M’Cheyne Bible Reading Plan
भोंदू संदेष्टे
13 “स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा भोंदू संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. 2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. 3 पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल. 4 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याच्याविषयी आदर बाळगा. त्याच्या आज्ञा पाळा. आणि त्याने सांगितलेले ऐका. त्याची सेवा करा. त्याचा त्याग करु नका. 5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तो तुम्हाला तुमच्या परमेश्वर देवापासून विचलीत करतो आहे. तुम्ही मिसर देशात गुलाम होतात तेव्हा आपल्या परमेश्वरानेच तुम्हाला तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही त्याचे निर्मूलन करा.
6 “तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल 7 तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे जे लोक आहेत त्यांचे हे दैवत होत.) 8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची कणव येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला संरक्षण देऊ नका. 9-10 त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील. कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे. 11 ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की ते ही धास्ती घेतील, आणि अशी दुष्कृत्ये करायला धजावणार नाहीत.
12 “तुम्हाला राहाण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की 13 तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. ‘आपण अन्य दैवतांची सेवा करु या’ असं म्हणून ते इतरांना बहकवत आहेत. (ही दैवते तुम्हाला अपारिचित असतील.) 14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याचा आधी पूर्ण शहानिशा करुन घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले 15 तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा. 16 मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करुन शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करुन टाका. तो आपल्या परमेश्वराचा होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधी ही वसवता कामा नये. 17 ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे,म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वतःसाठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्याला तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. 18 तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.
देवाची पवित्र प्रजा: इस्राएल लोक
14 “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर शोक प्रदर्शित करायला अंगावर वार करुन घेणे, क्षौर करणे असे करु नका. 2 कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने जगभरातून तुमची निवड केली आहे.
काय खावे, काय खाऊ नये याचे संकेत
3 “परमेश्वराला ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका. 4-5 गाय-बैल, शेळ्या, मेंढ्या, सांबर, हरीण, भेकर, चितळ, रोही, गवा, रानमेंढा हे खाऊ शकता. 6 दुभंगलेल्या खुरांचा [a] आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे. 7 पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत. 8 डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहेत पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तोही अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मेलेल्या डुकराला स्पर्शही करु नका.
9 “जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा. 10 पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय.
11 “कोणताही शुद्ध पक्षी खा. 12 पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या, 13 गीध, ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी, 14 कोणत्याही जातीचा कावळा, 15 शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा, 16 पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड, 17 पाणकोळी, गिधाड, करढोख, 18 बगळा, सर्व प्रकारचे करकोचे, टिटवी, वाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये.
19 “पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत. 20 पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही.
21 “नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्याला तो खायला हरकत नाही. किंवा त्याला तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात.
“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका.
दहावा हिस्सा देण्याविषयी नियम
22 “दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. 23 मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवी, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल तुमच्या मनात सतत आदर राहिल. 24 पण एखादेवेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हाला शक्य होणार नाही. असे झाले तर, 25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून परमेश्वराने निवडलेल्या जागी जा. 26 त्या पैशाने तुम्ही गायीगुरे, शेळ्या मेंढ्या, द्राक्षारस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या. 27 हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यात सामील करुन घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही.
28 “दर तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा. 29 लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला सर्व कार्यात आशीर्वाद देईल.
99 परमेश्वर राजा आहे
म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2 सियोन मधला परमेश्वर महान आहे.
तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
देवाचे नाव भीतीदायक आहे.
देव पवित्र आहे.
4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 देव उंच ढगांतून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
आणि देवाने त्यांना नियम दिले.
8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
धन्यवाद स्तोत्र.
100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
आपण त्याची मेंढरे आहोत.
4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5 परमेश्वर चांगला आहे.
त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
दाविदाचे गीत
101 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन,
परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
2 मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन.
परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
3 मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही.
जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो.
मी तसे करणार नाही.
4 मी प्रामाणिक राहीन.
मी वाईट कृत्ये करणार नाही.
5 जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणे वाईट गोष्टी बोलत
असेल तर मी त्या माणसाला थांबवेन.
मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि
ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
6 ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन
आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन.
जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
7 मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही.
मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
8 मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन.
दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.
परमेश्वर निर्माता आणि चिरंजीव आहे
41 परमेश्वर म्हणतो,
“दूरवरच्या देशांनो, शांत व्हा आणि माझ्याकडे या.
राष्ट्रांनो, शूर व्हा,
येऊन माझ्याशी बोला.
