M’Cheyne Bible Reading Plan
परमेश्वराची आठवण ठेवा
11 “म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा. 2 त्याने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हांलाच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी यापैकी काहीच पाहिले, अनुभवले नाही. त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रम तुम्ही पाहिलेले आहे. 3 मिसरचा राजा फारो व त्याचा सर्व देश यांच्या विरुध्द त्याने कोणती कृत्ये केली हे तुम्ही पाहिलेच आहे. 4 मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले. 5 तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हाला त्याने कसे आणले हे तुम्हाला माहीत आहेच. 6 त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले. 7 परमेश्वराची ही महान कृत्ये तुमच्या मुलांनी नाही, तर तुम्ही पाहिलीत.
8 “तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा. त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल. 9 त्या देशात तुम्ही चिरकाल राहाल. तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या वंशजांना हा प्रदेश द्यायचे परमेश्वराने वचन दिले आहे. या प्रदेशात सुबत्ता आहे. 10 तुम्ही जिथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही पेरणी झाल्यावर भाजीचा मळा शिंपावा तसे पायाने कालव्याचे पाणी ओढून देत होता. 11 पण आता मिळणारी जमीन तशी नाही. इस्राएलमध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते. 12 तुमचा देव परमेश्वर या जमिनीची काळजी राखतो. वर्षांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची या जमिनीवर कृपादृष्टी असते.
13 “परमेश्वर म्हणतो, ‘ज्या आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मनःनःपूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा. 14 तसे वागलात तर तुमच्या भूमिवर मी योग्य वेळी पाऊस पाडीन. म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस, तेल यांचा साठा करता येईल. 15 माझ्यामुळे तुमच्या गुराढोरांना कुरणात गवत मिळेल. तुम्हाला खाण्याकरीता पुष्कळ असेल.’
16 “पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका. 17 तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल.
18 “म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या ह्रदयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधा व कपाळावर लावा. 19 आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. 20 घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा. 21 म्हणजे जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला त्या देशात तुम्ही आणि तुमची मुलेबाळे पृथ्वीवर आकाशाचे छप्पर असेपर्यंत राहाल.
22 “मी सांगतो त्या सर्व आज्ञा नीट पाळा. परमेश्वर तुमचा देव ह्याजवर प्रेम करा. त्याने सांगितलेल्या मार्गाने जा. त्याच्यावरच निष्ठा ठेवा. 23 म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तेथील इतर राष्ट्रांना तो तेथून हुसकावून लावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सामर्थ्यवान राष्ट्रांवर तुम्ही ताबा मिळवाल. 24 जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल. 25 कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांना तुमची दहशत वाटेल.
इस्राएल पुढचे पर्याय: आशीर्वाद किंवा शाप
26 “आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा. 27 आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याचा ज्या आज्ञा तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. 28 पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळलात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितलेल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही.
29 “तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लौकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा. 30 हे डोंगर यार्देन नदीच्या पलीकडे, अराबात राहाणाऱ्या कनानी लोकांच्या प्रदेशात, पश्चिमेकडे गिलगाल शहराजवळच्या मोरे येथील ओक वृक्षांजवळ आहेत. 31 तुम्ही यार्देन नदी पार करुन जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यात वस्ती कराल तेव्हा 32 मी आज सांगितलेले नियम, विधी यांचे पालन करा.
95 चला, परमेश्वराची स्तुती करु या.
जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
2 परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या.
त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
3 का? कारण परमेश्वर मोठा देव आहे,
इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
4 सगळ्यांत खोल दऱ्या आणि
सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
5 महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्मिर्ण केला.
देवाने स्वःतच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
6 चला, आपण त्याची वाकून उपासना करु या.
ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
7 तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे.
आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ.
8 देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात
जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
9 तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली,
त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो
आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे.
त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की
ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”
96 परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा.
सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.
2 परमेश्वराला गाणे गा.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
चांगली बात्तमी सांगा.
तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
3 लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे.
देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.
4 परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे.
तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे.
5 इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत.
पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला.
6 त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते.
देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
7 कुटुंबानो आणि राष्ट्रांनो,
परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा.
8 परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा.
तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा.
9 परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा.
पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो.
10 सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही.
परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.
11 स्वर्गांनो, सुखी राहा!
पृथ्वीमाते आनंदोत्सव कर.
समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.
12 शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा.
जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा.
13 परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा.
परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
बाबेलचे दूत
39 त्या वेळेला, बलदानचा मुलगा मरोदख बलदान बाबेलचा राजा होता. मरोदखने हिज्कीयाच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बरे होण्याविषयी ऐकले, म्हणून त्याने हिज्कीयाला पत्रे व भेटी पाठविल्या. 2 ह्या भेटींमुळे हिज्कीयाला आनंद झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यातील अगदी खास अशा गोष्टी मरोदखच्या माणसांना पाहू दिल्या. हिज्कीयाने आपली संपत्ती त्यांना दाखविली. त्यात चांदी, सोने, अमूल्य तेले आणि अत्तरे होती. युध्दात वापरलेल्या तलवारी आणि ढालीही हिज्कीयाने त्यांना दाखविल्या. त्याने जमविलेल्या सर्व वस्तू मरोदखच्या माणसांना दाखविल्या. त्याने आपल्या घरातील व राज्यातील सर्व काही दाखविले.
3 संदेष्टा यशया, हिज्कीया राजाकडे गेला आणि त्याने विचारले, “ही माणसे काय म्हणत होती? ती कोठून आली होती?”
हिज्कीया उत्तरला, “ती फार दूरच्या देशातून माझ्याकडे आली होती. ती बाबेलमधून आली होती.”
4 मग यशयाने विचारले, “तुझ्या राज्यात त्यांनी काय काय पाहिले?”
हिज्कीया उत्तरला, “माझ्या राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दाखविली.”
5 यशया हिज्कीयाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराचे म्हणणे ऐक. 6 ‘भविष्यात, तुझ्या पूर्वजांनी आणि तू आतापर्यंत जे जमविले आहे ते सर्व लुटले जाईल आणि बाबेलला नेले जाईल.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले. 7 तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”
8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे हे बोल ऐकायला बरे वाटतात.” (“हिज्कीयाला वाटले मी राजा असताना सगळीकडे शांतता असेल, कसलाही त्रास असणार नाही.” म्हणून तो असे म्हणाला.)
9 पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला, पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांग दऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली. 2 मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊ लागला. बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले
3 मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता. 4 टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांना किंवा झाडांना हानि पोहचवू नये. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांना सांगण्यात आले होते. 5 या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी पाच महिने वेळ दिला होता. अधिकार दिला होता. पण त्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंख मारल्यावर होतात तशा होत होत्या. 6 या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना तो सापडणार नाही. त्यांना मरावेसे वाटेल पण मरण त्यांच्यापासून लपून राहील.
7 युद्धासाठी तयार असलेल्या घोड्यांसारखे टोळ दिसत होते. त्यांच्या डोक्यांवर त्यांनी सोनेरी मुगुटासारखे काही घातले होते. त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे दिसत होते. 8 त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते. त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. 9 त्यांची छाती लोखंडी उरस्त्राणासारखी (चिलखतासारखी) दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज युद्धात वेगाने धावणाऱ्या अनेक घोडयांच्या रथासारखा होता. 10 त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या. लोकांना पाच महिने वेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती. 11 टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहूदी भाषेत त्याचे नाव अबद्दोन, आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन (विध्वंसमूलक) होते.
12 पहिले मोठे संकट आता येऊन गेले होते. आणखी दोन मोठी संकटे येणार आहेत.
सहावा कर्णा वाजतो
13 सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासून येणारा आवाज ऐकला. 14 तो आवाज त्या सहाव्या दूताला ज्याच्याकडे कर्णा होता त्याला म्हणाला, “फरान नदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत सोड.” 15 ते चार देवदूत या घटकेसाठी, या दिवसासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी तयार ठेवले होते. पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकांना मारण्यासाठी हे देवदूत सोडण्यात आले. 16 घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 200,000,000 इतके घोडदळ होते.
17 माझ्या दृष्टान्तात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले, ते अशा प्रकारे दिसत होते: तांबड्या रंगाचे, गडद निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण (चिल खत) होते. घोड्यांची मस्तके सिंहाच्या मस्तकासारखी दिसत होती. घोड्यांच्या तोंडांतून अग्नि, धूर व गंधरस येत होते. 18 घोडयांच्या तोंडातून येणाऱ्या या तीन पीडा-अग्नि, धूर व गंधरस यामुळे पृथ्वीवरील एक तृतीयांश लोक मारले गेले. 19 घोड्यांची शाक्ति त्यांच्या तोंडात तशी त्यांच्या शेपटीतसुद्धा होती. त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते. ते लोकांना जखमी करीत असत.
20 इतर लोकांना या वाईट गोष्टींमुळे मारले गेले नाहीत. पण तरीही या लोकांनी आपली अंतःकरणे व जीविते बदलली नाहीत. आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजे सोने, चांदी, तांबे. दगड आणि लाकूड यांच्या मूर्तींची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत व चालू शकत नाहीत, अशांची भक्ति करण्याचे त्यांनी थांबविले नाही. 21 या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंतःकरणे बदलली नाहीत खून चेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत.
2006 by World Bible Translation Center