सेवकाला बोलावितो
49 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो,
माझे म्हणणे ऐका.
जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी
मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.
2 परमेश्वर त्याचे म्हणणे माझ्याकडून वदवितो.
तो माझा उपयोग धारदार तलवारीसारखा करतो.
त्याच्या ओंजळीत मला लपवून तो माझे रक्षणही करतो.
परमेश्वर टोकदार बाणाप्रमाणे माझा उपयोग करतो,
पण तो त्याच्या भाल्यात मला लपवितोही.
3 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस.
मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”
4 मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली.
स्वतः झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही.
मी माझी सर्व शक्ती खर्च केली
पण माझ्याहातून काहीच झाले नाही.
तेव्हा आता काय करायचे.
ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे.
देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.
5 मी परमेश्वराचा सेवक व्हावे,
याकोबाला आणि इस्राएलला मी परत देवाकडे न्यावे, म्हणून मला देवाने जन्माला घातले.
परमेश्वर माझा सन्मान करील.
मला देवाकडून शक्ती मिळेल.”
6 परमेश्वर मला म्हणाला, “तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस.
इस्राएलचे लोक कैदी आहेत.
पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल.
याकोबाच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल.
पण तुझे काम दुसरेच आहे,
ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे.
मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन.
जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”
7 परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव, इस्राएलला वाचवितो देव म्हणतो,
“माझा सेवक नम्र आहे.
तो अधिपतींची सेवा करतो पण लोक त्याचा तिरस्कार करतात पण राजे त्याला पाहतील आणि उभे राहून त्याला मान देतील.
मोठे नेते त्याच्यापुढे वाकतील.”
परमेश्वराला, इस्राएलच्या पवित्र देवाला हे व्हायला पाहिजे आहे म्हणून असे घडेल, परमेश्वर विश्वासू आहे. ज्याने तुला निवडले तोच तो आहे.
तारणाचा दिवस
8 परमेश्वर म्हणतो,
“माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल.
त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन.
तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल.
तेव्हा मी तुला मदत करीन.
मी तुझे रक्षण करीन.
माझा लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील.
देशाचा आता नाश झाला आहे
पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील.
9 तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील.
अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील
‘अंधारातून बाहेर या’ प्रवास करताना लोकांना खायला मिळेल.
ओसाड टेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल.
10 लोक उपाशी राहणार नाहीत.
ते तहानेलेही राहणार नाहीत.
तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत.
का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील
आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
11 मी माझ्या लोकांसाठी रस्ता तयार करीन.
डोंगर सपाट करीन
आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
12 “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर
आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत.
मिसरमधील सीनीहूनही (आस्वानहूनही) लोक येत आहेत.”
13 हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा.
डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा.
का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो.
गरिबांवर तो दया करतो.
सियोन-परित्यक्ता स्त्री
14 पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले,
माझा प्रभु मला विसरला.”
15 पण मी म्हणतो,
“आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही.
आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही.
आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही
आणि मी (परमेश्वर) तुला विसरू शकत नाही.
16 पाहा! मी तुझे नाव माझ्या हातावर लिहिले आहे.
मी नेहमी तुझाच विचार करतो.
17 तुझी मुले तुझ्याकडे परत येतील.
लोकांनी तुझा पराभव केला पण ते लोक तुला एकटी सोडतील.
18 वर पाहा, तुमच्या सभोवती पाहा.
तुझी मुले एकत्र गोळा होऊन तुझ्याकडे येत आहेत.”
परमेश्वर म्हणतो,
“मी प्रत्यक्ष आहे आणि मी तुला पुढील गोष्टींचे वचन देतो.
तुझी मुले गळ्यात शोभून दिसणाऱ्या रत्नांप्रमाणे होतील.
नववधूने गळ्यात घालायच्या हाराप्रमाणे ती होतील.
19 “आता तुझा नाश केला गेला आहे आणि तुझा पराभव झाला आहे.
तुझा देश कुचकामी आहे.