आपण एकत्र जमून कोणाचे
बरोबर आहे ते ठरवू.
2 माझ्या पुढील प्रश्नांना उत्तरे द्या:पूर्वेकडून येणाऱ्या माणसाला कोणी उठविले?
चांगुलपणा त्याच्याबरोबर आहे.
तो त्याच्या तलवारीच्या जोरावर राष्ट्रांना पराभूत करतो मग त्यांची जणू माती होते.
तो तीर सोडतो आणि राजांना जिंकतो.
वाऱ्याने गवताची काठी उडावी तसे ते दूर पळतात.
3 तो सैन्याचा पाठलाग करतो पण त्याला कधीच ईजा होत नाही
पूर्वी कधीही न गेलेल्या ठिकाणी तो जातो.
4 ह्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले?
सुरवातीपासून लोकांना कोणी बोलाविले?
मी, परमेश्वराने, या गोष्टी केल्या आरंभापासून
मी म्हणजे परमेश्वर आहे, आरंभापूर्वीही मी येथे होतो
आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन.
5 अती दूरच्या सर्व स्थळांनो,
पाहा आणि भिऊन असा!
पृथ्वीवरच्या दूरवरच्या सर्व ठिकाणांनो,
भीतीने थरथर कापा! इकडे
या आणि माझे ऐका.”
आणि ते आले.
6 “कामगार एकमेकांना मदत करतात. ते बळकटी येण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देतात. 7 एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”
फक्त परमेश्वरच आपले रक्षण करू शकतो
8 परमेश्वर म्हणतो, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस.
याकोब, मी तुझी निवड केली.
तू अब्राहामच्या वंशातील आहेस. आणि अब्राहामवर प्रेम केले.
9 पृथ्वीवर खूप लांब,
दूरच्या देशात होतास,
पण मी तुला बोलाविले
व सांगितले, ‘तू माझा सेवक आहेस.’
मी तुझी निवड केली
आणि मी कधीच तुझ्याविरूध्द् गेलो नाही.
10 काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे,
घाबरू नकोस, मी तुझा देव आहे.
मी तुला मदत करीन.
मी माझ्या चांगुलपणाच्या
उजव्या हाताने तुला आधार देईन.
11 बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत.
पण ते लज्जित होतील.
तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.
12 तू तुझ्याविरूध्द् असणाऱ्या लोकांना शोधशील
पण ते तुला सापडू शकणार नाहीत.
ते संपूर्णपणे नाहीसे होतील.
13 मी परमेश्वर तुझा देव आहे,
मी तुझा उजवा हात धरतो आहे,
मी तुला सांगतो:
‘घाबरू नकोस मी तुला मदत करीन.’
14 बहुमोल यहुदा, घाबरू नकोस.
इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका.
मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.”
परमेश्वराने स्वतःच ह्या गोष्टी सांगितल्या.
“जो तुम्हाला वाचवितो तोच
इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.
15 मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे.
त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत.
शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात.
त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल.
तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.
16 तुम्ही त्या फेकून द्याल
आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील.
नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल.
तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.
17 “गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात.
पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत.
त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे.
मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन.
मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
18 वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन
आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन.
मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन.
त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
19 वाळवंटात गंधसरू, बाभूळ, ऑलिव्ह (तेल) सरू, देवदारू
आणि भद्रदारू हे वृक्ष वाढतील.
20 लोक हे सर्व पाहतील
आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामुळेच
हे सर्व झाले आहे हे त्यांना कळेल.
हे सर्व घडवून आणणारा एकमेव पवित्र (देव) आहे
हे लोकांना, हे सर्व पाहिल्यावर कळेल.”
परमेश्वराचे खोट्या देवांना आवाहन
21 परमेश्वर, याकोबाचा राजा म्हणतो, “या आणि तुमचे काय मुद्दे आहेत ते मला सांगा तुमचे त्याबद्दलचे पुरावे मला दाखवा आणि मग आपण काय बरोबर आहे ते ठरवू. 22 तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे व काय घडत आहे ते सांगावे. सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल. 23 काय घडेल हे समजण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही पाहाव्या ते आम्हाला सांगा. मग आमचा तुमच्यावर खरोखरचे देव म्हणून विश्वास बसेल. काहीतरी चांगले किंवा वाईट करा म्हणजे आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आहात, जिवंत आहात हे दिसेल व आम्ही तुम्हाला अनुसरू.
24 “बघा! तुम्ही शून्य किंमतीचे आहात तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त कवडी किंमतीची माणसेच तुमची पूजा करू इच्छितात.”
