Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
गणना 34

कनानच्या सीमा

34 परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, “इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या. दक्षिणे कडे अदोमजवळच्या त्सीन वाळवंटाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल. तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करुन ती त्सीन वाळवंटातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल. असमोनहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि भूमध्यसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे भूमध्यसमुद्र (महासमुद्र). तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये). होर पर्वतावरुन ती लेबो-हमासला जाईल व तेथून सदादला. नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा. 10 तुमची पूर्व सीमा एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल. 11 शफामपासून ती अईनच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा गालीली तलावाजवळच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल. 12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.”

13 तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना या आज्ञा दिल्या, “तुम्हाला हा प्रदेश मिळेल. तुम्ही नऊ कुळात आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळात जमिनीची विभागणी करण्यासाठी चिठ्ठ्या टाकाल. 14 रऊबेन आणि गादची कुळे आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांनी आधीच त्यांची जमीन घेतली आहे. 15 त्या अडीच कुळानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडची जागा घेतली आहे.”

16 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 17 “जमिनीची विभागणी करण्यासाठी तुला या माणसांची मदत होईल: याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा. 18 आणि सर्व कुळांचे प्रमुख. प्रत्येक कुळाचा एक प्रमुख असेल. ते लोक जमिनीची विभागणी करतील. 19 प्रमुखांची ही नावे आहेतः

यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.

20 शिमोनेच्या कुटुंबातील अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.

21 बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद.

22 दानी कुटुंबातील यागलीचा मुलगा बुक्की.

23 योसेफच्या वंशातील

मनश्शेच्या कुटुंबातील एफोदचा मुलगा हन्नीएल.

24 एफ्राईम कुटुंबातील शिफटानचा मुलगा कमुवेल.

25 जबुलून वंशातील पर्नाकचा मुलगा अलीसाफान.

26 इस्साखार वंशातील अज्जानचा मुलगा पलटीयेल.

27 आशेरी वंशातील शलोमीचा मुलगा अहीहूद.

28 आणि नप्ताली वंशातील अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.”

29 परमेश्वराने कनानच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली.

