M’Cheyne Bible Reading Plan
याजक लेवींचा निर्वाह
18 “लेवी वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा. 2 इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे.
3 “यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. 4 धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.
6 “प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे. 7 आपल्या इतर बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. 8 त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
इतर राष्ट्रांचे अनुकरण नको
9 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका. 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये. 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे. 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.
परमेश्वराचा विशेष संदेष्टा
14 “इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक मांत्रिक, चेटूककरणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही. 15 तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हाला या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.!’
17 “तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘यांचे म्हणणे ठिकच आहे. 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’
भोंदू संदेष्ट्याची पारख
20 “पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वतःचेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.
105 परमेश्वराला धन्यावाद द्या.
त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा.
2 परमेश्वराला गाणे गा; त्याची स्तुतिगीते गा.
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.
3 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
4 शक्तीसाठी परमेश्वराकडे जा.
मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
5 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार
आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात.
तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
7 परमेश्वर आपला देव आहे.
परमेश्वर सर्व जगावर [a] राज्य करतो.
8 परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा.
हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
9 देवाने अब्राहामा बरोबर करार केला.
देवाने इसहाकाला वचन दिले.
10 नंतर त्याने याकोबासाठी नियम केला.
देवाने इस्राएल बरोबर करार केला.
तो सदैव राहील.
11 देव म्हणाला, “मी तुला कनानची जमीन देईन.
ती जमीन तुझ्या मालकीची होईल.”
12 अब्राहामाचे कुटुंब लहान होते, तेव्हा देवाने हे वचन दिले.
ते केवळ काही वेळ तिथे घालवणारे परके लोक होते.
13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते.
14 पण देवाने लोकांना त्यांना वाईट वागणूक देऊ दिली नाही.
देवाने राजांना त्यांना दुख: न देण्याची ताकीद दिली.
15 देव म्हणाला, “मी निवडलेल्या माणसांना दुख: देऊ नका.
माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”
16 देवाने त्या देशात दुष्काळ आणला.
लोकांना खायला पुरेसे अन्न नव्हते.
17 पण देवाने योसेफ नावाच्या माणसाला त्यांच्या पुढे पाठवले.
योसेफ गुलामा सारखा विकला गेला.
18 त्यांनी योसेफाच्या पायाला दोर बांधले.
त्यांनी त्याच्या मानेभोवती लोखंडी कडे घातले.
19 योसेफाने सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष घडेपर्यंत तो गुलामच राहिला.
परमेश्वराच्या संदेशामुळे योसेफ बरोबर होता हे सिध्द् झाले.
20 तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले.
राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुरुंगातून बाहेर काढले.
21 त्याने योसेफाला आपल्या घराचा मुख्य नेमले.
योसेफाने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
22 योसेफाने इतर प्रमुखांना सूचना दिल्या.
योसेफाने वृध्दांना शिकवले.
23 नंतर इस्राएल मिसरमध्ये आला.
याकोब हामच्या देशातच राहिला.
24 याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले.
ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
25 म्हणून मिसरचे लोक याकोबाच्या कुटुंबाचा द्वेष करु लागले.
त्यांनी त्याच्या गुलामांविरुध्द योजना आखल्या.
26 म्हणून देवाने त्याचा सेवक मोशे आणि
देवाने निवडलेला त्याचा याजक अहरोन यांना पाठविले.
27 देवाने मोशे आणि अहरोन यांचा हामच्या देशात
अनेक चमत्कार करण्यात उपयोग करुन घेतला.
28 देवाने अतिशय दाट काळोख पाठवला,
पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
29 म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले
आणि सगळे मासे मेले.
30 त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला.
राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.
31 देवाने आज्ञा केली आणि
माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.
32 देवाने पावसाचे गारात रुपांतर केले.
सर्व देशांत विजा पडल्या.
33 देवाने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे नष्ट केली.
देवाने त्यांच्या देशातले प्रत्येक झाड नष्ट केले.
34 देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले.
ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
35 टोळ व नाकतोड्यांनी देशातली सर्व झाडे खाऊन टाकली.
त्यांनी शेतातली सर्व पिके खाल्ली.
36 आणि नंतर देवाने त्यांच्या देशातल्या सर्व पहिल्या अपत्यांना ठार मारले.
देवाने त्यांच्या मोठ्या मुलांना मारले.
37 नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले.
त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली.
देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही.
38 देवाचे लोक गेल्याचे पाहून मिसरला आनंद झाला.
