Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 5

दहा आज्ञा

मोशेने सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. ते नीट समजून घ्या आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा. होरेब पर्वताजवळ असताना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्याबरोबर कारार केला होता. हा पवित्र करार आपल्या पूर्वजांशी नव्हता तर आपल्याशीच-आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता. त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून त्याने आपल्याशी संवाद केला. पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाहीत. तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो. परमेश्वर तेव्हा म्हणाला,

‘मी परमेश्वर, तुमचा देव आहे. मिसरमध्ये तुम्ही गुलामीत होतात तेथून मी तुम्हाला बाहेर काढले. तुम्ही आता या आज्ञा पाळा.

‘माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचीही तुम्ही उपासना करता कामा नये.

‘तुम्ही कोणतीही मूर्ती करु नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करु नका. कोणत्याही प्रकारच्या मूर्तीची पूजा किंवा सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या लोकांनी इतर देवांची पूजा करावी ह्याचा मला द्वेष आहे. [a] जे माझ्याविरुध्द पाप करतात ते माझे शत्रू बनतात. त्यांना मी शासन करीन. एवढेच नव्हे तर त्यांची मुले, नातवंडे अशा व पंतवडे चार पिढ्यांना शासन करीन. 10 पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील. [b]

11 ‘तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाचा तुम्ही गैरवापर करु नका. जो गैरवापर करील तो दोषी ठरेल. मग परमेश्वर त्याची गय करणार नाही.

12 ‘शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या आज्ञेप्रमाणे विशेष दिवस म्हणून पाळा. 13 आठवड्यातील सहा दिवस काम करा. 14 पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ विश्रांतीचा दिवस आहे. म्हणून त्या दिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुलं, मुली, अतिथी किंवा दास-दासी, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे. 15 मिसर देशात तुम्ही गुलाम होता याचा विसर पडू देऊ नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला तेथून बाहेर आणले, त्याने तुम्हाला मुक्त केले. म्हणून शब्बाथ नेहमी विशेष दिवस म्हणून पाळा, ही तुमचा देव परमेश्वर ह्याचा आज्ञा आहे.

16 ‘आपल्या आईवडलांचा आदर ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.

17 ‘कोणाचीही हत्या करु नका.

18 ‘व्यभिचार करु नका.

19 ‘चोरी करु नका.

20 ‘आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष [c] देऊ नका.

21 ‘दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दास दासी, गुरे-गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.’”

लोकांना देवाची दहशत

22 पुढे मोशे, म्हणाला, “ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हाला मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वताशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिली.

23 “पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकलीत. तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले. 24 आणि म्हणाले, ‘आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्याला प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव माणसाशी बोलला तरी माणूस जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे. 25 पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरु. तो भयंकर अग्नी आम्हाला बेचिराख करील. आणि आम्हाला मरायचे नाही. 26 साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणी ही नाही. 27 तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हाला सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.’

परमेश्वराचा मोशेशी संवाद

28 “हे तुमचे बोलणे परमेश्वराने ऐकले. तो मला म्हणाला, ‘मी सर्व ऐकलेले आहे आणि ते ठीकच आहे. 29 ते माझ्याशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.

30 “‘त्यांना म्हणावे तुम्ही परत आपापल्या जागी जा. 31 पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.’

32 “तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा. 33 तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हाला वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.

स्तोत्रसंहिता 88

कोरहाच्या मुलाचे स्तुतीगीत प्रमुख गायकासाठी हेमान एज्राही याचे दुःखद आजाराविषयीचे मास्कील

88 परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस.
    मी रात्रंदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
    दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे.
    मी आता लवकरच मरणार आहे.
लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात.
    मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.
मला तू मृत माणसात शोध.
    मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे.
ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून
    आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
तू मला जमिनीतल्या त्या खड्‌यांत टाकलेस.
    होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.
देवा, तू माझ्यावर रागावला होतास
    आणि तू मला शिक्षा केलीस.

माझे मित्र मला सोडून गेले.
    ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही.
अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात.
    मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
अति दुःखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत.
    परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे.
माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
10 परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का?
    भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.

