M’Cheyne Bible Reading Plan
परमेश्वराची आठवण करा
8 “आज मी दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करा. कारण त्याने तुम्ही जगाल, आणि वाढून एक महान राष्ट्र बनाल. तुमच्या राष्ट्राची भरभराट होईल. तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने कबूल केलेला प्रदेश तुम्ही ताब्यात घ्याल. 2 तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंतःकरणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले. 3 परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले. 4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे झिजले-फाटले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले. 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे.
6 “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल आदर बाळगा. 7 तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत. 8 ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे. 9 येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हाला डोंगरातील तांबे खणून काढता येईल. 10 तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
परमेश्वराची कृत्ये विसरु नका
11 “सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा. 12 त्यामुळे तुम्हाला अन्न धान्याची कमतरता पडणार नाही. चांगली घरे बांधून त्यात राहाल. 13 तुमची गायीगुरे आणि शेळ्या मेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. 14 या भरभराटीने उन्मत्त होऊ नका. आपला देव परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता. परंतु मिसरमधून परमेश्वराने तुमची सुटका केली व बाहेर आणले. 15 विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हाला आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले. 16 तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला नम्र केले. 17 ‘हे धन मी माझ्याट बळावर आणि कुवतीवर मिळवले’ असे चुकूनसुद्धा मनात आणू नका. 18 तुमचा देव परमेश्वर याचे स्मरण ठेवा. त्यानेच तुम्हाला हे सामर्थ्य दिले हे लक्षात ठेवा. त्याने तरी हे का केले? कारण आजच्याप्रमाणेच त्याने तुमच्या पूर्वजांशी पवित्रकरार केला होता, तोच तो पाळत आहे.
19 “तेव्हा आपला देव परमेश्वर ह्याला विसरु नका. इतर दैवतांना अनुसरु नका. त्यांची पूजा किंवा सेवा करु नका. तसे केलेत तर तुमचा नाश ठरलेलाच ही ताकीद मी आत्ताच तुम्हाला देऊन ठेवतो. 20 त्याचे म्हणणे तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या देखत इतर राष्ट्रांचा नाश परमेश्वराने केला तसाच तो तुमचाही करील!
91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून
आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता.
पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा
तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल
आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक
आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
7 तुम्ही 1,000 शत्रूंचा पराभव कराल,
तुमचा उजवा हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल.
तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.
8 तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी
त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.
9 का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता.
परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
10 तुमचे काहीही वाईट होणार नाही.
तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल
आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
12 तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून
ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.
13 तुमच्याजवळ सिंहावरुन आणि
विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
आणि त्यांना वाचवीन.”
अश्शूरची यहुदावर स्वारी
36 हिज्कीया यहुदाचा राजा होता. सन्हेरीब अश्शूरचा राजा होता. हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी सन्हेरीबने यहुदाच्या तटबंदी असलेल्या नगरांविरूध्द् उठाव केला आणि त्यांचा पाडाव केला. 2 सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले. सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला. त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते. परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आणणाऱ्या चराजवळ होता.
3 यरूशलेम मधील तिघेजण सेनापतीशी बोलणी करण्याकरिता गेले. हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम, आसाफचा मुलगा यवाह आणि शेबना हे ते तिघे होत. ह्यातील एल्याकीम हा राजाचा कारभारी होता. यवाह हा राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा होता. तर शेबना राजाचा चिटणीस होता.
4 सेनापती त्या तिघांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीया राजाला अश्शूरचा महान राजा काय सांगतो ते सांगा.
“‘सम्राटाचे म्हणजेच अश्शूरच्या राजाचा असा प्रश्र्न आहे की, तुला मदत मिळावी म्हणून तू कशावर पूर्णपणे विश्वास ठेवतोस? 5 सामर्थ्याच्या व चातुर्याच्या योजना ह्यावर तू विश्वास ठेवत असशील तर ते सगळे पोकळ आहे हे मीच तुला सांगतो. मग तू माझ्याविरूध्द का लढत आहेस? आता मी तुला असे विचारतो की तू तुझ्या मदतीसाठी कोणावर विश्वास ठेवतोस? 6 तू त्यासाठी मिसरवर विसंबतोस का? पण मिसर पिचलेल्या काठीसारखा आहे. तू त्याच्यावर आधारासाठी टेकलास तर तुला फक्त इजा होईल आणि तुझ्या हाताला जखम होईल. मिसरवर मदतीसाठी अवलंबून असलेले कोणीही मिसरचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवू शकत नाही.
