M’Cheyne Bible Reading Plan
यज्ञपशू निर्दोष असावा
17 “यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरु यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.
मूर्तिपूजकांना शासन
2 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध 3 त्याने इतर दैवतांची पूजा केली, किंवा सूर्य, चंद्र, तारे यांना देवपण दिले अशा स्वरुपाचे ते असेल. मी जी परमेश्वराची आज्ञा तुम्हाला दिली त्याच्या हे विरुद्ध आहे. 4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले 5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा. 6 त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका. 7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
अवघड न्यायनिवाडे
8 “एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे. 9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्या. या समस्येची सोडवणूक ते करतील. 10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा. 11 त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल न करता त्यांच्या सूचना पाळा.
12 “जो याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा. 13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
राजाची निवड
14 “तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या प्रदेशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल. 15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैंकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये. 16 त्याने स्वतःसाठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे. 17 तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
18 “राज्य करायला लागल्यावर त्याने स्वतःसाठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्या जवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे. 19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा. 20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.
104 माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस.
तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
2 माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस.
तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
3 देवा, तू तुझे घर त्यांच्यावर बांधतोस.
तू दाटढगांचा रथाप्रमाणे उपयोग करतोस आणि
वाऱ्याच्या पंखावर बसून तू आकाशातून संचार करतोस.
4 देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस
आणि तुझ्या सेवकांना अग्नीसारखे.
5 देवा, तू पृथ्वीला तिच्या पायावर अशा तऱ्हेने उभारलेस की
तिचा कधीही नाश होणार नाही.
6 तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस,
पाण्याने डोंगरही झाकले गेले.
7 परंतु तू आज्ञा केलीस आणि पाणी ओसरले.
देवा, तू पाण्याला दटावलेस आणि ते ओसरले.
8 पाणी डोंगरावरुन खाली दरीत वाहात गेले
आणि नंतर ते तू त्याच्यासाठी केलेल्या जागेत गेले.
9 तू समुद्राला मर्यादा घातलीस आणि
आता पाणी पृथ्वीला कधीही झाकून टाकणार नाही.
10 देवा, तू पाण्याला ओढ्यातून झऱ्यात जायला लावतोस.
ते डोंगरातल्या झऱ्यातून खाली वाहात जाते.
11 झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात.
रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.
12 पानपक्षी तेथे वस्ती करतात.
ते जवळच्याच झाडांच्या फांद्यांवर बसून गातात.
13 देव डोंगरावर पाऊस पाठवतो.
देवाने केलेल्या गोष्टी पृथ्वीला जे काही हवे ते सर्व देतात.
14 देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो.
तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो.
त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.
15 देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो.
आपली कातडी मऊ करणारे तेल देतो
आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.
16 लबानोन मधले मोठे देवदार वूक्ष परमेश्वराचे आहेत.
परमेश्वराने ती झाडे लावली आणि तो त्यांना लागणारे पाणी देतो.
17 पक्षी त्या झाडांत आपली घरटी बांधतात.
मोठे करकोचे देवदारूच्या झाडातच राहातात.
18 रानबकऱ्या उंच पर्वतावर राहातात.
मोठ मोठे खडक कोल्ह्यासारख्या प्राण्याची लपून बसायची जागा आहे.
19 देवा, तू आम्हाला सण केव्हा येतो ते कळण्यासाठी चंद्र दिलास
आणि सूर्याला केव्हा मावळायचे ते नेहमीच कळते.
20 तू काळोखाला रात्र केलेस अशा वेळी रानटी जनावरे बाहेर येतात
आणि इकडे तिकडे फिरतात.
21 सिंह हल्ला करताना गर्जना करतात.
जणू काही ते देवाकडे तू देत असलेल्या अन्नाची मागणी करीत आहेत.
22 नंतर सूर्य उगवतो आणि प्राणी
आपापल्या घरी परत जाऊन विश्रांती घेतात.
23 नंतर लोक त्यांचे काम करायला जातात
आणि ते संध्याकाळपर्यंत काम करतात.
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वर हाच खरा देव आहे
44 “याकोबा, तू माझा सेवक आहेस. माझे ऐक इस्राएल, मी तुला निवडले आहे. मी काय म्हणतो ते ऐक. 2 मी परमेश्वर आहे. मी तुला निर्माण केले. तुला तुझे हे रूप देणारा मी आहे. तू आईच्या गर्भात असल्यापासून मी तुला मदत केली. याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नकोस. यशुरूना, मी तुझी निवड केली.
3 “मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील. 4 झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकांत वाढतील.
5 “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबाचे’ नाव लावील आणखी एक आपली सही ‘मी परमेश्वराचा’ अशी करील, तर आणखी एक स्वतःला ‘इस्राएल’ म्हणवून घेईल.”
6 परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे. 7 माझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. जर असा कोणी असेल, तर त्याने आता बोलावे. त्याने यावे व तो माझ्यासारखा आहे हे सिध्द् करावे. मी ह्या लोकांना निर्माण केल्यापासून जे घडले आणि जे अनंत काळ घडत राहील ते काय ते त्याने मला सांगावे. भविष्यात काय घडणार आहे हे त्याला माहीत असल्याचे त्याने काही खुणेने पटवून द्यावे.