पण थोड्या काळानंतर, तुझ्या भूमीवर खूप खूप लोक असतील.
तुझा नाश करणारे खूप दूर जातील.
20 तुझ्या हरवलेल्या मुलांसाठी तू दु:खी झालीस.
पण ती मुले तुला म्हणतील,
‘ही जागा फारच लहान आहे.
आम्हाला राहायला मोठी जागा दे.’
21 मग तू मनाशी म्हणशील,
‘ही सर्व मुले मला कोणी दिली?
हे फार चांगले आहे.
मी दु:खी होते आणि एकटी होते.
माझा पराभव केला गेला आणि मला माझ्या माणसांपासून दूर केले गेले.
मग ही मुले मला कोणी दिली?
पाहा मला एकटी सोडले,
ही सर्व मुले कोठून आली?’”
22 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो,
“बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन.
मी सर्व लोकांना दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन नंतर
ते तुझी मुले तुझ्याकडे आणतील.
ते त्यांना खांद्यांवरून
आणि हातांतून आणतील.
23 राजे तुझ्या मुलांचे शिक्षक असतील.
राजकन्या त्यांची काळजी घेतील.
ते राजे व राजकन्या तुझ्यापुढे वाकतील.
ते तुझ्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लावतील.
मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे.
आणि माझ्यावर जो विश्वास ठेवतो त्याची निराशा होत नाही.”
24 जेव्हा एखादा शूर वीर युध्दात संपत्ती जिंकतो,
तेव्हा तुम्ही ती त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही.
जेव्हा एखादा बलवान शिपाई तुरूंगावर पहारा करतो
तेव्हा कैदी तुरूंगातून निसटू शकत नाही.
25 पण परमेश्वर म्हणतो,
“कैदी पळून जातील.
कोणीतरी त्यांना त्या कडक पहाऱ्यातून दूर नेईल.
हे कसे होईल? तुझी लढाई मी लढेन.
मी तुझ्या मुलांना वाचवीन.
26 त्या लोकांनी तुला दुखावले
पण त्यांना स्वतःचेच मांस खायला मी लावीन.
स्वतःच्याच रक्ताची त्यांना मद्यासारखी धुंदी चढेल.
मी तुला वाचविले हे प्रत्येकाला माहीत होईल
याकोबाच्या सामर्थ्यवान परमेश्वराने तुझे रक्षण केले हे सर्वांना समजेल.”
स्वर्गात लोक देवाची स्तुति करतात
19 यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:
“हालेलुया!
तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
2 कारण त्याचे न्यायनिवाडे खरे
आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने
आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,
तिला देवाने शिक्षा केली आहे.
त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”
3 ते पुन्हा म्हणाले,
“हालेलुया!
तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.”
4 मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याची उपासना केली. ते म्हणाले:
“आमेन, हालेलुया!”
5 मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली,
“देवाच्या सर्व सेवकांनो,
त्याची स्तुति करा,
जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर
देवाची स्तुति करा!”
6 नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला, तो आवाज महापूराच्या आणि मेघांच्या मोठया गडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की:
“हालेलुया!
कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने
सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे.
7 आपण उल्हास करु व आनंदात राहू!
आणि त्याचे गौरव करु
कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे.
आणि त्याच्या वधूने स्वतःला नटवून तयार केले आहे
8 तिला स्वच्छ, चमकणारे तागाचे कपडे
नेसायला दिले आहेत.”
(देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतीमत्त्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत.)
9 नंतर तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे, ते धन्य!” तो मला म्हणाला, “हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत.”
10 यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तर तुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवक मात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.”
पांढऱ्या घोड्यावरचा स्वार
11 नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे “नाव विश्वासू आणि खरा” असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. 13 त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला झगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे. 14 स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. 15 त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील, आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील. 16 त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:
राजांचा राजा आणि प्रभुंचा प्रभु
17 नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणत होता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा! 18 म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
19 मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते. 20 त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणि खोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले. 21 शिल्लक राहीलेले सैन्य, घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले. आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभर खाल्ले.
2006 by World Bible Translation Center