7 “‘तू कदाचित् म्हणशील “आम्हाला मदत मिळावी म्हणून मी परमेश्वर, आमचा देव, ह्यावर पूर्णपणे विश्वास टाकतो.” पण मी सांगतो की हिज्कीयाने देवाच्या वेद्या व पूजेसाठी असलेली उच्चासने ह्यांचा नाश केला. हे खरे आहे हो ना? आणि हे ही खरे आहे की हिज्कीयाने यहुदाला आणि यरूशलेमला सांगितले “तुम्ही यरूशलेममध्ये असलेल्या वेदीचीच फक्त पूजा करा.”
8 “‘तुम्हाला अजूनही आमच्याशी लढायचे असेल तर माझा प्रभु, अश्शूरचा राजा, तुमच्याबरोबर एक करार करील. तो असा तुमच्याकडे दोन हजार घोड्यांवर स्वार होऊन लढण्यास पुरेसे घोडेस्वार असतील तर मी तुम्हाला दोन हजार घोडे देईन. 9 पण एवढे केले तरी तुम्ही आमच्या राजाच्या एका गुलामालासुध्दा हरवू शकणार नाही. त्याच्या सर्वांत खालच्या पातळीवर असलेल्या अधिकाऱ्याचाही पराभव करू शकणार नाही. मग तुम्ही मिसरच्या घोड्यांवर व रथांवर का अवलंबून राहता?
10 “‘शिवाय हेही लक्षात ठेवा की मी या देशात येऊन लढलो तेव्हा परमेश्वर माझ्याच बाजूला होता. मी शहरांचा नाश केला तेव्हा परमेश्वर माझ्याच पाठीशी होता. परमेश्वरानेच मला सांगितले, “ऊठ ह्या देशात जा आणि त्याचा नाश कर.”’”
11 एल्याकीम, शेबना व यवाह ह्या यरूशलेममधल्या तिघांनी सेनापतीला सांगितले, “कृपया आमच्याशी अरामी भाषेत बोला. आमच्या यहुदी भाषेत बोलू नका. तुम्ही यहुदी भाषेत बोललात तर कोटावरील लोकांना तुमचे बोलणे समजेल.”
12 पण सेनापती म्हणाला, “माझ्या स्वामीने, मला, ह्या गोष्टी, फक्त तुम्हाला किंवा तुमच्या हिज्कीया राजालाच सांगण्यासाठी पाठविलेले नाही. कोटाच्या भिंतींवर बसलेल्या लोकांनाही हे सांगण्यासाठी मला माझ्या राजाने पाठविले आहे. त्या लोकांनाही पुरेसे अन्न वा पाणी मिळणार नाही. त्यांनाही तुमच्याप्रमाणेच स्वतःची विष्ठा खावी लागेल व स्वतःचे मूत्र प्यावे लागेल.”
13 नंतर सेनापती उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहुदी भाषेत बोलला. 14 सेनापती म्हणाला,
“सम्राटाचे म्हणजे अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका: ‘हिज्कीयाकडून तुम्ही फसवले जाऊ नका. तो तुमचे रक्षण करू शकणार नाही. 15 “परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर तुमचे रक्षण करील. परमेश्वर अश्शूरच्या राजाकडून शहराचा पराभव होऊ देणार नाही.” असे हिज्कीया म्हणेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवू नका.
16 “‘हिज्कीयाचे हे म्हणणे ऐकू नका. अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका. अश्शूरचा राजा म्हणतो, “आपण एक करार करू तुम्ही शहराबाहेर माझ्याकडे यावे. नंतर प्रत्येकाला घरी जाण्यास मोकळीक मिळेल. प्रत्येकाला आपापल्या द्राक्षवेलींची द्राक्षे व आपापल्या अंजिराच्या झाडाची अंजिरे खाण्यास मुभा मिळे. प्रत्येकाला स्वतःच्या विहिरीचे पाणी पिता येईल. 17 मी परत येऊन तुमच्यातील प्रत्येकाला स्वदेशच वाटावा अशा देशात घेऊन जाईपर्यंत तुम्हाला असे राहता येईल. त्या नव्या देशात तुम्हाला चांगले अन्नधान्य व नवे मद्य मिळेल. त्या देशात अन्नधान्य व द्राक्षमळे असतील.”