स्तोत्रसंहिता 78:38-72

38 परंतु देव दयाळू होता.
    देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
देवाने अनेक वेळा स्वत:चा राग आवरला.
    त्याने स्वत:ला खूप राग येऊ दिला नाही.
39 ती केवळ माणसेच आहेत याची देवाने आठवण ठेवली.
    लोक वाऱ्याप्रमाणे आहेत. तो वाहातो आणि ओसरतो.
40 त्या लोकांनी वाळवंटात देवाला अनेक संकटांत टाकले
    त्यांनी त्याला खूप दु:खी केले.
41 मग लोकांनी पुन्हा पुन्हा देवाच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली,
    त्यांनी इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला खूप दु:ख दिले.
42 ते लोक देवाची शक्ती विसरले.
    देवाने त्यांचा किती वेळा त्यांच्या शत्रूंपासून बचाव केला हे ते विसरले.
43 मिसर देशातल्या चमत्कारा बाबत ते विसरले.
    सोअन प्रांतातला चमत्कारही ते विसरले.
44 देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
    मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.
45 देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले.
    ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले.
    त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.
46 देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली
    आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली.
47 देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला
    आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बर्फाचा उपयोग केला.
48 देवाने गारांच्या वर्षावाने त्यांच्या प्राण्यांचा नाश केला
    आणि त्यांच्या पशुधनावर त्याने वीज पाडली.
49 देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला.
    त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.
50 देवाने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक मार्ग शोधला.
    त्याने त्या लोकांपैकी कुणालाही जगू दिले नाही.
    त्याने त्यांना एका भयंकर रोगाचे बळी केले.
51 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या सर्व पहिल्या मुलांना मारुन टाकले.
    त्याने हाम कुटुंबात जन्मलेल्या पहिल्या मुलांनाही मारले.
52 नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले.
    त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
53 त्याने त्याच्या माणसांना काळजीपूर्वक मार्गदर्शन केले
    देवाच्या माणसांना कशाचीच भीती वाटली नाही.
    देवाने त्यांच्या शत्रूंना लाल समुद्रात बुडविले.
54 देवाने त्याच्या माणसांना त्याच्या पवित्र देशात
    त्याने त्याच्या सामर्थ्याने घेतलेल्या डोंगरावर नेले.
55 देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले.
    देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला.
    देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्वःतचे घर दिले.
56 परंतु त्यांनी सर्वशक्तिमान देवाची परीक्षा घेतली आणि त्याचे त्याला खूप वाईट वाटले.
    त्या लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57 इस्राएलाच्या लोकांनी देवाकडे पाठ फिरवली.
    जसे त्याचे पूर्वज त्याच्याविरुध्द गेले तसेच ते त्याच्या विरुध्द गेले.
    ते वाकवलेल्या धनुष्याप्रमाणे अतिशय वाईट होते.
58 इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले.
    त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.
59 देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला,
    देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले.
60 देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला.
    देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
61 देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले.
    शत्रूंनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले.
62 देवाने त्याच्या माणसांवरचा त्याचा राग व्यक्त केला,
    त्याने त्यांना युध्दात मरु दिले.
63 तरुण माणसे जळून मेली आणि ज्या मुलींशी ते लग्न करणार होते
    त्यांनी विवाहाची गाणी म्हटली नाहीत.
64 याजक मारले गेले पण विधवा
    त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65 शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा,
    खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.
66 देवाने त्याच्या शत्रूंना माघार घ्यायला भाग पाडले आणि त्यांचा पराभव केला.
    देवाने त्याच्या शत्रूचा पराभव केला आणि त्यांना कायमची नामुष्की आणली.
67 परंतु देवाने योसेफाच्या कुटुंबाला झिडकारले,
    देवाने एफ्राईमच्या कुटुंबाचा स्वीकार केला नाही.
68 नाही, देवाने यहुदाच्या कुटुंबाला निवडले,
    देवाने त्याच्या आवडत्या सियोन पर्वताची निवड केली.
69 देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले.
    देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.
70 देवाने दावीदाला स्वत:चा खास सेवक म्हणून निवडले.
    दावीद मेंढ्यांच्या वाड्यांचे रक्षण करीत होता.
    परंतु देवाने त्याला त्याच्या कामापासून दूर नेले.
71 दावीद मेंढ्यांची काळजी घेत होता.
    परंतु देवाने त्याला त्या कामापासून दूर नेले.
देवाने दावीदाला त्याच्या माणसांकडे, याकोबाच्या माणसांकडे,
    इस्राएलाच्या माणसांकडे आणि देवाच्या मालमत्तेकडे लक्ष देण्याचे काम करायला सांगितले.
72 आणि दावीदाने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला,
    त्याने त्यांना शहाणपणाने मार्ग दाखवला.

यशया 26

देवाचे स्तवनगीत

26 त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील

परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे.
    भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्य आहे.
वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण
    मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.

परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना
    आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना,
    तू खरी शांती देतोस.

म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा,
    कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.
पण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील,
    आणि तेथील लोकांना शिक्षा करील.
परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील.
नंतर दीनदुबळे त्याचे भग्नावशेष पायाखाली तुडवतील.

प्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते.
    सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात,
आणि देवा तू तो मार्ग सुकर
    व सुलभ करतोस.
पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत.
    आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.
प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे,
    आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो.
जेव्हा तू न्याय देशील तेव्हा
    लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.
10 पापी माणसावर तू फक्त दयाच करीत राहिलास
    तर तो कधीच सत्कृत्य करायला शिकणार नाही.
वाईट माणूस चांगल्या लोकांत राहिला तरी वाईट गोष्टीच करील:
    दुष्टाला परमेश्वराची महानता कदाचित कधीच कळणार नाही.
11 पण परमेश्वरा, तू त्यांना शिक्षा करण्यास तयार हो.
    नक्कीच ते हे पाहातील नाही का?
परमेश्वरा, तुझ्या लोकांबद्दल असलेले
    तुझे भक्कम प्रेम तू पाप्यांना दाखव.
मग ते नक्कीच खजील होतील.
    तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच
    आगीत भस्मसात होतील.
12 परमेश्वरा, आम्ही तडीस नेलेल्या सर्व गोष्टी
    तूच आमच्यासाठी केल्या आहेस तेव्हा आम्हाला शांती दे.

