Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 19

आश्रय घेण्याची शहरे

19 “इतर राष्ट्रांच्या मालकीचा प्रदेश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे. परमेश्वर त्या राष्ट्रांना नष्ट करेल. मग त्यांच्या जागी तुम्ही वस्ती कराल. त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल. तेव्हा 2-3 त्या प्रदेशाचे तुम्ही तीन भाग करा. मग प्रत्येक भागात सर्वांना जवळ पडेल असे एक नगर निवडा. त्या नगरांना रस्त्यांची सोय करा. म्हणजे कोणाच्या हातून मनुष्यवध झाल्यास त्याला आश्रयासाठी या नगराकडे धाव घेता येईल.

“मनुष्यवध करुन या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना ज्याच्या हातून चुकून आपल्या शेजाऱ्याचा वध झाला आहे त्याने येथे जावे. उदाहरणार्थ, दोन माणसे लाकडे तोडायला जंगलात गेली. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नेमके दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने या तीनपैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे. हे नगर फार दूर असेल तर त्याला तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक [a] त्याचा पाठलाग करील व त्याला त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. यास्तव मुळात त्या माणसाच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता. म्हणून ही नगरे सर्वांना जवळ पडायला हवीत. तेव्हा अशी तीन नगरे राखून ठेवा.

“तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाडवडिलांना वचन दिले होते. त्यांच्याजवळ कबूल केलेला सर्वप्रदेश तो तुम्हांला देईल. तुमचाच देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा व त्याने दाखवलेल्या जीवनमार्गाने जा. या मी दिलेल्या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर तुम्हाला हे सर्व मिळेल. मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा. 10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या भूमीवर निर्दोष माणसांची हत्या होणार नाही आणि अशा हत्येचे पाप तुम्हांला लागणार नाही.

11 “पण द्वेषापोटीही एखादा माणूस संधीची वाट पाहात लपून छपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करुन या नगरात आश्रयाला येईल. 12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्याला तेथून बाहेर काढावे व मृताच्या आप्तांच्यां हवाली करावे. त्याला मृत्यूची सजा झाली पाहिजे. 13 त्याच्याबद्दल कळवळा वाटू देऊ नका. कारण त्याने निरपराध माणासाचा खून केला आहे. इस्राएलमधून हा कलंक दूर करा. मग सर्व काही ठीक होईल.

जमिनीची हद्द

14 “शेजाऱ्याच्या जमिनीची हद्द दाखवणारे दगड दूर करु नका. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे दगड म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढी जमीन दिली त्याच्या खुणा होत.

साक्षीदार

15 “नियमाविरुद्ध वागल्याचा, अपराधाचा आरोप कुणावर असेल तर त्याला दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.

16 “अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो. 17 अशावेळी त्या दोघांनी परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी जावे आणि तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांनी निवाडा करावा. 18 न्यायाधीशांनी कौशल्याने चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा खोटारडेपणा उघडकीला आला तर 19 मग तुम्ही त्याला शिक्षा करा. तथाकथित अपराध्याला जे शासन व्हावे असे त्याला वाटत होते तेच याला करा. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा. 20 इतरांच्या कानावर हे गेले की त्यांनाही दहशत बसेल आणि असे प्रकार करायला ते धजावणार नाहीत.

21 “गुन्हा जितका गंभीर स्वरुपाचा तितकीच शिक्षाही कडक असावी. अपराध्याला शासन करताना दया दाखवण्याचे कारण नाही. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहांताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.

स्तोत्रसंहिता 106

106 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या.
    देवाचे प्रेम सदैव राहील.
परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही.
    देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात.
    ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.

परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव.
    मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी
    ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे.
मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे.
    मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.

आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले.
    आम्ही चुकलो.
    आम्ही दुष्कृत्ये केली.
परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज
    तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत.
ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा
    आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.

परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर,
    देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला.
    देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले.
    देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले.
    शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.

12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला.
    त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
13 परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी
    विसरले त्यांनी देवाचा उपदेश ऐकला नाही.
14 आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले
    आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
15 परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या.
    पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.
16 लोकांना मोशेचा मत्सर वाटला.
    त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला.
17 म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली.
    जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले.
नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
18 नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले.
    अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले.
19 त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले.
    त्यांनी मूर्तीपूजा केली.
20 त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या
    बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
21 देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले.
पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले.
    ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केले त्या देवाला ते विसरले.
22 देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या.
    देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या.

23 देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती.
    परंतु मोशेने त्याला थोपवले.
मोशे देवाचा निवडलेला सेवक होता.
देव खूप रागावला होता.
    पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही. [a]

24 परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला.
    त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.
25 आमच्या पूर्वजांनी देवाचे
    ऐकायला नकार दिला.
26 म्हणून देवाने शपथ घेतली की
    ते वाळवंटात मरतील.
27 देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन.
    देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.

28 नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले.
    ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्या [b] लोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
29 देव त्याच्या माणसांवर खूप रागावला,
    देवाने त्यांना खूप आजारी पाडले.
30 पण फीनहासने देवाची प्रार्थना केली [c]
    आणि देवाने आजार थांबवला.
31 फीनहासने चांगली गोष्ट केली हे देवाला माहीत होते.
    व याची सदैव आठवण ठेवील.

