M’Cheyne Bible Reading Plan
बाशानातील लोकांशी संघर्ष
3 “मग आपण वळसा घेऊन बाशानच्या वाटेने निघालो. तेव्हा एद्राई येथे बाशानचा राजा ओग आणि त्याची सेना युद्धासाठी सामोरी आली. 2 परमेश्वर मला म्हणाला, ‘ओगला भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्याच हाती सोपवणार आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन याचा पराजय केलात तसाच याचाही कराल.’
3 “आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यांचा असा समाचार घेतला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही. 4 मग ओगच्या अखत्यारीतील सर्वच्या सर्व साठ नगरे म्हणजे अर्गेाबचा सारा प्रदेश घेतला. बाशानातले ओगचे राज्य ते हेच. 5 या सर्व नगरांना भक्कम तटबंदी होती. त्यांना उंच भिंती, वेशी, मजबूत अडसर होते. याशिवाय तट नसलेली गावे पुष्कळच होती. 6 हेशबोनच्या सीहोन राजाच्या नगरांप्रमाणेच येथेही आम्ही संहार केला. पुरुष, बायका, मुलंबाळं-कोणालाही म्हणून शिल्लक ठेवल नाही. 7 गुरंढोरं आणि किंमती लूट मात्र घेतली.
8 “अशाच पद्धतीने अमोऱ्यांच्या दोन राजांच्या ताब्यातला प्रदेशही आपण घेतला. तो म्हणजे यार्देनच्या पूर्वेकडचा, आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंतचा. 9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.) 10 माळावरील सर्व नगरे, सगळा गिलाद प्रांत तसेच बाशानच्या ओगच्या राज्यातील सलका व एद्रई सकट सर्व प्रांत आपण काबीज केला.”
11 (रेफाईम लोकांपैकी बाशानचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या रब्बा नगरात तो अजूनही आहे.)
यार्देन नदीच्या पूर्वेकडील वस्ती
12 “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असा-आर्णोन खोऱ्यातल अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे. 13 गिलादाचा उरलेला अर्धा भाग आणि संपूर्ण बाशान मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले.”
(बाशान म्हणजे ओगचे राज्य. त्याच्या एका भागाला अर्गोब म्हणतात. ह्यालाच रेफाईचा देशही म्हणतात. 14 मनश्शेचा मुलगा याईर याने गशूरी आणि माकाथी ह्यांचा सीमेपर्यंतचा अर्गोबचा सर्व प्रदेश हस्तगत केला. त्याच्या नावानेच तो भाग ओळखला जात असे. म्हणून आजही लोक त्याला याईरची नगरेच म्हणतात.)
15 “आणि गिलाद मी माखीराला दिला. 16 त्याचा पुढचा प्रदेश रऊबेनी आणि गादी यांना दिला. आर्णोन खोऱ्याच्या मध्यभागापासून अम्मोन्यांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत त्याची सरहद्द ठरवली. 17 पश्चिमेला यार्देन नदी. उत्तरेला गालिल सरोवर, पूर्वेला पिसागाची उतरण व त्याच्या तळाशी दक्षिणेला मृत समुद्र म्हणजेच क्षार समुद्र.
18 “त्यावेळी मी त्या सर्वांना आज्ञा दिली की यार्देन नदीच्या अलीकडचा हा प्रदेश तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हवाली केला आहे. पण तुमच्यापैकी सर्व लढाऊ पुरुषांनी पुढाकार घेऊन, हत्यारबंद होऊन आपल्या इस्राएली भाऊबंदाना पलीकडे घेऊन जावे. 19 तुमच्या बायका, मुलेबाळे आणि गायीगुरे (ती बरीच आहेत हे मला माहीत आहे) इथेच मी दिलेल्या प्रदेशात राहतील. 20 यार्देन नदी पलीकडचा प्रदेश इस्राएली बांधवांनी ताब्यात घेईपर्यंत त्यांना मदत करा. परमेश्वराच्या कृपेने ते तुमच्या प्रमाणे स्थिरस्थावर झाले की मग तुम्ही आपापल्या प्रदेशात परत या.
