Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 20

युद्धनीती

20 “तुम्ही शत्रूवर चाल करुन जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमचा पाठीराखा आहे.

“तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याशी बातचीत करावी. ती अशी, ‘इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करुन जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. उभारी कायम ठेवा. शत्रूला घाबरु नका. कारण तुम्हाला देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरुद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हाला मदत करणारा आहे.’

“मग लेवी अधिकाऱ्यांनी सैन्याला उद्धेशून असे सांगावे, ‘नवीनघर बांधून अजून गृह प्रवेश केला नाही असा कोणी तुमच्यात आहे का? त्याने परत जावे. कारण तो युद्धात प्राणाला मुकल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील. द्राक्षमळा लावून अजून त्याची तोडणी केली नाही, फळ चाखले नाही असा कोणी आहे काय? त्याने माघारी जावे कारण तो युद्धात मरण पावल्यास दुसराच कोणी त्याच्या मळ्यातील फळे खाईल. तसेच, वाङनिश्चय होऊन अजून लग्न झालेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.’

“त्या लेवी अधिकाऱ्यांनी पुढे हेही सांगावे की युद्धाच्या भीतीने कोणी गलितगात्र झालेला असल्यास त्याने घरी परत जावे. नाहीतर त्याच्यामुळे इतरांचेही अवसान गळेल. अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी.

10 “तुम्ही एखाद्या नगरावर चाल करुन जाल तेव्हा प्रथम शांततेच्या तहाची बोलणी करुन पाहा. 11 त्यांनी तुमच्या बोलण्याला मान्यता देऊन नगराचे दरवाजे उघडले तर तेथील सर्व प्रजा तुमची गुलाम होईल व तुमची सेवाचाकरी करील. 12 पण त्यांनी तुमची तहाची बोलणी फेटाळून लावली आणि ते युद्धाला सज्ज झाले तर मग नगराला वेढा घाला. 13 आणि तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देईल तेव्हा तेथील सर्व पुरुषांना ठार करा. 14 पण तेथील बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वतःसाठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या. 15 तुमच्यापासून फार लांब असणाऱ्या व तुमच्या प्रदेशाबाहेर असणाऱ्या नगरांबाबत असे करण्यात यावे.

16 “पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशातील नगरे तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा तिथे मात्र कोणालाही जिवंत ठेवू नका. 17 हत्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा एकूण एक सर्वांचा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे समूळ नाश करा. 18 नाहीतर आपापल्या दैवतांची पूजा करताना ते ज्या अमंगळ गोष्टी करतात त्या ते तुम्हाला शिकवतील आणि तसे करणे आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने पाप आहे.

19 “युद्धात एखाद्या नगराला तुम्ही फार काळ वेढा घालून राहिलात तर तेथील फळझाडांवर कुऱ्हाड चालवू नका. त्यांची फळे अवश्य खा पण झाडे तोडू नका. त्यांच्याशी युद्ध पुकारायला ती झाडे काही तुमची शत्रू नाहीत. 20 पण ज्यांना फळे येत नाहीत ती झाडे तोडलीत तरी चालतील. युद्ध चालू असेपर्यंत युद्धासाठी लागणारी शस्त्र बनवायला त्या लाकडाचा उपयोग हवा तर करा.

स्तोत्रसंहिता 107

भाग पांचवा

((स्तोत्रसंहिता 107-150)

107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
    कारण तो चांगला आहे.
    त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
    परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
    त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.

त्यांतले काही वाळवंटात फिरले.
    ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
    आणि अशक्त होत होते.
नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
    तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
    देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.

10 देवाची काही माणसे कैदी होती
    आणि काळ्याकुटृ तुरुंगात गजांच्या आडबंद होती.
11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले.
    त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले.
    ते अडखळले आणि पडले.
    त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले,
    ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी
    ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करायला मदत करतो.
    देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो.
    देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.

17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात.
    आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
18 त्या लोकांनी खायचे नाकारले
    आणि ते जवळ जवळ मेले.
19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
    आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
20 देवाने आज्ञा केली आणि
    त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी
    करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा.
    परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.

23 काही लोक बोटीतून समुद्रापार जातात.
    त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
24 त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले.
    त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
25 देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला,
    लाटा उंच उंच जायला लागल्या.
26 लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले
    आणि खोल समुद्रात खाली टाकले.
वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
27 ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते.
    खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
28 ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
29 देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
30 समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आनंदित झाले.
    देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
31 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल
    आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
32 देवाची मोठ्या सभेत स्तुती करा.
    वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.

33 देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले.
    देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
34 देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले.
    का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
35 देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले.
    देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
36 देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले
    आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
37 त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली
    आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
38 देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला.
    त्यांचे कुटुंब वाढले.
    त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
39 अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान
    आणि अशक्त राहिली.
40 देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले
    आणि ओशाळवाणे वाटायला लावले
आणि त्याला खाली पाहायला लावले.
    देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
41 पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली
    आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
42 चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात.
    पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील
    नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.

यशया 47

बाबेलला देवाचा संदेश

47 “धुळीत पड आणि तेथेच बस!
    खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस.
तू आता सत्तेवर नाहीस.
    लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
तू आता खूप मेहनत केली पाहिजेस.
    तुझी चांगली वस्त्रे आणि बुरखा उतरव तू जात्यावर धान्य दळले पाहिजेस.
पुरूष तुझे पाय पाहू शकतील एवढे तुझे वस्त्र वर उचलून धर आणि नद्या पार कर.
    तुझा देश सोड.
पुरूष तुझा देह पाहतील
    आणि तुझा भोग घेतील.
तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन.
    आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”

“माझे लोक म्हणतात, ‘देवाने आम्हाला वाचविले.
    त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
    इस्राएलचा पवित्र एकमेव देव.’”