18 “‘हिज्कीयाकडून फसवले जाऊ नका. तो म्हणतो, “परमेश्वर आपल्याला वाचवील.” पण मी तुम्हाला विचारतो की कोठल्या राष्ट्रतील देवाने आपल्या राष्ट्रातील लोकांना अश्शूरच्या सामर्थ्यापासून वाचाविले आहे? कोणीही नाही. आम्ही त्या प्रत्येकाला पराभूत केले. 19 हमाथ आणि अर्पाद यांचे देव कोठे आहेत? ते हरले आहेत. सफखाईमचे देव कोठे आहेत? तेही हरले. आहेत शोमरोनच्या देवांनी तेथील लोकांना माझ्या सामर्थ्यापसून वाचविले का? नाही. 20 माझ्या सामर्थ्यापासून एखाद्या राष्ट्रातील लोकांना वाचविले आहे अशा एका तरी देवाचे नाव मला सांगा. मी त्या सर्वांचा पराभव केला. म्हणूनच म्हणतो की परमेश्वर माझ्या सामर्थ्यापासून यरूशलेमला वाचवू शकणार नाही.’”
21 यरूशलेममधील लोक अगदी शांत होते त्यांनी सेनापतीला उत्तर दिले नाही. “सेनापतीला उत्तर देऊ नका” असा हुकूम हिज्कीयाने त्यांना दिला होता.
22 नंतर राजाचा कारभारी (हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम) राजाचा चिटणीस (शेबना) व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा (आसाफचा मुलगा यवाह) ह्यांनी आपले कपडे फाडले, (ह्याचा अर्थ त्यांना फार दु:ख झाले होते.) ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले.
The Lamb Opens the Scroll
6 मग मी पाहिले की, कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक उघडला. मी त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एकाला ढगाच्या गडगडाटासारखे बोलताना ऐकले. तो म्हणाला, “ये!” 2 मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा घोडा होता. घोडेस्वाराने धनुष्य धरले होते. त्याला मुगुट देण्यात आला होता. तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला, तो विजय मिळविण्यासाठी निघाला.
3 जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले. तो म्हणाला, “ये!” 4 मी पाहिले तेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला. घोडेस्वाराला पृथ्वीवरुन शांति काढून घेण्याचा अधिकार दिला होता. म्हणजे लोकांनी आपापसांत एकमेकाला ठार करावे. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.
5 जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तेव्हा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले, “ये!” मी पाहिले तेव्हा माझ्यासमोर काळा घोडा होता व घोडेस्वाराच्या हातात तराजू होते असे मला दिसले 6 मग मी जणू काय चारही जिवंत प्राणी बोलल्यासारखा आवाज ऐकला. ते म्हणत होते, “एक किलो गहू एका दिवसाच्या मजुरीइतके, आणि तीन किलो बार्ली एका दिवसाच्या मजुरीइतकी, मात्र तेल व द्राक्षारस वाया घालवू नका.”
7 जेव्हा त्याने चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकला. तो म्हणाला, “ये आणि पाहा!” 8 मी पाहिले तेव्हा माझ्यासमोर फिक्या रंगाचा घोडा मला दिसला. त्यावरच्या घोडेस्वाराचे नाव मृत्यु होते. आणि त्याच्या मागोमाग अधोलोक चालला होता. आणि त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर (पृथ्वीच्या पाव भागावर) लोकांना तरवारीने मारण्याचा, दुष्काळाने आणि पटकीने मारण्याचा व पृथ्वीवरील जंगली हिस्र प्राण्यांकडून मारण्याचा अधिकार दिला होता.
9 जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले. त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते. 10 ते मोठ्या आवाजात म्हणाले, “पवित्र आणि सत्य प्रभु, कोठपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणि आम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस?” 11 त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यात आला. आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत व यांना जसे मारण्यात आले, तसे त्यांनाही मारण्यात येईल व ते पूर्ण होइपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे.
12 मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला, सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्या काळ्या कापडासारखा झाला, पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. 13 ज्याप्रमणे अंजिराचे झाड वारा आला म्हणजे अंजिरे खाली पाडते तसे आकाशातून तारे पृथ्वीवर पडले. 14 जसे गुंडाळी गुंडाळतात तसे, आकाश गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत व बेट त्याच्या स्थानावरुन हलविले गेले.
15 मग सर्व लोक गुहेत, पर्वतांच्या, खडकांच्या मागे लपले. त्यामध्ये जगातील राजे, सत्ताधीश, सेनापती, श्रीमंत लोक आणि सामर्थ्यशाली लोक होते. प्रत्येक व्यक्ति, गुलाम किंवा स्वतंत्र लपून बसली. 16 लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडा. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरुन आम्हांला लपवा. कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा. 17 कारण त्याच्या रागाचा मोठा दिवस आला आहे. त्यासमोर कोणीच टिकाव धरु शकत नाही!”
2006 by World Bible Translation Center