देव त्यांच्या लोकांना नवजीवन देईल

13 परमेश्वरा, तू आमचा देव आहेस.
    पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना
अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले.
    पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते.
14 ते मृत देव जीवंत होणार नाहीत.
    त्यांची भुते आता उठणार नाहीत.
तू त्यांचा नाश करायचे ठरविलेस
    आणि त्यांची आठवण देणाऱ्या सर्व खाणाखुणा तू नष्ट केल्यास.
15 तुझ्या आवडत्या राष्ट्राला
    तू मदत केलीस.
इतर लोकांना त्या राष्ट्राचा
    पराभव करण्यापासून थांबविलेस.
16 परमेश्वरा, संकटात असताना लोक
    तुझे स्मरण करतात.
तू शिक्षा केल्यास लोक मनात
    तुझा धावा करतात.
17 परमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही.
    प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत.
    ती वेदनेने विव्हळते.
18 त्याचप्रमाणे आम्हाला वेदना आहेत.
    आम्ही जन्म देतो पण तो फक्त वाऱ्याला.
आम्ही जगासाठी नवीन लोक तयार करत नाही.
    आम्ही देशासाठी तारण आणत नाही.
19 परंतु परमेश्वर म्हणतो,
“तुझे लोक मेले असले
    तरी जिवंत होतील.
आमच्या माणसांचे मृतदेह सजीव होतील.
    मृतांनो, थडग्यातून उठा
आणि आनंदित व्हा.
    तुमच्यावर पडलेले दव
हे जणू नव्या दिवसाचा प्रकाश आहे.
    तो प्रकाश नवाकाळ येत आहे हे दाखवितो.
मृत लोकांना आता जमिनीत पुरले आहे
    पण त्यांना नवजीवन मिळेल.”

देवाचा न्याय बक्षिस किंवा शिक्षा

20 माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा.
    दारे लावून घ्या.
थोडा वेळ खोलीतच लपून बसा.
    देवाचा राग शांत होईपर्यंत लपून राहा.
21 परमेश्वर दुष्कृत्यांबद्दल जगातील लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी
    देव आपले स्थान सोडून येईल.
मारल्या गेलेल्या लोकांचे रक्त
    पृथ्वी त्याला दाखवील.

1 योहान 4

खोट्या शिक्षकांविरुद्ध योहानाचा इशारा

प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते (खरोखर) देवापासून आहेत का ते पाहा. मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त या जगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे. आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तो देवापासून नाही. अशी व्यक्ति म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे. तो अगोदरच जगात आला आहे.

माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो.

प्रीति देवापासून येते

प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण जो प्रीति करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे. अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीति दर्शविली: त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. 10 आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्चित्त म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे.

11 प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आम्ही एकमेकांवर प्रीति केलीच पाहिजे. 12 देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीति करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हांवरील प्रीति पूर्णत्वास आणलेली आहे.

13 अशा प्रकारे आम्हांला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो: त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे. 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे. 15 जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ति देवामध्ये रहाते. 16 आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीति आहे.

आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो 17 अशा प्रकारे आमच्याबाबतीत प्रीति पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढविश्वास प्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे. 18 प्रीतीमध्ये कोणतीही भिति नसते. उलट पूर्ण प्रीति भीतीला घालवून देते. प्रीति शिक्षेशी संबंधित आहे. आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही.

19 आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली. 20 जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,” पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही! 21 आम्हांला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center