कारण त्यांना देवाच्या लोकांची भीती वाटत होती.
39 देवाने ढग पांघरुणासारखे पसरले.
देवाने अग्नीच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
40 लोकांनी अन्नाची मागणी केली आणि देवाने लावे आणले.
देवाने त्यांना स्वर्गातली भाकरी भरपूर दिली.
41 देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले.
वाळवटांत नदी वाहू लागली.
42 देवाला त्याच्या पवित्र वचनाची आठवण होती.
देवाला त्याचा सेवक अब्राहाम याला दिलेल्या वचनाची आठवण आली.
43 देवाने त्याच्या माणसांना मिसरमधून बाहेर आणले.
लोक आनंदाने नाचत बागडत, गाणी म्हणत बाहेर आले.
44 देवाने त्याच्या माणसांना इतर लोक राहात असलेला देश दिला.
देवाच्या माणसांना इतरांनी काम करुन मिळवलेल्या वस्तू मिळाल्या.
45 देवाने असे का केले?
त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची
शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून,
परमेश्वराची स्तुती करा.
इस्राएलाच्या मुक्तीसाठी देवाकडून कोरेशची निवड
45 परमेश्वराने स्वतः निवडलेल्या राजाला, कोरेशला पुढील गोष्टी सांगितल्या,
“मी कोरेशचा उजवा हात धरीन.
इतर राजांकडून सत्ता काढून घेण्यास मी त्याला मदत करीन.
नगराच्या वेशी कोरेशला थोपवू शकणार नाहीत.
मी वेशी खुल्या करीन.
आणि कोरेश आत जाईल.
2 कोरेश, तुझ्या सैन्याच्या पुढे मी चालीन.
मी डोंगर भुईसपाट करीन.
मी वेशीचे जस्ताचे दरवाजे मोडीन.
त्यावरील लोखंडी सळ्या तोडीन.
3 तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन.
मी तुला गुप्त धन देईन.
मीच परमेश्वर आहे,
हे तुला कळावे म्हणून मी हे करीन.
मी इस्राएलचा देव आहे,
व मी तुला नावाने हाका मारत आहे.
4 माझा सेवक याकोब,
आणि माझे निवडलेले लोक, म्हणजे इस्राएल ह्यांच्यासाठी मी हे करतो.
कोरेश, मी तुला नावाने हाक मारीत आहे.
तू मला ओळखत नाहीस, पण मी तुला नावाने ओळखतो.
5 मी परमेश्वर आहे मीच फक्त देव
आहे दुसरा कोणीही देव नाही.
मी तुला वस्त्रे घातली,
पण तरीही तू मला ओळखत नाहीस.
6 मी एकटाच देव आहे.
हे मी ह्या सर्व गोष्टी करतो, त्यावरून लोकांना कळेल.
मीच परमेश्वर आहे,
दुसरा कोणीही देव नाही हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यत सर्व लोकांना कळेल.
7 मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही.
मी शांती निर्माण केली तशी संकटेही.
मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.
8 “आकाशातील ढगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडो.
पृथ्वी दुभंगो तारण वाढो,
आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढो.
मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे.”
देव त्याच्या निर्मितीचे नियंत्रण करतो
9 “ह्या लोकांकडे पाहा ते त्यांच्या निर्मात्याशीच वाद घालीत आहेत. माझ्याशी वाद घालणाऱ्यांकडे पाहा. ते खापराच्या तुकड्यासारखे आहेत. कुंभार भांडे करण्यासाठी मऊ, ओला चिखल वापरतो पण चिखल त्याला ‘तू काय करतोस?’ असे विचारीत नाही. निर्मितीला निर्मात्याला प्रश्र्न विचारण्याची हिंमत नसते. हे लोक त्या चिखलासारखे आहेत. 10 आई-वडील मुलांना जन्म देतात पण मुले वडिलांना ‘तुम्ही आम्हाला जीवन का दिले’ किंवा आईला ‘तुम्ही आम्हाला जन्म का दिला?’ असे विचारू शकत नाहीत.”
11 परमेश्वर इस्राएलचा पवित्र देव आहे, त्याने इस्राएलची निर्मिती केली. परमेश्वर म्हणतो,
“माझ्या मुलांनो, तुम्ही मला काही खूण दाखविण्यास सांगितले.
मी केलेल्या गोष्टी दाखविण्याचा तुम्ही मला हुकूम दिला.
12 म्हणून पाहा! मी पृथ्वी व तीवर राहणारी
सर्व माणसे निर्माण केली.
मी माझ्या हाताने आकाश केले,
आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो.
