M’Cheyne Bible Reading Plan
परमेश्वराची आज्ञा पाळा व परमेश्वरावर प्रेम करा
6 “तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा त्या ह्याच. ज्या प्रदेशात तुम्ही राहण्यासाठी जात आहात तेथे हे नियम पाळा. 2 तुम्ही व तुमची मुले नातवंडे-सर्वांनी आमरण आपल्या परमेश्वराचा आदर बाळगा. त्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे वागा, म्हणजे दीर्घायुषी व्हाल. 3 इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे भले होईल. तुम्हाला भरपूर संतती होईल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.
4 “हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. 5 आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. 6 मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. 7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा. 8 त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा. 9 दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
10 “अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हांला हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हांला मिळेल. तुम्ही स्वतः वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हाला देईल. 11 उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हाला देईल. तुम्हाला खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हांला देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हाला देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.
12 “पण सावध राहा! परमेश्वराला विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हांला बाहेर आणले. 13 त्याचा आदर ठेवा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने घेऊ नका. 14 तुमच्या आसपासच्या राष्ट्रातील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. 15 तुमचा देव परमेश्वर सतत तुमच्या बरोबर आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वराला आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हाला पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
16 “मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका. 17 त्याच्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा. 18 उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हांला द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यात तुमचा प्रवेश होईल. 19 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.
देवाने जे केले ते मुलांना शिकवा
20 “आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. 21 तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला तेथून बाहेर आणले. 22 त्याने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करुन दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. 23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. 24 ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचा आदर बाळगला पाहिजे. मग तो आपल्याला कायम जीवंत ठेवील व भले करील. 25 जर आपण काळजीपूर्वक परमेश्वराचे सर्व नियम पाळले तर आपण फार चांगली गोष्ट [a] केली आहे असे तो म्हणेल.
एथान एज्राहीचे मास्कील
89 मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन
मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन.
2 परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे.
तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे.
3 देव म्हणाला, “मी निवडलेल्या राजाशी करार केला.
मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले.
4 दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन.
तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.”
5 परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात.
लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात.
पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते.
6 स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही.
“देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशी तुलना होऊ शकत नाही.
7 देव पवित्र लोकांना भेटतो.
ते देवदूत त्याच्या सभोवती असतात.
ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात.
ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
8 सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही.
आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
9 तू गर्वाने समुद्रावर राज्य करतोस
तू त्याच्या क्रोधित लाटांना शांत करु शकतोस.
10 देवा, तू राहाबचा पराभव केलास
तू तुझ्या बलवान बाहूंनी तुझ्या शत्रूंना इतस्तत पांगवलेस.
11 देवा, स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वगोष्टी तुझ्या आहेत, तूच जग
आणि त्यातल्या सर्वगोष्टी निर्माण केल्यास.
12 उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत
आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
13 देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे.
तुझीशक्ती महान आहे.
विजय तुझाच आहे.
14 तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे.
प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.
15 देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत.
ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात.
16 तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते.
ते तुझ्या चांगुलपणाची स्तुती करतात.
17 तू त्यांची अद्भुत शक्ती आहेस.
त्यांची शक्ती तुझ्यापासूनच येते.
18 परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस.
इस्राएलचा पवित्र देव आमचा राजा आहे.
19 तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास आणि म्हणालास,
“मी गर्दीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले.
मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले.
20 माझा सेवक दावीद मला सापडला
आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
21 मी दावीदाला माझ्या उजव्या हाताने आधार दिला
आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही.
दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या
राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन.
मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले,
तो नद्यांना काबूत ठेवेल.
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात
तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन.
तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.
28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल
त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
29 त्याचा वंश सदैव चालू राहील.
स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि
माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
31 जर त्या निवडलेल्या राजाच्या
वंशजांनी माझे नियम मोडले.
32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले
तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.
33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही.
मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
34 मी दावीदाशी झालेला माझा करार मोडणार नाही.
मी आमचा करार बदलणार नाही.
35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे
आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील.
त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील.
आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
38 पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास
आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.
39 तू तुझा करार पाळला नाहीस.
तू राजाचा मुकुट धुळीत फेकून दिलास.
40 तू राजाच्या नगरातील भिंती पाडल्यास.
तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41 लोक जाता जाता त्याच्या वस्तू चोरतात.
त्याचे शेजारी त्याला हसतात.
42 तू राजाच्या सर्व शत्रूंना आनंदी केलेस.
तू त्याच्या शत्रूंना युध्द जिंकू दिलेस.
43 देवा, तू त्यांना स्वःतचे रक्षण करायला मदत केलीस.
तू तुझ्या राजाला युध्द जिंकायला मदत केली नाहीस.
44 तू त्याला युध्द जिंकू दिले नाहीस.
तू त्याचे सिंहासन जमिनीवर फेकलेस.
45 तू त्याचे आयुष्य कमी केलेस.
तू त्याला शरम आणलीस.
46 परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे?
तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का?
तुझा राग अग्नीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का?
47 माझे आयुष्य किती लहान आहे ते लक्षात ठेव
तू आम्हाला छोटे आयुष्य जगण्यासाठी व नंतर मरुन जाण्यासाठी निर्माण केलेस.