11 थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत.
    मृत्युलोकांतील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
12 अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत.
    विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.
13 परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे.
    प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
14 परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?
    तू माझे ऐकायला नकार का देतोस?
15 मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे.
    मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
16 परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास
    आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे.
17 दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात.
    मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.
18 आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस.
    केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.

यशया 33

पाप फक्त आणखी पापाला जन्म देते

33 पाहा! तुम्ही युध्द् करता आणि दुसऱ्यांच्या वस्तू चोरता. पण त्यांनी तुमचे काहीही चोरले नाही. तुम्ही दुसऱ्यांविरूध्द् उठता पण त्यांनी तुमच्याविरूध्द् कधीच उठाव केला नाही. म्हणून जेव्हा तुम्ही चोरी करायचे थांबवाल तेव्हा ते तुमच्या वस्तू चोरतील. तुम्ही लोकांविरूध्द् उठाव करायचे सोडाल तेव्हा ते तुमच्याविरूध्द् उठाव करतील. मग तुम्ही म्हणाल:

परमेश्वरा, आमच्यावर दया कर.
    आम्ही तुझ्या मदतीची वाट पाहिली.
परमेश्वरा, रोज आम्हाला शक्ती दे.
    संकटकाळी आमचे रक्षण कर.
तुझा प्रचंड आवाज लोकांना घाबरवितो.
आणि ते तुझ्यापासून दूर पळतात.
    तुझी महानता राष्ट्रांना पळून जाण्यास भाग पाडते.

तुम्ही लोकांनी युध्दात वस्तू चोरल्या. त्या तुमच्याकडून परत घेतल्या जातील. खूप लोक येतील आणि तुमची संपत्ती लुटतील. टोळधाड ज्याप्रमाणे सर्व पीक फस्त करते तसे हे होईल.

परमेश्वर महान आहे. तो उच्च स्थानी राहातो. परमेश्वर सियोनमध्ये प्रामाणिकपणा व चांगुलपणा भरतो.

यरूशलेमा तू श्रीमंत आहेस. देवाच्या शहाणपणात व ज्ञानात तू श्रीमंत आहेत. तू तारणात श्रीमंत आहेस. तू परमेश्वराचा आदर करतो व तेच तुला श्रीमंत करते. म्हणून लक्षात असू दे की तू सतत राहाशील.

पण ऐक! बाहेर देवदूत रडत आहेत. शांती आणणारे दूत फार जोराने रडत आहेत. रस्ते नष्ट केले गेले आहेत. रस्त्यावर कोणीही नाही. लोकांनी केलेले करार मोडले आहेत. साक्षीदारांच्या पुराव्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत. कोणी कोणाला मान देत नाही. भूमी शोक करीत मरणपंथाला लागली आहे. लबानोन मरत आहे आणि शारोन दरी कोरडी व ओसाड झाली आहे. बाशान व कर्मेल यामध्ये एकेकाळी सुंदर झाडे होती. पण आता त्या झाडांची वाढ खुंटली आहे.

10 परमेश्वर म्हणतो, “आता मी उठून माझी महानता दाखवीन. आता मी लोकांना माझे महत्व पटवीन. 11 तुम्ही लोकांनी निरर्थक गोष्टी केल्यात. त्या गोष्टी वाळलेल्या गवताप्रमाणे वा पेंढ्यातील काडीप्रमाणे आहेत. त्यांची किंमत शून्य आहे. तुमचा आत्मा [a] अग्नीप्रमाणे आहे. तो तुम्हाला जाळील. 12 लोकांची हाडे चुन्याप्रमाणे [b] होईपर्यंत म्हणजेच हाडांचा भुगा होईपर्यंत लोक जाळले जातील. काटे आणि वाळलेली झुडुपे ह्यांच्याप्रमाणे चटकन ते जळतील.

13 “दूर देशांत राहणाऱ्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. माझ्याजवळ राहणाऱ्या, लोकांनो, माझे सामर्थ्य जाणा.”

14 सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळ [c] कोणी राहू शकेल का?”