13 कोरेशला चांगल्या गोष्टी करण्यासाठी मीच शक्ती दिली. [a]
मी त्याचे काम सोपे करीन.
कोरेश माझी नगरी पुन्हा वसवेल.
तो माझ्या लोकांना मुक्त करील.
तो माझ्या लोकांना मला विकणार नाही.
ह्या गोष्टी करण्यासाठी मला त्याला काही द्यावे लागणार नाही.
लोक मुक्त केले जातील.
आणि त्यासाठी मला काही मोजावे लागणार नाही.”
सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
14 परमेश्वर म्हणतो, “मिसर आणि इथिओपिआ श्रीमंत आहेत.
पण इस्राएल, तुला ती संपत्ती मिळेल.
सेबाचे उंच लोक तुझ्या मालकीचे होतील.
ते गळ्यात साखळ्या अडकविलेल्या अवस्थेत
तुझ्यामागून चालतील (म्हणजेच ते तुझे गुलाम होतील)
ते तुझ्यापुढे वाकतील आणि तुझी विनवणी करतील.”
इस्राएल, देव तुझ्या बरोबर आहे
दुसरा कोणीही देव नाही.
15 देवा, तुला लोक पाहू शकत नाहीत
तू इस्राएलचा तारणारा आहेस.
16 पुष्कळ लोक खोटे देव तयार करतात.
पण अशा लोकांची निराशा होईल.
ते सगळे लोक लज्जित होऊन दूर जातील.
17 पण परमेश्वर इस्राएलला वाचवील
आणि हे तारण निरंतर सुरूच राहील.
परत कधीही इस्राएलला लज्जित व्हावे लागणार नाही.
18 परमेश्वरच फक्त देव आहे.
त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली.
परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले.
परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकामी नको होती.
ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली.
तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली
“मीच परमेश्वर
आहे दुसरा कोणीही देव नाही.
19 मी गुप्तपणे कधी बोललो नाही.
मी मोकळेपणानेच बोललो.
मी जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात माझे शब्द लपविले नाहीत.
रिकाम्या जागी मला शोधा
असे मी याकोबाच्या लोकांना कधीही सांगितले नाही.
मी परमेश्वर आहे.
मी नेहमीच सत्य बोलतो.
खऱ्या गोष्टीच मी सांगतो.”
परमेश्वर स्वतःच फक्त देव आहे हे तो सिध्द् करतो
20 “तुम्ही लोक दुसऱ्या राष्ट्रातून पळालेले आहात. तेंव्हा गोळा व्हा आणि माझ्यासमोर या. (हे लोक स्वतःजवळ खोट्या देवाच्या मूर्ती बाळगतात. ते त्या त्यांना वाचवून न शकणाऱ्या देवांची हे लोक प्रार्थना करीत राहतात. ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही. 21 त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)
“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही. 22 दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे.
23 “मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर वचन देईन. आणि जेंव्हा मी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हूकूम देतो तेंव्हा ती होतेच. मी वचन देतो की प्रत्येकजण माझ्यापुढे (देवापुढे) नमन करेल. प्रत्येकजण मला अनुसरण्याचे वचन देईल. 24 लोक म्हणतील ‘चांगुलपणा आणि सामर्थ्य फक्त परमेश्वराकडूनच मिळते.’”
काही लोक देवावर रागावतात पण परमेश्वराचे साक्षीदार येतील आणि परमेश्वराने केलेल्या गोष्टींबद्दल सांगतील, मग परमेश्वरावर रागावणारे लोक लाजेने माना खाली घालतील. 25 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना सत्कृत्य करायला मदत करील, व लोक त्यांच्या देवाबद्दल अभिमान बाळगतील.
शेवटच्या पीडेसह देवदूत
15 मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडा आणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
2 मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. 3 त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:
“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान
आणि अदभुत गोष्टी करतोस.
राष्ट्रांच्या राजा,
तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
4 हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील
सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील.
फक्त तूच पवित्र आहेस
सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील
कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
5 त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप) [a] पाहिले. मंदिर उघडे होते. 6 आणि सात पीडा आणणारे सात देवदूत मंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्या होत्या. 7 मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या जो देव अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्या रागाने त्या वाट्या भरल्या. 8 आणि देवाच्या तेजामधून व पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले. आणि कोणीही सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करु शकले नाही. देवाच्या रागाने वाट्या भरल्या
देवाच्या क्रोधाने भरलेल्या सात वाट्या
2006 by World Bible Translation Center