“बाबेल, तेथेच शांत बसून राहा.
    खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का?
    कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.

“मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत
    पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले.
मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले.
    तू त्यांना शिक्षा केलीस.
पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस.
    तू वृध्दांनासुध्दा् खूप मेहनत करायला लावलीस.
तू म्हणालीस, ‘मी चिरकाल राहीन.
    मी नेहमीच राणी होईन.’
तू त्या लोकांना वाईट वागविलेस हे तुझ्या लक्षात आले नाही.
    काय घडेल याचा तू विचार केला नाहीस.
तेव्हा ‘सभ्य स्त्रिये,’ आता माझे ऐक!
    तुला आता सुरक्षित वाटते व तू स्वतःशीच म्हणतेस,
‘मीच तेवढी महत्वाची व्यक्ती आहे.
    माझ्यासारखे महत्वाचे कोणीही नाही.
मी कधीच विधवा होणार नाही.
    मला नेहमीच संतती होईल.’
एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील.
    पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील.
हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील.
    तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.
10 तू दुष्कृत्ये केलीस आणि तरी तुला सुरक्षित वाटते.
    मनातल्या मनात म्हणतेस ‘माझी दुष्कृत्ये कोणालाच दिसत नाहीत.’
तुझे शहाणपण आणि ज्ञान तुला वाचवील असे तुला वाटते.
    ‘मीच एकमेव आहे.
    माझ्यासारखे महत्वाचे कोणी नाही’ असा विचार तू स्वतःशीच करतेस.

11 “पण तुझ्यावर संकटे येतील हे केव्हा होईल ते तुला कळणार नाही.
    पण तुझा नाश जवळ येत आहे.
तू ती संकटे थोपवू शकणार नाहीस.
    काय होते आहे हे कळायच्या आतच तुझा नाश होईल.
12 जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी
    तू आयुष्यभर मेहनत केलीस.
तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर.
    कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील;
    कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
13 तुला खूप सल्लागार आहेत.
    त्यांनी दिलेल्या सल्याचा तुला वीट आला का?
मग ग्रहनक्षत्रे पाहून ज्योतिष सांगणाऱ्यांना पाठव.
    ते तुला महिन्याची सुरवात कधी आहे हे सांगतात;
    तर कदाचित् तुझा त्रास कधी सुरू होणार हे ही सांगू शकतील.
14 पण ही माणसे स्वतःचा बचाव करण्यासही समर्थ असणार नाहीत.
    ते गवताच्या काडीप्रमाणे जळतील.
ते इतक्या चटकन् जळतील की भाकरी भाजायला निखारे पेटणार नाहीत
    की उबेला आगोटी राहणार नाही.
15 तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल.
    तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील.
प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल.
    तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”

प्रकटीकरण 17

श्र्वापदावर बसलेली तुच्छ स्त्री

17 सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीच वेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला. आणि तिच्या लैंगिक पापाच्या द्राक्षारसाने पृथ्वीवरील लोक धुंद झाले आहेत.”

मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्या श्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती, त्या स्त्रीने किरमिजी व जांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेला होता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता. तिच्या कपाळावर नाव लिहिले होते. त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:

मोठी बाबेल वंश्यांची

व पृथ्वीवरील ओंगळ

गोष्टींची माता

मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयी सांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.

जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो. मग देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे, ज्याला सात डोकी व दहा शिंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो. जो श्र्वापद तू पाहिला तो (पूर्वी) होता, आता तो नाही. आणि तो तळविरहीत बोगद्यातून येईल आणि नष्ट केला जाईल. पृथ्वीवर राहणारे लोक ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीच्या स्थापनेपासून लिहिलेली नाहीत ते जेव्हा श्र्वापदाला पाहतील, तेव्हा ते आश्चर्यचकित होतील कारण तो (पूर्वी) होता, आता तो नाही आणि तरी तो येईल.

“यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे. सात डोकी या सात टेकड्या आहेत, ज्यावर ती स्त्री बसते. 10 ते सात राजेसुद्धा आहेत. त्यापैकी पाच राजे पतन पावले आहेत. एक आहे आणि एक अजून आला नाही. पण जेव्हा तो येईल तेव्हा तो फारच थोडा वेळ थांबेल. 11 जो प्राणी (पूर्वी) होता आणि जो आता नाही तो आठवा राजा आहे. आणि तो त्या सात राजांपासून आहे. आणि तो आपल्या नाशाकडे जात आहे.

12 “जी दहा शिंगे तू पाहिलीस ते ज्यांना अजून सत्ताधिकार मिळाला नाही, असे दहा राजे आहेत. पण त्यांना श्र्वादाबरोबर एका घटकेसाठी राजासारखा अधिकार मिळेल. 13 त्यांचा एकच हेतू आहे. आणि ते त्यांची शक्ती व अधिकार श्र्वापदाला देतील. 14 ते कोकऱ्याबरोबर युद्ध करतील पण कोकरा त्यांच्यावर मात करील. कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे. आणि त्याच्याबरोबर त्याने बोलाविलेले, निवडलेले, विश्वासू अनुयायी असतील.”

15 मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक, समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत. 16 तो श्र्वापद आणि दहा शिंगे तू पाहिलीस ते त्या वेश्येचा तिरस्कार करतील. ते तिला ओसाड, उजाड करतील आणि तिला नग्न सोडून देतील, ते तिचे मांस खातील, व अग्नीने तिला जाळतील. 17 देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत, देवाने त्या श्र्वापदाला सत्ता चालविण्याचा अधिकार देण्याचे कबूल केले आहे. देवाने त्याचा हेतु पूर्ण करण्याचे त्यांच्या मनात घातले आहे. 18 जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्या राजांवर सत्ता गाजवील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center