परमेश्वर, स्वतःच खरा परमेश्वर आहे, हे सिध्द् करतो
25 “मी उत्तरेकडील एका माणसाला [a] उठविले
तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे.
तो माझी उपासना करतो.
कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.
26 “हे सर्व घडण्यापूर्वी आम्हाला कोणी सांगितले?
त्याला आम्ही देव म्हणावे, तुमच्या कोणत्या मूर्तीने हे सांगितले का?
नाही. त्या मूर्तीपैकी कोणीही आम्हाला काहीही सांगितले नाही.
त्या मूर्ती एक शब्दसुध्दा् बोलत नाहीत.
आणि आपण बोललेले ते खोटे देव ऐकू शकत नाहीत.
27 सियोनला ह्या गोष्टीबद्दल सांगणारा पहिला मी म्हणजेच परमेश्वर आहे.
मी यरूशलेमला दूताबरोबर संदेश पाठविला.
‘पाहा! तुझे लोक परत येत आहेत.’
28 मी त्या खोट्या देवांना पाहिले.
काहीही सांगण्याइतके
ते शहाणे नाहीत.
मी त्यांना प्रश्न विचारले,
पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.
29 ते सगळे देव कवडीमोलाचे आहेत.
ते काही करू शकत नाहीत.
त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत.
दोन साक्षीदार
11 मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली. आणि मला सांगण्यात आले, “जा आणि देवाचे मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर. 2 पण बाहेरचे अंगण सोडून दे. त्याचे मोजमाप करु नको. कारण ते विदेशी लोकांना दिलेले आहे. ते बेचाळीस महिने पवित्र शहर तुडवितील. 3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन. ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रे [a] घालतील.”
4 हे दोन साक्षीदार म्हणजे दोन जैतुनाची झाडे आहेत. आणि पृथ्वीच्या प्रभुसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत. 5 जर एखाद्या व्यक्तीने त्या साक्षीदारांना दुखविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करीत राहत असे. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करीत असे त्याला अवश्य मरावे लागे. 6 या साक्षीदारांना ते संदेश देत असताना पाऊस पडला तर तो थांबविण्याचे सामर्थ्य आहे. त्या साक्षीदारांना पाण्याचे रक्त करण्याचे सामर्थ्य आहे. पृथ्वीवर प्रत्येक प्रकारचे संकट पाठविण्याचे सामर्थ्य आहे आणि त्यांना पाहिजे तितके वेळा ते हे करु शकतात.
7 आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाई करील. प्राणी त्यांचा पराभव करील व, त्यांना मारुन टाकील. 8 त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील. त्या शहरांचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहरांच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूला वधस्तंभावर मारण्यात आले. 9 साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे. जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीरांकडे पाहतील. पण त्यांना पुरण्यास नकार देतील. 10 पृथ्वीवर राहणारे लोक त्या दोन साक्षीदारांच्या मृत्यूने आनंद पावतील ते मेजवान्या आयोजित करतील व एकमेकांना भेटी पाठवतील. ते असे करतील कारण या दोन साक्षीदारांनी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना अतोनात क्लेश दिले होते.
11 पण साडेतीन दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला. आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरुन गेले. 12 मग त्या दोन साक्षीदारांनी स्वर्गातून मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला, “इकडे वर या!” मग ते दोन साक्षीदार ढगातून स्वर्गात गेले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना वर जाताना पाहिले.
13 त्याच वेळेला मोठा भूकंप झाला. एक दंशाश शहर नष्ट झाले व भूकंपात सात हजार लोक मारले गेले. जे लोक मेले नाहीत ते खूप घाबरले होते. त्यांनी स्वर्गातील देवाला गौरव दिले.
14 दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.
सातवा कर्णा
15 सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:
“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे.
आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”
16 मग जे चोवीस वडील सिंहासनावर बसले होते, ते आपल्या चेहऱ्यावर पडले व त्यांनी देवाची भक्ति केली. हे वडील देवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले. 17 ते म्हणाले:
“आम्ही तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ प्रभु देवा,
तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास.
आम्ही तुझे उपकार मानतो कारण तुझे महान सामर्थ्य वापरुन
सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस
18 जगातील लोक रागावले
पण आता तुझा राग आला आहे,
आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे.
तुझे सेवक, संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे.
आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे.
जे लहानमोठे लोक तुझा आदर करतात,
त्यांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे.
जे पृथ्वीचा नाश करतात, त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे!”
19 मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट, भूकंप व गारांचे वादळ झाले.
2006 by World Bible Translation Center