48 कोणीही माणूस जगून कधीही मरणार नाही असे होणार नाही.
कोणीही थडगे चुकवू शकणार नाही.
49 देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे?
तू दावीदाला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.
50-51 प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा.
परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले.
त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.
52 परमेश्वराला सदैव दुवा द्या.
आमेन आमेन.
देव त्याच्या शत्रूंना शिक्षा करील
34 सर्व राष्ट्रांनो, जवळ येऊन ऐका. सर्व लोकांनी कान देऊन ऐकावे. पृथ्वी व तीवर राहणाऱ्या सर्व लोकांनी ह्या गोष्टी ऐकाव्या. 2 परमेश्वर सर्व राष्ट्रांवर व त्यांच्या सैन्यांवर रागावला आहे. परमेश्वर त्या सर्वांचा नाश करील. तो त्या सर्वाना मरायला भाग पाडील. 3 त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल व त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल. 4 आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील. 5 परमेश्वर म्हणतो, “माझी आकाशातील तलवार रक्ताने माखेल तेव्हा हे सर्व घडेल.”
पाहा! परमेश्वराची तलवार अदोमला आरपार कापील. परमेश्वराने तेथील लोकांना अपराधी ठरविले आहे आणि त्यांना मेलेच पाहिजे. [a] 6 बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवार माखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्ताने भरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाश करण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे. 7 म्हणून मेंढे, गुरेढोरे व मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल.
8 देवाने शिक्षेची वेळ ठरवली असल्याने ह्या गोष्टी घडून येतील. लोकांनी सियोनवर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे. 9 अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल. 10 आग रात्रंदिवस पेटत राहील. कोणीही ती विझविणार नाही. अदोममधून निघणारा धूर कायमचा राहील. ती भूमी कायमची नाश पावेल. कोणीही, त्या भूमीतून, पुन्हा कधीही प्रवास करणार नाही. 11 पक्षी आणि लहान सहान प्राणी तिचा ताबा घेतील. घुबडे आणि डोमकावळे तेथे वस्ती करतील. त्या भूमीला “रिकामे वाळवंट” [b] असे नाव पडेल. 12 प्रतिष्ठित नागरिक आणि नेते नाहीसे होतील. त्यांना राज्य करायला काहीही शिल्लक राहणार नाही.
13 तेथल्या सुंदर घरांतून काटेकुटे आणि रानटी झुडुपे वाढतील. त्या घरांतून जंगली कुत्रे व घुबडे राहतील. जंगली प्राणी तेथे वस्ती करतील. तेथे वाढलेल्या गवतात मोठमोठे पक्षी घरटी बांधतील. 14 रानमांजरे तरसांबरोबर तेथे राहतील. रानबोकड आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचरांना विश्रांतीचे ठिकाण मिळेल. 15 साप तेथे वारूळे करतील आणि अंडी घालतील. अंडी फुटून छोटे छोटे साप त्या अंधाऱ्या जागेत वळवळतील. स्त्रिया जशा घोळक्याने आपल्या मैत्रिणींना भेटायला जातात, तशीच गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास गोळा होतील.
16 परमेश्वराच्या पाटीकडे पाहा. त्यावर लिहिलेले वाचा त्यातून काहीही सुटलेले नाही. ते प्राणी सर्व एकत्र येतील असेच त्यावर लिहिले आहे. मी त्यांना एकत्र आणीन. असे देव म्हणाला म्हणून देवाचा आत्मा त्यांना एकत्र करील. 17 त्यांचे काय करायचे ते देवाने ठरविले, नंतर देवाने त्यांच्यासाठी जागा निवडली. देवाने रेघ काढून त्यांना त्यांची जागा दाखविली. ते प्राणी ती जागा कायमची व्यापतील. वर्षांनुवर्षे ते तेथे राहतील.
योहान स्वर्ग पाहतो
4 तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.” 2 त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर सिंहासन होते. कोणी एक त्यावर बसलेले होते. 3 त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि सिंहासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते.
4 सिंहासनाभोवती चोवीस आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुगुट असलेले चोवीस वडील बसले होते. 5 सिंहासनापासून विजा व भिन्न आवाज निघत होते. शिवाय गडगडाट निघत होते. सिंहासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. 6 तसेच सिंहासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते.
मध्यभागी, सिंहासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते डोळ्यांनी भरले होते. पुढे डोळा, मागे डोळे. 7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता. दुसरा बैलासारखा होता. तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता. आणि चवथा उडत्या गरुडासारखा होता. 8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते. दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते:
“पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ
जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”
9 जेव्हा जेव्हा ते जिवंत प्राणी सिंहासनावर बसलेल्याचा गौरव, सन्मान व उपकारस्तुति करीत होते आणि व जो सिंहासनावर बसलेला होता तो अनंतकाळपर्यंत जगत राहणारा आहे, 10 तेव्हा तेव्हा जो सिंहासनावर बसला होता आणि अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्यासमोर चोवीस वडील पाया पडत होते आणि त्याची उपासना करीत होते. ते आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवत होते. व म्हणत होते की:
11 “आमचा प्रभु आणि देव!
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करुन घेण्यास योग्य आहेस.
तू सर्व काही तयार केलेस
तुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले.”
2006 by World Bible Translation Center