21 “मग मी यहोशवाला सांगितले, ‘या दोन राजांचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले हे तू पाहिलेच. पुढेही ज्या ज्या राज्यात तू जाशील त्या सर्वांचे परमेश्वर असेच करील. 22 तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे.’
कनानमध्ये मोशेला प्रवेशबंदी
23 “मग मी माझ्यासाठी काहीतरी विशेष करण्यासाठी परमेश्वराची आळवणी केली. मी म्हणालो, 24 ‘परमेश्वरा, मी तुझा दास आहे. तुझ्या थक्क करुन टाकणाऱ्या पराक्रमाची तू मला फक्त चुणूक दाखवली आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे? 25 तेव्हा कृपा करुन मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.’
26 “पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, ‘पुरे, आता एक शब्दही बोलू नको. 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्व काही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस. 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्याला उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांना पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहाण्यासाठी मिळवून देईल.’
29 “आणि म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”
प्रमुक गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत
85 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव.
याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत.
कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
त्यांची पापे पुसून टाक.
3 परमेश्वरा, रागावणे सोडून दे.
क्रोधित होऊ नकोस.
4 देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे.
आणि आमचा पुन्हा स्वीकार कर.
5 तू आमच्यावर कायमचा रागावणार आहेस का?
6 कृपा करुन आम्हाला पुन्हा जगू दे.
तुझ्या लोकांना सुखी कर.
7 परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि
तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव.
8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले.
तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल,
जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील.
आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.
10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल.
चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.
11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील
आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. [a]
12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल.
जमीन खूप चांगली पिके देईल.
13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल
आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.
इस्राएलने देवाच्या सामर्थ्यावर विसंबावे
31 मदत मागण्यासाठी मिसरमध्ये जाणारे ते लोक पाहा ते घोडे मागतात. घोडे आपला बचाव करतील असे त्यांना वाटते. मिसरमधील रथ आणि घोडेस्वार आपल्याला वाचवतील असा या लोकांचा समज आहे. मिसरचे सैन्य मोठे असल्याने आपण सुरक्षित आहोत असेच त्यांना वाटते. हे लोक इस्राएलच्या पवित्र देवावर विश्वास ठेवत नाही. ते परमेश्वराची मदत मागत नाहीत. 2 पण खरा ज्ञानी परमेश्वर आहे. त्यांच्यावर संकटे आणणारा परमेश्वरच असेल. परमेश्वराची आज्ञा बदलण्याची ताकद लोकांत असणार नाही. पापी लोकांच्याविरूध्द (यहुदाच्याविरूद्द) देव उभा राहील आणि लढेल. ह्या पापी लोकांना मदत करणाऱ्या लोकांविरूध्द म्हणजे मिसरच्या लोकांविरूध्दही देव लढेल.
3 मिसरमधील लोक फक्त माणसे आहेत देव नाहीत. मिसरमधील घोडे फक्त प्राणी आहेत पण आत्मे नाहीत. परमेश्वर स्वतःचा हात लांब करील आणि मदतनीसाचा (मिसरचा) पराभव होईल. त्याची मदत घेणारे लोक (यहुदा) पडतील. त्या सर्व लोकांचा बरोबरच नाश केला जाईल.
4 परमेश्वराने मला सांगितले, “जेव्हा एखादा सिंह किंवा त्याचा छावा, खाण्यासाठी, जनावर पकडतो तेव्हा तो त्या मारलेल्या प्राण्यापाशी उभा राहून डरकाळ्या फोडतो. त्या वेळी कोणीही त्या शक्तिशाली सिंहाला घाबरवू शकत नाही. जरी माणसे आली आणि त्यांनी आरोळ्या ठोकल्या तरी तो सिंह भिणार नाही. लोकांनी कितीही कोलाहल केला तरी तो सिंह पळून जाणार नाही.”
