M’Cheyne Bible Reading Plan
देवाच्या उपासनेसाठी स्थळ
12 “परमेश्वर हा तुमच्या पूर्वजांचा देव आहे. त्याने दिलेल्या प्रदेशात तुम्ही हे विधी व नियम यांचे पालन काटेकोरपणे करा. 2 आता तेथे असलेल्या राष्ट्रांना घालवून तुम्ही ती जमीन ताब्यात घेणार आहात. तेथील लोकांची सर्व पूजास्थळे तुम्ही नेस्तनाबूत करुन टाका. उंच पर्वत, टेकड्या, हिरवीगार झाडी अशा बऱ्याच ठिकाणी ही पूजास्थळे विखुरलेली आहेत. 3 तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.
4 “ते लोक करतात तशी तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची उपासना करु नका. 5 तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वसाहतीतून एक विशिष्ट स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा. 6 तेथे तुम्ही आपापले होमबली, यज्ञबली, आपल्या पिकांचा व जनावरांचा एक दशांश हिस्सा, काही खास भेटी, नवस फेडण्याच्या वस्तू, खुशीने अर्पण करायच्या वस्तू तसेच आपल्या पाळीव प्राण्यांना झालेला पहिला गोऱ्हा तुम्ही आणा. 7 आपल्या कुटुंबियासमवेत तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात तुम्ही तेथे भोजन करा. तुम्ही कष्ट करुन जे मिळवलेत त्याच्या आनंदात तेथे तुम्ही सर्वजण सामील व्हा. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व गोष्टी मनासारख्या मिळत आहेत याची आठवण ठेवा.
8 “आतापर्यंत आपण सगळे जशी उपासना करत आलो तशी आता करु नका. इतके दिवस आपण प्रत्येकाच्या मनाला येईल त्याप्रमाणे देवाची उपासना करत आलो. 9 कारण तुमचा देव परमेश्वर देत असलेले हे विसाव्याचे ठिकाण अजून मिळाले नव्हते. 10 पण आता तुम्ही यार्देन नदी पलीकडे परमेश्वर देणार असलेल्या देशात जाऊन राहणार आहात. तेथे तुम्हाला सर्व शत्रूंपासून अभय मिळेल. तुम्हाला स्वस्थता लाभेल. 11 मग परमेश्वर एक ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा-होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा, [a] परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोऱ्हा. 12 येताना आपली मुलेबाळे, नोकरचाकर, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत तुमच्याबरोबर वाटा नाही.) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा. 13 आपले होमबली निष्काळजीपणाने वाटेल त्या ठिकाणी अर्पण करु नका. 14 परमेश्वर तुमच्या वसाहतीत कुठेतरी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या इतर गोष्टी करायला सांगितल्या त्या करा.
15 “तथापी, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. देवदयेने मिळतील तितके आणि हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे. 16 फक्त त्यातले रक्त तेवढे खाऊ नका. ते पाण्यासारखे जमीनीवर ओतून टाका.
17 “आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षारस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे. 18 या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामं पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा. 19 या देशात राहाल तितके दिवस या सगळ्यात लेवींना न चुकता सामील करुन घ्या.
20-21 “तुमच्या देशाच्या सीमा वाढवायचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वचन दिले आहे. तसे झाले की त्याने निवडलेली जागा तुमच्या राहत्या घरापासून लांब पडेल. तेव्हा मांसाची गरज पडली की जे मिळेल ते मांस तुम्ही खा. परमेश्वराने दिलेल्या पशुपक्ष्यांच्या कळपातील कोणताही प्राणी मारलात तरी चालेल. मी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही राहत्या जागी हे मांस हवे तेव्हा खा. 22 हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणीही व्यक्तिने ते खावे. 23 पण रक्त मात्र खाण्यात येऊ देऊ नका. कारण रक्त म्हणजे जीवन आहे. ज्या मांसात जीवनाचा अंश आहे ते खाणे कटाक्षाने टाळा. 24 रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका. 25 परमेश्वराच्या दृष्टिने जे योग्य तेच तुम्ही करावे म्हणजे तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल.
26 “देवाला काही विशेष अर्पण करायचे ठरवले तर तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या त्याच्या जागी तुम्ही जावे. नवस बोललात तर तो फेडायलाही तेथे जा. 27 आपले होमबली म्हणजे मांस व रक्त तेथे वेदीवर अर्पण करा. इतर बळींचे रक्त वेदीवर वाहा. मग त्याचे मांस खा. 28 मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
29 “तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्यांचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांना हुसकावून तुम्ही तेथे राहाल. 30 एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हालाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. ‘या लोकांनी ज्याप्रकारे पूजा केली तशीच मी आता करतो’ असे मनात आणू नका. 31 तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
32 “तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.
97 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते.
दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत.
चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3 अग्नी परमेश्वराच्या पुढे जातो
आणि शत्रूंचा नाश करतो.
4 त्याची वीज आकाशात चमकते.
लोक ती बघतात आणि घाबरतात.
5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात.
ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा
प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात.
ते त्यांच्या “देवाला” नावजतात.
परंतु त्या लोकांना लाज वाटेल.
त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का?
कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस.
तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो.
देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11 चांगल्या लोकांवर प्रकाश
आणि सुख चमकते.
12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
स्तुतिगान
98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
त्याच्याकडे विजय परत आणला.
2 परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
3 त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
4 पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
5 वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
6 कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
परमेश्वराचे गुणवर्णन करा.
7 समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
जोर जोरात गाऊ द्या.
8 नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
9 परमेश्वरासमोर गा.
कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.
