M’Cheyne Bible Reading Plan
इस्राएल लोकांसमोर मोशेचे प्रवचन
1 मोशेने इस्राएल लोकांना हा संदेश दिला. तेव्हा ते सर्व यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात सूफाच्या समोर एकीकडे पारान आणि दुसरीकडे तोफेल, लाबान, हसेरोथ व दी-जाहाब या नगरांच्या मध्ये होते.
2 होरेबा (सिनाई) पासून कादेश-बर्ण्यापर्यंतची वाट सेईर डोंगरांच्या मागे फक्त अकरा दिवसांची आहे. 3 पण इस्राएलांनी मिसर सोडले आणि ते या जागी आले याला चाळीस वर्षे लागली. तेव्हा चाळीसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे जे काही सांगायची आज्ञा केली होती; ते सर्व त्याने सांगितले. 4 अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांना परमेश्वराने ठार मारल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहात असे. ओग बाशानचा राजा होता. तो अष्टेरोथ व एद्रई येथे राहाणारा होता.) 5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पूर्वेला मवाबच्या देशात नियमशास्त्राचे विवरण करु लागला.
6 “मोशे म्हणाला, आपला देव परमेश्वर होरेबात (सिनाई) आपल्याशी बोलला. त्याने सांगितले, ‘या डोंगरातील तुमचे वास्तव्य आता पुरे झाले. 7 आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा. 8 पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे मी वचन दिले होते.’”
अधिकाऱ्यांची नेमणूक
9 मोशे पुढे म्हणाला, “‘तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की मी एकटा तुमचा सांभाळ करु शकणार नाही. 10 आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे. परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे. 11 तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने ती आणखी वाढून आत्ताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळो. 12 पण मी एकटा तुमचा सांभाळ करायला तसेच तुमची आपापसांतली भांडणे सोडवायला असमर्थ आहे. 13 म्हणून मी तुम्हाला सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना प्रमुख म्हणून नेमतो.’
14 “त्यावर ‘हे चांगलेच झाले’ असे तुम्ही म्हणालात.
15 “म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासांवर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
16 “या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करु नका. मग तो वाद दोन इस्राएलींमधला असो की एक इस्राएली व एक उपरा यांच्यातील असो. नीतीने न्याय करा. 17 कोणालाही कमी अधिक लेखू नका. सर्वांना समान लेखा. कोणाचीही भीती बाळगू नका. कारण तुम्ही दिलेला न्याय हा देवाचा आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन. 18 तुमच्या इतर कर्तव्यांबद्दलही मी तेव्हाच तुम्हांला सांगितले होते.
कनानात पाठवलेले हेर
19 “मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो. तेव्हा वाटेत आपल्याला ते विस्तीर्ण आणि भयंकर वाळवंट लागले. ते ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोचलो. 20 तिथे मी तुम्हाला म्हणालो की पाहा, अमोऱ्यांच्या पहाडी प्रदेशात तुम्ही पोचलात. आपला देव परमेश्वर तुम्हाला हा प्रदेश देणार आहे. 21 हा प्रदेश तुमचाच आहे. तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार तो हस्तगत करा. कचरु नका व कशाचीही भीती बाळगू नका.
22 “पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात की, आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू. म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.
23 “मलाही ते पटले. म्हणून प्रत्येक घराण्यातून एक अशी बारा माणसे मी निवडली. 24 ते लोक मग निघाले व पहाडी प्रदेशात जाऊन अष्कोल ओढ्यापर्यंत पोचले. त्यांनी तो देश हेरला. 25 येताना त्यांनी तिकडे होणारी काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले की, आपला देव परमेश्वर देत असलेला हा भूभाग उत्तम आहे.
26 “पण तुम्ही तेथे जायचे नाकारलेत. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेविरुद्ध बंड केलेत. 27 तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात की परमेश्वर आमचा द्वेष करतो. अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले. 28 आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या (12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.
29 “तेव्हा मी तुम्हाला म्हणालो की हताश होऊ नका. त्या लोकांना घाबरु नका. 30 स्वतः परमेश्वर देव तुमचा पाठिराखा आहे. मिसर देशात तुमच्यादेखत त्याने जे केले तेच तो येथेही करील. तुमच्यासाठी लढेल. 31 तिकडे तसेच या रानातल्या वाटचालीतही, माणूस आपल्या मुलाला जपून नेतो तसे त्याने तुम्हांला येथपर्यंत सांभाळून आणले.
32 “तरीही तुम्ही आपल्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला नाही. 33 प्रवासात तो तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
लोकांना कनानात प्रवेश बंदी
34 “परमेश्वराने तुमचे बोलणे ऐकले व तो संतापला. कठोरपणे शपथपूर्वक तो म्हणाला, 35 ‘तुमच्या पूर्वजांना कबूल केलेला हा उत्तम प्रदेश या कृतघ्न पिढीतील एकाच्याही दृष्टीस पडणार नाही. 36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील. त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्याला व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईन. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.’