15 हो! पैशासाठी दुसऱ्यांना जे त्रास देत नाहीत असे प्रामाणिक लोक या अग्नीमधूनही वाचतील. ते लोक लाच घेत नाहीत. दुसऱ्याची हत्या करण्याच्या बेताला ते नकार देतात. दुष्कृत्यांच्या योजनांकडे ते पाहण्याचे टाळतात. 16 ते लोक उच्च स्थानावर सुरक्षित राहतील. उंच पर्वतांवरील दुर्ग त्यांचे रक्षण करतील. त्यांना नेहमीच अन्न व पाणी मिळेल.

17 तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल. 18-19 तुम्ही तुमच्या भूतकाळातील संकटांबद्दल विचार कराल. तुम्ही विचार कराल, “ते दुसऱ्या देशातील लोक कोठे ओहेत? ते आम्हाला न समजणारी भाषा बोलत. दुसऱ्या देशातील ते अधिकारी आणि कर गोळा करणारे कोठे आहेत? आमच्या संरक्षक बुरूजांची मोजदाद करणारे हेर कोठे आहेत? ते सर्व नाहीसे झाले.”

देव यरुशलेमचे रक्षण करील

20 आमच्या धार्मिक सणांच्या नगरीकडे सियोनकडे पाहा, विश्राम करण्याच्या सुंदर जागेकडे, यरूशलेमकडे पाहा. यरूशलेम, कधीही न हालणाऱ्या तंबूसारखी आहे. त्याच्या घट्ट रोवलेल्या मेखा कधीही उखडल्या जाणार नाहीत. त्याच्या दोऱ्या कधीही कापल्या जाणार नाहीत. 21-23 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर तेथे आहे. त्या भूमीवर झरे व रूंद पात्रांच्या नद्या आहेत. पण तेथे शत्रूंच्या नावा अथवा जहाजे नसतील. त्या नावांवर काम करणारे तुम्ही लोक दोऱ्या सोडतात तसेच काम सोडू शकाल. तुम्ही डोलकाठी पुरेशी घट्ट करू शकणार नाही. तुम्हाला शीड उभारता येणार नाही का? कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा् युध्दात खूप धन मिळेल. 24 येथे राहणारा कोणीही “मी विटलो आहे” असे म्हणणार नाही. ज्यांना क्षमा केली गेली आहे असेच लोक तेथे राहतात.

प्रकटीकरण 3

सार्दीस येथील मंडळीला

“सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही:

“जो देवाचे सात आत्मे धरतो व सात तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत.

“मला तुमची कामे माहीत आहेत, जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे. पण तुम्ही मेलेले आहात. जागे व्हा! जे उरलेले आहेत आणि मरणाच्या ह्यामार्गावर आहेत त्यांना मजबूत करा. कारण माझ्या देवाच्या दृष्टीने तुमची कृत्ये पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा. आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी एखाद्या चोरासारख येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन.

“तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दीसमध्ये आहेत ज्यांनी स्वतःला स्वच्छ राखले आहे. ते लोक माझ्याबरोबर चालतील. ते पांढरी वस्त्रे घालतील कारण ते पात्र आहेत. प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन, आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

फिलदेल्फिया येथील मंडळीला

“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:

“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.

“मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे. जे कोणीही बंद करु शकणार नाही. मला माहीत आहे की, तू दुर्बळ आहेस, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस. जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीति केली आहे. 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हांला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी होईल.

11 “मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरुन राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये. 12 जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येत आहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन. 13 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

लावदिकीया येथील मंडळीला

14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही:

“जो आमेन [a] आहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.

15 “मला तुमची कामे माहीत आहेत तुम्ही थंडही नाही व गरमही नाही. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी असावे! 16 पण, तुम्ही कोमट असल्याने मी तुम्हांला तोंडातून (थुंकून) टाकणार आहे. 17 तुम्ही म्हणता, मी श्रीमंत आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होत नाही की, तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात. 18 मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घ्या. म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि शुभ्र वस्त्रे विकत घ्या व तुमची लज्जास्पद नग्नता तुम्ही झाका. आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घ्या.

19 “ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना दटावतो व शिस्त लावतो म्हणून कसोशीचे प्रयत्न करावयास लागा आणि पश्चात्ताप करा. 20 मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल.

21 “जो विजय मिळवील त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन ज्याप्रमाणे मी विजय मिळविला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. 22 आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center