Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
अनुवाद 4

परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याविषयी मोशेचा लोकांना उपदेश

“इस्राएल लोकहो, आता मी जे नियम आणि आज्ञा सांगतो ते नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे त्याचा ताबा घ्याल. माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही अधिक-ऊणे करु नका. या तुमचा देव ह्याच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे. त्या तुम्ही पाळा.

“बाआल पौराच्या जे नादी लागले त्यांना परमेश्वराने नष्ट केले. पण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही आज जिवंत आहा.

“परमेश्वराने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत म्हणून मी ते सांगितले. त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. ते हे नियम ऐकून म्हणतील, ‘खरंच, हे महान राष्ट्र (इस्राएल) बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’

“आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे कोणत्या राष्ट्राचे आहे बरे? ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हाला दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे? पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाही तर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरुन जाल. आपल्या मुला नातवंडांना त्याची माहिती द्या. 10 तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी परमेश्वरासमोर उभे होतात तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, ‘मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव. म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल आदर बाळगतील. आपल्या मुलबाळांनाही तशीच शिकवण देतील.’ 11 मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता. 12 परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हाला आवाज ऐकू आला पण दिसले काहीच नाही. फक्त वाणी ऐकू आली. 13 परमेश्वराने आपला पवित्र करार तुम्हाला सांगितला. त्याने तुम्हाला दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हाला आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या. 14 त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होतात तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हाला शिकवण्यास सांगितले.

15 “होरेब पर्वतावरुन अग्रीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्या दिवशी तो तुम्हाला दिसला नाही. कारण त्याला कोणताही आकार नव्हता. 16 तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करुन स्वतःला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका. 17 जमिनीवरील प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी, 18 जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारखीही मूर्ती करु नका. 19 तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना सावध राहा. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तो जगातील इतरांना करु देतो. 20 पण तुम्हाला त्याने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हाला स्वतःचे खास लोक केले. जणू तापलेल्या लोखंडी भट्टीतून त्याने तुम्हाला बाहेर काढले आणि तुम्ही आता त्याचे खास लोक आहा!

21 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने निश्चयाने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या ज्या सुपीक भूमीत तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला मज्जाव आहे. 22 त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या व राहा. 23 तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्रकरार विसरु नका व त्याच्या आज्ञा पाळा. कुठल्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका. 24 कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.

25 “त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहाल. तुमचा वंश वाढेल. तुम्ही म्हातारे व्हाल. आणि मग तुम्ही स्वतःचा नाश ओढवून घ्याल तुम्ही सर्व तऱ्हेच्या मूर्ती कराल. या तुमच्या कृत्यामुळे देव क्रुद्ध होईल. 26 म्हणून मी आत्ताच तुम्हाला सावध करत आहे. स्वर्ग आणि पृथ्वी याला साक्ष आहेत. ही नीच गोष्ट कराल तर तुमचा नाश त्वरीत होईल. तुम्ही त्या प्रदेशात वस्ती करायला यार्देन नदी पार करत आहात. पण मूर्ती केल्यात तर मात्र तुम्ही तेथे फार काळ राहणार नाही. नव्हे, तुमचा सर्वस्वी नायनाट होईल. 27 परमेश्वर देव तुम्हांला वेगवेगळ्या राष्ट्रात विखरुन टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील. 28 तेथे तुम्ही माणसांनी घडवलेल्या दगडी, लाकडी दैवातांची-जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल. 29 परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला, आपल्या देवाला काया वाचा मने शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल. 30 या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या कडेच परतून याल व त्याला शरण जाल. 31 आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्रकरार तो विसरणार नाही.

परमेश्वराच्या महान लीलांचे स्मरण करा

32 “असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर माणूस निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकिवात तरी आहे का? 33 साक्षात अग्नीमधून देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतील घडले आहे? 34 दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या परमेश्वराने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने या महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वतः पाहिले आहे. त्याने आपले सामर्थ्य व प्रताप तुम्हाला दाखवले आहेत. कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांतून तुम्ही गेलात. तुम्ही अनेक चमत्कार व नवलपूर्ण गोष्टी पाहिल्यात. तसेच युद्ध आणि भयानक घटनाही पाहिल्यात. 35 परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. 36 तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.

37 “त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हाला आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला. 38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करुन दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हाला राहाण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.

39 “तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा. 40 आज मी तुम्हाला त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.”

सुरक्षितेसाठी तीन नगरांची निवड

41 मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली. 42 अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, न जाणता एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्याला ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये. 43 ती नगरे अशी: रऊबेनींसाठी रानातील माळावरचे बेसेर. गादींसाठी गिलादमधील रामोथ आणि मनश्शे लोकांसाठी बाशान मधील गोलान.

परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांची मोशेने करुन दिलेली तोंड ओळख

44-45 इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, शिकवण दिली. 46 मोशेने हे निर्बंध त्यांना सांगितले तेव्हा ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते. म्हणजेच हेशबोनचा अमोऱ्यांचा राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात. (मोशे आणि इस्राएलच्या लोकांनी मिसरातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.) 47 त्यांनी हा देश आणि बाशानचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहात असत. 48 आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून थेट सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. 49 यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.

स्तोत्रसंहिता 86-87

दावीदाची प्रार्थना

86 मी गरीब, असहाय्य माणूस आहे.
    परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
परमेश्वरा मी तुझा भक्त आहे.
    कृपा करुन माझे रक्षण कर.
मी तुझा सेवक आहे.
    तू माझा देव आहेस.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर
    मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे.
प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे.
    मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.
प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस.
    तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
    दयेसाठी माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे.
    तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही.
    तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत.
    ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.
10 देवा, तू महान आहेस.
    तू अद्भुत गोष्टी करतोस.
    तू आणि फक्त तूच देव आहेस.
11 परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव.
    मी जगेन व तुझी सत्ये पाळीन.
तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली
    सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.
12 देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
    मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.
13 देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे
    तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस.
14 गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात.
    देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे
    आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
15 प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
    तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
16 देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव.
    तू माझ्यावर दया कर.
मी तुझा दास आहे.
    मला शक्ती दे.
    मी तुझा सेवक आहे मला वाचव.
17 देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव.
    माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील.
    तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

कोरहाच्या मुलाचे स्तुतिगीत

87 देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
    परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.

देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात.
    त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो.
    सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो.
    प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.

देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात.
    ते खूप आनंदी आहेत.
ते गाणी गातात, नाच करतात.
    ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”

यशया 32

नेत्यांनी सज्जन आणि प्रामाणिक असावे

32 मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत. असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल. लोक मदतीसाठी त्याच्याकडे धाव घेतील व त्याचे म्हणणे ते खरोखरच ऐकतील. आता जे लोक गोंधळलेले आहेत त्यांना त्या वेळी सर्व समजून येईल. आता स्पष्ट बोलू न शकणारे लोक त्या वेळी स्पष्टपणे व लवकर बोलतील. दुष्ट आणि अनीतीमान लोकांना कोणी थोर म्हणणार नाही. जे लोक गुप्त योजना करतात त्यांना लोक मान देणार नाहीत.

मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो आणि मनात वाईट गोष्टींचे बेत आखतो. त्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या असतात. तो परमेश्वराबद्दल वाईटसाईट बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही. तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही. तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.

परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.

कठीण काळ येत आहे

तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे. 10 आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.

11 स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा. 12 दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत. 13 माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी व हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.

14 लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा व बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत न राहता गुहेत राहतील. रानगाढवे व मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाण्यास तेथे जातील.

15-16 देव वरून त्याचा आत्मा आम्हांला देईपर्यंत असेच घडत राहील. आता या भूमीवर चांगुलपणा राहिला नाही. ही भूमी जणू वाळवंट झाली आहे. पण भविष्यात, ते वाळवंट कर्मेल प्रमाणे होईल. तेथे योग्य न्याय नांदेल आणि कर्मेल हिरव्यागार रानासारखे होईल. चांगुलपणा तेथे वस्ती करील. 17 तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील. 18 माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.

19 पण ह्या गोष्टी घडण्यापूर्वी जंगल उजाड झालेच पाहिजे, शहराचा पाडाव झाला पाहिजे. 20 तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवांना मोकळे सोडा. व तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.

प्रकटीकरण 2

इफिस येथील मंडळीला

“इफिस येथील मंडळीच्या दूताला हे लिही:

“जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोनेरी दीपसमयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेतः

“तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोस हे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे. माझ्या नावासाठी तू धीर धरलास, माझ्या नावामुळे तू दु:ख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस.

“तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तू तुझी पहिली प्रीति सोडली आहेस. ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा [a] कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करितो.

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे (फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.

स्मुर्णा येथील मंडळीला

“स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही:

“जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला.

“मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.

11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही.

पर्गम येथील मंडळीला

12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:

“ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्येसुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझा विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे.

14 “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. 15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्येसुद्धा काहीजण आहेत. 16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.

17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

“जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल.

थुवतीरा येथील मंडळीला

18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:

“देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत.

19 “मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे. आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे. 20 तरीसुद्धा तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावयास मोहविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करु देता. 21 मी तिला तिच्या अनैतिक लेंगिक पापाविषयी पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे. परंतु ती तसे करायला तयार नाही.

22 “म्हणून मी तिला दु:खाच्या बिछान्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दु:ख भोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्र्चात्ताप पावली नाही 23 तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंतःकरणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन.

24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्या तुम्ही सैतानाची म्हणविलेली खोल गुपिते जाणली नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. 25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरुन राहा.

26 “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन. 27 तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवील मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करील. जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे, check add footnote 28 तसा मीसुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन. 29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center