8 “घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”
खोटे देव निरूपयोगी आहेत
9 काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.
10 हे खोटे देव कोणी घडवले? ह्या निरूपयोगी मूर्ती कोणी निर्माण केल्या? 11 कारगिरांनी त्या तयार केल्या. ते सर्व कारागीर माणसेच होती देव नव्हते. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीबद्दल विचार केला तर ते लज्जित होतील व घाबरतील.
12 एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी न मिळाल्यास तो अशक्त होतो.
13 दुसरा कारागीर ओळंबा आणि कर्कटक यांच्या साहाय्याने लाकडावर कापण्यासाठी रेषा आखून घेतो. मग छिन्नीने लाकडातून तो मूर्ती कोरतो. तो मोजपट्टीने मूर्तीचे मोजमाप करतो. अशा तऱ्हेने कारागीर हुबेहूब मनुष्याप्रमाणे दिसणारी मूर्ती करतो आणि ही माणसाची मूर्ती घरात बसून राहण्यापलीकडे काहीही करीत नाही.
14 माणूस गंधसरू, देवदारू वा कधी कधी अल्लोनची झाडे तोडतो (त्या माणसाने ती झाडे वाढवलेली नव्हती. ती जंगलात आपल्या सामर्थ्याने वाढली. जर कोणी भद्रदारू लावला तर पावसामुळे तो वाढतो.)
15 तो ह्या झाडांचा उपयोग सरपणासाठी करतो. तो झाडांच्या बारीक ढलप्या करतो आणि त्यांचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी व ऊबेसाठी करतो. एखाद्या लाकडाच्या ढलपीने अग्नी प्रज्वलित करून तो भाकरी भाजतो आणि त्याच लाकडाच्या तुकड्याचा उपयोग तो देवाची मूर्ती करण्यासाठी करतो व त्या देवाची पूजा करतो. तो देव म्हणजे माणसाने तयार केलेला पुतळा आहे. पण माणूस त्यापुढे नतमस्तक होतो. 16 माणूस अर्ध्याहून अधिक लाकूड जाळतो. अग्नीचा उपयोग तो स्वतःला ऊबदार ठेवण्यासाठी करतो. मग तो म्हणतो, “छान! मला ऊब आली. अग्नीच्या प्रकाशात मी पाहूही शकतो.” 17 पण थोडे लाकूड शिल्लक आहे. मग त्यापासून मूर्ती करून तो त्या मूर्तीलाच देव म्हणतो. तो तिच्यापुढे वाकतो आणि तिची पूजा करतो. तो प्रार्थना करतो, “तू माझा देव आहेस. माझे रक्षण कर.”
18 त्या लोकांना ते काय करीत आहे कळत नाही. त्यांना काही समजत नाही. जणू काही त्यांच्या डोळ्यावर पडदा पडला आहे, त्यामुळे ते पाहू शकत नाही. त्यांची हृदये (मने) समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत. 19 त्यांनी ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. त्यांना काही समजत नसल्याने त्यांनी असा विचार केला नाही “अर्धे लाकूड मी जाळले. त्या विस्तवावर मी भाकरी भाजली, मांस शिजविले. मग मी जेवलो आणि उरलेल्या लाकडातून मी ही भयानक वस्तू तयार केली. मी लाकडाच्या ओंडक्याचीच पूजा करीत आहे.”
20 त्या माणसाला, तो काय करीत आहे, ते कळत नाही. तो गोंधळलेला आहे. त्यामुळे त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गाने नेते. तो स्वतःला वाचवू शकत नाही. तो चूक करतोय हे त्याला दिसत नाही. “मी हातात धरलेली मूर्ती म्हणजे खोटा देव आहे” असे तो म्हणणार नाही.
परमेश्वर, खरा देव इस्राएलला मदत करतो
21 “याकोबा, ह्या गोष्टी लक्षात ठेव.
इस्राएला, तू माझा सेवक आहेस.
हे लक्षात ठेव.
मी तुला निर्माण केले.
तू माझा सेवक आहेस.
म्हणून इस्राएल, तू मला विसरू नकोस.
22 तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती.
पण मी ती सर्व पुसून टाकली.
ढग हवेत विरून जातो तशी
तुझी पापे दिसेनाशी झाली.
मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले.
म्हणून तू माझ्याकडे परत ये.”
23 परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात
आहे खोलवरची भूमीसुध्दा् सुखात आहे.
डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत.
रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत.
का? कारण परमेश्वराने याकोबाला वाचविले.
परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.
24 तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले.
तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले.
परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली.
मी स्वतः आकाश तेथे ठेवले
आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”
25 खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा् परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो. 26 लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
यहुदाची पुनर्बांधणी करण्यासाठी देव कोरेशला निवडतो
परमेश्वर यरूशलेमला म्हणतो, “तुझ्यात परत लोक राहू लागतील.”