37 “तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावरही कोप झाला. तो म्हणाला, ‘मोशे, तूही या प्रदेशात प्रवेश करणार नाहीस. 38 पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल. त्याला तू प्रोत्साहन दे कारण इस्राएलांना तोच देश वतन म्हणून मिळवून देईल.’ 39 परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, ‘शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात. ती मात्र या देशात जातील. मी मुलांवर तुमच्या चुकांचे खापर फोडत नाही. कारण बरे वाईट ठरविण्याइतकी ती मोठी नाहीत. 40 पण तुम्ही-तुम्ही मात्र परत फिरुन तांबड्या समुद्राच्या वाटेने रानाकडे कूच करा.’
41 मग तुम्ही मला म्हणालात की आमच्या हातून पाप घडले आहे. आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालात.
तो डोंगराळ भाग सर करणे सहज जमेल असे तुम्हांला वाटले. 42 पण परमेश्वर मला म्हणाला, ‘त्यांना तेथे जाऊन युद्ध करण्यापासून परावृत कर. कारण मी त्यांच्या बाजूचा नाही. शत्रू त्यांना पराभूत करेल.’
43 “त्याप्रमाणे मी त्यांना सांगितले. पण तुम्ही ऐकले नाही. तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीत. आणि धिटाई करुन त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेलात. 44 तेव्हा तेथील अमोरी तुमच्याशी सामना करायला सामोरे आले. आणि चवताळलेल्या मधमाश्यांप्रमाणे त्यांनी सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. 45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे मदतीसाठी याचना केलीत. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. 46 तेव्हा तुम्ही कादेश येथे बरेच दिवस राहिलात.
प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.
81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
2 संगीताची सुरुवात करा.
डफ वाजवा.
सतार आणि वीणा वाजवा.
3 अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
याचवेळी आपला सण सुरु होतो.
4 हा इस्राएल देशाचा नियम आहे.
देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
5 जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
6 देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
7 तुम्ही लोक संकटात होता.
तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
8 “लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
9 परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
आसाफाचे स्तोत्र
82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
5 “काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
यरूशलेमबद्दल देवाचे प्रेम
29 देव म्हणतो, “अरीएलकडे पाहा. तेथे दाविदाने तळ ठोकला होता. त्या शहराची सुटी वर्षानुवर्षे सुरूच आहे. 2 मी अरीएलला शिक्षा केली आहे. त्यामुळे ते शहर दु:ख व शोक यांनी भरून गेले आहे. पण तरीसुध्दा ते माझे अरीएल आहे.
3 “अरीएल, मी तुझ्यासभोवती सैनिक ठेवले आहेत. मी तुझ्याविरूध्द् मोर्चे बांधले आहेत. 4 तुझा पराभव झाला, तुला जमीनदोस्त केले गेले. आता भुताप्रमाणे जमिनीतून येणारा तुझा आवाज मी ऐकतो. तुझे शब्द, धुळीतून आल्याप्रमाणे येतात.”
5 धुळीच्या कणांप्रमाणे खूप परके येथे आहेत. ते क्रूर लोक, वाऱ्यावर उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे आहेत. 6 सर्वशक्तिमान परमेश्वराने भूकंप, मेघगर्जना व मोठा गडगडाट यांच्याद्वारे तुला शिक्षा केली. तेव्हा सगळीकडे वादळे, वावटळी व सर्वनाशक आग पसरली होती. 7 अनेक राष्ट्रे अरीएलविरूध्द् लढली. ते सर्व रात्रीच्या दु:स्वप्नासारखे होते. सैन्यांनी अरीएलला वेढा घातला आणि शिक्षा केली. 8 पण त्या सैन्यांनाही ते स्वप्नासारखेच वाटेल. त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाने अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल.जेंव्हा असा माणूस जागा होतो तेंव्हा तो भुकेलेलाच असतो.तहानलेल्याने पाण्याचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल.तोजागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते. सियोनविरूध्द् लढणाऱ्या राष्ट्रांची अशीच स्थिती आहे. त्या राष्ट्रांना जे हवे आहे ते मिळणार नाही.
9 तुम्ही विस्मित
व आश्चर्यचकीत व्हा.
तुम्ही धुंद व्हाल पण मद्याने नव्हे.
तुम्ही झोक जाऊन पडाल पण दारूने नव्हे.
10 परमेश्वर तुम्हाला झोपेची गुंगी आणील.
परमेश्वर तुमचे डोळे मिटेल. (संदेष्टे हेच तुमचे डोळे आहेत)
परमेश्वर तुमची डोकी झाकील. (संदेष्टे हेच तुमची डोकी आहेत.)