इस्राएलची शिक्षा संपेल
40 तुमचा देव म्हणतो,
“माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
2 यरुशलेमशी ममतेने बोला यरुशलेमला सांगा:
‘तुझ्या सेवेचा काळ संपला
तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस.’
परमेश्वराने यरूशलेमला शिक्षा केली.
तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली.”
3 ऐका! कोणीतरी ओरडत आहे,
“परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा.
आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
4 प्रत्येक दरी भरून काढा.
प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा.
वेडेवाकडे रस्ते सरळ करा.
खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
5 मग देवाची प्रभा फाकेल
आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील.
हो! स्वतः परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”
6 एक आवाज आला, “बोल!”
मग माणूस म्हणाला, “मी काय बोलू?”
आवाज म्हणाला, हे बोल: “सर्व माणसे गवतासारखी आहेत.
माणसाचा चांगुलपणा कोवळ्या गवताच्या पात्यासारखा आहे.
7 परमेश्वराकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने
हे गवत सुकते व मरते,
सर्व माणसे गवतासारखी आहेत हेच सत्य आहे.
8 गवत सुकते आणि फुले कोमेजतात
पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.”
तारण: देवाची सुवार्ता
9 सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे.
उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग.
यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे.
घाबरू नकोस.
मोठ्याने बोल.
यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!”
10 परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे
लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील
तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील.
तो त्यांचा मोबदला चुकता करील.
11 ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल.
परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील.
तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.
देवाने जग निर्मिले-तो त्याचे आधिपत्य करतो
12 आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले?
आकाशाचे मोजमाप करण्यासाठी कोणी आपला हात वापरला?
पृथ्वीवरची धूळ वाडग्याने कोणी मापली?
डोंगर आणि टेकड्या तराजूने कोणी तोलल्या?
हे सर्व करणारा परमेश्वर होता.
13 काय करावे हे कोणीही माणसाने परमेश्वराला सांगितले नाही.
त्याने ज्या गोष्टी केल्या, त्या कशा कराव्या हे ही परमेश्वराला कोणी माणसाने सांगितले नाही.
14 परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का?
कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का?
परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का?
कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का?
नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या.
15 हे बघा! राष्ट्र हा परमेश्वराच्या सृष्टीचा फार सूक्ष्म अंश आहे.
राष्ट्र हे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे आहे.
जर परमेश्वराने सर्व राष्ट्रे गोळा करून त्याच्या तराजूच्या पारडयात टाकली
तर ती धुळीच्या लहान लहान कणांप्रमाणे दिसतील.
16 परमेश्वरापुढे होम करायला लबानोनमधील
सर्व झाडेही पुरणार नाहीत.
आणि त्याच्यापुढे बळी देण्यासाठी तेथील
सर्व प्राणी मारले तरी अपुरेच पडतील.
17 तुलनेने देवापुढे जगातील सर्व राष्ट्रे म्हणजे काहीच नाहीत.
देवाच्या तुलनेत जगातील सर्व राष्ट्रांची किंमत शून्य आहे.
लोक देवाची कल्पनाच करू शकत नाहीत
18 देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता.
का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.
19 पण काहीजण लाकूड आणि दगड यांपासून मूर्ती तयार करतात
आणि त्यांनाच देव मानतात.
एक कारागीर मूर्ती तयार करतो.
दुसरा तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या करतो.
20 पायासाठी तो न कुजणारे विशेष
प्रकारचे लाकूड निवडतो.
नंतर तो चांगला सुतार शोधतो
आणि “देवाच्या” मूर्तीसाठी भक्कम पाया तयार करतो.
21 तुम्हाला सत्य नक्कीच माहीत आहे.
नाही का? तुम्ही नक्कीच त्याबद्दल ऐकले आहे.
फार पूर्वी नक्कीच कोणीतरी तुम्हाला ते सांगितले आहे.
ही पृथ्वी कोणी निर्मिली हे तुम्ही जाणता.
22 परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो.
त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत.
त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले.
आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले.
23 तो अधिपतींना निरूपयोगी करतो
आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो.
24 ते राजे (अधिपती) रोपट्यांप्रमाणे आहेत.
जमिनीत लावल्यावर ती रूजायच्या आधीच
देवाच्या जोरदार वाऱ्याने ती “रोपटी” सुकतात
आणि मरतात व वारा
त्यांना गवताच्या काडीप्रमाणे दूर उडवून देतो.
25 पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का?
नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही.”
26 आकाशाकडे पाहा.
हे तारे कोणी निर्मिले?
ही आकाशातील “सेना” कोणाची निर्मिती आहे.
प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो?
खरा देव फार बलवान व सामर्थ्यवान आहे.
म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.
27 याकोब, हे खरे आहे इस्राएल,
तू ह्यावर विश्वास ठेवावा.
मग तुम्ही “मी कसा जगतो हे परमेश्वराला दिसू शकत नाही.
देव मला शोधून शिक्षा करणार नाही.
असे का म्हणता?”
28 परमेश्वर देव फार सुज्ञ आहे,
हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे.
देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही.
परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही.
जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली.
परमेश्वर चिरंजीव आहे.
29 परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो.
तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.
30 तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते.
लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात.
31 पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात,
त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात.
ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.
देवदूत आणि लहान गुंडाळी
10 मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. 2 त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. 3 आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्द उच्चारले.
4 जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.”
5 मग ज्या देवदूताला मी समुद्रात व जमिनीवर पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला. 6 जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणखी विलंब होणार नाही! 7 पण जेव्हा सातवा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल त्या दिवसात देवाची गुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे (भविष्यवदी) त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल.”
8 तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.”
9 म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.” 10 मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले. 11 तेव्हा मला सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.”
2006 by World Bible Translation Center