ह्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर खाली उतरून सियोन पर्वतावर येईल. तो तेथे लढेल. 5 पक्षी ज्याप्रमाणे घिरट्या घालून आपल्या घरट्याचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर यरूशलेमचे रक्षण करील. परमेश्वर तिला वाचवील. परमेश्वर यरूशलेमचे “वरून जाऊन” रक्षण करील.
6 इस्राएलच्या मुलांनो, तुम्ही देवाच्याविरूध्द् गेलात. तुम्ही देवाकडे परत यावे. 7 मग, तुम्ही बनविलेल्या सोन्या चांदीच्या मूर्तींची पूजा करणे लोक बंद करतील. त्या मूर्ती तयार करून तुम्ही खरोखरच पाप केले.
8 इस्राएलच्या ईशान्येकडील एकेकाळी शक्तिशाली असलेले हे (अश्शूर) राष्ट्र तलवारीच्या बळावर पराभूत होईल. पण ही तलवार मानवाची नसेल. अश्शूरचा नाश होईल. पण हा नाश मानवाच्या तलवारीने होणार नाही. देवाच्या तलवारीमुळे अश्शूर पळून जाईल. पण त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल. 9 त्याच्या संरक्षणाच्या जागा नष्ट केल्या जातील. त्यांचे नेते पराभूत होतील आणि ते त्यांचा ध्वज सोडून देतील म्हणजेच त्यांची सत्ता नाहीशी होईल. परमेश्वराने या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.
परमेश्वराची शेकोटी (वेदी) सियोनवर आहे. परमेश्वराची भट्टी (वेदी) यरूशलेममध्ये आहे.
योहान या पुस्तकाविषयी सांगतो
1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहे, ते आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी देवाने येशूला हे देवापासून प्राप्त झाले ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला दाखविण्यास सांगितले. 2 योहानाने जे काही पाहिले त्या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली की येशू ख्रिस्ताने हे त्याला सांगितले; देवाकडून आलेला हा संदेश आहे. 3 जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेश ऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत. कारण आता जास्त वेळ उरला नाही.
योहान येशूचा संदेश मंडळ्यांना कळवितो
4 योहानाकडून,
आशिया [a] प्रांतातील सात मंडळ्यांना:
जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हांस कृपा व शांति असो. 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे.
पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले; 6 ज्याने आम्हांला राज्य आणि देवपित्याची सेवा करणारे याजक बनविले त्या येशूला गौरव व सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असोत! आमेन.
7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन.
8 प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा [b] आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”
9 मी योहान आहे, आणि मी तुमचा बंधु आहे. आपण ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि आपण या गोष्टींमध्ये वाटेकरी आहोत. दु:खसहनात, राज्यात, धीराने सहन करण्यात, येशूच्या सत्यात आणि देवाच्या संदेशात मी विश्वासू होतो त्यामुळे मी पात्म [c] नावाच्या बेटावर होतो. 10 प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माझ्या मागे मी एक मोठा आवाज ऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला. 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही, आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”
12 माझ्याबरोबर कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, जेव्हा मी मागे वळालो, तेव्हा मी सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. 13 मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळ झगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता. 14 त्याचे डोके आणि केस बरफासारख्यापांढऱ्या लोकरीप्रमाणे शुभ्र होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. 15 त्याचे पाय भट्टीत गरम झाल्यानंतर चमकणाऱ्या पितळासारखे होते. त्याचा आवाज पुराचे पाणी जसा आवाज करते तसा होता. 16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली. तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.
17 जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे, 18 मी मेलो होतो, पण पाहा; मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत. 19 म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस त्या लिही. ज्या गोष्टी आता घडत आहेत त्या लिही. आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही. 20 जे सात तारे तू माइया हातात पाहिलेस आणि ज्यात सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे: सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.
2006 by World Bible Translation Center