परमेश्वर यहुदातील नगरांना म्हणतो, “तुमची पुनर्बांधणी होईल.”
ज्या शहरांचा नाश झाला, त्या शहरांना परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला परत शहराचे रूप देईन.”
27 परमेश्वर खोल पाण्याला आटून जायला सांगतो “तो म्हणतो की
मी तुमचे झरे सुकवीन.”
28 परमेश्वर कोरेशला म्हणतो, “तू माझा मेंढपाळ आहेस.
मला पाहिजे ते तू करशील.
तू यरूशलेमला म्हणशील, ‘तुझी पुनर्बांधणी केली जाईल.’
तू मंदिराला सांगशील, ‘तुझा पाया परत घातला जाईल.’”
मुक्त केलेल्यांचे गीत
14 मग मी पाहिले, आणि तेथे माइयासमोर कोकरा होता. तो सियोन पर्वतावर [a] उभा होता. त्याच्याबरोबर 1,44,000 लोक होते. त्यांच्या कपाळांवर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते.
2 आणि आकाशातून पुराच्या लाटांचा लोंढा आल्यासारखा आवाज, ढगांचा मोठा गडगडाटाचा आवाज ऐकला. जो आवाज मी ऐकला तो जणू काय अनेक लोक आपल्या वीणा वाजवीत आहेत तसा आवाज होता. 3 ते लोक सिंहासनासमोर आणि चार जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्त करण्यात आलेले, असे 1,44,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही.
4 हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करुन स्वतःला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वतःला शुद्ध राखले. कोकरा जेथे गेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरुन मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिले आहेत. 5 त्यांच्या मुखात असत्य कधी आढलेले नाही, खोटे बोलण्याबद्दल ते निर्दोष होते.
तीन देवदूत
6 मग मी आणखी एक देवदूत हवेत उंच उडताना पाहिला. पृथ्वीवरील लोकांना सांगण्यासाठी म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जमातीच्या लोकांना सांगण्यासाठी त्या देवदूताकडे अनंतकाळचे शुभवर्तमान होते. 7 देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र, व पाण्याचे झरे निर्माण केले, त्या देवाचे भय धरा आणि त्याची स्तुति करा. देवाने न्याय करावा अशी वेळ आली आहे. देवाची उपासना करा.”
8 मग पहिल्या देवदूताच्या मागे दुसरा देवदूत गेला आणि म्हणाला, “तिचा नाश झालेला आहे! बाबेल हे मोठे शहर नष्ट झाले आहे. त्या नगरीने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा द्राक्षारस व देवाचा राग प्यायला लावला.”
9 तिसरा देवदूत पहिल्या दोन देवदूतांच्या मागे गेला. तिसरा देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला: “जो माणूस प्राण्याची आणि प्राण्याच्या मूर्तीची उपासना करतो, त्याला त्याच्या कपाळावर किंवा हातावर प्राण्याची खूण करु देतो, 10 तो मनुष्य देवाच्या रागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकाने पीडले जाईल. 11 आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळासाठी धूर निघेल, जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे. त्यांना रात्र असो किंवा दिवस असो, विश्रांति मिळणार नाही.” 12 याचा अर्थ असा की, देवाच्या पवित्र लोकांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि येशूमधील त्यांचा विश्वास टिकवला पाहिजे.
13 मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला, तो आवाज म्हणाला, “हे लिही: येथून पुढे, जे प्रभूमध्ये मेलेले आहेत, ते त्यांच्या श्रमापासून विश्रांति घेतील.”
आत्मा म्हणतो, “होय, हे खरे आहे. ते लोक आपल्या कठीण कामापासून विश्रांति पावतील. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्याबरोबर राहतील.”
पूथ्वीची कापणी
14 मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा ढग होता. त्या ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता. त्याच्या डोक्यावर सोनेरी मुगुट आणि त्याच्या हातात धारदार विळा होता. 15 मग आणखी एक देवदूत मंदिरामधून बाहेर आला व ढगावर बसलेल्यास मोठ्याने म्हणाला, “तुझा विळा घे व (पृथ्वीवरुन) पीक गोळा कर, कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे फळ पिकले आहे.” 16 मग जो ढगावर बसला होता त्याने त्याचा विळा पृथ्वीवर चालविला. आणि पृथ्वीची कापणी केली.
17 मग दुसरा देवदूत स्वर्गातील मंदिरातून बाहेर आला. या देवदूताकडेसुद्धा धारदार विळा होता. 18 मग आणखी एक देवदूत वेदीकडून आला. या देवदूताचा अग्नीवर अधिकार होता. या देवदूताने धारदार विळा असलेल्या देवदूताला बोलाविले. तो म्हणाला, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षाचे घड काढ. पृथ्वीची द्राक्षे पिकली आहेत.” 19 देवदूताने त्याचा विळा पृथ्वीवर चालवला. देवदूताने पृथ्वीची द्राक्षे गोळा केली आणि देवाच्या क्रोधाच्या घाण्यात टाकली. 20 ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला.
2006 by World Bible Translation Center