32 मरीबा येथे लोक खूप रागावले
    आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.
33 त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले
    म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थांबता बोलला.

34 परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहाणाऱ्या इतर देशाचा नाश करायला सांगितले.
    पण इस्राएलच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही.
35 ते इतर लोकांत मिसळले आणि
    ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले.
36 ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले.
    ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.
37 देवाच्या माणसांनी स्वःतचीच
    मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.
38 देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले.
    त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले
    आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
39 म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली.
देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत
    आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.
40 देव त्याच्या माणसांवर रागावला.
    देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले.
    देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले
    आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले.
    पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले.
    देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती
    तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली
आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली
    आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले
    पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून
    आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू
आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या.
    देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे.
आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन!”

परमेश्वराची स्तुती करा.

यशया 46

खोटे देव अर्थशून्य आहेत

46 “बेल आणि नेबो माझ्यापुढे वाकतात. ते खोटे देव म्हणजे फक्त मूर्ती आहेत.

“लोक त्या मूर्तीना जनावरांच्या पाठीवर लादतात त्या मूर्ती म्हणजे वाहून न्यावी लागणारी फक्त ओझी आहेत. खोटे देव लोकांना दमविण्याव्यतिरिक्त काहीही करीत नाहीत. त्या सर्व खोट्या देवांना नमावे लागेल ते सर्व जमीनदोस्त होतील. ते पळून जाऊ शकणार नाहीत त्यांना कैद्याप्रमाणे धरून नेले जाईल.

“याकोबच्या वंशजांनो, आणि इस्राएलमधील वाचलेल्या लोकांनो, ऐका! तुम्ही आईच्या गर्भात असल्यापासून मी तुम्हालाआधार देत आलो आहे. तुम्ही जन्मल्यावर मीच तुम्हाला आधार दिला. आणि तुम्ही वृध्द झाल्यावर, तुमचे केस पिकल्यावरही मीच तुम्हाला आधार देईन, कारण मी तुम्हाला निर्माण केले. मी तुम्हाला आधार देतच राहीन व तुमचे रक्षण करीन.

“तुम्ही माझी तुलना दुसऱ्या कोणाशी करू शकता का? नाही! कोणीही माणूस माझ्याबरोबरीचा नाही. तुम्ही माझ्याबद्दल सर्वच जाणू शकत नाही. माझ्यासारखे काही नाही. काही लोकांजवळ भरपूर सोने-चांदी असते. सोने त्यांच्या बटव्यातून गळत असते. चांदी ते तराजूने तोलतात. हे लोक कारागिराला पैसे देऊन लाकडापासून खोटा देव तयार करून घेतात. नंतर ते त्या देवाची पूजा करतात. त्याच्यापुढे नतमस्तक होतात. ते स्वतःच्या खांद्यांवरून तो खोटा देव वाहून नेतात. तो देव निरूपयोगी आहे. लोकांना त्यास वाहून न्यावे लागते. लोक मूर्ती जमिनीवर बसवितात. तो देव हालू शकत नाही. तो त्याची जागा सोडून लांब जाऊ शकत नाही. लोक त्याच्याशी ओरडून बोलले तरी तो उत्तर देणार नाही, तो देव म्हणजे फक्त एक मूर्ती आहे, ती लोकांना संकटातून वाचवू शकणार नाही.

“तुम्ही लोकांनी पापे केली तुम्ही त्याबद्दल पुन्हा विचार करावा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि खंबीर व्हा. पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत.

10 “अखेरीला काय होणार हे मी तुम्हाला आरंभीच सांगितले, फार वर्षांपूर्वी, ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच त्या गोष्टी घडण्यापूर्वी अनेक वर्षे मी त्या घडणार असल्याचे तुम्हाला सांगितले. मी योजतो, तसेच घडते मला पाहिजे ते मी घडवून आणतो. 11 मी पूर्वेककडून एका माणसाला बोलवीत आहे. तो माणूस गरूडासारखा असेल. तो अती दूरच्या देशातून येईल. आणि मी ठरविलेल्या गोष्टी तो करील. मी हे करीन असे तुम्हाला सांगत आहे आणि मी ते करीनच. मी त्याला घडविले आहे. मी त्याला आणीन.

12 “तुमच्यातील काहीजणांना आपल्याजवळ प्रचंड सामर्थ्य आहे असे वाटते. पण तुम्ही सत्कृत्ये करीत नाही, माझे ऐका. 13 मी चांगल्या गोष्टी करीन. लवकरच मी माझ्या लोकांना वाचवीन. मी सियोनचे तारण करीन. आणि माझे गौरव इस्राएलला देईन.”

प्रकटीकरण 16

16 मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्या ओता.”

पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले.

दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले,

तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्या व झरे रक्तमय झाले. मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले:

“केवळ तूच एक आहेस,
    जो तू आहेस आणि जो तू होतास.
    तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस.
लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले.
    तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता
तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.
    कारण ते याच पात्रतेचे आहेत.”

त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,

“होय, प्रभु देवा सर्वसमर्था,
    तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”

चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती. भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पण लोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.

10 पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होते. 11 लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.

12 सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला. 13 तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले. 14 हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करतात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात.

15 “पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील, आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.”

16 मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन [a] नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.

17 मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे.” 18 मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता. 19 महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्ट झाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला. 20 प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले. 21 लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पौंड [b] वजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center