11 हे असे घडेल असे मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला माझे म्हणणे कळणार नाही. माझे शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्याला वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे. मी ते उघडू शकत नाही.” 12 किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”
13 माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत. 14 म्हणून मी शक्तिशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांना विस्मित करीत राहीन. त्यांच्यातील सुज्ञ स्वतःतील शहाणपण गमावतील. त्यांना काही समजू शकणार नाही.”
15 ते लोक परमेश्वरापासून काही लपविण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांची दुष्कृत्ये अंधारात करतात. ते लोक स्वतःशीच म्हणतात, “आम्हांला कोणीही पाहू शकत नाही. आम्ही कोण आहोत हे कोणालाही माहीत नाही.”
16 तुम्ही गोंधळलेले आहात. तुम्हाला वाटते की चिखल व कुंभार सारखेच. तुम्हाला वाटते की एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला सांगेल, “तू मला घडवले नाहीस.” असे म्हणणे म्हणजे मातीच्या भांड्याने कुंभाराला “तुला काही समजत नाही” असे सांगण्यासारखेच होय.
चांगला काळ येत आहे
17 हे सत्य आहे: काही काळानंतर कर्मेलच्या डोंगरावरील भूमीप्रमाणे लबानोनची भूमी सुपीक होईल आणि कर्मेलच्या भूमीवर घनदाट जंगल माजेल. 18 बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल आणि आंधळा अंधारातून आणि धुक्यातून पाहू शकेल. 19 परमेश्वर दरिद्री लोकांना सुखी करील आणि ते लोक इस्राएलच्या पवित्रदेवाबद्दल हर्ष व्यक्त करतील.
20 कोते आणि कंजूष लोक व दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे लोक नाहीसे होतील तेव्हा हे घडून येईल. 21 (हे लोक सज्जनांना खोटे पाडतात. लोकांना न्यायालयात खेचून जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. ते भोळ्या लोकांना उध्वस्त करण्याचा यत्न करतात.)
22 म्हणून परमेश्वर याकोबच्या वंशजांशी बोलतो. (ह्याच परमेश्वराने अब्राहामला मुक्त केले होते.) परमेश्वर म्हणतो, “याकोब, (इस्राएलमधील लोकांनो,) आता तुम्हाला ओशाळवाणे व लज्जित व्हावे लागणार नाही. 23 तो त्याची सर्व मुले पाहील आणि तो माझ्या नावाला पवित्र म्हणेल. मी ह्या मुलांना स्वतःच्या हाताने घडविले आहे आणि ही मुले म्हणतील की याकोबाचा पवित्र देव हा असामान्य आहे. ही मुले इस्राएलाच्या देवाचा आदर करतील. 24 ह्यातील पुष्कळांना काही कळत नव्हते म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांना काही समजले नाही पण ते धडा शिकतील.”
1 वडिलाकडून, [a] माझ्या प्रिय मित्र गायस ज्याच्यावर मी सत्यामध्ये [b] प्रीति करतो त्यास,
2 माझ्या प्रिय मित्रा, जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझे चांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो. 3 जेव्हा काही बंधु आले आणि सत्यात तू सातत्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मला फार आनंद झाला. 4 माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून जितका आनंद मला होतो तितका कशानेही होत नाही.
5 माझ्या प्रिय मित्रा, आपल्या बंधूंच्या परक्यांच्या कल्याणासाठी जे काही करणे तुला शक्य आहे ते तू विश्वासूपणे करीत आहेस. 6 जे बंधु आले व ज्यांनी तू दाखविलेल्या प्रीतिविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, त्यांच्या पुढील वाटचालीकारिता देवाला आवडेल अशा प्रकारे 7 शक्य ते सर्व कर, कारण ते ख्रिस्ताच्या सेवेसाठी दौऱ्यावर निघाले आहेत व अविश्वासणाऱ्यांकडून त्यांनी काहीही स्वीकारले नाही. 8 म्हणून आम्ही विश्वासणाऱ्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे. यासाठी की आम्ही सत्यासाठी एकमेकांचे भागीदार होऊ.
9 मी मंडळीला पत्र लिहिले पण दियत्रेफस ज्याला त्यांचा नेता व्हायचे आहे व जे सांगतो ते तो स्वीकारीत नाही. 10 या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यात भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करीत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करु इच्छितात त्यांना अडथळा करतो, आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
11 माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाइटाचे अनुकरण करु नको. जे चांगले आहे ते जो करतो, तो देवाचा आहे. जो वाईट करतो त्याने देवाला पाहिले नाही.
12 प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व सत्यदेखील तसेच सांगते. आणि आम्ही देखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो, आणि तुम्हांला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
13 मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही. 14 त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. 15 तुझ्याबरोबर शांति असो. तुझे सर्व मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.
2006 by World Bible Translation Center